घरफिचर्ससारांशदोष कपड्यांचा की आपल्या मानसिकतेचा!

दोष कपड्यांचा की आपल्या मानसिकतेचा!

Subscribe

आजच्या २१ व्या शतकात केवळ एखाद्याच्या नग्न असण्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडत असेल तर आपण समाजाला शरीरशास्त्र समजाविण्यात अपयशी ठरलो आहोत हे मान्य करण्याचं धाडस कुणीच करणार नाही. नागा साधूंमुळे सामाजिक स्वास्थ्य खराब होत नाही, पण उर्फीमुळे ते होते, कारण ती स्त्री आहे. किती दुटप्पी भूमिका असावी? स्त्रियांच्या कपड्यांचा बाऊ करून विकृती घोषित करण्यापूर्वी इतिहास त्याबाबत काय सांगतो याचा उहापोह होणे आवश्यक आहे. श्लील-अश्लील या मानवनिर्मित बाबी आहेत, ज्यांचा मानवाच्या शरीराशी नैसर्गिकरित्या संबंध नाही. शेवटी मुद्दा कपड्यांचा नाही तर समाजाच्या सदोष मानसिकतेचा आहे.

–प्रतीक्षा पाटील

अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद राजकीय पटलावर चांगलीच गाजली. भाजप प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उर्फीच्या पेहरावाच्या पद्धतीला ‘नंगटपणा’, विकृती संबोधून तिचे थोबाड फोडण्याचे असंवैधानिक विधान केले. तिच्याविरुद्ध तक्रारही नोंदविली, ज्यावर उर्फीने सडेतोड उत्तरही दिले. परिणाम स्वरूप राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनीही यात उडी घेतली. कालपर्यंत फक्त पेज थ्रीची आवड असणार्‍यांना माहिती असणारी उर्फी अचानक महिला अत्याचार, बलात्कार यापेक्षाही महत्त्वाचा विषय बनली. यानिमित्ताने दररोज भाजप आणि राष्ट्रवादीकडून वैयक्तिक आरोप करत होणार्‍या पत्रकार परिषदांना माध्यमांनी भरपूर प्रसिद्धीही दिली, मात्र सातत्याने उर्फीच्या पेहरावाचा संबंध सामाजिक स्वास्थ्य आणि बलात्काराशी जोडणार्‍या वाघ यांच्या तथ्यहीन बोलण्याचे व्यक्तिस्वातंत्र्याचा आयता दाखला सोडता मुद्देसूद खंडन मात्र कोणतीही महिला प्रतिनिधी करू शकली नाही. अगदी स्वतः उर्फीलादेखील ते जमले नाही. उर्फी प्रकरणात रणकंदन माजवताना सातत्याने नंगानाच चालू देणार नाही म्हणणार्‍या चित्रा वाघ यांची नग्नतेची नेमकी व्याख्या काय, हा प्रश्न एकाही राजकीय प्रतिनिधीला विचारावा वाटला नाही. अगदी आधुनिक विचारांच्या नेत्या म्हणवल्या जाणार्‍या सुषमा अंधारे यांनादेखील नाही?

- Advertisement -

भाजपच्या असल्याने महिलांबाबत भूमिका मांडताना चित्रा वाघ यांच्या विचारात सनातनी वृत्ती नेहमीच झळकते. कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग दिले म्हणून महाविकास आघाडीविरुद्ध रान उठविणार्‍या वाघ यांना ऊर्फीच्या कपड्यांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडते असे वाटणे स्वाभाविक आहे, मात्र हे मांडत असताना बलात्कार पीडितेच्या आईने उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर बंदी आणण्याची मागणी केल्याचे त्या सांगतात. ते महिलांच्या कपड्यांमुळेच त्यांच्यावर बलात्कार होतात या सो कॉल्ड संस्कृती रक्षकांच्या आरोपांचे सरळसरळ समर्थन आहे. आजच्या २१ व्या शतकात केवळ एखाद्याच्या नग्न असण्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडत असेल तर आपण समाजाला शरीरशास्त्र समजाविण्यात अपयशी ठरलो आहोत हे मान्य करण्याचं धाडस कुणीच करणार नाही. नागा साधूंमुळे सामाजिक स्वास्थ्य खराब होत नाही, पण उर्फीमुळे ते होते, कारण ती स्त्री आहे. किती दुटप्पी भूमिका असावी? स्त्रियांच्या कपड्यांचा बाऊ करून विकृती घोषित करण्यापूर्वी इतिहास त्याबाबत काय सांगतो याचा उहापोह होणे आवश्यक आहे.

प्राचीन भारतीय संस्कृतीचा इतिहास पाहिला तर देवदेवतांची आणि देवाच्या अवतारांची नग्न चित्रे, शिल्प, मूर्तींचा वारसा असल्याचे निदर्शनास येते. एक इस्लामचा अपवाद वगळता कोणत्याही धर्मग्रंथात, वेद-पुराणात वस्त्रांची मोजमापे आखून दिलेली नाहीत. मनुवादी विचारसरणीचा पुरस्कार करणारे सनातनी लिंग आणि योनीला पवित्र मानून तिची पूजा करताना दिसतात, जे हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर कुठेही आढळत नाही. कामाख्या देवी मंदिर जे नवसाला पावणारे शक्तिपीठ आहे, तेथे योनी पूजा ही अतिपवित्र आणि त्यातून येणारे रक्त हे शक्तिबीज मानले जाते. नांदेड जिल्ह्यातल्या दशरथेश्वर मंदिराच्या बह्यांगावर असणारी शितला देवीची मूर्तीसुद्धा नग्नावस्थेतच आढळते. खजुराहोच्या लेणीत लैंगिक शिक्षण देणारी कामशिल्पे आणि अजिंठा येथील स्त्री लेण्यांमधील स्त्री सौंदर्याचे अप्रतिम नमुने कोणत्याही अंगाने बीभत्स वाटत नाहीत. उलटपक्षी आपल्यापेक्षा आपले पूर्वज जास्त पुढारलेले होते आणि आपण पुरोगामित्वाचा बुरखा पांघरूनही मनुवादी संस्कृतीच्या प्रभावातून मुक्त झालेलो नाहीत याचा खेद वाटतो.

- Advertisement -

मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातदेखील कपड्यांच्या उपयोगाचा (कपडे म्हणून झाडांची पाने, वेली यांचा वापर) संबंध ऊन, वारा, पाऊस याच्या रक्षणापासूनच आलेला आहे. कापडनिर्मितीचा शोध लागल्यानंतरदेखील जोवर शिवणकामाची कला अवगत झाली नव्हती तोवर अंगाला कापड गुंडाळणे असाच पेहराव होता. हस्तकला, शिवणकला, विणकाम अशी स्थित्यंतरे येत गेल्यानंतर मानवी पोषाखात हळूहळू स्थानिक हवामानानुसार बदल होत गेले आणि त्या-त्या भागाची संस्कृती तयार होत गेली. अनेक आदिवासी जमातींमध्येदेखील महिलांचा कमरेवरचा भाग खुला असणे हाच पेहराव होता, मात्र जसजसा आदिम जमातींचा संबंध जंगलाबाहेरील जगाशी आला तसतसा त्यांच्या पेहरावातही बदल झाला.

पूर्वी केरळमध्ये सर्वच वर्ग आणि वर्णातील स्त्रियांनी केवळ कंबरेभोवती वस्त्र गुंडाळणे ही परंपरा हजारो वर्षे चालली आणि विशेष म्हणजे या ठिकाणी स्त्रीसत्ताक कुटुंब पद्धती असल्याने उत्पन्नाची सर्व संसाधने, व्यापार, आर्थिक व्यवहार महिलांकडे एकवटले होते, मात्र उरोभाग (टॉपलेस) उघडा असणार्‍या महिलांशी व्यापार करणे युरोपियन व्यापार्‍यांना अडचणीचे ठरत होते. कारण या महिला त्यांच्या ‘सदाचारी स्त्री’ या संकल्पनेत बसणार्‍या नव्हत्या. म्हणूनच त्यांनी स्त्रियांच्या कमरेवरचा भाग झाकला जावा या उद्देशाने ‘सन्मानाची शाल’ ही योजना राबवायला सुरुवात केली, जी १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत रुजली, मात्र मूलत: ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती असणार्‍या युरोपीयनांनी केवळ राजघराणे, उच्चवर्णीय, व्यावसायिक स्त्रियांसाठीच ‘सन्मानाची शाल’ हा गौरव आहे असे वातावरण तयार केले. कारण सरसकट दिली तर अंमलबजावणी होणार नाही हे त्यांना ठाऊक होते. हेतू साध्य झाला आणि उच्चभ्रू वर्गातील महिला अंगभर कपडे घालू लागल्या, मात्र दलित महिलांना उरोभाग झाकण्यासाठी ‘ब्रेस्ट टॅक्स’ हा जाचक कर देण्याची प्रथा पडली. सार्‍याच स्त्रिया टॉपलेस होत्या तोवर समाजात लाज नावाची बाब नव्हती, मात्र निम्म्या स्त्रियांनी कपडे परिधान केल्यानंतर सामाजिक दृष्टिकोनातील निखळता हरवली.

उर्फीप्रमाणेच सिनेसृष्टीतील अभिनेत्रींबाबत अंगप्रदर्शन करणारे कपडे हा टॅग लावणारे शरीरशास्त्राबाबतचे अज्ञान आणि वासनांध वृत्तीचे तोकडे प्रदर्शन करतात, तेव्हा सामाजिक स्वास्थ्याचा मुद्दा कुठे जातो? उर्फीचे समर्थन करणार्‍या महिला प्रतिनिधी कपड्यांमुळे बलात्कार होतात ही सडकी मानसिकता पसरविणार्‍यांना तुमच्या वखवखलेल्या नजरांना आवर घाला, अन्यथा डोळे फोडू म्हणायला तरी धजावतील का? आपण जेव्हा सामाजिक स्वास्थ्य या अतिशय संवेदनशील आणि गंभीर विषयाला कपडे कसे घालावेत हे अतिशय गौण असणारे संदर्भ जोडले जातात तेव्हा सामाजिक जडणघडणीतील फोलपणा लक्षात येतो. वंदनीय छत्रपती शिवरायांचा उल्लेख करणार्‍या वाघ शिवरायांनी ‘परस्त्री मातेसमान असावी’ हे तत्त्व अंगीकारून स्त्रियांसाठी सुरक्षित वातावरणदेखील निर्माण केले हे विसरतात? विवस्त्र स्त्रीला पाहून वासनेने पेटत तिला भोगण्यापेक्षा तिच्या अंगावर वस्त्र घालून तिचे रक्षण करणारा समाज अद्याप घडू शकला नाही हा शिवरायांच्या विचारांचा अवमान नाही? आपल्या लेकीबाळी उर्फीपासून काय आदर्श घेतील, हा प्रश्न समाज म्हणून आपण आपल्या लेकीबाळींमध्ये जिजाऊ आणि सावित्रीमाईंचे विचार रुजविण्यात अपयशी ठरलो हे मान्य करायला लावणारा आहे.

स्थळ आणि कालानुरूप आपला वावर असावा. कारण आपल्या कृतीचा समाजघटकांवर प्रभाव पडतो हे नाकारता येणार नाहीच, मात्र स्त्रीदेह अधोरेखित करताना ती वस्तू नसून माणूस आहे. तिलाही माणूस म्हणून वाट्टेल तसं वावरण्याचा निसर्गदत्त अधिकार आहे. अर्थात समाजाचा भाग म्हणून वावरताना भान राखणे आवश्यकच, जे पुरुषांनाही तितक्याच प्रमाणात लागू होते, पण तिने शरीराचा काही भाग उघडा ठेवला म्हणून लगेच तिच्या चारित्र्यावर बोट उचलण्याचा नैतिक अधिकार कुणालाही नाही. श्लील-अश्लील या मानवनिर्मित बाबी आहेत, ज्यांचा मानवाच्या शरीराशी नैसर्गिकरित्या संबंध नाही. नजरेत अश्लीलता घेऊन वावरणार्‍या विकृत समाजाचे स्वास्थ्य बिघडायला अजून काही उरलंय? ज्यात नेहमीच दुय्यम स्थानी राहिलेली स्त्री पुरुषसत्ताक विचारांना बळी ठरत असूनही पुरुषांनी आखून दिलेल्या चौकटीत धन्यता मानते आणि दुसरी कुणी या चौकटीबाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर मनात निर्माण झालेल्या असुयेनं तिलाच सामाजिक स्वास्थ्यासाठी घातक ठरवून बंदिस्त करण्याचा प्रयत्न करते. शेवटी मुद्दा कपड्यांचा नाही तर समाजाच्या सदोष मानसिकतेचा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -