घरफिचर्ससारांशपावरी बिवरी...

पावरी बिवरी…

Subscribe

दिवाळीच्या वेळी तर चक्क तरुण पिढीतील मुली, अहो आजकाल मुलीच काय पण मुलंदेखील पुढे येऊन फराळ बनवायला मदत करतात आणि मग एकमेकांना चिडवत व्हिडीओ बनवतात. ‘ही माझी बहीण आहे, हा तिने बनविलेला लाडू आहे आणि तो खाण्यासाठी आम्ही हातोडा घेऊन पावरी करणार आहोत.’ एकदा तर एका लग्नाच्या समारंभात सगळे अगदी पटापट आवरून, हो चक्क सगळ्या बायका, पुरुष इतकेच काय पण तरुण पिढीतील मुलं, मुली, लहानगे या व्हिडीओसाठी एकत्र आले आणि इतके मग तो परफेक्ट बनविण्यासाठी जे मग्न होऊन गेले की लग्नमंडपातून गुरुजी म्हणाले, चला आता मुहूर्तावर लग्न लावून मग काय ती तुमची पावरी बिवरी करा.

— अर्चना दीक्षित

ये मै हूँ, ये मेरे घरवाले, ये पिछे हमारा पूरा परिवार है, और हमारी पावरी हो रही है। हमम आठवला ना हा व्हिडीओ. अहो, नक्कीच पाहिला असणार आपण सर्वांनी. हा व्हिडीओ किंवा आजकालच्या भाषेत रील सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध झाला होता आणि तो पाहून पार्टी होत नसेल तरी सोशल मीडियाचे प्रेशर म्हणूनदेखील खास घरगुती समारंभ आयोजित करून असा रील बनवून किती कुटुंब सोशल मीडियावर टाकत खूश होतात.

- Advertisement -

पण ही भारी फॅशन आहे बरं का. आणि मी आधी नमूद केल्याप्रमाणे फॅशन ही अनेक प्रकारची आहे बरं का. यात वयोमर्यादा, लिंगभेद, भाषेचीदेखील मर्यादा नाही किंवा कोणती फॅशन या विषयाला कोणतीही मर्यादा नाही हं. हं तर आजचा आपला विषय आहे पावरी हाहा, अहो, मला पार्टीच म्हणायचे होते. ते ओघाओघात तोंडून पावरी आलं पाहा.

तर या पावरी व्हिडीओची फॅशन मधल्या काही काळात जणू थैमान घालत होती. जो येईल तो, ज्याला जमेल तसं पार्टीचे आयोजन करून आपला उत्साह वाढवून हा व्हिडीओ बनविण्यासाठी प्रयत्न करत होता. शिवाय सोशल मीडियावर एकमेकांना टॅग करून हा व्हिडीओ शेअर करत असत.

- Advertisement -

अहो, आता काय सांगू कधीही आमच्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख लक्षात न राहणारे आमचे हे, चक्क आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काही परिवारातील सदस्यांना बोलावून अगदी त्या दिवशी स्वत: सर्व आयोजन करून जणू फॅशनप्रमाणे वागायचे म्हणून हा व्हिडीओ बनवून आमच्या मुलांना पाठवत होते. मला तर बाई आश्चर्य वाटले आणि गंमतदेखील वाटली.
मग काय आमच्या आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून ते ज्या देशात होते, तिथल्या सहकार्‍यांना घरी बोलावून तिथेदेखील हा उत्साह साजरा केला. आणि हो त्यांनी पण इंग्रजी भाषेत व्हिडीओ बनवून पाठवला. ‘This is me, these are my friends, we are celebrating our parents anniversary and our PAWRI is going on’या पावरीच्या व्हिडीओची फॅशन इतकी प्रचलित झाली की कोणत्याही समारंभात, लग्न समारंभ असो की बारसे असो, सणासुदीचे दिवस असो की प्रमोशन असो, अशी पावरी हो हो तेच ते पार्टी करत व्हिडीओ बनवून आपला आनंद पसरवायचा.

दिवाळीच्या वेळी तर चक्क तरुण पिढीतील मुली, अहो आजकाल मुलीच काय पण मुलंदेखील पुढे येऊन फराळ बनवायला मदत करतात आणि मग एकमेकांना चिडवत व्हिडीओ बनवतात. ‘ही माझी बहीण आहे, हा तिने बनविलेला लाडू आहे आणि तो खाण्यासाठी आम्ही हातोडा घेऊन पावरी करणार आहोत.’

एकदा तर एका लग्नाच्या समारंभात सगळे अगदी पटापट आवरून, हो चक्क सगळ्या बायका, पुरुष इतकेच काय पण तरुण पिढीतील मुलं, मुली, लहानगे या व्हिडीओसाठी एकत्र आले आणि इतके मग तो परफेक्ट बनविण्यासाठी जे मग्न होऊन गेले की लग्नमंडपातून गुरुजी म्हणाले, चला आता मुहूर्तावर लग्न लावून मग काय ती तुमची पावरी बिवरी करा. तर एकीकडे कॉलेजमधील मजा तर वेगळीच बरं का. रीझल्ट लागो अथवा न लागो, नंतर मार्क्स कसे मिळतील याचं टेन्शन न घेता आधीच मिसळीचा आस्वाद घेत हे आपली पार्टी सुरू करतात. ‘ये हम है, ये हमारा मिसळ पाव है और हमारी पावरी हो रही है.’

असं म्हणत मग सकारात्मक विचार करून रीझल्ट पाहण्याचे ठरवतात. गंमत म्हणजे आमच्या सोसायटीत एक वयस्कर आजी-आजोबा राहतात. तर चक्क आजोबांच्या वाढदिवसानिमित्त आजींनी सोसायटीमधील त्यांचे समवयस्क मित्र मंडळींना बोलावले. बरं आधी अगदी छान आपल्या पद्धतीनुसार आजोबांना काही बायकांनी ओवाळले. या वयात कसली भेटवस्तू आणि कसलं काय. आजींनी आधीच सांगितले होते सगळ्यांना ‘भेटवस्तूचे जे काही पैसै असतील ते आपण छान गरजू संस्थेला दान करूयात.’ सगळ्यांनी याला दुजोरादेखील दिला. त्याप्रमाणे एक ठरावीक रक्कम गोळा करून त्यानुसार पाकीट तयार केले.

पण हां आता आजींचा आग्रह की यांचा व्हिडीओ बनवून लगेच तो सोशल मीडियावर टाकला जावा. आजींनी खणखणीत आवाजात ए चला ग सगळे ते काय ते आजकालच्या फॅशनप्रमाणे आपण पण मस्त व्हिडीओ बनवून टाकू की फेसबुकवर. मग काय लगेच त्यांनी त्या ठिकाणी जमलेल्या आप्तेष्टांना एकत्र करून सगळे एकत्र फ्रेम येत आहेत की नाही हे पाहून एका तरुण पिढीतील व्यक्तीला बोलावले. सर्व जण मिळून एका सुरात म्हणू लागले, ‘ये हम है, ये मेरे अहो है, और इनके नामसे जो दान करेंगे, उनकी पावरी हो जाएगी आणि लाईफ बन जाएगी.’कसली मस्त फॅशन आहे ना ही.

खरंच पण ही फॅशन संभाळत आपणच आपल्या समाजाचे भान ठेवून समाजासाठी काहीतरी करू शकलो तर त्याचे महत्त्व आणि समाधान काही वेगळेच आहे असं मला अगदी मनापासून वाटतं. एकूण काय तर आपण आपले वय, भाषा इत्यादी इत्यादी गोष्टी विसरून एकत्र येऊन हे आयुष्य उत्साहवर्धक बनवणे किंवा बनवायला शिकणे.

(लेखिका फॅशन क्षेत्रातील नामवंत आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -