घरफिचर्ससारांशशाही कार्ये...शाही मेन्यू

शाही कार्ये…शाही मेन्यू

Subscribe

हल्लीचा कोणताही समारंभ बहुधा शाहीच असतो. त्यात लग्न म्हणजे तर काय...समारंभांचा सरताज...त्यामुळे लग्न ठरल्यापासून ते मांडव परतणीपर्यंत नानाविध तर्‍हेचे बारीक सारीक प्रकारचे कार्यक्रम समारोह असतात. त्या सर्व समारोहातल्या मेन्यूमध्ये वेगवेगळ्या चवदार पदार्थांची नुसती रेलचेल असते. हे चवदार पदार्थ पनीर, चीज, सुकामेवा, मलई, तूप, साखर, कसले कसले भारी मसाले, केशर यांनी अगदी शाही बनवलेले असतात. हे शाही पदार्थ म्हणजे अक्षरशः डोळे फिरतील आणि रसना खवळेल असे देखणे, चमत्कृतीपूर्ण नावांचे, खमंग चवींचे पदार्थ पण पोटाला भरपूर जड होतील असे असतात. या पदार्थांना कसली तरी थीमही असते. कधी रंगांची, कधी ऋतूंची, कधी भौगोलिक ठिकाणांची, कार्यक्रम प्रभूंच्या आवडीचे पदार्थ इत्यादी.

– मंजुषा देशपांडे 

हल्लीच्या दिवसांत, कोणत्याही समारंभात आपण हजर झाल्यापासून ‘स्टार्टर्स पदार्थ आणि वेलकम ड्रिंक्स’ फिरवत असतात. त्यांची नावेही ‘पनीर कॉर्न टिक्की’ नाहीतर ‘गोभी पसंद टमाटर…चिली हरियाली’.. असली काहीच्या काही असतात. साध्या कांद्याच्या विंचू भज्यांनाही ‘ऑनिअन फ्रिटर्स विथ कोरिऍन्डर’ असे नाव दिलेले असते. त्यावेळी देण्यात येणार्‍या वेलकम ड्रिंक्समध्येही ‘मिंट विथ लेमन सोडा’, ‘कोकम विथ सिनॅमन’ किंवा ‘ऑरेंज विथ जिंजर’…अशी विदेशी नावे असतात. गरम पेये म्हणून चिली कॉर्न, टोमॅटो आणि व्हेज सूप्सही असतात. अगदी मराठीच्या कट्टर अभिमानी घरातल्या समारंभातही शाही पदार्थांची नावे मराठी सोडून इतर कोणत्याही भाषेतील म्हणजे हिंदी, इंग्रजी, पंजाबी, बंगाली, उर्दू, इटालियन, थाई किंवा मेक्सिकन भाषेतीलच असतात.

- Advertisement -

त्या समारंभांच्या वेळी बनवले जाणारे गोड पदार्थ म्हणजे तर त्या समारंभाची जान आणि केटररची शानच जणू असे असतात. खरंतर एखाद्या माहिती असलेल्या गोड पदार्थांमध्ये थोडेफार बदल करून त्यालाच अभिनव रूप आणि अभिनव नावे दिलेली असतात. जसे की ‘कुल्फी विथ जिलबी.’ यामध्ये कुल्फीत अगदी बारकी पण कुरकुरीत जिलेबीची वळी घातलेली असते. (ही जिलेबी कुरकुरीत कशी राहते याचे मला खरोखरं गूढच वाटते). दुसरे उदाहरण म्हणजे गुलाबजामवर संस्कार करून केलेले प्रकार. यामध्ये तर गुलाबजाम रबडी, आईस्क्रीम गुलाबजाम, गुलाबजाम शिरा अशा प्रकारचे…कमळ काला जामून हाही असाच एक प्रकार…काला जामून कमळासारख्या आकारात कापून त्यात मलई, चॉकलेट वर क्रीम आणि ड्रायफ्रूट्स असे काहीतरी घातलेले असते. त्याचे नाव ‘लोटस जामून विथ क्रीम’ असे काहीतरी असते.

एरवी आपण घरात एकतर पोळ्या करतो नाहीतर भाकरी, पण लग्न समारंभातल्या स्टॉलमध्ये मात्र फुलके, पुर्‍या, कुलचे, तंदूर रोटी, ज्वारी, बाजरीच्या भाकरी असे सर्वच प्रकार ठेवलेले असतात. भाकरीवर वाढायला लोण्याचा गोळा असतो. त्यावर मिरच्यांचा ठेचा आणि पिठले असे सगळे सांग्रसंगीत असते. त्या स्टॉल्सची नावेही मोठी बहारीची असतात. गांव की पहचान असे नाव असलेल्या स्टॉलमध्ये हुरडा, भाजलेली मक्याची कणसे, दही धपाटे, कढी खिचडी, तूप, गूळ, पालेभाज्यांचा खुडा (ताज्या पालेभाज्या बारीक चिरून त्यात भाजलेले शेंगदाणे घालून मिरचीची फोडणी घालायची) असे पदार्थही आवर्जून ठेवलेले असतात.

- Advertisement -

अलीकडेच मला माझ्या दोन मैत्रिणींच्या मुलांच्या विवाह सोहळ्यानिमित्त त्यांच्याकडे आयोजित केलेल्या पाच वेगवेगळ्या समारंभांसाठी जेवण्याचा योग आला. त्या सर्व जेवणात मिळून ४० प्रकारचे तर निव्वळ गोड पदार्थच होते. बाकीच्याही अनेक अभिनव पदार्थांचा त्यात समावेश होता. सर्व पदार्थांमध्ये पारंपरिक आणि आधुनिक असा उत्तम संगम साधलेला होता. त्या लग्नातले नवरा मुलगा आणि नवरी मुलगी दोघेही अमेरिकास्थित. दोघांचेही आईवडील उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू. त्यांच्या लग्नाचा बार धडाक्यात उडला नसता तरच नवल.

मला आठवतेय मुलगा आणि मुलगी दोघांच्याही आया माझ्या बालमैत्रिणी असल्याने त्यांच्या लग्नातही मी जातीने हजर होते. मुलाच्या आईच्या लग्नाच्या जेवणातील जिलेबीची अजूनही लोक आठवण काढतात. त्या दिवशी शेवटच्या पंगतीला तर जिलेबीचे फक्त काही तुकडेच शिल्लक राहिले होते. नवर्‍या मुलीच्या आईच्या लग्नात तर गोड पदार्थ म्हणून चक्क सोजी रव्याचा गूळ घातलेला तेलातला शिरा करून शिरा आणि काळा भात (मसाले भाताला कोल्हापुरात काळा भात असे म्हणतात) असा फर्मास बेत केलेला होता.

आता दोन्ही घरातली आर्थिक स्थिती चांगलीच उंचावली असल्याने त्या उच्चतम स्थितीचे प्रतिबिंब त्यांनी लग्नानिमित्त दिलेल्या प्रत्येक जेवणात दिसत होते. सर्वप्रथम लग्नपत्रिकेबरोबरच विशेष निमंत्रितांसाठी चांदीचा वर्ख लावलेले काजू कतलीचे पाव किलोचे आकर्षक पुडे पाठवण्यात आले. त्याबरोबर तिखट पदार्थ म्हणून मेथी मठरीचीही पाकिटे होती, तर अतिविशेष निमंत्रितांसाठी काजू कतलीबरोबर ड्रायफ्रूट बर्फी आणि पुण्याच्या लक्ष्मीनारायण चिवड्याचीही पाकिटे पाठवलेली होती.

नवर्‍या मुलाकडे होणार्‍या व्याहीभोजनाच्या वेळी खरंतर नवरा नवरी अजून अमेरिकेतच होती. तरीही त्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ १५० माणसांना निमंत्रण होते. त्यावेळी जिलेबी, मावा कचोडी, पानमिठाई (विड्याच्या पानाचा अर्क असलेली मलई बर्फी), गुलाबाचे पाकातले चिरोटे, मखाण्याची खीर…अशी पंचपक्वान्ने होती. बटाटेवडे, डाळवडे, व्हेज फ्राईज अशी तळणे, तीन प्रकारचे भात, दोन प्रकारच्या कोशिंबिरी, दाल फ्राय, भाताचे तीन प्रकार एवढे पदार्थ केलेले होते. तरीही व्याहीभोजनासाठी करंज्या केल्या नाहीत त्यामुळे मैत्रीण असलेल्या भावी विहिणबाई थोड्या नाराजच झाल्या.

ती कसर घरच्या केळवणाच्या वेळी भरून काढण्यात आली. नवरा-नवरी वजनाच्या बाबतीत अतिशय जागरूक असल्यामुळे दोन्ही घरातून एकच घरचे केळवण करायचे अशी सक्त सूचना दोन्हीही पोरांनी दिलेली होती. त्यामुळे दोन्ही घरात मिळून दशपक्वान्ने बनवली गेली. उत्तर, पश्चिम, पूर्व आणि दक्षिण भारतातल्या निवडक मिठाया जातीने हजर होत्या. वाटल्या डाळीचे हरभरा लाडू, बेसनाचे खवा घातलेले लाडू, गाजर हलवा, खव्याच्या करंज्या, चमचम, फिरनी, आंब्याचा रस आणि तुकडेही घातलेले आम्रखंड, बेळगावचा कुंदा, फ्रूट कस्टर्ड विथ बटर स्कॉच आईस्क्रीम त्याबरोबर तिखट, तळलेले, पाचक आणि सारक असे पदार्थही होते. मुखशुद्धी पाच प्रकारची आणि पाच प्रकारचे विडेही होते.

त्या केळवणाच्या जेवणासाठीही अगदी जवळचेच लोक असे म्हणत साधारण ३०० लोक जेवलीच. त्यानंतरचा मेंदी आणि संगीत समारोह… हा एक हल्लीच्या लग्नातला अभिनव प्रकार. त्यासाठी झाडून सगळे चौपाटी पदार्थ आणि मेवाडी कुल्फी, बदाम, काजू, अंजीर मिल्क शेक, रंगीबेरंगी बर्फाचे गोळे आणि गरम गोड पदार्थ म्हणून चक्क खव्याचे गोळे (खरंतर छोटेसे गुलाबजामून) घातलेला तुपात डोलणारा केशरी शिरा केलेला होता.
लग्नाच्या आदल्या दिवशीच्या रिसेप्शनसाठी तर एकाच पदार्थाचे विविध प्रकार असे स्टॉल्स होते. म्हणजे सहा-सात प्रकारची सलाड, रायता, (पपई, अ‍ॅपल्स, अननस आणि बुंदी रायता), लोणची, पोळ्यांचे सात-आठ प्रकार, त्यात बारक्या पुरणपोळ्या आणि खव्याच्या पोळ्याही होत्या. भाज्यांचे तर अबब किती प्रकार. गट्टा भाजी, काश्मिरी दम आलू, पनीर पसंद, माखनी कढाई, ग्रीन तवा, भरली दोडकी आणि चमचम कारलेही होते. थाई, इटालियन आणि चायनीज प्रकार होते. मेदू वडा सांबार, छोले भटुरे होते. भाताचेही असेच चार-पाच प्रकार होते. गोड पदार्थांमध्ये तर
बापरे…केवढे ते प्रकार… तुपात निथळणारा मुगाचा हलवा, गाजराचा हलवा, बदाम हलवा, चांदीचा वर्ख लावलेले माव्याचे लाडू, मांडे, रबडी-गुलाबजाम-आईस्क्रीम, जिंजर क्रॅनबेरी चॉकलेट पाय, फ्रूट कस्टर्ड विथ राजभोग जेली…
ब्लूबेरी-स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. याशिवाय तीन प्रकारची कॉफी आणि गिरनार मसालेदार चहा होता.
सगळ्या स्टॉल्सवर तुफान गर्दी होती. रिसेप्शनसाठी साडेसात आठ वाजता आलेले लोक जवळपास १२ वाजेपर्यंत थोडा थोडा का होईना पण जवळजवळ सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत फिरत होते.

दुसर्‍या दिवशी लग्नाच्या वेळेस आता काय काय नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ असतील या स्वप्नरंजनात लग्नासाठी आलेले पाहुणे झोपले होते. आश्चर्य म्हणजे सकाळच्या चहा-कॉफीबरोबर काही आले नाही. ब्रेकफास्टसाठी चक्क भरपूर खोबरे घातलेले दडपे पोहे आणि बुंदीचे लाडू. कालपर्यंत शाही मेजवान्या रिचवलेल्या पाहुण्यांना कसेसेच व्हायला लागले होते. जेवणाच्या वेळीही साधा वरण भात, शेवयाची खीर, उकडीचे मोदक, पुरणपोळ्या, शकुनाच्या म्हणून करंज्या, लाडू, सांबार, कढी, मसालेभात, मऊसूत घडीच्या पोळ्या, पंचामृत, कोशिंबीर, शेंगदाण्याची चटणी, पापड आणि शेवटी दही भात एवढेच पदार्थ होते. मुळात लग्नसमारंभासाठी केवळ घरात जमलेली माणसे आणि जवळचे मित्रमैत्रिणीच उपस्थित होती. आचार्‍याच्या मदतीने घरातच स्वयंपाक बनवला होता. केळीच्या पानावर पंगती बसवलेल्या होत्या. सगळे लोक आनंदाने जेवले. हा मेन्यू म्हणजे नवरा-नवरीने आयत्या वेळी केलेला बदल होता. तरी त्यातही पंचपक्वान्नांचा समावेश होताच.

कोणत्याही साध्यासुध्या कार्यक्रमातही अशा प्रकारचे खाद्यपदार्थांचे प्रदर्शन भरवणे हा गेल्या २५-३० वर्षांतच झालेला बदल आहे. पूर्वी साखरपुड्यासारख्या छोटेखानी कार्यक्रमात तर केवळ घरातली माणसेच असत आणि त्यावेळी एखादा गोड पदार्थ करून नेहमीचे साधेच जेवण केलेले असायचे किंवा बाहेरच्या लोकांसाठी अगदी पोहे, उप्पीट आणि एखादा पेढा किंवा लाडू एवढाच बेत असायचा. एवढेच कशाला प्रत्यक्ष लग्नकार्यातही साधेच गोडाचे जेवण असायचे. आमच्या कोल्हापुरातले पूर्वीचे लग्नाचे जेवण म्हणजे आमटी, साधा वरण भात, बटाट्याची/वांग्याची भाजी, मसालेभात, मठ्ठा, जिलेबी किंवा बुंदीचे लाडू, फार तर पापड कुरडयांचे तुकडे असेच मुख्य जेवण.

आदल्या दिवशीच्या सीमांत पूजनाला तर अगदी साधे जेवण असायचे. फक्त त्यामध्ये गोड पदार्थ म्हणून केळे घातलेला सुधारस असे. त्यानंतरच्या काळात लग्न जेवणात श्रीखंड/आम्रखंड किंवा फार तर गुलाबजाम. क्वचित कुणाकडे तरी रसमलाई आणि इतर बंगाली मिठाया असत.

सध्याच्या काळात साधे वाढदिवस, लग्नदिवस, मंगळागौरी, जावळ, डोहाळजेवणी, बारसे इतकेच कशाला बारावे तेरावे अशा कार्यक्रमातही भरपूर आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ ठेवलेले असतात. कधी कधी तर ते पदार्थ एकमेकांबरोबर जातात किंवा कसे याचाही विचार न करता त्यात विविध पदार्थांचा नुसता भरणा केलेला असतो.

जैन मारवाडी समाजाने मात्र याबाबत सुधारकी पाऊल उचलल्याचे कळते. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या प्रमुख जेवणात तीन ते पाच पदार्थच असावेत असे सर्व समाजाने मिळून ठरवले आहे. अर्थातच त्या पदार्थांमध्येही संपत्तीचे प्रदर्शन आणि जास्तीत जास्त नावीन्यपूर्णता आणलेली असतेच.

या पार्श्वभूमीवर जवळपास ४० वर्षांपूर्वी खरोखरंच शाही म्हणावे अशा लग्नाला मला अचानकपणे जाता आले त्याची आठवण होते. उत्तर प्रदेशातल्या कर्वी संस्थानातील राजपुत्राचे लग्न होते. त्या लग्नासाठी सर्व गावालाच जेवणाचे निमंत्रण होते. गावातल्या लोकांनी मिळून तुपातल्या पुर्‍या, बटाट्याची रस्सा भाजी, खरपूस भाजलेला आणि दाणेदार तुपातील बदाम पिस्ते घातलेला हलवा आणि पुलाव बनवलेला होता. जेवताना दही साखरेचे द्रोणही देत होते. जेवणाच्या शेवटी भलेमोठे तळलेले पापड (ती म्हणे जेवण संपल्याची खूण होती) पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर…नवरा नवरीसकट सगळे जण भरपेट जेवले.

त्यानंतर आलेल्या प्रत्येक पाहुण्याला संस्थानच्या राजाकडून घमेलेभर चिवडा आणि एक डझन बुंदीच्या लाडवांच्या पिशव्या देण्यात आल्या. आलेल्या प्रत्येकाचे पोट समाधानाने भरलेले असल्यामुळे सर्व लहानथोर पाहुण्यांनी नवपरिणीत वधूवरांना भरघोस आशीर्वाद दिले. त्या शाही अन्नाची चव परत कुठे अनुभवायला मिळाली नाही. कारण कोणत्या तरी बाहेरच्या केटररला न सांगता त्या लग्नातील प्रत्येक पदार्थ बनविण्यासाठी घरातल्या आणि गावातल्या बाया आणि बाप्यांचा हात लागला होता. त्यामागे आपुलकीची भावना होती.

(लेखिका कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील लोकविकास केंद्राच्या संचालक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -