घरफिचर्ससारांशवृक्षारोपण

वृक्षारोपण

Subscribe

– कस्तुरी देवरुखकर

एखादा नाट्यप्रसंग लिहिण्याची इच्छा होती म्हणून खालील नाट्यप्रसंग लिहिला आणि लिहिताना माझ्या लक्षात आले, आपण जो विषय अधोरेखित केला आहे, त्यावर सर्वांनी गांभीर्याने विचार व कृती करण्याची वेळ आली आहे. तशी काळाजी गरज आहे म्हणा ना…
तर संवाद खालीलप्रमाणे…

- Advertisement -

शीर्षक-: फुलबाग
स्वानंदी – आई ए आई. किती वेळ हाक मारायला लागते तुला. खरंच आईपण ना कधी वेळेवर येईल तर शप्पथ. आज खूपच मज्जा येणार आहे. आज की नाही माझा वाढदिवस आहे. आज काहीतरी हक्काने मागता येईल आईकडे. नाहीतर वर्षभर काही मागायला गेलं की सारखा ओरडा पडतो. काय तर म्हणे आधी अभ्यास करा. मग सगळे हट्ट, पण आज तसे नाही. जे मागेन ते मिळेल. गेल्या वर्षी सहलीला जाण्याची परवानगी मिळाली होती. किती मजा आली होती. आमची सहल एका मोठ्या बागेत गेली होती. वाहवा! मस्त हिरवीगार बाग बघून डोळ्याचं पारणंच फिटलं. सुंदर सुंदर गुलाबाची, जाईजुई, शेवंतीची फुलं डौलाने बागडत होती. झाडाच्या फांदीवर पक्ष्यांचे थवेच्या थवे बसलेले. सर्व बाग खूप सुरेख वाटली. मन कसं प्रसन्न झालेलं. आहा! पुन्हा एकदा बागेत, त्या हिरव्या निसर्गात जाऊन आल्यासारख वाटलं.

एक कल्पना आली आहे डोक्यात. आपणही आपल्या घराशेजारी झाडे लावून अशी बाग बनवायला हवी. अय्या, मस्तच होईल की. मग मला रोज त्या रोपांना पाणी घालता येईल. फुलांचा सुगंध अनुभवता येईल. निसर्गाची किमया पाहता येईल. ठरलं तर मग मी आज वाढदिवसाला माझी ही सुंदर कल्पना आईला सांगेन आणि माझ्या हाताने एक रोपटं लावेन. नको तो व्हिडीओ गेम आणि खेळणी.

- Advertisement -

स्वानंदीची आई -: अग स्वानंदी बेटा, आज तुझा वाढदिवस आहे. काय हवंय तुला.

स्वानंदी -: आई मला या वाढदिवसाला एक छान रोपटं लावायचं आहे आपल्या घराशेजारी.

स्वानंदीची आई -: अरे व्वा! माझी छकुली आता मोठी झाली म्हणायची. बरं आपण तुझ्या दर वाढदिवसाला एक रोप लावण्याचा संकल्पच करू. आणखी काही नको ना तुला?

स्वानंदी -: नको ग आई, मी आता खूश आहे.

स्वानंदीची आई-: बरं का ओ, तो व्हिडीओ गेम काल तुम्ही आणला आहेत ना तो परत करून या. आपल्या स्वानंदीला आता काही नको.

स्वानंदी -: (गालातल्या गालात हसत)
आई, व्हिडीओ गेम दाखव ना कुठे आहे. दाखव ना प्लीज. मला हवा आहे.
यावर्षी माझ्या वाढदिवसाची गंमतच न्यारी आहे.

खरंच कौटुंबिक समारंभात एकमेकांना भेट म्हणून एखादे छानसे रोप दिल्यास किती समर्पक ठरेल!
वाढत्या शहरीकरणामुळे रोज अतोनात वृक्षतोड केली जातेय. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपण निसर्गाला वेठीस धरत आहोत. जर एका हाताने निसर्गाचा अमर्याद खजिना लुटत आहोत तर आपले कर्तव्य आहे की निसर्गाची ती हरित छाया आपल्याला सदोदित मिळत राहावी याकरिता आपण योगदान दिले पाहिजे.

साधा जन्मदिवसाचा सोहळा असला तरी प्रियजनांनी दिलेल्या भेटीच्या बदल्यात फूल ना फुलाची पाकळी म्हणून काही ना काही भेटवस्तू दिलीच जाते. मग औद्योगिकरण, व्यापारीकरण हेतूने वृक्षतोड केल्यानंतर पुन्हा नव्याने वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे हेही आपले कर्तव्यच आहे, नाही का?

शहरी भागात ताज्या हवेत श्वास घ्यायचे म्हटले तर समोर यक्षप्रश्न उभा राहतो. सिमेंटच्या जंगलात इमारतींच्या विळख्यात निसर्गाला फास बसत असल्याने मानवाचा प्रत्येक श्वास महाग झाला आहे. हवेतील विषारी घटकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शहरात तर धुकंसुद्धा दूषित धुराचे लोट घेऊन निघते. याचा पर्जन्यमानावर हमखास परिणाम होतो व पर्यायाने ऋतुचक्राचे फेरे अनियमित होतात.

शाळकरी मुलांमध्ये वृक्षसंवर्धनाविषयी जागरूकता निर्माण केली जातेय ही समाधानाची बाब नक्कीच आहे. आपल्या कुटुंबात किंवा मैत्री परिवारात एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तेव्हा इतर कृत्रिम भेटवस्तू देण्यापेक्षा छोटंस सजीव रोपटं भेट म्हणून दिल्यास ते रोप मातीत रुजल्यावर तुमच्या नात्याची साक्ष आजीवन देत राहील व त्याची गोड फळे येणार्‍या अनेक पिढ्यांना नात्यांचा गोडवा चाखवत राहतील हे नक्की.

हल्ली समाजमाध्यमांवरून अमुक गॉगल लावून सेल्फी काढा, तमुक प्रकारचे कपडे घालून सेल्फी काढा, असे फोटो काढण्याचे आव्हान दिले जाते, परंतु त्यात बदल करून जर तुम्ही एखादे रोप लावताना फोटो काढा आणि पाठवा अथवा तुम्ही जोपासलेल्या बागेसोबत छानसा सेल्फी पाठवा, असे आव्हान मित्रमैत्रिणींना दिले तर खरोखरंच समाजमाध्यमांचा सुयोग्य वापर होईल असे मला वाटते.

आपण शालेय प्रार्थनेत वंदे मातरम् असंख्य वेळा म्हटले आहे. यामधील सुजलाम् सुफलाम् याचा अर्थ ज्या भूमातेचे जलाशय शुद्ध जलाने दुथडी भरून वाहत आहे, भरपूर पावसाने त्या जलसंचयात अखंड भर पडत आहे आणि जिथे बागबगीचे गोड, मधाळ फळांनी बहरलेले आहेत, जणूकाही वसुंधरा हिरवा शालू नेसली आहे, असा अर्थ येथे अपेक्षित आहे, पण खरंच हे सुंदर विलोभनीय चित्र आजच्या परिस्थितीत आपल्या देशात पूर्णपणे पाहावयास मिळते का?

हा प्रश्न जर आपण स्वत:ला विचारला तर त्याचे उत्तर असमाधानकारकच येईल. किती दुर्दैवी गोष्ट आहे. आज असे मनमोहक दृश्य आपल्या देशात फारसे दृष्टीस पडत नाही.

वाढते औद्योगिकीकरण, गगनचुंबी इमारतींचे पसरणारे जाळे, अमर्याद वृक्षतोड यामुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे. त्याचा परिणाम पर्जन्यवृष्टीवर होत असल्याने अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, पिकांची नासाडी, भूकंप, महापूर, अनियमित ऋतुमान, वाढते प्रदूषण अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आजच्या शेतकर्‍याला निसर्गाचे रौद्र रूप पाहणे नशिबी आले आहे. यामुळे शेतीवर उदरनिर्वाह करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. पीकपाणी नीट होत नसल्याने त्याचा परिणाम संपूर्ण देशातील जनतेलाही सोसावा लागत आहे. कारण जागतिक अन्नपुरवठ्याचा महत्त्वाचा आणि मुख्य स्रोत शेती आहे.

आपण पावसाला, निसर्गाला दोष देऊन मोकळे होतो, पण हा विचार नाही करीत की आज जी नैसर्गिक आपत्ती कोसळत आहे त्याला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत. त्याचे मूळ मानवाकडेच आहे. मानवाच्या वाढत्या हव्यासापोटी या सुंदर धरतीचा त्याने कायापालट केल्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.

आज गरज आहे ती वृक्ष संवर्धनाची, निसर्ग जोपासण्याची. येणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण मनोमन ही प्रतिज्ञा करूया की, मी माझ्या भूमातेला या गलिच्छ विळख्यातून सोडवीन. त्याची सुरुवात प्रत्येकाने जर स्वत:पासून केली, प्रत्येकाने आपले घर, परिसर स्वच्छ ठेवला, नियमित वृक्षारोपण केले, तर पर्यायाने देश सुधारेल. आपली येणारी पिढी पुढील प्रार्थना अभिमानाने म्हणेल…

वंदे मातरम्।
सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्,
सस्यश्यामलाम् मातरम्। वंदे मातरम्॥ १॥

शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीम्,
फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीम्,
सुहासिनीम् सुमधुरभाषिणीम्,
सुखदाम् वरदाम् मातरम्। वंदे मातरम्॥२॥

(लेखिका साहित्यिक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -