सत्य घटनांवर आधारित- ‘आयबी ७१’

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक विद्युत जामवाल पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांसमोर एक नवीन चित्रपट घेऊन आला आहे. त्याच्या ‘आयबी ७१’ या चित्रपटाची कथा त्या युवकांची आहे जे देशासाठी मरायला तयार होते, परंतु आज त्यांच्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल. कारण गुप्तचर मोहिमेचे काम ओळखले जात नाही, ते बुद्धिमत्ता म्हणून ठेवले जाते. या चित्रपटात विद्युतने स्वत:ला खूप वेगळ्या पद्धतीने सादर केले आहे.

— आशिष निनगुरकर

पाकिस्तानात जाऊन त्यांची भारतावर आक्रमण करण्याची योजना रोखण्यासाठी त्यांचे हवाई मार्ग रोखणे हे या ’आयबी ७१’ चित्रपटाचे ध्येय आहे. कारण पाकिस्तान या युद्धासाठी तयार आहे, पण भारत नाही. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. एजंट देव (विद्युत जामवाल) ३० एजंटसह काही दिवसांच्या या मिशनवर जातो.

या चित्रपटात विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची कथा आदित्य शास्त्री यांनी लिहिली असून पटकथा स्टोरीहाऊस फिल्म्स एलएलपीने तयार केली आहे. चित्रपटाबद्दल बोलताना निर्माता-अभिनेता विद्युत जामवाल म्हणाला की, माझे प्रोडक्शन हाऊस ऍक्शन हिरो फिल्म्सची ही एक नवीन सुरुवात आहे. इतिहासातील गौरवशाली अध्याय पुन्हा सांगणार्‍या चित्रपटाचे समर्थन करताना मला आनंद होत आहे. ही गुप्तचर अधिकार्‍यांच्या प्रतिभेची गोष्ट आहे, ज्यांना मी मनापासून सलाम करतो. मी आणि माझी टीम कृतज्ञ आहोत की आम्ही या वर्षाची सुरुवात रोमांचकारी पद्धतीने करीत आहोत. ‘आयबी ७१’ हा चित्रपट गुलशन कुमार, टी सिरीज फिल्म्स आणि रिलायन्स इंटरटेन्मेंटच्या सहयोगाने प्रस्तुत करण्यात आला आहे.

विद्युत जामवाल हा एक अ‍ॅक्शन हिरो आहे, पण विद्युत त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडतो आणि एका वेगळ्या पात्रात रूपांतरित होतो. कारण आयबी एजंट म्हणून त्याचे काम हे शारीरिक कामापेक्षा मनाच्या खेळाचे असते. आयबी एजंट देव जामवाल यांनी राबवलेल्या एका अनोख्या मिशनची ही कहाणी आहे. ज्या १७-१८ वर्षांच्या दोन मुलांना काश्मीरच्या स्वातंत्र्याचे समर्थन करणार्‍या एका बनावट अपहरणाने फसवले जाते, जे स्वतःला आझाद काश्मीरचे सैनिक मानतात, त्यांचा वापर केला जातो आणि नंतर इंटेलिजन्स ब्युरोने त्यांच्याच विमानाचे अपहरण करून त्यांना लाहोरला नेले, जेणेकरून पाकिस्तान एअरवेजला रोखून भारताविरुद्ध पाकिस्तान आणि चीनचे प्लॅनिंग थांबवता येईल. ही कथा खूप रंजक आहे आणि लोक खूप उत्सुकतेने ती पाहायला जातील. इतिहासाच्या पानांमध्ये ही कथा जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.या चित्रपटाची निर्मिती विद्युत जामवाल आणि अब्बास सय्यद यांनी केली असून कथा आदित्य शास्त्री यांनी लिहिली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संकल्प रेड्डी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

१९७० च्या अखेरीस चीनच्या मदतीने भारताविरुद्ध युद्धाचे षड्यंत्र रचणार्‍या पाकिस्तानचे मनसुबे आयबी ही भारतीय गुप्तचर संस्था कशा प्रकारे उधळून लावते हा आहे आयबी-७१चा कथासार. आताचे बांगलादेश म्हणजेच तेव्हाचे पूर्व पाकिस्तानमध्ये कार्यरत आयबी एजंट देव जामवालला (विद्युत जामवाल) पाकिस्तान करीत असलेल्या युद्धाच्या तयारीची चाहूल लागते. देव याची माहिती आयबी चीफ अवस्थी (अनुपम खेर) यांना देतो. अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपलेल्या युद्धासाठी भारत तयार नसतो आणि तयारीसाठी किमान दोन महिन्यांची आवश्यकता असल्याने हे युद्ध कसेही करून लांबविणे एवढेच भारताच्या हातात असते. याचवेळी आयबीकडे अजून एक इनपुट असते. काश्मीरच्या आझादीची स्वप्ने बघणारा काश्मिरी तरुण मुलगा कासीम कुरेशी (विशाल जेठवा) भारतीय प्लेन हायजॅकची योजना आखतोय. या योजनेची माहिती पाकिस्तानलाही असते, पण पाकिस्तानला हे होऊ द्यायचे नसते आणि देवला नेमके हेच हवे असते. का? कशासाठी? देव तसे होऊ देतो का? पाकिस्तानला देवच्या योजनेची माहिती मिळते का? देव यात सफल होतो का? या प्रश्नांची उत्तरे देत चित्रपट पुढे सरकतो.

२०१७ साली ‘द गाजी अटॅक’ या आपल्या पहिल्याच चित्रपटात दिग्दर्शक संकल्प रेड्डीने १९७१च्या युद्धातील अशीच एक अनकही घटना आपल्यासमोर आणली होती. त्याच संकल्पनेने यावेळी आयबी ७१द्वारे ७१चे युद्ध सुरू होण्यापूर्वी पडद्यामागे घडलेली भारतीय हेरांची एक साहसी सत्यकथा समोर आणली आहे. आदित्य शास्त्री यांच्या कथेला पटकथेत रूपांतरित करताना दिग्दर्शक संकल्पसहित तब्बल ५ जणांच्या टीमने मेहनत घेतल्याचे चित्रपट बघताना जाणवते. केवळ २ तासांची टाईट अशी पटकथा मध्यंतरापूर्वी आणि नंतरही तुम्हाला पुरती खिळवून ठेवते. एकानंतर एक घडत जाणारा नाट्यमय आणि थरारक घटनाक्रमाचा इम्पॅक्ट कुठेही कमी होणार नाही याची काळजी दिग्दर्शक संकल्प आणि संकलक संदीप फ्रान्सिस यांनी घेतली आहे.

प्रशांत विहारी यांचे पार्श्वसंगीत पटकथेचा वेगवान असा टेम्पो कायम राहील याची काळजी घेणारे आहे. चित्रपटात गीत-संगीताला नसलेले स्थान हीसुद्धा एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. विद्युत जामवाल म्हणजे निव्वळ ऍक्शन हे समीकरण या चित्रपटात विद्युतने जाणीवपूर्वक तोडले आहे असे वाटते. एरवी तो अभिनयसुद्धा बर्‍यापैकी करतो, पण ऍक्शनमुळे त्याकडे लक्ष जात नाही. यात मात्र त्याच्या अभिनयाकडेसुद्धा लक्ष जाते. अनुपम खेर, विशाल जेठवा यांचा अभिनयसुद्धा उत्तम आहे. ७०च्या दशकाचा माहोल कला दिग्दर्शकाने उत्तम बनवला आहे.

७०-८०च्या दशकातील व स्पाय थ्रीलर या जॉनरमध्ये मोडणारे असे प्रयोग यापूर्वीही येऊन गेले आहेत, पण तरीही इतक्या वर्षांनंतर सांगण्यात आलेली ही गुप्तकथा नावीन्यपूर्ण आहे असे म्हणता येईल. संवाद आणि ऍक्शन अशा प्रकारच्या कथांना देशप्रेमाची धार असणारे संवाद आणि सोबतीला त्याच तोडीची ऍक्शन अपेक्षित असते, पण पटकथेत ऍक्शनला फारसा वाव नाही. संवाद मात्र अजूनही फायरी होऊ शकले असते. भारतीय गुप्तचर अधिकारी कसे संपूर्ण पाकिस्तानी कार्यालयाला चकमा देत आपल्या सशस्त्र दलांना दोन आघाड्यांवर युद्धाला सामोरे जाण्यास कशी आवश्यक मदत पुरवतात याचे चित्रण करण्यात आले आहे. या सशक्त चित्रपटाचे नेतृत्व संकल्प रेड्डी यांनी केले आहे, ज्यांनी ‘गाझी’ चित्रपटाचा संवेदनशील विषय अतिशय उत्तमरित्या हाताळला होता.

प्रत्येक चित्रपटातून अभिनेता विद्युत काही ना काही वेगळे देण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटातदेखील त्याने एक वेगळा विषय, आशय मांडण्याचा उत्तम असा प्रयत्न केला आहे आणि तो काही अंशी यशस्वी झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. एक वेगळी अनुभूती या चित्रपटाच्या निमित्ताने मिळू शकेल.