घरफिचर्ससारांशभोंदूबाबा जाळ्यात अडकला...

भोंदूबाबा जाळ्यात अडकला…

Subscribe

फलज्योतिषाचा वापर करून कोट्यवधींची माया जमवल्यानंतर, सर्वप्रकारची हाव सुटलेला भोंदूबुवा-फलज्योतिषी नाशिक अंनिस शाखेच्या जाळ्यात अलगद अडकला. पूजा, विधि, तंत्र-मंत्र करून, भल्या मोठ्या रकमेची मागणी करून, मूलबाळ देणार्‍या फलज्योतिषाला पुढच्या क्षणी त्याच्या आयुष्यात काय होणार आहे, हे मात्र अगोदर का कळले नाही, हा लक्षात घेण्यासारखा प्रश्न आहे. फलज्योतिष हे थोतांडच आहे. भविष्य जाणून घेण्याच्या कुतूहलापोटी जरी त्याच्या नादी कुणी लागले तरी त्याचे नुकसान ठरलेलेच असते.

अंधश्रद्धेच्या माध्यमातून भोंदूगिरी करणार्‍या भोंदूंबाबत केवळ नाशिक शहराचा विचार केला तरी, मागील महिना दोन महिन्यात तीन गंभीर घटना शहरात उघडकीस आलेल्या आहेत. मंत्र-तंत्राच्या साह्याने पैशाचा पाऊस पाडण्याचा बहाणा करत, एका महिलेवर सतत काही महिने भोंदूगिरी करणार्‍या तीन नराधमांनी अत्याचार केला. शेवटी अत्याचार असह्य झाल्यावर तिने पोलीस ठाणे गाठले. जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत या तिघा भोंदूंवर गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे हे तिघेही तीन वेगवेगळ्या धर्माचे होते. श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा काळाबाजार करणार्‍यांना कोणताच जात-धर्म नसतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

फलज्योतिषाचा वापर करून कोट्यवधींची माया जमवल्यानंतर, सर्वप्रकारची हाव सुटलेला भोंदूबुवा-फलज्योतिषी नाशिक अंनिस शाखेच्या जाळ्यात अलगद अडकला. पूजा, विधि, तंत्र-मंत्र करून, भल्या मोठ्या रकमेची मागणी करून, मूलबाळ देणार्‍या फलज्योतिषाला पुढच्या क्षणी त्याच्या आयुष्यात काय होणार आहे, हे मात्र अगोदर का कळले नाही, हा लक्षात घेण्यासारखा प्रश्न आहे. फलज्योतिष हे थोतांडच आहे. भविष्य जाणून घेण्याच्या कुतूहलापोटी जरी त्याच्या नादी कुणी लागले तरी त्याचे नुकसान ठरलेलेच असते. या व्यवसायात भले होते ते फक्त फलज्योतिष सांगणार्‍या थापेबाज व्यक्तींचे!! कारण ती कला त्याने अवगत केलेली असते.

- Advertisement -

खरं तर, लोकांनीही, फलज्योतिष ही केवळ कला म्हणून, मनोरंजनाचा भाग म्हणूनच तिच्याकडे पाहिले पाहिजे. मात्र दररोजच्या वर्तमानपत्रात सर्व प्रथम आपले आजचे राशीभविष्य शोधणारा आणि त्याप्रमाणे दैवी सामर्थ्याचा दिवसभर अनाठायी शोध घेणारा, आपला समाज, खरंच फलज्योतिषाला मनोरंजन करणारा कलाकार ठरवेल का? माझ्या आजच्या राशीभविष्यात लिहिलेल्या फलानुसार घडण्याऐवजी विपरीत आणि विसंगत घडले म्हणून, कितीजणांनी आजपर्यंत त्या त्या वृत्तपत्रांना किंवा त्यामध्ये लिहिणार्‍या तथाकथित फलज्योतिषाला धारेवर धरले? जाब विचारला आहे?

फलज्योतिषी हे ग्राहकाची समस्या आणि ती सोडवण्यासाठी त्याची ऐपत पाहून ग्राहकाला हळूहळू त्यांच्या जाळ्यात ओढतात. छोट्या-मोठ्या भूलथापा मारून, प्रलोभन दाखवून, गुंतवून ठेवतात. भरगच्च व्यवसाय झाला असे लक्षात आले की, एका शहरातून गाशा गुंडाळतात आणि दुसरीकडे मोठ्या शहरात बस्तान बसवतात. संमोहन ही मनाची एक अवस्था आहे. जसे आपण झोप घेतो, जागृत अवस्थेत असतो, आपल्याला स्वप्न पडतात, अशा वेगवेगळ्या अवस्था म्हणजे संमोहन होय. मात्र संमोहनातून अनेक वेळा गंभीर आजार बरे करण्याचा दावा केला जातो. नाशिकच्या एका संमोहन तज्ञाने संमोहनातून निपुत्रिक जोडप्यांना मूलबाळ होऊ शकते, असा दावा पंचवीस वर्षापूर्वी केला होता. त्याचवेळी महाराष्ट्र अंनिसने त्याचा समोरासमोर जाहीररित्या भांडाफोड नाशिक शहरातच केला होता. मात्र तरीही या महोदयांनी संमोहनाच्या व्यवसायातून कोट्यवधीची माया जमवली होती.

- Advertisement -

संमोहन ही मनाची अवस्था असली तरी कोणत्याही व्यक्तीला तिच्या इच्छेविरुद्ध कधीही संमोहित करता येत नाही. शिवाय व्यक्तीच्या जीवाला धोकादायक आणि तिच्या नैतिक धारणांशी संबंधित चुकीची गोष्ट कधीही व्यक्तीकडून करवून घेता येत नाही. मात्र तरीही स्वसंमोहनाद्वारे व्यक्तीमत्वात आमूलाग्र बदल करण्याचे तसेच गंभीर समस्या सोडवण्याचे बिनतोड आणि फसवे दावे तथाकथित संमोहन तज्ज्ञांकडून केले जातात. नाशिक शहरात अशाच एका तथाकथित संमोहन तज्ज्ञाने संमोहनशास्त्र शिकवण्याचा बहाणा करून, एका महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार नुकतीच दाखल झाली आहे.

वरील तिन्ही घटनांचे वरवर निरीक्षण केले तर असे लक्षात येते की, लोकांच्या मनातील भीती, अज्ञान, अगतिकता, प्रचंड हव्यास, चिकित्सेविना रूढीं, परंपरेतून आलेल्या, जोपासल्या गेलेल्या अनेक अवैज्ञानिक गोष्टींचा बिनबोभाट अनुनय आणि या सर्वांमधून स्वीकारलेली मानसिक गुलामगिरी, समाजाला अंधश्रद्धेच्या खोल गर्तेत घेऊन जाते. नाशिकसारख्या ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या शहरात अनेकदा अंधश्रद्धांचे पेव फुटल्याचे वारंवार दिसून येते. तीनही घटनांमध्ये एक साम्य असल्याचे आपल्या लक्षात येईल. ते म्हणजे तीनही घटनांमध्ये महिलांशी गैरवर्तन करण्याची हिंमत भोंदूबुवांनी केलेली आहे. जागृक महिलांनी हिंमत करून, तसेच महाराष्ट्र अंनिससारख्या संघटनाच्या माध्यमातून किंवा भोंदूगिरीचा अत्याचार सहन न झाल्याने पोलिसांपर्यंत धाव घेतल्याचे लक्षात येते.

लोकांच्या मनातील अशा लहान-मोठ्या अंधश्रद्धांचा गैरफायदा घेऊन शहरात काय किंवा गावखेड्यात काय, असे अनेक गैरप्रकार अंधश्रद्धेच्या माध्यमातून सातत्याने चालू असतात. घडत असतात. महाराष्ट्र अंनिससारख्या संघटना धाडस करुन अशा घटना उघड करतात. जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याकामी कसोशीने आणि सातत्याने प्रयत्नशील असतात. मात्र तेवढे पुरेसे ठरत नाही, हे वरील घटनांवरून वारंवार स्पष्ट होत जाते. हरघडी विज्ञानाचा वापर करणार्‍या समाजाने जाणीवपूर्वक विज्ञान दृष्टीचा अंगिकार केला पाहिजे, तिचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर एक उत्कृष्ट व्यक्ती होण्यासाठी, स्वतःला सतत तपासले पाहिजे. आपल्या क्षमता, मर्यादा काय आहेत,खरं आध्यात्मिक आनंद म्हणजे काय असतो, नैतिक मार्गाने तो कसा मिळवावा, वाढवावा, त्याचाही वारंवार आढावा व्यक्तीने घेतला पाहिजे.

स्वतःच्या मनाशी ह्या बाबी निश्चित केल्या पाहिजेत. प्रत्येक बाबतीत स्वतःच्या बुद्धीचा कस लावायला शिकलं पाहिजे. वेळोवेळी त्या त्या क्षेत्राशी निगडित योग्य त्या तज्ज्ञ, अनुभवी, विचारवंत व्यक्तींचा सल्ला, मार्गदर्शन घेतलं पाहिजे. अन्यथा,‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ असा प्रकार सर्रास घडतो. त्याने अशा भोंदूबाबांचे फावते. त्यातून, त्यांचेच भले होते. केवळ तांत्रिक माहिती आणि काही अंशी ज्ञान,अशी आजच्या आपल्या शिक्षणाची अवस्था आहे. मात्र तरीही मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग व्यक्तीच्या दैनंदिन आचरणातून दिसायला हवा. ते दाखवण्याचे धाडस व्यक्तीने करायला हवे. तरंच अंधश्रद्धा आणि त्यांच्या माध्यमातून केले जाणारे शोषण, काही प्रमाणात का होईना कमी होईल.

आपला समाज प्रवाहपतित आहे. हजारो वर्षांपासूनच्या रूढी, प्रथा जशाच्या तशा जोपासण्याकडे आणि जतन करण्याकडे समाजाचा कल असतो. आपल्या आजूबाजूला जे चुकीचे चाललेले आहे, घडत आहे, हे समजत असूनही, कळत असूनही, लोक याबाबत विरोधात जाणे तर सोडाच, पण बोलायची हिंमतसुद्धा दाखवत नाहीत. अन्यथा दिवसाढवळ्या लाखोची वस्ती असलेल्या अनेक शहरांमधून चालणारी ही उघड उघड भोंदूगिरी लोकांना दिसत नाही, असे थोडेच आहे? काही लोकांनी तरी त्या विरोधात आवाज उठवायला हवा की नको? समाजात एवढा सामूहिक दुबळेपणा, अलिप्ततावाद का आणि कसा निर्माण झाला आहे? इतर अनेक बाबतीत असलेला लोकांचा प्रचंड उत्साह अशा अनिष्ट बाबींच्या विरोधात संघर्षासाठी पुढे येण्यासाठी का दिसून येत नाही? ज्या संत-समाजसुधारकांनी सर्व सोसून,त्यागपूर्ण आयुष्य कंठून, कृतीशील विचार-वारसा समाजाला दिला,तो पुढे चालवावा, असं बहुसंख्य समाजाला का वाटत नाही?

पंचाहत्तर वर्षांपासून आपण आधुनिक लोकशाही स्वीकारलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला इथे स्वतःचा विकास साधण्याची पुरेपूर खात्री आणि संधी आहे. पण त्याचबरोबरच लोकसमुदायाचाही संघटितपणे विकास होत राहील, व्यक्तीविकासाचा अडसर तिथे असणार नाही. हा विचार आणि स्वातंत्र्य हे आधुनिक लोकशाहीने आपल्याला बहाल केलेले मौल्यवान मूल्य आहे. तरीही, कालपरवा पर्यंत जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेली आपल्या माहितीतील किंवा परिसरातील एखादी व्यक्ती अगदी अल्पकालावधीत गडगंज श्रीमंत होते. त्या व्यक्तीने कोणत्याही नैतिक मार्गाशिवाय, मेहनतीशिवाय सारी धनसंपत्ती कमावलेली असते, हेही अनेकांना माहीत असते. तरीही अनेक लोक त्या व्यक्तीविरोधात ब्र शब्द काढत नाहीत, काहीही बोलत नाहीत. उलट त्याच्या डामडौलात सामील होतात. हुजरेगिरी करण्यात मश्गुल असतात. धन्यता मानतात. भोंदूगिरी करणारे असेच श्रद्धेच्या नावाने भाविकांना कोट्यवधी रुपयांना लुटतात, गंडा घालतात. स्वतः ऐषोआरामात जगतात. भाविक मात्र भोंदूंच्या सेवेत समाधान मानतात. अशी आपली समाजस्थिती आहे.

आजही बहुसंख्य व्यक्तींचे दररोजचे वर्तन आणि एकूणच समाजाची सामूहिक वर्तनाची वाटचाल ही परंपरेने लाभलेल्या, कालबाह्य झालेल्या अनेक रूढी, प्रथा, परंपरांमध्ये गुरफटलेली आहे, समाज पुन्हा पुन्हा तिथेच घुटमळत आहे. आधुनिक लोकशाहीचा प्रवास सुरू होऊन पंच्याहत्तर वर्षे होत आली, पण प्रथा-परंपरांच्या जोखडात अडकलेला आपला समाज अजूनही आधुनिक लोकशाहीने बहाल केलेल्या मानवी मूल्यांच्या आसपासही फिरकला नाही, असे आजच्या अंधश्रद्धांची भयानकता पाहून, म्हणावेसे वाटते. अध्यात्माच्या नावाखाली चालणारी आध्यात्मिक बुवाबाजी ही, बुवाबाजी प्रकारांतील अतिशय खतरनाक बुवाबाजी आहे. प्रचलित जादुटोणा विरोधी कायदा तेथे कारवाईसाठी तोकडा पडतो. म्हणून अशा अंगाने भोंदूगिरी करणारे भोंदूबुवांचे प्रस्थ आणि संख्येचे प्रमाण वाढत चाललेले आहे. याविरोधात काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मात्र धाडस दाखवताना दिसतात. अशा प्रतिनिधींची संख्या वाढली तर लोकप्रबोधन लवकर आणि मोठ्या प्रमाणावर होईल.

कसदार शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाला,वैज्ञानिक दृष्टिकोनाची जाणिवपूर्वक जोड दिली तर ,आपल्या जीवनात शहाणपण नक्कीच येईल. त्यासाठी आजच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणंही आवश्यक झाले आहे. मग त्यातून जे व्यक्तीगत आणि सामूहिक शहाणपण निर्माण होईल, मिळेल, तेच अशा या खतरनाक भोंदूगिरीवरील एक प्रमुख, प्रभावी आणि जालीम उपाय ठरेल, अशी खात्री आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -