द्विधा!

Subscribe

इतकी वर्षं परशुरामाची ही भूमी उपेक्षित होती. कोकण रेल्वे आली आणि सगळ्या खासगी कंपन्यांचे लक्ष ह्या भूमीकडे गेलं आहे. हळूहळू इथला समुद्र, इथली जंगलं सगळं वर बसलेले अधिकारी कुठल्यातरी नियमात बसवून हे सगळं विकतील. समुद्राच्या किनाराने पारंपारिक मासेमारी करणारे आमचे बांधव हे सगळे कसं झालं म्हणून बघत बसतील, तेव्हा आम्ही विकासाभिमुख नागरिक म्हणून कोणाच्या बाजूने उभे राहू? विकास आणि पर्यावरण भकास, असे विचार मनात येतात आणि मनाची द्विधा अवस्था होते. मग बसल्या जागी आपला त्रिशंकू होऊन जातो.

गेल्या महिन्यातील गोष्ट. कुठल्यातरी लिखाणाच्या बाबतीत संदर्भ शोधत होतो. अचानक वातावरणात बदल जाणवू लागला. उष्णतेच्या लाटेने जीव हैराण झाला. अंगाची लाही लाही होते म्हणून एसी चालू करून संदर्भ शोधत पुस्तक बाजूला करत होतो. अचानक माझी आई खोलीत आली आणि गरम्याचा दिवसात गरम होतला नाय तर काय माणसाक हिव भरतली?, तिने एवढं बोलून थांबण अपेक्षित नव्हतं. बाजूला माझी मुलगी बसली होती. तिला उद्देशून बाहेर बघितलं का?…. झाडांना नवी पालवी फुटली आहे. अशी पालवी फुटली की गरम्याचे दिवस सुरू झाले म्हणून समजायचे. निसर्ग आपला नियम सोडत नाही. होळी पेटली की गरमी होणारच. तुम्हाला आंबे-काजू खायला हवेत. ते पिकण्यासाठी वातावरणात गरमा हवाच. नातीचा आणि आजीचा हा संवाद चालू होता. खरोखर असल्या कितीतरी गोष्टी आपल्या नजरेतून सुटून जातात. निसर्ग ऋतू बदलाचे अनेक संकेत आपल्याला देत असतो, पण आपल्याला ह्या गोष्टी बघायला वेळ कुठे आहे?.आम्ही सण, वार ह्यासाठी गुगलमधल्या पंचांगाचा आधार घेतो. द. भा. धामणस्कर यांच्या एका कवितेतील ओळ आठवते.मी पंचांगाला चैत्र कधी हे नाही विचारले,झाडांची पोपटी पालवी मला अधिक विश्वासार्ह वाटली.

समोरच्या बागेतील झाडांची गळून गेलेली पालवी आणि नव्याने बहरलेली पालवी हे ऋतू बदलाचे द्योतक, तरी नित्याने भेटणार्‍या या गोष्टींकडे आमचं दुर्लक्ष होतं. लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो असताना मे महिन्याच्या शेवटी कुठे भिंतीवर काळे डोंगळे दिसू लागले किंवा लाल मुंग्यांची रांग दिसू लागली की थोरली काकी लगेच म्हणू लागायची आता चार दिवसात पावस येतलो हा. निसर्गाने दिलेले हे संकेत आमच्या पिढीला कसे कळत नाहीत? कोण म्हणतो तुम्ही शहरात रहता, पैशाच्या मागे फिरता. तुम्हाला ह्या अलौकिक गोष्टी कशा कळणार? कोणी असं म्हटलं जरी तरी गावखेड्याकडे काही वेगळी परिस्थिती नाही. निसर्गाकडे, पर्यावरणाकडे बघण्याचा, त्याचा समतोल राखण्याचा आम्ही काही ठेका नाही घेतला. विकास हवा, रस्त्यांचे चौपदरीकरण हवे तर झाडं तोडायला हवीच की! इथल्या स्थानिक लोकांना नोकर्‍या हव्या तर रिफायनरी हवीच. आम्ही का म्हणून पर्यावरण प्रेमींच्या बाजूने उभे रहावे? कोणाच्या मनात असे विचार येऊ शकतात.

- Advertisement -

अशा गोष्टी आजूबाजूला घडत असताना आपण कोणाच्या बाजूने उभं राहावं हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात येऊ शकतो. एखादा रिफायनरी प्रकल्प जेव्हा उभा रहातो किंवा उभा करण्यासाठी प्रयत्न चालू होतात तेव्हा त्या अनुषंगाने अनेक गोष्टींचा र्‍हास होत असतो. अगदी साध्या साध्या गोष्टीत आम्ही असंवेदनशीलतेने वागत असतो. समुद्राच्या बाजूने उभ्या रहाणार्‍या ह्या अजस्त्र प्रकल्पाचं स्वागत करायला आम्ही उभे रहातो तेव्हा एक गोष्ट विसरत असतो की, समुद्राच्या बाजूने जी दलदल निर्माण झाली आहे तिच्यातून अनेक सूक्ष्मजीव अधिवास करतात. पंधरा वर्षापूर्वी मुंबईत पावसाने हाहाकार केल्यावर सगळ्यांना मिठी नदीची आठवण झाली. इथला आजूबाजूचा परिसर बघितला तर एक गोष्ट लक्षात येईल. इथली दलदल बुजवून इथे आजूबाजूला नवीन वसाहत तयार करण्यात आली आहे. वास्तविक ह्या दलदलीचे काम काय होते?. विकासाच्या नावाखाली आम्ही तयार केलेल्या रासायनिक कंपनीच्या नळकांड्यातून येणारे दूषित पाणी, रासायनिक पदार्थ इथल्या दलदलीतील सूक्ष्मजीव निचरा करण्याची क्षमता बाळगून होते. निसर्गाच्या ह्या अचाट क्षमतेची ताकद आपल्याला माहीत होती का?.

गेली अनेक वर्षे ऐन मे महिन्यात किंवा पावसाच्या सुरुवातीला कोकणकिनारपट्टी वादळाने घडघडत असते. नेमकी याची कारणे काय असतील याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला का? केवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय एवढं बोलून आम्ही गप्प बसतो. हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यामागे निसर्गाची क्रूरपणे केलेली कत्तल तर कारणीभूत नाही ना? सह्याद्रीच्या उंच उंच डोंगरात मायनिंग, चिरेखणी मोठ्या प्रमाणत तयार होत आहेत. ह्या डोंगरदर्‍यांनी गेली कित्येक शतक ह्या कोकणकिनारपट्टीला नैसर्गिक आपत्तींपासून वाचवले. आज सह्याद्रीच्या एक एक कड्याला पोखरले जात आहे. गेल्या पावसात दोडा मार्गातील कितीतरी गावं पुराखाली होती. कोकणात काय ह्या आधी एवढा पाऊस कधी पडला नाही?, मग आताच पूरस्थिती निर्माण होण्याची कारण काय?. विकास कोणाला नको आहे?.सगळ्यांना हा विकास हवा आहे. इथल्या तरुणाला नोकरी-धंदा हवा आहे, पण ते करत असताना इथल्या पर्यावरणाचे काय होईल, त्याच्या दुष्परिणामाचे उत्तरदायित्व कोणाच्या माथी टाकायचे?

- Advertisement -

आमच्या मित्रांच्या एका गटात कोणीतरी कोकणात येणार्‍या नव्या प्रकल्पाची बातमी गटात टाकली. मी कोकणातील असल्याने त्या मित्राने गटात मलाच विचारले वैभव तुला काय वाटत रे?. मी बातमी सविस्तर वाचली. किनारपट्टीवर एक मोठा प्रकल्प मंजूर झाल्याची बातमी होती. ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभा करायचा आहे तिथे निर्माण झालेली खारफुटी खाडी बुजवावी लागेल. अशा आशयाची ती बातमी होती. मी त्याला उत्तर म्हणून ही खाडी बुजवायची म्हणजे अनेक वनस्पती, तेथील मत्सजीव, सूक्ष्मजीव नष्ट होणार. ह्याशिवाय या खाडीच्या किनारी जे अनेक वर्षे मत्स्यव्यवसाय करतात त्यांच्या जीवनचरितार्थाचे काय?, याशिवाय ह्या प्रकल्पामुळे सागरीप्रदूषण, जलप्रदूषण, वायूप्रदुषण वाढेल त्याचे काय?, मी पर्यावरणप्रेमीच्या बाजूने माझं मत दिल्यावर ह्या मित्राने मात्र अरे कोकणी लोक तुम्ही असेच. इथे जगायला पैसा लागतो. तुमच्यासारख्या लोकांनी कोकणची प्रगती रखडवली.

आयती इथल्या भूमिपुत्रांना नोकरीची संधी उपलब्ध होणार असताना तुम्ही कोकणीलोक कोकणची वाट लावता. मला ह्या मित्राचा मुद्दा कळलाच नाही. इथल्या भूमिपुत्रांना फक्त जीवघेणा प्रकल्प झाला तरच नोकर्‍या मिळण्याची संधी आहे का?, इतर पर्यावरणप्रेमी उद्योग आले तर इथला तरुण मागे राहील का?, स्थानिक लोकांना नोकर्‍या या एका उदेशाने असे किती प्रकल्प इथे राबवले गेले आणि इथल्या तरुणांना किती नोकर्‍या मिळाल्या?. इतकी वर्षं परशुरामाची ही भूमी उपेक्षित होती. कोकण रेल्वे आली आणि सगळ्या खासगी कंपन्यांचे लक्ष ह्या भूमीकडे गेलं आहे. हळूहळू इथला समुद्र, इथली जंगलं सगळं वर बसलेले अधिकारी कुठल्यातरी नियमात बसवून हे सगळं विकतील. समुद्राच्या किनाराने पारंपारिक मासेमारी करणारे आमचे बांधव हे सगळे कसं झालं म्हणून बघत बसतील तेव्हा आम्ही विकासाभिमुख नागरिक म्हणून कोणाच्या बाजूने उभे राहू?

निसर्गाने आपले रौद्ररूप अनेकवेळा दाखवले आहे. आम्ही त्याच्या सांकेतिक भाषेकडे कानाडोळा केला आहे. राहून राहून इथल्या भूमीला नापीक करण्यासाठी उचललेल्या ह्या प्रकल्पाची भीती वाटते. हल्ली ह्या खासगी कंपन्यांकडे इतका पैसा आहे की त्या हा देश विकत घेतील. एखाद्या दिवशी सकाळी उठून वर्तमानपत्रात बातमी येईल की इथला समुद्रकिनारा खाडीच्या पाण्यासकट विकला गेला आहे. आमचे नाकर्तेपण म्हणून आम्ही मुग गिळून गप्प बसू. कारण काळच असा विचित्र येऊन ठेपला आहे.

हे सगळं विसरून पुन्हा खिडकीच्या बाहेर फुललेली चैत्रपालवी बघून आम्ही कॉलेजच्या तयारीने बाहेर निघते. नित्याची कामे आटोपून बारावीच्या बोर्डाचे पेपर तपासायला हाती घेतले. पहिला पेपर तपासून दुसरा पेपर हाती घेतला तर एक जाणवलं हा तर पहिल्या पेपरची प्रतिकृती. तिसरा दुसर्‍यासारखा. चौथा तिसर्‍यासारखा. अरे चालले काय?. नियामकाना कळवले तर त्यांना मुख्य नियामकांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात आपण मुलांना शिकवले आहे, गुणदान करताना हात थोडा सैल सोडा. सगळीकडे दुर्लक्ष करून मुलांना निदान पास होतील एवढ्या गुणापर्यंत आणून सोडा. कोणच कशाचे उत्तरदायीत्व घ्यायला तयार नाही. नैसर्गिक वाढीला आम्ही सगळ्या बाजूने कोंडून ठेवतो. एखाद्यावेळी मनात येते की काहीही विकण्याच्या काळात आम्ही बुद्धी, संवेदना आणि मूल्यदेखील विकायला काढलीत की काय? त्याशिवाय का एका मुलाची उत्तरपत्रिका ही दुसर्‍या मुलाच्या उत्तरपत्रिकेसारखी असते?. माणसाच्या सर्जनाचा काळ संपत आला की काय असा काहीसा भास होतो आणि दुसर्‍याक्षणी सगळे विसरून जीवनाच्या रहाटगाडग्याच्या मागे लागतो.

रात्री डोळा लागला की समोर कोकणातला समुद्रकिनारा येतो, दिवसभर तपासलेल्या उत्तरपत्रिका येतात. मुंबईत मागच्या दोन दिवसाच्या काळात जाणवलेली उष्णतेची लाट आठवते आणि भाऊसाहेब खांडेकरांच्या ययाती कादंबरीतलं वाक्य आठवत रहातं हे उन्मत्त सागरा ! उगाच गर्जना करू नकोस. आज काळ तुला पोषक आहे म्हणून पृथ्वीचा एक एक भाग तू जिंकत चालला आहे, पण थोडा वेळ थांब म्हणजे दैवाचा प्रताप तुला कळून येईल. ते जी मर्यादा घालून देईल, त्याच्या पलीकडे एक पाऊलसुद्धा तुला टाकता येणार नाही. उगाच हे सारे भास होतात. कोणाला पर्यावरण, समुद्र, नितीमत्ता ह्या गोष्टी हव्या आहेत. प्रत्येकाला हे सगळे भकास करून विकास हवा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -