घरफिचर्ससारांशदो दीवाने शहर में...

दो दीवाने शहर में…

Subscribe

आयुष्यात एकमेकांची अतूट सोबत असली की जीवनप्रवास सुखकर होतो. जगाच्या भाऊगर्दीत एकट्या व्यक्तीला जीवाभावाची संगत लाभली की त्या व्यक्तीचं आयुष्य सार्थकी लागतं. पैसा, संपत्तीमुळे आयुष्य सुखदायी होतं, पण अविस्मरणीय होईलच याची खात्री देता येत नाही. जीवन अविस्मरणीय होण्यासाठी एकमेकांच्या मनाच्या तारा झंकारल्या जायला हव्यात. ‘दो दीवाने शहर में...’ या गाण्यातून सोबत नि सहवासाची मनोहरी कथा सांगितलेली आहे.

निर्माता-दिग्दर्शक भीमसेन खुराना यांचा ‘घरौंदा’ हा चित्रपट 1977 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा डॉ. शंकर शेष यांची तर पटकथा गुलजार यांनी लिहिली होती. या चित्रपटात अमोल पालेकर, जरीना बहाब, डॉ. श्रीराम लागू, जलाल आगा, दीना पाठक, साधु मेहर, सुधा चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात तीन गाणी असून दोन गाणी ( एक अकेला इस शहर में… आणि दो दीवाने शहर में…) गुलजार आणि एक गाणे (तुम्हे हो ना हो मुझको तो इतना यकीन है…) गीतकार नक्ष लायलपुरी यांनी लिहिलं आहे. चित्रपटाचे संगीतकार आहेत जयदेव. गुलजार-जयदेव या जोडगोळीचा हा बहुदा एकमेव सिनेमा असावा. या चित्रपटासाठी डॉ. लागू यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा तर गुलजार यांना दो दिवाने शहर में… या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाला होता. शिवाय उत्कृष्ट चित्रपट-दिग्दर्शक-अभिनेत्री आणि कथा यासाठी फिल्म फेअरची नामांकने यांस मिळाली होती.

प्रतिभावंत असूनही संगीतकार जयदेव यांना हिंदी चित्रपटसृष्टीत तुलनेने कमी संधी मिळाली. शिवाय ते पंजाबी आणि इथं पंजाब्यांचे वर्चस्व आढळतं. मात्र ते कमनशिबी ठरले. असं असलं तरी जयदेव यांना एक नव्हे तर तीनदा उत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय सन्मान मिळाला. रेश्मा और शेरा (1972), गमन (1979) आणि अनकही (1985) हे ते तीन चित्रपट. तीन राष्ट्रीय पारितोषिक पटकावणारे हिंदी चित्रपटसृष्टीतले जयदेव पहिले संगीतकार आहेत. त्यांनी कारकीर्दीच्या सुरुवातीला महान संगीतकार सचिनदेव बर्मन यांचे सहायक म्हणून काम केलं. नवकेतन फिल्मसच्या ‘हम दोनो’ (1961) ह्या चित्रपटामुळे ते प्रकाशझोतात आले. यातली कभी खुद पे कभी हालात पे रोना आया.., अभी ना जाओ छोड के.., अल्लाह तेरो नाम… आणि मै जिंदगी का साथ निभाता चला गया… ही गाणी सिनेसंगीताच्या रसिकांच्या पसंतीस उतरली.

- Advertisement -

मुझफ्फर अली यांच्या ‘गमन’ मध्ये जयदेव यांनी अजीब सानेहा मुझपर गुजर गया यारो.., सिने में जलन आंख में तुफान सा क्यू है.., रातभर आप की याद आती रही… अशी एकपेक्षा एक गाणी (गझल) दिलीत. यात त्यांनी सुरेश वाडकर, हरिहरन, छाया गांगुली यासारख्या तत्कालीन नवोदित गायकांना संधी दिली. हिंदी साहित्यातले श्रेष्ठ कवी हरिवंशराय बच्चन यांच्या गाजलेल्या ‘मधुशाला’ या काव्यसंग्रहाला गायक मन्ना डे यांच्या आवाजात त्यांनी संगीतबद्ध केलं. ते आयुष्यभर अविवाहित राहिले. वयाच्या 68 व्या वर्षी 6 जानेवारी 1987 रोजी आपल्या इहलोकाची यात्रा त्यांनी संपवली. त्यांना चारदा सूर सिंगार संसद सन्मान मिळाला. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कारही त्यांना लाभला. काही चित्रपटांत त्यांनी छोटेखानी भूमिकाही केल्या.

आयुष्यात एकमेकांची अतूट सोबत असली की जीवनप्रवास सुखकर होतो. जगाच्या भाऊगर्दीत एकट्या व्यक्तीला जीवाभावाची संगत लाभली की त्या व्यक्तीचं आयुष्य सार्थकी लागतं. पैसा, संपत्तीमुळे आयुष्य सुखदायी होतं, पण अविस्मरणीय होईलच याची खात्री देता येत नाही. जीवन अविस्मरणीय होण्यासाठी एकमेकांच्या मनाच्या तारा झंकारल्या जायला हव्यात. ‘दो दीवाने शहर में…’ या गाण्यातून सोबत नि सहवासाची मनोहरी कथा सांगितलेली आहे. गायक भूपेंद्रसिंह आणि बांगलादेशची गायिका रुना लैला यांनी हे सवांदात्मक शैलीतलं गाणं गायलं आहे. यात सर्वसामान्य व्यक्तीचं भावविश्व गुलजार यांनी साध्या, सहज नि सोप्या शब्दांत वर्णिलेलं आहे. जयदेव यांनी मधुर चालीत हे गाणं बांधलंय. अमोल पालेकर आणि झरिना बहाब यांच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्यातले शब्द कल्पनारम्य अथवा स्वप्नील नाहीयेत. तर सर्वसामान्य व्यक्तीच्या मनातले विचार, भावना, आशा-आकांक्षा अधोरेखित करणारे आहेत. आपल्या हक्काचं छोटसं घर आणि त्यात सुखानं राहण्याची साधीसुधी अपेक्षा यातून व्यक्त झालेली आहे. सर्वसामान्य व्यक्तीचं सुख, त्याचं धाडस, त्याचं सौंदर्य, त्याची दंगा-मस्ती आणि विशिष्ट असा अंदाज गाण्यातून प्रतीत होतो. या गाण्यावर हा दृष्टिक्षेप:

- Advertisement -

दो दीवाने शहर में, रात में और दोपहर में
आब-ओ-दाना ढूँढते हैं एक आशियाना ढूँढते है
दो दीवाने शहर में, रात में और दोपहर में,
आब-ओ-दाना ढूँढते है एक आशियाना ढूँढते हैं
दो दीवाने…

इन भूलभूलइया गलीयों, अपना भी कोई घर होगा
अम्बर पे खुलेगी खिडकी या, खिडकी के खुला अम्बर होगा
असमानी रंग की आंखो में
असमानी या आसमानी ?
असमानी रंग के आंखो में, बसने का बहाना ढूँढते है, ढूँढते हैं
आब-ओ-दाना ढूँढते है एक आशियाना ढूँढते है
दो दीवाने…

जब तारे जमीन पर
तारे, और जमीन पर ?
ऑफ कोर्स…
जब तारे जमीन पर चलते है, आकाश जमीन हो जाता है
उस रात नही फिर घर जाता, वो चांद यही सो जाता है
पल भर के लिये, पल भर के लिये
पल भर के लिये इन आंखो में हम एक जमाना ढूँढते है, ढूँढते हैं
आब -ओ -दाना ढूँढते हैं एक आशियाना ढूँढते हैं
दो दीवाने शहर में…

मायानगरी मुंबईत घरट्याच्या शोधात असलेल्या प्रेमी जोडप्याने आपल्या नवथर प्रीतीचे रंग या गाण्यातून भरले आहेत. प्रेमात पडल्यानंतर व्यक्तीला अनेक संघर्षांचा सामना करावा लागतो. याच संघर्षाला कवी गुलजार यांनी वाचा दिलेली आहे, असं म्हणता येईल. समाजापासून दूर जात प्रेमाच्या सहार्‍याने संपूर्ण आयुष्य काढून घेऊ अशा प्रेमाच्या आणाभाका घेणं तसं सोपं असतं. वास्तव मात्र खूप वेगळं नि कठीण असल्याचं दिसून येतं. तरीही मन खंबीर नि शांत ठेवलं तर या सार्‍या खडतर वाटा पार करत इप्सित साध्य करता येतं. त्यासाठी गरज असते ती जिद्द, चिकाटी आणि संयमाची ! असं म्हटलं जातं ज्याने प्रेम केलं ती व्यक्ती जगण्याच्या प्रवासातल्या अनेक खाचखळग्याना धीराने सामोरी जाते. असाच काहीसा संदेश या गाण्यातून श्रोत्यांना दिलाय. सत्तरच्या दशकात मुंबईत पोटापाण्यासाठी आलेल्या एका मध्यमवर्गीय नवदाम्पत्याच्या सच्च्या भावनांचा आविष्कार या गाण्यातून घडवलेला आहे. या गाण्यातली ‘उस रात नही फिर घर जाता, वो चांद यही सो जाता है’ ही खास गुलजार यांच्या शैलीतली अभिव्यक्ती !

–प्रवीण घोडेस्वार 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -