Sunday, May 2, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश प्रवक्ता व्हायचंय मला!

प्रवक्ता व्हायचंय मला!

Related Story

- Advertisement -

पक्या फोमणसकर आज सकाळी जो उठला तो तिरीमिरीत थेट घराजवळच्या एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात घुसला. काल रात्री सगळ्या मराठमोळ्या सिरीयल्स बघून झाल्यानंतर त्याच्या मनात एक स्वप्न तरळलं होतं आणि त्या स्वप्नाचं त्याला आपल्या ध्येयात रूपांतर करायचं होतं.

झालं होतं असं की पक्या फोमणसकरसारख्या अनेकांनी तगवलेली ‘माझ्या नवर्‍याची बायको’ अनेक वर्षांनी संपली होती. त्यामुळे करोडोचा टर्नओव्हर असलेली तमाम मराठी जनांची लाडकी राधिका मसालेवाली टीव्हीवरून सध्या दिसेनाशी झाली होती. दुसरीकडे ‘तुझ्यात जीव रंगला’मधला राणादा आणि फाटकबाई काही दिवसांनी फिक्या फिक्या होत नंतर पार डिलिटच झाल्या होत्या.

- Advertisement -

आधी छान चमकत राहायचं आणि नंतर असं एकाएकी डिलिट व्हायचं हा प्रकार पक्या फोमणसकरच्या आजच्या काळातल्या अनप्रोफेशनल मनाला पटला नव्हता. ‘माझ्या नवर्‍याची बायको’ संपल्यानंतर काही दिवस पक्या फोमणसकरच्या घशाखाली मसाल्याचा एकही पदार्थ उतरत नव्हता आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ संपल्यानंतर दंड फुगवून आरशासमोर पक्या फोमणसकर एकदाही उभा राहिला नव्हता. चमचमत्या नभांगणातल्या सुप्त कलागुण असलेल्या अशा चंद्रचांदण्यांचं अकस्मात लुप्त होणं पक्या फोमणसकरला खूपच चटका लावून गेलं होतं. अशा चंद्रचांदण्यांनी चिरंतन आपल्या दिव्य चक्षूंसमोर चिरंतन चमचमत राहावं अशी पक्या फोमणसकरची प्रांजळ इच्छा होती.

कालच्या सिरीयल्स पाहिल्यानंतर पक्या फोमणसकरने आपलंच आपल्याशी ह्यावर खूप विचारमंथन केलं. टीव्हीवर चिरंतन चमचमत राहायचं असेल तर आपण काय करायला हवं हाच प्रश्न त्याच्या मनात अंथरुणावर पसरेपर्यंत बराच वेळ पसरून राहिला. इतक्या सखोल विचारप्रक्रियेचा व्हायचा तोच अनुकूल परिणाम झाला. पक्या फोमणसकरच्या स्वप्नात एका राजकीय पक्षाचा एक पक्का प्रवक्ता आला.

- Advertisement -

त्याचाच अनुकूल परिणाम म्हणून पक्या फोमणसकर अंथरुणातून तिरीमिरीत उठला. त्याच्या मनात आलं – च्यायला, राधिका मसालेवाली संपली, फाटकबाई गायब झाली, पण हा राजकीय पक्षाचा हा प्रवक्ता मात्र आज इतकी वर्ष आपल्या ज्ञानाच्या स्वयंप्रकाशाने अधूनमधून का होईना, पण कायम तेवतो आहे. टीव्हीच्या पडद्यावर चमकत राहायचं असेल तर कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रवक्ता होण्याशिवाय दुसरा मार्ग नाही!

झालं, पक्या फोमणसकर अंथरुणातून उठला तोच प्रवक्ता होण्याचं नवं स्वप्न डोळ्यांंत घेऊन. नवं ध्येय उराशी बाळगून. सकाळचे सगळे रितीरिवाज उरकून पक्या फोमणसकरने जी धुम ठोकली ती त्याने स्वत:च्या घराजवळचं राजकीय पक्षाचं एक तारांकित कार्यालय गाठलं. मागचंपुढचं काही न पाहता तो थेट त्या कार्यालयात घुसला. कार्यालयातल्या स्वागतकक्षात पक्षाचा एक अर्धपिकला निष्ठावान कार्यकर्ता बसला होता. पक्षाला आयुष्यभर निष्ठा वाहून तो कार्यकर्ता कार्यालयातल्या खुर्चीतच बसल्या बसल्या अर्धा पिकला होता हे अर्धवट राजकारण कळणार्‍यांनाही कळायचं. पक्या फोमणसकरलासुद्धा ते अर्ध्या कटाक्षात कळलं.

पक्या फोमणसकरने म्हणूनच त्याच्या स्वागताची किंचितही दखल घेतली नाही. अर्धपिकला कार्यकर्ता, ‘अहो, शुक शुक, रजिस्टरमध्ये नावाची नोंद करा’ वगैरे बोंबलत बसला. पण पक्या फोमणसकरच्या डोळ्यांत नवं स्वप्न तरळत होतं, मनात नवं ध्येय उमलत होतं. त्याने अर्धपिकल्याला हिशेबात पकडलंच नाही. पक्या थेट गेला तो कार्यालयातल्या एका केबिनमध्ये घुसला. केबिनमध्ये पक्षाचा एक शीर्षस्थ नेता बसला होता. उन्हं कलत गेली की नंतर कार्यकर्त्यांचा घोळका जमतो म्हणून तो जमण्याआधीच तो नेता केळीच्या पानाच्या एका हिरव्याशार तुकड्यावर पसरलेलं थालिपीठ खात होता.

हे थालिपीठ खाण्यात त्या शीर्षस्थ नेत्याची छान समाधी लागलेली असतानाच पक्या फोमणसकर सरळ त्या थालिपीठाच्या बाजूलाच येऊन बसला. शीर्षस्थ नेत्याची थालीपिठीय समाधी तात्काळ भंग पावली.

ह्या कार्यालयातल्या सगळ्या नेत्यांचा नेता, आय मिन शीर्षस्थ नेता कोण? पक्या फोमणसकरने रोकडा सवाल केला.
तो सवाल शीर्षस्थ नेत्याला सुखावणारा होता. शीर्षस्थ नेत्याने तर्जनी छातीवर टेकवली आणि खुणेनेच आपण इथला शीर्षस्थ नेता असल्याचं सांगितलं.
‘बोला…काय काम काढलंत?‘ शीर्षस्थ नेता म्हणाला.
‘मला तुमच्या पक्षात यायचंय‘, पक्या फोमणसकरने अजिबात वेळ न लावता सांगून टाकलं.
मग शीर्षस्थ नेता आणि पक्या फोमणसकर ह्या दोघांमध्ये इंटरव्ह्यू स्टाइल सवाल-जबाब झडला.
‘आमच्या पक्षात येऊन काय करायची इच्छा आहे तुमची?‘ शीर्षस्थ नेत्याने विचारलं.
‘मला प्रवक्ता व्हायचंय‘, इथेही पक्या फोमणसकरने जराही वेळ लावला नाही.
‘अच्छा?…प्रवक्ता म्हणून काय पात्रता तुमच्यात आहे असं तुम्हाला वाटतं?‘
‘सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मला माझा मुद्दा सिद्ध करता आला नाही तरी माझा आवाज मोठा आहे हे सिद्ध करता येतं.‘
‘अच्छा म्हणजे तुमचा बेंबीचा देठ भक्कम आहे…त्याशिवाय प्रवक्ता होणं कठीण आहे हे खरं आहे…आणखी काय पात्रता आहे तुमच्याकडे प्रवक्ता होण्यासाठी?‘
‘दुसर्‍या प्रवक्त्याने आपल्या विरोधातला मुद्दा मांडला की मी आपल्या हातातल्या मोबाइलशी चाळा करण्याचा अभिनय करत त्याचा मुद्दा कस्पटासमान लेखू शकतो.‘

‘आणखी?‘
‘दुसरा प्रवक्ता आपल्या पक्षाचा मुद्दा जोरदारपणे खोडून काढत असेल तर नळावरच्या भांडणाचा सूर लावून मी त्याचा एकही शब्द अँकर काय, कुणालाच ऐकू येणार नाही इतक्या डिसेबलपर्यंत किंचाळू शकतो.‘
‘ते तुमच्या बेंबीच्या देठाची क्षमता सांगताना तुम्ही आधीच सांगितलंत…तुमची आणखी पात्रता सांगा.‘

‘आपल्या पक्षासाठी अडचणीचा प्रश्न विचारल्यावर आपल्याकडे देण्यासाठी उत्तर नसेल तर चॅनेलची सगळी सिस्टिम व्यवस्थित असतानाही आपल्यापर्यंत तुमचा आवाज पोहोचत नसल्याचे हातवारे मी करू शकतो.‘
‘आणखी?‘

‘आपल्या पक्षाच्या ऐतिहासिक चुकांबद्दल कुणी काही विचारलंच तर ह्या विषयावर स्वतंत्र चर्चा करता येईल, ती जेव्हा कराल तेव्हा आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो, पण आज तो विषय इथे नाही, त्याच्या खोलात मला आज जायचं नाही, आजचा विषय वेगळा आहे असं म्हणून मी आपल्या चुका साफ धुडकावू शकतो.‘

पक्या फोमणसकरच्या शेवटच्या उत्तरावर शीर्षस्थ नेत्याने थालिपीठाचा छान ढेकर दिला. पक्या फोमणसकरलाही आपल्या नव्या स्वप्नाला, नव्या ध्येयाला आकार मिळणार ह्याची खात्री पटली.

- Advertisement -