1971 मधील न संपलेली प्रतीक्षा !

भारतीय सैन्याची यशोगाथा स्पष्ट करणारी कथानकं हिंदी पडद्यावर साकारली गेली आहेत. हकिकतपासून बॉर्डर, उरीपर्यंत ही यादी असताना 2007 मध्ये रिलिज झालेला ‘1971’ वेगळा ठरावा. पियुश मिश्राचे कथानक आणि अमृत सागरचं दिग्दर्शन असलेला ‘1971’ या चित्रपटाला भारत-पाकिस्तानच्या युद्धाची पार्श्वभूमी आहे. हिंदी सिनेमातील सैनिकी कथानकाच्या बहुतेक चित्रपटात याच युद्धाचे कथानक असताना हा सिनेमा इतर सैनिकी चित्रपटांपेक्षा वेगळा ठरतो. कारण सीमेपार अडकलेल्या भारतीय सैनिकांची प्रतीक्षा अजून संपलेली नाही.

भारत-पाकिस्तानमधील 1971 सैनिकी युद्ध संपलेलं आहे. युद्धविरामानंतरच्या आंतरराष्ट्रीय मुत्सदी धोरणांच्या शीतयुद्धाची दुसरी बाजू या चित्रपटातून समोर येते. 1971 चित्रपटाला पाकिस्तानमध्ये रिलिज करण्यास बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटातून पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांना थेट खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला असून युद्धातील वास्तवापासून फारकत घेऊन हा चित्रपट बनवल्याचा आरोप पाकिस्तानी माध्यमांनी केला होता. तर भारतातही 1971 च्या प्रदर्शनाबाबत वाद निर्माण झाले होते. सिनेमाचं कथानक ऐतिहासिक सत्यापासून फारकत घेणारं असल्याचा आरोप झाला. आरोप करणार्‍यांमध्ये पाकिस्तानातील आणि भारतातीलही अनेकजण होते. या चित्रपटाच्या कथानकातून भारत-पाक युद्धकाळात भारताच्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा पराभव समोर आल्याचंही अनेकांचं म्हणणं होतं.

युद्ध संपल्यानंतर संबंधित देशांच्या ताब्यात असलेले युद्धकैदी सैनिक सहीसलामत त्यांच्या मायदेशाकडे देण्याबाबतच्या आंतरराष्ट्रीय कायद्याचं पाकिस्तानने केलेल्या उल्लंघनाचे कथानक या चित्रपटात आहे. कुठल्याही देशाच्या सैनिकी घडामोडी आणि कायद्यांमध्ये कमालीची गोपनीयता पाळली जाते. देशाची प्रतिमा जागतिक पटलावर डागाळली जाऊ नये आणि देशातील नागरिकांचा सुरक्षा यंत्रणांवरील विश्वास कायम राहावा हा प्रयत्न यामागे असतो. या शिवाय देशवासीयांची राष्ट्रभावना, सार्वभौम लोकशाही धोक्यात येऊन अराजक निर्माण होण्याची भीतीही या गोपनीयतेमागे असते. 1971 चित्रपटाच्या कथानकातूनही ही बाब समोर येते. देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांची नावे देशवासियांना माहिती असतात, त्यांचा गौरवशाली इतिहास असतो, मात्र असेही अनेक सैनिक योद्धे असतात.

ज्यांची नावे समोर येत नाहीत किंवा जाणीवपूर्वक आणली जात नाहीत. कारण ते सीमेपलीकडे अडकलेले असतात. आपल्या पराभवाचा सूड तो देश त्या पकडलेल्या सैनिकांवर उगवत असतो. १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धात पाकिस्तानचा भारताने पराभव केला. पाकिस्तानचे पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश निर्माण झाला. त्याचसोबत भारताने पाकिस्तानचे ९१००० हजार सैनिक युद्धकैदी बनवले होते, पण ते त्यांना परत करण्यात आले, पण पाकिस्तानच्या बाजूने तो प्रामाणिकपणे दाखवण्यात आला नाही. पकडले गेलेल्या ५६ भारतीय सैनिकांना सोडण्यात आले नाही, त्यांचे हाल करण्यात आले. ते आपल्याकडे आहेत, त्याचा सुगावाही पाकिस्तानने लागू दिला नाही. त्यामुळे काळाच्या ओघात ही नावे लुप्त झाली. हा काळा इतिहास आणि त्या भारतीय युद्धकैद्यांची न संपणारी प्रतीक्षा ‘1971’ हा चित्रपट समोर आणतो.

पाकिस्तानचे सैनिक त्यांना मिळालेल्या आदेशाप्रमाणे काम करत असले तरी तिथल्या मानवतावादी संघटनांची माणसे आणि कलाकार सहानुभूतीने विचार करणारी आहेत, हेही हा चित्रपट दाखवतो. पाकिस्तानी सैनिक भारतीय युद्धकैदी सैनिकांना विविध ठिकाणी लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. कारण भारतीय सैनिक पाकिस्तानच्या ताब्यात आहेत हे सिद्ध झाले असते, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पोलखोल झाली असती. ते टाळण्यासाठी पाकिस्तानी शासकांची धडपड सुरू असते. पण त्याच वेळी पाकिस्तानातील मानवाधिकार विभागाच्या महिला सदस्य भारतीय सैनिकांचा शोध घेऊन वास्तव समोर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात.

त्याच वेळी गायिका खानम खान यांना भारतीय सैनिक आपली सुटका करून घेताना सोबत घेतात, जेव्हा त्यांना बेशुद्ध करण्याची वेळ येते तेव्हा त्या म्हणतात, मला बेशुद्ध करू नका. पाकिस्तानातून केवळ अविश्वास घेऊन जाऊ नका, विश्वासही घेऊन जा. पुढे जेव्हा पाकिस्तानी सैनिक यांना भारतीय सैनिकांची माहिती विचारतात तेव्हा त्या भारतीय सैनिक ज्या मार्गाने गेलेेले असतात तो सांगत नाहीत. त्यामुळे भारतीय सैनिक पाकिस्तानी सैनिकांना सापडत नाहीत. पाकिस्तानला भारताशी झालेली सगळी युद्धे हरावी लागली आहेत, त्यामुळे त्यांच्या मनातील सुडभावना वाढत जात असते. त्यातूनच मग युद्धकैदी सैनिकांचा छळ करणे, भारतीय हद्दीत अतिरेकी पाठवून हल्ले करून सामान्य नागरिकांचे बळी घेणे सुरू असते.

चित्रपटात मनोज वाजपेयीने साकारलेला मेजर सुरज सिंग केवळ अप्रतिम आहे. या मेजरसोबत इतर सैनिकी अधिकारी, दोन एअरफोर्स पायलट आणि इतर सैनिकही पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. रेडक्रॉसच्या नजरेआड त्यांना सीमावर्ती भागात विशेष बंदोबस्तात ठेवण्यात आलंय, भारताविरोधात मुत्सद्दीगिरीत वेळ आल्यावर त्यांचा योग्य ठिकाणी वापर करून घेण्याच्या पाकच्या नुकत्याच बदललेल्या सरकारचं धोरण आहे. या सैनिकांना जिनिव्हा करारानुसार मायदेशात पाठवणं बंधनकारक असतानाही त्यांना बेकायदा ताब्यात ठेवलं आहे. मात्र सैनिकांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात असल्याचा बनाव पाकिस्तानकडून केला जात आहे. या बनावाला भारत कसा बळी पडतो आणि आपल्या जवानांना सुरक्षित आपल्या देशात आणण्यात अयशस्वी कसा ठरतो, जिनिव्हा कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार्‍या रेडक्रॉस सोसायटीचं अपयशही हा सिनेमा पुढे आणतो.

भारतीय सैनिकी कथानकावरील आधारीत चित्रपटात इतिहासाचे संदर्भ देत देशभक्ती, शौर्याची कथानकं साकारल्याचाही सिनेइंडस्ट्रीचा इतिहास आहे. 1971 हा त्याला अपवाद आहे. या चित्रपटातील कथा संदर्भामुळे पाकिस्तानवर भारताने युद्धात मिळवलेला विजय किती तोकडा होता यावर भाष्य केल्यानं या विजयाच्या सांगितलेल्या यशोगाथेवरही चित्रपट प्रश्नचिन्ह निर्माण करतो. त्यामुळे आपल्या युद्धकालीन लढ्याच्या विजयी इतिहासाला आव्हान देणारं कथानक असल्यानेच हा चित्रपट इतिहासकालीन संदर्भांनाही धक्के देतो. दोन देशांमधील युद्धकालीन इतिहासाचे अनेक पैलूही या चित्रपटाने समोर येतात. युद्ध केवळ दोन देशांच्या सैनिकांमध्येच लढलं जातं, हा सामान्यांचा गैरसमज 1971 खोडून काढतो. दोन देशातील सैनिकी यंत्रणेतील अधिकारीच युद्धांचे शिलेदार असतात, हेही स्पष्ट होतं. अवाजवी देशप्रेमाला फाटा देत चित्रपटाचं कथानक युद्धज्वराचे सैनिकी परिणाम थेटपणे समोर मांडतो. धार्मिक उन्मादामुळे देशाला असलेला धोकाही 1971 मधून समोर येतो.

सैनिकांची बांधिलकी थेट राष्ट्राच्या तिरंग्याशी असते. देशाच्या फाळणीचे परिणाम सैनिकांच्या मानसिकतेवर किती विपरित झाले, हे जाणवून घेण्यासाठी हा सिनेमा पाहायला हवा. पाकिस्तानच्या युद्ध छावणीत नजरबंद असलेल्या भारतीय सैनिकांमधील कर्नल पुरी आणि सुभेदार अहमद यांच्यातील पडद्यावर दिसणारा तणाव सैनिकांच्या देशाविषयी असलेल्या बांधिलकीमध्ये धार्मिक उन्मादाची भेसळ झाल्यास निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीवर प्रकाश टाकतो. तर सुभेदार अहमदची व्यक्तीरेखा देशाप्रति निष्ठा असलेल्या आणि भारत-पाकिस्तान फाळणीपासून कायमच आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केल्या जाणार्‍या विशिष्ट समुदायाचं नेतृत्व करते. आपला जीव आणि रक्ताची आहुती देऊनच देशाप्रति असलेली निष्ठा सिद्ध करण्याची वेळ फाळणीनंतर येथील अल्पसंख्यांकावर वारंवार का यावी, असा प्रश्नही कथानकातून निर्माण होतो. 1971 रिलिज झाल्यावर त्याच्या दुसर्‍याच वर्षी समर खान दिग्दर्शित ‘शौर्य’ नावाचा हिंदी सैनिकीपट प्रदर्शित झाला होता.

आलेल्या कटू अनुभवातून विशिष्ट धर्मसमुदायाप्रति असलेल्या द्वेषपूर्ण धारणेचा परिणाम कोर्ट मार्शल कारवाई झालेल्या ब्रिगेडियर रुद्रप्रताप सिंगच्या व्यक्तीरेखेतून के. क.े मेनन या कसलेल्या अभिनेत्याने समोर आणला होता. 1971 च्या एकूण कथानकामध्ये हासुद्धा एक महत्वाचा धागा आहे. पियुश मिश्रा लक्षात राहाण्याचं कारण वेगळं आहे. पाकिस्तानी सुरक्षा अधिकार्‍यांनी रेडक्रॉसला अंधारात ठेवून आंतरराष्ट्रीय कायद्याची केलेली थेट पायमल्ली त्याला कळतेय, पण सैनिकी आदेशापुढे तो हतबल असल्याचं त्याने संतुलित अभिनयातून स्पष्ट केलं आहे. पाकच्या छावणीतून पळ काढण्याचं धाडस थेट मरणात बदलू शकतं, हे माहीत असूनही मेजर सुरज सिंग (मनोज वाजपेयी) ने असं धाडस करण्यामागे असलेल्या कारणांचा उहापोह युद्धजन्य परिणामांची निगेटिव्ह बाजू समोर आणतो. मनोज वाजपेयीनं आपल्या कसदार अभिनयातून 1971 चा डोलारा एकहाती पेलला आहे. उत्तम पटकथा, दिग्दर्शन आणि संवादामुळे 1971 लक्षात राहतोच, भारतीय सैनिकांच्या कधीही समोर न आलेल्या सहनशक्तीची शौर्यगाथा म्हणूनही 1971 पाहायला हवा.