घरफिचर्ससारांशस्टाईल आयकॉन!

स्टाईल आयकॉन!

Subscribe

एकाच वेळी खलनायकी जरब आणि त्याच वेळी हळव्या प्रियकरासाठी असलेली आतुरता रमेश देव यांच्या आवाजात होती. सत्तरच्या दशकात ऐन रोमँटीसिझमच्या काळात हिंदी पडद्यावर राजेश खन्ना धुमाकूळ घालत होता. त्याच वेळी मराठी चित्रपटसृष्टीत रमेश आणि सीमा देव यांच्या जोडीने प्रेमळपटांची सुुरुवात केली होती. मराठी पडद्याची या काळात दोन टोकं होती, एका बाजूला लोककलेचा बाज असलेला तमाशापट आणि दुसर्‍या बाजूला रमेश देव यांचे चित्रपटांचा हुकूमी प्रेक्षकवर्ग होता. हिंदीच्या तोडीस तोड स्टाईल आयकॉन, पियानो प्लेअर प्रियकराचा रोमँटीसिझम मराठीच्या पडद्यावर आणलेल्या रमेश देव यांनी ग्रामीण कथानकांनाही तेवढ्याच ताकदीने न्याय दिला. रमेश हे नाव त्यावेळी रोमँटीक प्रियकराच्या नावासाठी मराठीत समानार्थी शब्द होता.

लोककलावंत, ग्रामीण कथानकांचे नेतृत्व करणार्‍या तमाशापटांसाठी चंद्रकांत, सूर्यकांत आणि अरुण सरनाईक ढोलकीच्या थापेवर उघडणार्‍या पडद्याचे शिलेदार होते. तर विशेष करून ग्रामीण शहरी भागातील प्रेक्षकांसाठी रमेश देव आणि सीमा देव यांची जोडी प्रेमपटातील आदर्श जोडी होती. सीमा आणि रमेश देव यांच्या ‘अपराध’ चित्रपटातील छायाचित्रासारखे फोटो काढून घेण्यासाठी सत्तरच्या दशकात फोटो स्टुडिओमध्ये गर्दी केली जात होती. ‘अपराध’मधील कृष्णधवल पोस्टर फोटो स्टुडिओबाहेर लावली जाण्याचा हा काळ होता. रमेश देवांच्या आवाजात एक प्रकारची जरब होतीच, त्यांचा जन्म जरी अमरावतीचा असला तरी बालपण आणि तारुण्याचा काळ कोल्हापूरमध्ये गेला होता. त्यामुळे कोल्हापूरचा ग्रामीण बाज त्यांच्या आवाजात होता. हिंदी पडद्याने त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला.

हिंदीतल्या सत्तरच्या दशकातल्या ‘जमीर’ आणि ‘परवरीश’ची कथा जवळपास सारखीच होती. दोन्ही चित्रपटात अमिताभ आणि विनोद खन्ना होतेच. मात्र, ‘जमीर’मध्ये रमेश देव यांचीही महत्वाची आणि चित्रपटाच्या कथानकाला कलाटणी देणारी भूमिका होती. जमीरमध्ये ठाकूर महाराज सिंह शम्मी कपूरने साकारला होता. ठाकूरच्या मुलाचं लहानपणी दरोडेखोरांच्या टोळीकडून अपहरण केलं जातं. या मुलाच्या दंडावर त्रिशूळचं गोंदण असल्याची माहिती रामू या महाराज सिंह यांच्या एकमेव विश्वासू नोकराला असते. हा रामू रमेश देवांनी साकारला होता, रामू साकारताना त्यांनी कोल्हापूरच्या गावरान भाषेतून ही भूमिका जिवंत केली. जमीरमध्ये एका जत्रेतील प्रसंगात रामू (रमेश देव) आणि विजय (अमिताभ बच्चन)ची भेट होते. रामू या मेळ्यात बंदुकीने पडद्यावर लावलेले फुगे फोडण्याचा जुगार चालवत असतो.

- Advertisement -

अमिताभ फुगे फोडण्यासाठी आल्यावर रमेशने दिलेल्या बंदुकीच्या नळीची नोक व्यवस्थित लावून घेतो आणि फुगे फोडून जुगार जिंकतो, त्यावेळी चेहर्‍यावरील आश्चर्याचे भाव अचानक हव्यासात बदलण्याची किमया देवांनी रामूच्या व्यक्तीरेखेतून केलेली असते. अमिताभ म्हणतो, ‘आज तर वो बंदूक नही बनी, जो हमारा निशाना बदल सक’े….असाच संवाद महाराज सिंहांकडून नोकर रामूनं ऐकलेला असतो आणि महाराजांचा हरवलेला मुलगा म्हणून अमिताभला शम्मी कपूरच्या घरी धाडतो. महाराजांच्या मालमत्तेत अर्ध्या हिस्स्याच्या अटीवर जमीरच्या पडद्यावर सुरू झालेल्या या बनावातून कथानक पुढे सरकतं…रमेश देवांनी हिंदी पडद्यावर चरित्र अभिनेते म्हणूनच बहुतांशी भूमिका केल्या. मात्र, आपल्या भूमिकेची छाप त्यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून पाडली गेली.

हिंदी कलाकारांना घेऊन मराठीत ‘दोस्त असावा तर असा’ चित्रपट १९७८ मध्ये देवेंद्र गोयल यांनी बनवला. रवीराज, असीत सेन, डेव्हिड अब्राहम असे हिंदीतले आघाडीचे कलाकार यात होते. म्हातारपणात आईवडिलांचे हाल करणार्‍या श्रीकांत मोघे या मोठ्या भावाला धडा शिकवणार्‍या छोट्या भावाची भूमिका यात रवीराज यांनी केली होती. दोस्त असावा….मध्ये रमेश देवांची भूमिका ही चित्रपटाचा मुख्य नायक, रवीराजच्या समांतर अशीच होती, रवीराजचा मित्र सदू शिंदे (रमेश देव) मुळे रवीराज वेटरपासून हॉटेलचा मालक बनण्याचा प्रवास या चित्रपटात होता. हिंदीतील दोस्तीपटांमध्ये आजही देवांनी साकारलेल्या सदूची आठवण काढायला हवी. हिंदी आणि मराठी पडद्यावर रमेश देव यांनी ७० हून अधिक वर्षे काम केले. हिंदी भाषेची जाण आणि आवाजामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांनी अनेकविध भूमिका साकारल्या. ऐंशीच्या दशकात देवांनी मुलगा अजिंक्यला घेऊन ‘सर्जा’ची निर्मिती केली. मराठी आणि हिंदीतही सर्जाचे कौतुक झाले आणि तिकीटबारीवरही चित्रपटाने चांगला व्यवसाय केल्याने अजिंक्य देव ही नवी ओळख हिंदी पडद्याला झाली.

- Advertisement -

मराठी चित्रपटांमध्ये हिंदीच्या तोडीस तोड प्रेमकथानकांच्या चित्रपटांची ओळख रमेश देव यांच्या चित्रपटांनीच करून दिली. हिंदी सिनेसृष्टी ज्यावेळी राजेश खन्ना, कपूर कुटुंबाच्या चित्रपटांनी भारलेली होती. अशोक कुमार, राज कपूर आणि राजेश खन्नाची मक्तेदारी असलेला हिंदी पडद्यावरचा रोमँटीसिझम पियानो रमेशने मराठीत आणला. सूर तेच छेडिता….हे आजही मराठीतलं पियानोवरचं दुर्मीळ गाणं असावं….हिंदी पडद्यावर स्टाईल आयकॉन म्हणून दिलीप कुमार, राजकुमार, अशोककुमार यांची ओळख होती. हातात सिगार किंवा सिगारेट पेटवून ब्लेझरच्या खिशात हात घालून पियानोला टेकून उभे राहणारे, आपली स्टाईलबाज चाल दाखवणारे खडाखड बूट वाजवून पडद्यावरच्या एंट्रीला टाळ्या मिळवणारे कलावंत हिंदीत मुबलक होते. याशिवाय कोटाच्या बटनाशी खेळत संवादातील सातत्य राखणारे मेथडीक कलावंतही होते.

मराठीत सूट बूट आणि स्टँडींग स्टाईल आयकॉन नायकाची सुरुवात रमेश देवांनीच केली. हिंदीत राजेश किंवा अमिताभच्या ओठांमध्ये फिरणारी सिगारेट रमेशने मराठीत आणली. तर प्राणसाहेबांच्या हातातली छडी आणि हॅट रमेशच्या हातातही तेवढीच रुळली. हिंदीतली राज, गुरुदत्त यांच्या तुलनेत बारीक मिशी हिंदीत रमेशच्या चेहर्‍यावरच शोभली असावी. रमेश हिंदीतही काम करत होते, मराठीतही वेगवेगळ्या भूमिका करताना रमेशने हिंदीतला दर्शनी नायक तस्साच्या तस्साच मराठीत आणला नाही, मराठीतील नायक साकारताना त्यांनी मराठीचा बाज कायम राखला. मात्र, या दोन्ही भाषेतील चित्रपटाचा सेतू म्हणजेच रमेश देव अशी स्थिती सत्तर, ऐंशीच्या दशकात होतीच.

‘आनंद’मध्ये राजेश खन्नाच्या कर्करोगाविषयीची माहिती समजल्यावर आपल्यातील निखळ माणूस, मित्र आणि डॉक्टर या तिहेरी भूमिकेतील डॉ. प्रकाश कुलकर्णी साकारणार्‍या रमेश देवांनी ही कसरत अभिनयातून पेलली. तर आनंदच्या पडद्यावर सुमन कुलकर्णी झालेल्या सीमा देव यांनी त्यांना उत्तम साथ दिली. सीमा आणि रमेश ही जोडी मराठी सिनेसृष्टीला पडलेल्या गोड स्वप्नासारखी आजही आहे. मराठी चित्रपटांना हिंदीच्या काळानुसार वळवण्यात या देव जोडीचा मोलाचा सहभाग आहे.

दिल अपना और प्रित पराई…मध्ये मीना कुमारीने साकारलेली नर्स ही १९६० च्या काळातली, पुढे खामोशीमध्ये वहिदाने परिचारिका साकारली, हिंदी पडद्यावर हेमा मालिनी, शर्मिला, पुढे माधवी, श्रीदेवीनेही साकारल्या. मराठीत मात्र सीमा देव यांनी साकारलेली ‘अपराध’ मधली नर्स एकमेव असावी. अपघात झालेल्या रमेश देवची सेवा शुश्रूषा करणारी सीमा या नर्स आणि अपघातात दवाखान्यात दाखल झालेला गायक कलावंत श्याम दाते अर्थात रमेश देव यांच्यात फुलत जाणार्‍या प्रेमकथेचा विषय अचानक गंभीर वळणावर आल्याचं कथानक अपराधाचं होतं. मराठीतल्या ‘अपराध’ने मराठी चित्रपटांना दर्जा आणि संगीत तसंच अभिनयामुळे हिंदीशी थेट स्पर्धा करण्याचं बळ दिलं.

त्यामुळेच मराठीसोबतच हिंदी भाषक आणि सिनेसृष्टीनेही अपराधचं कौतुक केलं. रमेश आणि सीमा यांची जोडी ही केवळ पडद्यावरच नाही, तर प्रत्यक्षातही आदर्श पती-पत्नीची जोडी होतीच. सत्तरच्या दशकात सीमा यांच्या साड्या, केसात माळलेलं फूल, बहुतेक चित्रपटात सीमा यांच्या केसात फूल माळण्याचं काम रमेश देवांनीच केलेलं आहे. सीमा यांच्या कपड्यांच्या पद्धती आणि रमेश देवांचे सूट, ब्लेझर, कॅज्युअल स्टाईलचे शर्ट्स हे कुतूहल आणि कौतुकाचे विषय होते. रमेशचं हसणं जगणं सगळंच निर्भेळ होतं. सिनेनिर्मितीपासून ते अभिनयापर्यंतचा त्यांचा सत्तर वर्षांचा प्रवास जगण्याची प्रेरणा देणाराच होता. रमेश नावाचा मराठीतला स्टाईल आयकॉन सिनेरसिकांच्या मनाच्या पडद्यावर कायम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -