घरफिचर्ससारांशमिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनचा भुलभुलैया !!!

मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनचा भुलभुलैया !!!

Subscribe

अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांमधून सहा ते पंधरा वयाच्या वयोगटातील मुलांमुलींना स्टेजवर येण्याचे आवाहन केले. प्रेक्षकांमधील मुलां-मुलींचे कुतूहल शिगेला पोहचलेले होतेच. त्यामुळे दहा-बारा मुलं-मुलीं पळतच स्टेजवर आले. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनवाल्यांना सांगितले की, तुम्ही मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन प्रशिक्षणाच्या नावाखाली जबर फी आकारून तीन ते सात दिवसाचे प्रशिक्षण मुला-मुलींना देतात. आता आम्ही तुम्हाला ह्या आलेल्या मुला-मुलींकडून काहीही फी न घेता, फक्त पाच मिनिटाचेच प्रशिक्षण त्यांना देऊन त्यांचे डोळे बांधून पुस्तकातील मजकूर आणि तत्सम गोष्टी करायला सांगतो.

2014 ह्या वर्षातील १ मेचा दिवस, म्हणजे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन ! वेळ दुपारची! ओझर (मिग), तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथून एका अंनिसच्या कार्यकर्त्याचा फोन आला. हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या लोकवस्तीमध्ये आनंद मेळाव्याच्या निमित्ताने मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनचा जाहीर कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता होणार असल्याचे त्याने सांगितले. पुढे तो असेही म्हणाला की, छद्मविज्ञानाच्या आधारे लोकांमध्ये दैववाद व अंधश्रद्धा पसरवण्याचा हा प्रकार आपण थांबवला पाहिजे. त्यासाठी तुम्ही नाशिकहून काही कार्यकर्ते ओझरला या. त्याप्रमाणे नाशिकहून आम्ही दोघेतिघे कार्यकर्ते ओझरला वेळेच्या आत पोहचलो. संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी साहेबांची भेट घेतली. मिड ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन हा छद्मविज्ञानावर आधारित असा चमत्काराला खतपाणी घालून, लोकांमध्ये दैववाद, अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार आहे. त्यातून विद्यार्थी, पालक आणि समाजाचे मोठ्या प्रमाणात मानसिक आणि आर्थिक शोषण केले जाते.

तेव्हा सदर कार्यक्रम घेणार्‍यांना आपल्या समक्ष आमच्याशी बोलण्यासाठी बोलवा. म्हणजे त्यांना समज देऊन, हा दैववाद आणि अंधश्रद्धा पसरवणारा कार्यक्रम आपल्याला थांबवता येईल, अशी विनंती आम्ही पोलिसांना केली. मात्र पोलीस म्हणाले की, ‘हा कार्यक्रम संयोजकांनी अगोदरच ठरवलेला आहे. तेव्हा ऐनवेळी कार्यक्रम रद्द केला तर, लोकप्रक्षोभ निर्माण होईल. त्याऐवजी त्यांचा कार्यक्रम होऊ द्या. फार तर तुम्ही त्यानंतर लगेच लोकांसमोर तिथेच त्यांचा भांडाफोड करा. आम्ही तुम्हाला परवानगी देतो. त्यामुळे आमचा नाईलाज झाला. खरंतर, असा कार्यक्रम होऊच नये, अशीच कार्यकर्त्यांची भूमिका होती, पण पोलिसांनी अडचण सांगितल्याने आणि आम्हालाही भांडाफोड करण्यासाठी परवानगी देण्यात येईल असे सांगितल्याने स्टेजवरच मिडब्रेन अ‍ॅक्टिवेशनवाल्यांचा भांडाफोड करण्याचे कार्यकर्त्यांनी ठरवले.

- Advertisement -

पोलिसांनी मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनच्या व्यक्तींनाही याबाबतची कल्पना दिली. मात्र अंनिसकडे दुर्लक्ष करून मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनवाल्यांनी त्यांची बनवाबनवी सुरू करण्याचे धाडस केलेच. स्टेज आणि प्रेक्षक यांच्यामध्ये साधारणत: वीस फुटांपेक्षा जास्त अंतर होते. शिवाय स्टेज थोडे उंच होते. त्यामुळे ज्या मुलांचे किंवा मुलींचे रुमालाने डोळे बांधण्याची हातचलाखी मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनवाले करणार होते ती, सहजपणे पाहणार्‍या व्यक्तींच्या, प्रेक्षकांच्या लक्षात येण्यासारखी नव्हती. प्रत्यक्ष कार्यक्रम सुरु झाला. अंनिसनचे कार्यकर्ते स्टेजवर एका बाजूला थांबून, हे सर्व व्हिडिओ कॅमेरा वापरून त्यात बंदिस्त करत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनवाल्यांनी विज्ञानाचा मुलामा देऊन, साळसूदपणे, हे कसे खरे विज्ञान आहे, हजारो वर्षांपासून ते चालत आलेले आहे, या प्रयोगाचे जागतिक पातळीवर कशाप्रकारे शास्त्रीय संशोधन झालेले आहे आणि ते आपल्या मुलांना किती फायदेशीर आहे, असे बरेच काही मधुर पण संदिग्ध भाषेत कथानक स्वरूपात सांगितले. खरे तर ती सर्व चुकीची माहिती होती. ह्या प्रयोगात आपले नैसर्गिक डोळे बांधल्यानंतरही आपल्या कपाळावर असलेला ‘तिसरा डोळा’ उघडून मोठ्या मेंदूमधील म्हणजे मिडब्रेनमधील मेंदू कसा अ‍ॅक्टिव्हेट होतो आणि त्यामुळे किती फायदे होतात, हे सर्व अतिशय प्रभावी भाषेत कथन केले. त्यामुळे साहजिकच लोकही त्यांच्या बोलण्याकडे आकृष्ट झाले.

- Advertisement -

मग त्यांनी प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात केली. मिडब्रेन अ‍ॅक्टिवेशनचे तथाकथित प्रशिक्षण घेतलेली काही मुलं-मुली अगोदरच त्यांनी स्टेजवर आणून उभे केलेले होते. त्यातील साधारण बारा वर्षाच्या एका मुलीला त्यांनी स्टेजच्या मध्यभागी बोलावले. तिला डोळे बंद करायला सांगून, तिच्या डोळ्यावर कापसाचे बोळे ठेवल्यासारखे दाखवून, काळ्या रुमालाची पट्टी अशाप्रकारे तिच्या डोळ्यावर बांधली की, तिच्या नाकाच्या दोन्ही बाजूच्या फटींतून तिला, तिच्या नाकापेक्षा खालच्या पातळीवर असलेल्या पुस्तकातील मजकूर, नोटेचा क्रमांक सहज दिसेल आणि वाचता येईल. त्या मुलीनेही तिला पूर्वसूचना दिल्याप्रमाणे आणि तिला फटीतून दिसत असल्यामुळे, तिने पुस्तकातील मजकूर भराभरा वाचून दाखवला. लोकांना याचे मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी तथाकथित प्रशिक्षित केलेली वेगवेगळी मुले- मुली बोलावून, दोन तीन वेळा हा प्रयोग पुन्हा पुन्हा करून दाखवला गेला. मात्र प्रयोगासाठी प्रत्येक वेळी ते तथाकथित प्रशिक्षण दिलेली मुले-मुलीचं बोलवत होते.

लोकांना प्रश्न पडला की, रुमालाने डोळे बांधल्यावर सुद्धा हे कसे काय घडते आहे? प्रेक्षकांमधून एका व्यक्तीने हा प्रश्न विचारला. प्रेक्षकाने विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना संयोजक म्हणाला की, दोन्ही डोळे रुमालाने घट्ट बांधले तर, अजिबात दिसत नाही.पण त्याच वेळी व्यक्तीच्या दोन्ही डोळ्यांच्या भुवयांमधील अगदी कपाळाच्या मध्यभागी ‘तिसरा डोळा ’ असतो. प्रशिक्षण घेतलेल्या या मुलांचाच तो लगेच जागृत होतो. त्यामुळे मोठा मेंदू म्हणजे मिड ब्रेनची स्मरणशक्ती प्रचंड वाढते. त्यामुळे नैसर्गिक डोळे बंद असताना ही, व्यक्तीला दिसू लागते. पुस्तकातील मजकूर वाचणे, चलनी नोटेचा क्रमांक सांगणे, मोबाईलमधील मेसेज वाचणे, केवळ वासावरून विविध रंगाचे चेंडू ओळखणे असे त्याला किंवा तिला सहज दिसते. मिडब्रेनवाल्याच्या मधुर भाषेच्या भुलभुलैयाला प्रेक्षकामधील अनेक पालक लगेच भुलले. एवढ्या महत्वाच्या प्रशिक्षणासाठी आपल्या पाल्याची नोंदणी करावी म्हणून, प्रेक्षकांमधून काहींनी लगेच स्टेजकडे धाव घेतली. त्यामुळे कार्यक्रमात थोडासा गोंधळ उडाला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून लोकांना शांत केले.

अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांमधून सहा ते पंधरा वयाच्या वयोगटातील मुलांमुलींना स्टेजवर येण्याचे आवाहन केले. प्रेक्षकांमधील मुलां-मुलींचे कुतूहल शिगेला पोहचलेले होतेच. त्यामुळे दहा-बारा मुलं-मुलीं पळतच स्टेजवर आले. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनवाल्यांना सांगितले की, तुम्ही मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन प्रशिक्षणाच्या नावाखाली जबर फी आकारून तीन ते सात दिवसाचे प्रशिक्षण मुला-मुलींना देतात. आता आम्ही तुम्हाला ह्या आलेल्या मुला-मुलींकडून काहीही फी न घेता, फक्त पाच मिनिटाचेच प्रशिक्षण त्यांना देऊन त्यांचे डोळे बांधून पुस्तकातील मजकूर आणि तत्सम गोष्टी करायला सांगतो.

त्यानंतर स्टेजवर आलेल्या मुलां-मुलींना एकत्र घेऊन, त्यांना काळजीपूर्वक काही सूचना अंनिसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. पुस्तकातील मजकूर वाचण्यात काय अडचण येईल, ती दूर करण्यासाठी कशी दक्षता घ्यायची, हे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मुलामुलींना व्यवस्थित समजावून, पटवून सांगितले. त्यानंतर एका बारा-तेरा वर्षांच्या मुलीला, तिच्या डोळ्यावर कापसाचे बोळे अलगद ठेवून रुमालाने, तिचे डोळे अशा प्रकारे बांधले कि, तिला नाकाच्या बाहेरच्या दोन्ही फटींमधून नाकाच्या खालच्या पातळीत धरलेली वस्तू सहज दिसेल, मजकूर वाचता येईल, नोटेचा क्रमांक दिसेल. असे सर्व केल्यानंतर त्या मुलीने तिच्या नाकाच्या खालच्या पातळीवर धरलेल्या पुस्तकातील मजकूर घडाघडा वाचून दाखविला.

असा प्रयोग नंतर चारपाच मुलां-मुलींकडून करून घेतला. मग अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनवाल्यांना सांगितले की, जर तुम्ही म्हणता डोळे बांधल्यानंतर, कपाळावर असलेला ‘तिसरा डोळा’ अ‍ॅक्टिव्ह होऊन मोठ्या मेंदूमधली स्मरणशक्ती प्रचंड वाढते, तर बंद डोळ्याच्या नाकाच्या पातळीच्या खाली वस्तू धरण्याऐवजी ती नाकाच्या वरच्या बाजूला, बरोबर कपाळासमोर धरली तर ती वस्तू तिसरा डोळ्यासमोर असेल. नैसर्गिक डोळे रुमालाने बांधल्यावर, तिसरा डोळा उघडेल आणि मजकूर वाचता येईल. पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. तेही कार्यकर्त्यांनी करून दाखवले.

खरंतर, हा सर्व बनाव होता. हातचलाखी होती. आता लोकांच्याही लक्षात हा बनावटपणा आला होता. मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनवाल्यांनाही आता, त्यांचा भांडाफोड झाल्याचे कळून चुकले होते. पोलिसांनी परिस्थिती ओळखून लगेच मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनवाल्यांना वाहनात बसवून कार्यक्रम स्थळावरून हलवले.

मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनच्या गोंडस नावाखाली नेमकं कसं फसविलं जातं. समाजातील, विशेषतः मध्यम व उच्च मध्यम वर्गातील पालकांना आणि त्यांच्या पाल्यांना छद्मविज्ञानाच्या आधारे मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनवाल्यांकडून छद्मविज्ञानाचा वापर करून भुरळ घातली जाते. पाल्याची स्मरणशक्ती तत्काळ आणि मोठ्या प्रमाणात वाढते, असे भंपक दावे लोकांच्या गळी उतरवून, तीन ते सात दिवसाच्या प्रशिक्षणासाठी अकरा हजार ते एकवीस हजार (अकरा आणि एकवीस, हे दोन्ही क्रमांक शुभ असल्याचे आपल्याकडे मानलं जातं) रुपयापर्यंत जबरदस्त फी आकारली जाते. मोठ्या हायफाय हॉटेलमधे किंवा रिसोर्टमध्ये एकाच वेळी सहा ते पंधरा वयोगटातील शंभर ते पाचशे विद्यार्थी-विद्यार्थींनींना तीन ते सात दिवस एकत्र आणून, संमोहित केले जाते. डोळे बांधले तरी दिसते, असा दडपशाहीचा वापर करून, किंवा गोड बोलून, विश्वासात घेऊन मुलांना खोटं बोलायला भाग पाडलं जातं.

सर्वात मोठा धोका म्हणजे, अशा फसव्या कार्यक्रमातून चमत्काराचा बोलबाला, प्रचार आणि प्रसार वाढत गेल्याने समाजात दैववादीपणा वाढत जातो. परिणामी प्रयत्नवादाला खिळ बसते. मग साहजिकच, देशाच्या घटनेतील नागरिकांचे मूलभूत कर्तव्य म्हणून सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्याचे मोठ्या प्रमाणात समाजात अवमूल्यन होत राहते. त्यामुळे मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनवाल्यांच्या फंदात न पडता मेहनत घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -