घरफिचर्ससारांशमोबाईल : माणसाचे सहावे इंद्रिय

मोबाईल : माणसाचे सहावे इंद्रिय

Subscribe

आज मोबाईल माणसांच्या खिशात नाही, मोबाईलच्या खिशात माणसं असतात. मोबाईलच्या चौकटीत जगणार्‍या माणसांनी आज मोबाईल हे सहावे इंद्रिय म्हणून घोषित करावे. अगदी ३० वर्षांपूर्वी प्रतिष्ठेचं लक्षण असलेला मोबाईल आज हातागणीक झालेला आहे. अनेकदा एकच व्यक्ती दोन किंवा तीन मोबाईलची मालक असणंही सहजमान्य झालेलं आहे. व्हिडीओ फोटो फिचर्स असलेला मोबाईल वेगळा आणि सोशल मीडियासाठी वेगवेगळा मोबाईल वापरणारेही आहेतच. इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपनं माणसांचं जगणं केव्हाच गिळून टाकलंय. लोकल ट्रेनमध्ये वर्तमानपत्रं, मासिकं वाचण्याचा काळ संपूनही काळ लोटून गेलाय. आता सिनेमा चित्रपटगृहात पाहिला जात नाही, ओटीटीमुळे ही सोय मोबाईलमध्येच झाल्यावर आणि ५जी, ६जीच्या जमान्यात मोबाईल मानवी देहाचाच भाग झालेला आहे. मोबाईलचे जनक मार्टिन कूपर यांनीही मोबाईलला व्यसन होेऊ देऊ नका, असा सल्ला दिला आहे, पण लक्ष कोण देतो अशीच सध्या अवस्था आहे.

–संजय सोनवणे

इंटरनेट पेमेंट केल्यावर बँकेतली शिल्लक पाहण्यापुरते एसएमएस उरले आहेत. ‘कमरेला पेजर आणि गावाला चक्कर’ नव्वदच्या दशकाच्या अखेरीस पेजरधारी मानवाकृती एखाद्या म्यानातून तलवार उपसावी अशा आवेशात प्लास्टिकच्या कमरेला लटकवलेल्या चौकोनी कॅबिनेटमधून रिंग वाजवणारा पेजर बाहेर काढीत. पेजरला सोन्या-चांदीची चैन लावणं ही काही पेजरधार्‍यांसाठी चैनच होती. मोबिलिंक किंवा ईझीकॉलच्या पेजरवरचा नंबर पाहून एमटीएनएलचे लाल डबे शोधत आलेल्या नंबरवर फोन करणं हे सामाजिक प्रतिष्ठेचं लक्षण होतं, तर मोटोरोला, नोकियानं वॉकीटॉकीसदृश्य मोबाईल आणून पेजरयुग संपवलं. मॉट्स, ऑरेंजचा काळही दोन दशकांपूर्वीचा.‘तीन रुपयांत चाय कटिंग आणि दोन रुपयांत एक फोन कॉल’ अशा जाहिरातींनी मुंबईच्या स्टेशनातल्या जागा हेरलेल्या होत्या.

- Advertisement -

उत्क्रांतीवादात माकडाचा माणूस होत गेला. आता त्यापुढं माणूस झालेल्या माणसाचा मोबाईल होतोय. सिक्थ सेन्सनंतर हे सातवं इंद्रिय माणसाच्या आज खिशात असतंय. त्यामुळे एकच डोईजड झालं असताना अशीच आणखी दोन-तीन मोबाईलरूपी इंद्रियं बाळगणार्‍यांचं कौतुकच व्हावं. मोबाईलच्या दुष्परिणामांची चर्चा जगभर सुरू असताना मोबाईलचा शोध लावणार्‍या मार्टिन कूपर यांनी मोबाईलच्या वाढत्या व्यसनामुळे चिंता व्यक्त केलीय. मोबाईलचा वापर गरजेइतकाच करण्याचं त्यांनी सुचवलंय. मग गरज कोणती व्हिडीओ पाहण्याची, करण्याची, चॅटिंगची, सिनेमे पाहण्याची, संवाद साधण्याची, सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहण्याची अशी सगळीच आहे. या गरजांनी सगळं जगणंच व्यापून टाकलंय. आज चार मित्र मैत्रिणी प्रत्यक्ष दुर्मीळ होऊन भेटले तरी ते चौघे इतर चार जणांशी आणि बाहेरच्या जगाशी आपापल्या मोबाईलरूपी चौकटीतून आपापले बाहेरच्यांशी संवाद साधत असतात.

लोकल ट्रेनच्या प्रवासात ऑफिसातनं एकत्र सुटलेले मित्र, सहकारी आपसात बोलत नसतात, तेसुद्धा इतरांशी आपल्या चौकटीतून संवाद साधतात. हे बोलणं आपलं आपल्याशी नसतंय, ते आपल्यातल्या लोकांशीही नसतं, ते बाहेरच्यांशी असतं. व्हर्च्युअल जगातल्या लोकांनी परस्परांशी बोलावं, आपापली गार्‍हाणी मांडावीत, सुख-दुःखं सोशल मीडियाच्या चव्हाट्यावर मांडावीत, या वेदना-संवेदनांना लाईक्स मिळावेत, मिळवावेत, अगदी आत्महत्येचा विचारही सोशल मीडियावर मांडून मग त्याची प्रत्यक्ष लाईव्ह अंमलबजावणी करण्याच्या घटनांनी आणि मग तो व्हिडीओ चालवणारे, व्हायरल करणारे, त्यावर मतमतांतरे देणारे, रडके, चिंताग्रस्त इमोजी टाकणार्‍यांसाठीही त्यांचं व्हर्च्युअल सांत्वन एका क्लिकपुरतंच. एखाद्याच्या मृत्यूचा फोटोसोहळा इथंही क्लिक केलं, ‘आरआयपी’ची अक्षरं डकवली की पुढे जाता येतं. पुढच्याला ‘हॅप्पी बर्थडे’ करताना अभिनंदन करताना फोटोला लाईक मारून वाह, क्या बात है, भारीच, बढीया…असली अक्षरं डकवून इमोजी बदलणारं ‘फास्टफूड’ संवेदनांनी भरलेलं जग झाकलेल्या मोबाईलच्या मुठीत संपूर्ण सामावून गेलंय. आनंदाचा चित्कार करणारे, खो-खो हसणारे, व्हॉट्सअ‍ॅपवरच वाढदिवसाचा केक पाठवणारे मोबाईल मित्र मंडळ मोठं होत जातं. मोबाईलमुळे माणसांमधला ‘मी’ वाढीस लागल्यानं ‘आम्ही’ मागे पडत जातो.

- Advertisement -

जुन्या जाणत्या जगात ‘माणसांनी माणसांशी ‘मोबाईलवर’ माणसासारखं वागावं’ हे नवं तत्त्वज्ञान आज हाताच्या मुठीत बंदिस्त असतं. मोबाईल वापरणार्‍या माणसांची मूळ सुख दुःखं कुठल्याही काळात कायम असतात. माणसांना गरजा असतात, समाजमाध्यमांमुळे त्या वेळीच लक्षात येतात. वेळेवर मदत पोहचवली जाते. एका क्लिकवर पैसे पाठवता- मागवता येतात. मोबाईलच्या मुठीत माणसांचा आनंद, वेदना, दुःखं, सगळं जगणं बंदिस्त झालेलं असतं. असा मोबाईल टाळून जगता येत नसतं. मोबाईल सॅव्ही नावाच्या संज्ञेचं कौतुक केलं जातं. आमची इशा किंवा आमचा इशान आतापासूनच मोबाईलवर खेळतो, हे त्याच्या आईबापांसाठी कौतुक असतं. रडणार्‍या पोराला खांद्यावर घेऊन थोपटण्याचे दिवस मागे पडलेले असल्याने आता रडणार्‍या ‘त्याला किंवा तिला’ तातडीनं मोबाईल उघडून दिला जातो. कँडी क्रश किंवा मागे लागलेल्या हिंसक अक्राळ सैतानापुढं जिवाच्या आकांतानं पळणार्‍याला पळवून पळवून पळवलं जातं. त्यासाठी मोबाईलच्या कोपर्‍यातल्या चौकटीत मिळालेल्या नंबर्सरूपी गुणांचं कौतुक होतं. कँडी क्रशच्या गोळ्या तोडताना शाळेतल्या दिवसात खिशात लिमलेटच्या तांबड्या पिवळ्या गोळ्या भरणार्‍या पिढीला या गोळ्यांचं कोडकौतुक मोबाईलवर कमालीचं नॉस्टेल्जिक होतं.

मोबाईलचं व्यसन मागे पडून श्वासच झालेला असतो. त्यामुळे दिवसभरात एकही थम न मिळाल्याचं दुःख आता कमालीचं नैराश्य आणतं. मोबाईल माणसांना माणसांशी जोडूनही कमालीचं व्यक्तीगत करतो. नाही खरंतर तो माणसांना एकटं करतो. या एकटेपणाचं व्यक्तिगत ‘स्पेस’ म्हणून कौतुक केलं जातं. मोबाईलमुळे हिंसा, अफवा,अब्रूनुकसानीची प्रकरणं जगण्याचा भाग झालेली असतात. मोबाईल माणसाच्या खिशात नसतो, माणूस मोबाईलच्या चिरेबंदी चौकटीत जेरबंद झालेला असतो. मग मोबाईलपासून सुटका मिळवण्यासाठी मोबाईलवरच व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करून चर्चा, परिसंवाद घडवले जातात. मोबाईलवर सगळीच माहिती खुली झालेली असते, ज्यात लैंगिकतेपासून सामाजिक मूल्यांपर्यंत सगळंच उपलब्ध होतं. शाळेत नीतीमूल्ये शिकवली जात असताना मोबाईलवर मात्र जागतिकीकरणानंतरच्या खुल्या झालेल्या जगात चांगलं वाईट समजण्याची शिक्षक, कुटुंब नावाची गाळणी निकालात निघालेली असते.

मोबाईलमुळे माणसांच्या जाणिवा, भावनांना मोकळी वाट मिळते, मात्र या जाणिवा जरी जिवंत असल्या तरी मिळालेल्या व्हर्च्युअल संवेदना निर्जीव असतात. मोबाईलवर माणसं भेटत नाहीत, फक्त बोलतात, ते जिवंत असल्याचं मोबाईलवरच समजतं. मग एखाद्या दिवशी मोबाईलच्या चॅटबोर्डवर समोर अगरबत्ती लावलेलं छायाचित्र दिसतं. खरंच भेटायला हवं होतं, ही हूरहूर लागून राहते. ताबडतोब दोन रडके इमोजी पोस्ट केले जातात आणि न भेटल्याच्या ओशाळलेपणातून स्वतःची व्हॅच्युअल मुक्तता केली जाते. आज मोबाईलमुळे माणसांना प्रत्यक्ष भेटण्याची कारणं निकालात निघालेली असतात. मित्राला दिलेली उसनवारी फेडण्यासाठी आणि ‘का रे अचानक पैशांची गरज का पडली, सगळं ठीक आहे ना,’ असं बोलण्यासाठीही आता भेटण्याची गरज नसते. पे फोननं ही गरजही निकालात काढलेली असते. मोबाईलमुळे प्रत्यक्षातल्या पुस्तकांच्या देण्याघेण्याची जागा पीडीएफनं घेतलेली असते.

पीडीएफ पुस्तकासारखी सलग वाचली जात नसते. एकाच वेळी बरेचसे मेसेजेस आल्यामुळे किंडलचा मजकूर झरझर नजरेखालून घातला जातो किंवा पुस्तकातली कथा कानात हेडफोन टाकून ऐकली जाते. मोटोरोला, डॉल्फिन, नोकियाच्या जाडजूड मोबाईल असल्यानं मिळणारी प्रतिष्ठा आता स्मार्टफोनला वळसा घालून ‘आयफोन’ असल्यावरच मिळते. मोबाईल स्वतः बोलत नसतो, तो केवळ ऐकवत असतो. हे ऐकवणं आणि ऐकणं आभासी जगातलं असल्यानं वास्तवाशी फारकत घेणारं असतं. जगणं आभासी नसल्यानं आभासी जग आणि वास्तवात असलेला भवताल यात कायम संघर्ष सुरू असतो. हा संघर्ष मानसिक, शारीरिक आजारांना आमंत्रण देतो. आज दोन-तीन वर्षे वयापासून मोबाईलचं माणसांना गिळणं सुरू होतं. त्यामुळेच २०४५-५० मध्ये ऐन विशी बाविशीतल्या तरुण पिढीला डोळे निकामी किंवा कमकुवत होण्याचा धोका केलेल्या सर्व्हेतून आजच वैद्यकीय क्षेत्रातून वर्तवलेला असतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक तणाव वाढलेला असतो. मोबाईलकडे माणसांच्या संवेदना नसतात. चॅट जिपीटीसारख्या तंत्रातून या संवेदनांचेही ‘आभासी मार्केट’ उपलब्ध झाले आहे.

मोबाईल सांत्वन, आनंद, दुःख, वेदना, कौतुक, आपलेपणा, आधार, मानसिक जिव्हाळा…या सगळ्यांचाच पुरेपूर आभास निर्माण करतो, मात्र जगणं आभासी नसतं. माणसांच्या शरीर आणि मनाच्या जाणिवा आभासी नसतात. घर, कुटुंब, समाज घेरून राहिलेली माणसं एकट्यानेच जगत असतात. मोबाईलच्या आभासी जगात या एकटेपणाची जाणीव होऊ देत नाही. डॉक्टरने दिलेल्या अनेस्थेशियासारख्या मोबाईलमुळे काही काळ भावना बधिर होतात, मात्र वेदना किंवा संवेदना सुरूच असते. या बधिरता आर्टिफिशल इंटेलिजन्समधून भवताली गर्दीचा आभास निर्माण करते. हा केवळ आभास असल्यानं तो फसवा ठरल्यावर माणसांच्या चांगल्या वाईट जाणिवा दुपटीने टोकदार होतात. जसं की मद्याच्या नशेत काही तासांसाठी समाधी लागावी आणि भवतालच्या जगाचा विसर पडावा, मात्र दारूचा कैफ उतरल्यावर त्याच चांगल्या-वाईट, भेसूर-सुंदर जगाच्या भवतालाशी सामना करावा लागावा. आभासी नशेमुळे वास्तवातील संघर्ष टाळता येत नसतो. मोबाईल अशाच आभासी नशेच्या जगात गुंगवून ठेवतो.

मानवी जगण्याच्या बदलत्या संकल्पनांच्या भ्रमात मार्केटनं गरजा निर्माण केल्यानंतर या मोबाईलनं माणसांना कित्येक दशकं पुढे नेऊन बसवलं आहे. गरज ही शोधाची जननी असल्याचं अर्थशास्त्रात शिकवलं जातं. मोबाईल त्याही पुढं गेलाय. सकाळी उठल्यावर, चहा, नाश्ता करताना, जेवताना, काम करताना, प्रवासात, मित्रांमध्ये, लायब्ररीत, दवाखान्यात सर्वच ठिकाणी माणूस त्याचा श्वास आणि स्पंदनं सोबत घेऊन जातो. त्यांना नाकारता येत नसतं. या दोन्हींमध्ये आता मोबाईलची भर पडली आहे.

मोबाईलमुळे मानसिक तणाव वाढल्याची मानसोपचार संशोधनातून चर्चा होते. मोबाईलमुळे नाही तर मोबाईल वेळीच उपलब्ध नसल्यानं तणाव वाढल्याची उदाहरणे आहेत. ‘मोबाईल पाहू दिला नाही म्हणून पत्नीची आत्महत्या’, ‘महागडा फोन घेऊन दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलाने गळफास घेतला’ या बातम्या आता जुन्या झाल्या आहेत. पर्सनल चॅटिंग पाहिल्याने संशय वाढून नातेसंबंधात होणारे घटस्फोट, मोबाईलवरून होणारे विकृत चित्रीकरण, निद्रानाश, रात्री उशिरा झोपण्याची सवय, मोबाईल हाती न लागल्याने होणारी चिडचिड, मोबाईलची बॅटरी संपल्यावर देहाचा एखादा अवयव निकामी झाल्याची होणारी भावना आता नवी राहिलेली नाही. बाकी मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे आजार हा मोठा विषय आहे. मोबाईलमुळे माणसा माणसांत संवाद होतील, ती जवळ येतील, अशी घोषणा मोबाईल मार्केटनं अडीच-तीन दशकांपूर्वी केली होती.

हे खरं आहे की माणसं जवळ आलीत, मात्र ती एकेकटी म्हणून, आपापल्या मोबाईलच्या चौकटीत बंदिस्त झालेली ही माणसांची गर्दी आहे. कुठल्याही स्टेशनच्या पुलावर सकाळ-संध्याकाळी असलेल्या गर्दीसारखी ही चालतात सम, चॅट फ्रेंड, मैत्रीला असे टॅग नसावेत. व्यसनाच्या पुढचा टप्पा हा श्वासाशिवाय जगूच न शकणार्‍या कमजोरीसांतरावरून एकमेकांसोबत, मात्र एकत्र नसतात. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप फ्रेंडारखा असतो. मोबाईलच्या अतिवापरानं व्यसनाचा हा टप्पा कधीच ओलांडला आहे. हा मोबाईल माणसाच्या सोबत असावा, समांतरावर असावा, त्याला श्वास होऊ देता कामा नये. काळाच्या खिशात पडून अधूनमधून कधीही वाजणारा माणसाचा मोबाईल होऊ नये. मोबाईल बंद पडल्यावर रिचार्ज करता येतो, त्याची बॅटरीही बदलता येते. तो कुणाच्या हातात असला तरी मोबाईलला फरक पडत नाही. मर्त्य माणसं मोबाईल नसतात, त्यांनी मोबाईल बनूही नये. माणसांना निसर्गाने ही सवलत दिलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -