घरफिचर्ससारांशमहाराष्ट्राची कीर्तन परंपरा!

महाराष्ट्राची कीर्तन परंपरा!

Subscribe

कीर्तनाच्या बहुविध स्वरूपामुळेच ही कला मराठी साहित्यातील संत, पंत आणि तंत या तिन्ही प्रवाहांमध्ये महत्त्वाची मानली गेली. एवढेच नव्हे तर अनेक पंडित व शाहीर कवी हे उत्तम कीर्तनकार होते. कीर्तनाच्या माध्यमातूनच काव्य, शास्त्र व विनोदाचा विशेषत: संत, पंत, तंत साहित्याचा प्रसार व प्रचार झाला. मनोरंजनासह जीवनमूल्यांचा प्रसार करणारे कीर्तनासारखे दुसरे प्रभावी, लोकप्रिय आणि आदर्श माध्यम नाही. पौराणिकतेपासून राष्ट्रीयत्वापर्यंतचा पैस कीर्तन संस्थेने व्यापलेला दिसून येतो. कीर्तनाच्या या कलात्मक आणि समाजाभिमुखतेमुळेच अनेक सुधारक संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृतीचे आणि आत्मजागृतीचे कार्य केले.

–डॉ. अशोक लिंबेकर

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये कीर्तन परंपरेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना कीर्तन संस्था ही महाराष्ट्राचीच नव्हे तर एकुणातच तमाम भारतीयांच्या सांस्कृतिक व आधात्मिक जीवनाचे भरणपोषण करणारे महत्त्वाचे केंद्र आहे. या परंपरेचा उगम थेट प्राचीन पुराणग्रंथात तसेच वैदिक काळातही सापडतो. यावरून या माध्यमाची प्राचीनता व मौलिकता स्पष्ट होते. कीर्तन या शब्दाचे अनेक अर्थ दिसून येतात. स्तवन करणे, स्तुतीस्तोत्र गाणे, गुण वर्णिने किंवा कथीने, हरिदास वगैरे वीणादी गाणसाहित्य घेऊन देवळात परमेश्वराचे उभ्याने गुणवर्णन करतात ते.

- Advertisement -

celebrating the praises of a God with music and singing. इत्यादी अर्थ अग्निपुराण, भारतीय संस्कृती कोश आणि मोल्सवर्थ शब्दकोशात दिलेले आहेत. महर्षी नारदांना या संस्थेचे जनक मानले जाते. त्यामुळेच या व्यासपीठाला नारदाची गादी म्हणण्याचाही प्रघात आहे. वारकरी पंथात कीर्तनाच्या प्रवर्तकाचा मान संत नामदेवांना दिला जातो. नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, रामदासी कीर्तन आणि लोकमान्यांनी सुरू केलेला राष्ट्रीय कीर्तन हा नवा प्रवाह असे कीर्तनाचे विविध प्रकारही पडतात. रंजन व प्रबोधनाचे अत्यंत सुलभ व प्रभावी साधन म्हणजे कीर्तन होय. कीर्तन ही दृकश्राव्य कला आहे.

मौखिक परंपरेने चालत आलेली प्रयोगरूप कला म्हणून कीर्तन या प्रकाराकडे पाहिले जाते. नवविधा भक्तीतील भक्तीचा दुसरा प्रकार म्हणूनही कीर्तनाची ओळख आहे. हे पारमार्थिक अधिष्ठान या कला प्रकाराला लाभल्याने कीर्तनाकडे केवळ भक्तिभावाने पाहिले गेले. त्यामुळे या कलेच्या प्रायोगिक व कलात्मक अंगाकडे दुर्लक्ष झालेले दिसते. कीर्तन हा जसा सामूहिक भक्तीचा एक प्रकार आहे तसाच ती सादरीकरण होणारी नाट्यासारखी प्रायोगिक कला आहे. संगीत, नाट्य नृत्य, साहित्य, वक्तृत्व या कलेचा समन्वय कीर्तनात होतो. तसेच नाटकाप्रमाणे ही कला समूहासमोर प्रत्यक्ष सदर होत असल्याने ही कला अधिक समूहिष्ठ समजली जाते. या संस्थेचे आणखी वैशिष्ठ्ये म्हणजे ज्या काळात कोणत्याही प्रकारचे शिक्षण आणि मुद्रण कलेची सुविधा उपलब्ध नव्हती, त्या काळात लोकशिक्षणाचे व साहित्याच्या प्रसार, प्रचाराचे आणि समाजप्रबोधनाचे, प्रभावी असे कार्य कीर्तन या संस्थेने केले. या दृष्टीने विचार करता कीर्तन ही परंपरा एकाच वेळी पारमार्थिक, रंजनात्मक, प्रबोधनात्मक आणि प्रकाशनात्मक, प्रसारात्मक असे पंचविध कार्य करते. या माध्यमाचे हे अनेकविध पैलू आहेत.

- Advertisement -

कीर्तनाच्या या बहुविध स्वरुपामुळेच ही कला मराठी साहित्यातील संत, पंत आणि तंत या तिन्ही प्रवाहामध्ये महत्त्वाची मानली गेली. एवढेच नव्हे तर अनेक पंडित व शाहीर कवी हे उत्तम कीर्तनकार होते. कीर्तनाच्या माध्यमातूनच काव्य, शास्त्र व विनोदाचा विशेषत: संत, पंत, तंत साहित्याचा प्रसार व प्रचार झाला. मनोरंजनासह जीवनमूल्यांचा प्रसार करणारे कीर्तनासारखे दुसरे प्रभावी, लोकप्रिय आणि आदर्श माध्यम नाही. पौराणिकतेपासून राष्ट्रीयत्वापर्यंतचा पैस कीर्तन संस्थेने व्यापलेला दिसून येतो. कीर्तनाच्या या कलात्मक आणि समाजाभिमुखतेमुळेच अनेक सुधारक संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृतीचे आणि आत्मजागृतीचे कार्य केले.

‘नाचू कीर्तनाच्या रंगी। ज्ञानदीप लावू जागी।, अशी प्रतिज्ञा करून संत नामदेवांनी आत्मजागृतीचे, भागवत धर्माचे प्रसाराचे कार्य केले, तर संत गाडगेबाबांनी या कीर्तनाला संवादात्मक रूप देऊन समाज जागृतीचे कार्य केले. यावरून ह्या कलेचे महात्म्य लक्षात येते. अनेक थोर विचारवंतांनी कीर्तन परंपरेचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. यासंदर्भात लोकमान्य टिळकांनी म्हटले आहे, ‘मी पत्रकार झालो नसतो तर कीर्तनकार झालो असतो.’ तर सावरकर म्हणतात, ‘कीर्तन संस्था ही सत्प्रचाराचे अप्रतिम साधन असून गायन, वादन, वक्तृत्व, विनोद, गांभीर्य आणि हृदयस्पर्शी आपुलकी इत्यादीचा मिलाफ असल्याने असा संयोग कीर्तनाव्यतिरिक्त आढळत नाही.’

अशा प्रकारे कीर्तन ही कला समाज जीवनामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. एकाच वेळी हजारो लोकांसमोर साक्षात होणारे हे माध्यम असल्याने विविध भक्तीपंथांनी आपल्या विचाराचे व पंथीय तत्त्वज्ञानाचे प्रसारण याद्वारे केले. विशेषत: नाम भक्तीच्या व स्मरण भक्तीच्या प्रचारासाठी कीर्तनाचे खूपच प्रभावी उपयोजन झालेले दिसून येते. आजच्या आधुनिक काळातही या माध्यमाची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली दिसत नाही. कीर्तनाच्या या लोकप्रियतेचे गमक तत्कालीन लोकमानसातील कलाविषयक दृष्टिकोनात दडलेले दिसते. त्याकाळी कोणत्याही कलेला मोठ्या प्रमाणात समाजमान्यता नव्हती. नृत्य, नाट्य, गाणे, बजावणे हे शिष्टसंमत समजले जात नसे. कलावंताकडेही निकोप दृष्टीने पाहिले जात नसे. अशा कलाविषयक उदासीनतेच्या काळात मानवी मनाची रंजन भूक कीर्तनाच्या माध्यमातून तृप्त झाली.

कीर्तनात अनुस्युत असलेल्या भक्तिभावामुळे लहान, थोर, स्त्री-पुरुष व सर्व वर्गामध्ये कीर्तन प्रसिद्ध झाले. नाट्यानुभूतीचा आनंद कीर्तनाच्या माध्यमातूनच लोकांना प्राप्त झाला यात कसलाही संशय नाही. जोपर्यंत दूरदर्शन आणि तत्सम मनोरंजनाची साधने ग्रामीण भागात उपलब्ध नव्हती तेव्हा साहित्य, कलेच्या आस्वादाची गरज लोकनाट्य आणि कीर्तन या दोन लोकमाध्यमांनी परिपूर्ण केली. या मूलभूत गुणधर्मामुळेच कीर्तन ही एक प्रभावी अशी लोकप्रकटन संस्था ठरते. कीर्तन या माध्यमाचे हे सामर्थ्य ओळखूनच मराठी संतांनी

कीर्तनाद्वारे भक्तीचा प्रसार केला. वारकरी पंथात तेराव्या शतकात सुरू झालेला हा कीर्तनानंद अखंडपणे महाराष्ट्रभर विणेच्या झंकाराने आणि राम कृष्ण हरीच्या गजराने निनादत आहे. यात कोणताही खंड पडला नाही. भक्ती आणि काव्याच्या प्रसारासाठी कीर्तनासारखे सशक्त साधन इतर कोणत्याही राष्ट्रामध्ये सापडणार नाही. भक्ती आणि ज्ञानाचा सुरेख संगम कीर्तनातून प्रतीत होतो. ‘सततं कीर्तर्यंतो मा’ या उक्तीप्रमाणे कीर्तन ही उपासना भक्ती असली तरी समाजप्रबोधनाचे, समाजजागृतीचे महत्त्वाचे परिमाण या भक्ती प्रकाराला लाभलेले असल्याने सामाजिक दृष्टीनेही या प्रकाराचा विचार करणे गरजेचे आहे.

संत ज्ञानदेवांपासून कीर्तनाचा जागर महाराष्ट्रात सुरू झाला. ‘मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद’ या वचनाला अनुसरून सर्व संतांनी कीर्तन भक्तीचा मार्ग अवलंबला. या प्रेरणेतूनच नामसंकीर्तन साधन पै सोपे, असे म्हणत वारकरी पंथानेही या माध्यमाचा नामभक्तीचा परिपूर्ण वापर केला. तत्कालीन समाजातील कर्मकांडाला फाटा देऊन भक्तीचे सुलभीकरण केले. संत नामदेवांनी तर कीर्तनालाच आपले जीवितकार्य मानले. त्यांच्या अनेक अभंगांतून याची प्रचिती येते. नामा वाळवंटी कीर्तन करी, हे जनाबाईने नामदेवांसंबंधी काढलेले उद्गार नामदेवांच्या कीर्तन प्रेमाची साक्ष आहे. नामदेवांनी रचिलेल्या या कीर्तनरूपी इमारतीचा कळस चढवला तो संत तुकोबांनी! तुकारामांच्या अभंगांतूनही कीर्तनाबद्दलची आस्था त्यांच्या अनेक अभंगांतून आविष्कृत झाली.

सत्त्वाचे शरीर भावाचे कीर्तन। प्रेमे जनार्धन उभा तेथे। अहिंसा मृदंग अदैवेताची टाळी। प्रेमाची आरोळी हरिनामे। सप्रेमाचा वीणा निसंगाच्या तारा। आणील दरारा पातकांशी। या रूपकात्मक रचनेतून तुकोबांनी कीर्तनाचा महिमा उदधृत केला. त्यामुळे कीर्तन या प्रकाराची खरी ओळख दृढमूल झाली ती वारकरी पंथामुळेच. वारकरी पंथाचे हे योगदान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीचेच द्योतक आहे. तुकाराम म्हणतात, ‘भावे करिता कीर्तन। तारे तरी अनेकजण। भेटे नारायण। संदेह नाही तुका।’ असे म्हणत तुकोबांनी आपल्या चौदा टाळकर्‍यांना सोबत घेऊन कीर्तनरूपी व्यासपीठावरून विठ्ठलभक्ती आणि सद्विचाराचे प्रसारण केले. संत एकनाथांनीही कीर्तन भक्तीबद्दल ‘महापाप राशी तरले कीर्तनी। प्रत्यक्ष पुराणी वंद्य झाले।’ असे उद्गार काढून या भक्तीचा सार्थ गौरव केला.

एकूणातच कीर्तन परंपरेने आपल्या संस्कृतीचे उन्नयन केले. मराठी संतांनी पुरस्कार केलेल्या या भक्तीचा प्रभाव महाराष्ट्राभर पडून गावोगावी कीर्तनाचे सप्ताह रंगू लागले. कीर्तनकारांची अनेक घराणी उदयास आली. कीर्तनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणार्‍या कीर्तन महाविद्यालयांसारख्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. अशा रीतीने कीर्तन या भक्तीप्रकाराचा सर्वदूरपर्यंत प्रसार झाला. कालानुरूप कीर्तनाच्या आविष्कार पद्धतीमध्ये भाषिक बदल होत गेले. लोकांना हलकेफुलके आवडते त्यामुळे विनोदी शैलीतून केल्या गेलेल्या कीर्तनाला लोकांची पसंती मिळू लागली. यात गैर असे काही नाही.

गाडगेबाबांनी या शैलीतून समाज प्रबोधन साधले, पण जेव्हा कीर्तनाच्या व्यासपीठावरून चित्रपट गीतांच्या चाली लावून अभंग गायिले जातात, तेव्हा मात्र खूप वेदना होतात. काहीही झाले तरी भक्तीचा इव्हेंट होऊ देता कामा नये. सवंग लोकप्रियतेच्या मागे लागून रंजनासाठी लोकाभिरुचीचा अनुनय केला जाऊ नये. या भक्तीचे पावित्र्य जपणे, ते अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची आहे. काळ कितीही बदलेल पण अजून तरी कीर्तनाचे तिकीट काढावे लागत नाही ही कोणाची पुण्याई आहे? मराठी संतांचीच ना? शेवटी नामदेवांच्याच शब्दांत सांगावेसे वाटते, ‘नामा म्हणे फार सोपे हे साधन। वाचे नाम घेणे इतुकेची।’ कीर्तन परंपरेची ही सहजता आणि सुलभता आपण जोपासायला हवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -