ती…जाणती!

Subscribe

चिमण्याला सकाळी घरट्यातून निघायला थोडा उशीर झाला. तोपर्यंत चिमणीने चार जास्तीच्या काटक्या बाहेरून चोचीत धरून घरट्यात आणल्यासुध्दा.
चिमणा चिमणीला म्हणाला, ‘अगं तू सकाळी गेलीस तरी कधी आणि आलीस तरी कधी! मला कळलंसुध्दा नाही. मी आपला इथेच आळोखेपिळोखे देत बसलोय.’
चिमणी म्हणाली, ‘मी काल रात्री झोपतानाच ठरवलं होतं, उद्या सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठायचं, तुझ्यापेक्षाही आधी उठायचं आणि घरट्याबाहेर पडायचं.’
‘अगं पण आपल्या संसारातला आपला इतक्या वर्षांचा रिवाज आहे, आपण सकाळी जोड्याने बाहेर पडतो आणि जोड्याने काटक्या गोळा करून आणतो,‘चिमण्याने चिमणीला इतक्या वर्षांच्या शिरस्त्याची आठवण करून दिली.
चिमणी त्यावर काही उत्तरलीच नाही. चोचीतून आणलेल्या काड्या तिने कोपर्‍यात ठेवल्या आणि ती पिल्लांच्या दाणापाण्याच्या व्यवस्थेला लागली. चिमण्याला तिच्या ह्या गूढ वागण्याचा अर्थ कळला नाही, पण ती गूढ वागते आहे हे मात्र कळलं.
चिमण्यापुढे आता प्रश्न होता की आता काटक्या गोळा करण्यासाठी आपण एकट्यानेच घरट्याबाहेर पडायचं कसं? इतक्या वर्षांचा जोड्याने घरट्याबाहेर पडण्याचा रिवाज मोडून जर आपण एकट्यानेच बाहेर पडलो तर आपला गोजिरवाणा चिमणा समाज आपल्याला काय म्हणेल? त्याचा अर्थ काय काढला जाईल? समाजमाध्यमाच्या मार्फत समाजात कोणकोणत्या अफवा पसरवल्या जातील?
चिमण्याचं चिमणं डोकं भंडावून जायला सुरूवात झाली तसं चिमण्याला राहावलं नाही. त्याने अखेर चिमणीला प्रश्न विचारलाच.
‘काय गं, तुझ्या-माझ्या वाडवडिलांनी घालून दिलेल्या प्रथापरंपरेप्रमाणे आपण नेहमी जोड्याने घरट्याबाहेर पडतो, आज तुला हे एकट्याने घरट्याबाहेर पडायचं सुचलंच कसं? इतक्या वर्षांची आपली ही गौरवशाली परंपरा आपण आज अशी एकाएकी मोडतो आहोत ह्याबद्दल तुला काहीच वाटलं नाही?’
चिमणीने त्यावर आपली कसली प्रतिक्रिया तर दिली नाहीच, पण चेहर्‍यावर कसली रेषही उमटू दिली नाही. ती आपण आणलेला ओलासुका दाणापाणी निवडण्याच्या तयारीला लागली.
चिमणा तिच्या ह्या अनपेक्षित वागण्याने मनातून थोडा धुसफुसला. पण उगाच वाद वाढू नये म्हणून नरमाईने म्हणाला,‘अगं चिमणुके, मी तुला काहीतरी विचारतो आहे, प्रथापरंपरांची-प्रोटोकॉलची आठवण करून देतोय, तुला काहीच उत्तर द्यायचं नाही का? की तुझ्याकडे त्याचं काही उत्तर नाही?’
पण चिमणीवर त्याचा काही परिणाम झाला नाही. चिमणीने आपलं मौन जराही ढळू दिलं नाही. ती आपल्या पुढ्यातला ओलासुका दाणापाणी शांतपणे निवडत बसली.
चिमण्याला तिचा थंड डोक्याने उत्तर टाळण्याचा माईंडगेम लक्षात आला. मग चिमणाही घरट्यातल्या एका कोपर्‍यात स्वस्थ चित्ताने बसून राहिला. आज त्याने कुठे बाहेर न पडता घरट्यात स्वस्थ बसून राहायचं ठरवलं. तो स्वस्थ बसून राहिला तरी मनाने अस्वस्थ होता. त्याची ती अस्वस्थता चिमणी जाणून होती.
आज चिमणा आणि चिमणी, दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद घडून आला नाही. माणसांच्या भाषेत सांगायचं तर त्या घरट्यातून चिवचिवाट कानावर पडला नाही. सारं कसं शांत शांत. इतकी भीषण, बीभत्स शांतता असलेलं घर माणसांना खायला उठतं. त्या दिवशी चिमणा आणि चिमणीला घरटं खायला उठलं.
दिवस गेला. संध्याकाळ सरून रात्र झाली. चिमणी शांत. चिमणा स्वस्थ. दोघांमधली कोंडी फुटता फुटेना. शेवटी चिमणी उठली आणि रात्रीच्या जेवणाची ताटं तिने रोजच्यापेक्षा जरा लवकरच मांडली. ताटाचा आवाज होताच मात्र चिमण्याला राहावलं नाही.
‘आज जेवणं इतक्या लवकर…? नेहमीचं टाइमटेबल बदलायचं ठरवलंय काय?’ चिमण्याला खरंतर चिमणीला ‘हुकूमशाही आणायची ठरवलं काय?’ असा प्रश्न विचारायचा होता. पण चिमण्याने तो अक्कलहुशारीने टाळला.
ह्यावेळी मात्र चिमण्याचा दगड बरोबर लागला. घरट्यातली दिवसभराची जीवघेणी शांतता संपवत चिमणी म्हणाली, ‘मला आता ह्यापुढे कायम लवकर झोपायचं आहे.’
‘का? का म्हणून लवकर झोपायचं आहे? इथेही नेहमीचे रितीरिवाज मोडायचे ठरवले आहेस का?’ चिमण्याने ठरवल्याप्रमाणे आपला संताप शांतपणे व्यक्त केला.
‘आता ह्यापुढे मला नेहमीपेक्षा लवकर झोपून नेहमीपेक्षा लवकर उठायचं आहे,’ चिमणीने आपण घेतलेला निर्णय शांततेवर जराही ओरखडा न ओढता जाहीर केला.
‘का?’ चिमण्याने हा प्रश्न विचारताना बराच विलंबित सूर लावला. त्याचा चेहराही विस्फारला.
‘मला आता दाणापाण्यासाठी, काड्याकाटक्यांसाठी लवकर घरट्याबाहेर पडायचं आहे,’ चिमणीने आपला दाबून ठेवलेला ठसका दाखवला.
‘का? आजवर मी इतका खंबीर असताना तुला असं लवकर आणि एकट्याने बाहेर बाहेर का पडायचंय?’ चिमण्याने ठामपणे विचारलं.
‘मला आता स्वबळावर लढायचं आहे. मला जगण्याशी स्वबळावर लढा द्यायचा आहे,’ चिमणी म्हणाली.
चिमण्याने नंतर चिमणीकडे पाहिलंच नाही. चिमणीला सत्तेचं राजकारण कळू लागलं हे चिमणा समजून चुकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -