घरफिचर्ससारांशमाझा खेळ मांडू दे...

माझा खेळ मांडू दे…

Subscribe

नवरात्री म्हटल्यावर आज नऊ दिवसांचे नऊ रंग, असं समीकरण झालंय. पण अगदी काल-परवापर्यंत नवरात्री म्हणजे भोंडला, असं एक समीकरण रूढ होतं. साधारणत: मुलींनी खेळायचा हा खेळ, पण मुलामुलींनी एकत्र खेळण्याच्या खेळात आमच्या भावविश्वात भोंडल्याचाही समावेश झाला..

तो काळ जरा वेगळाच होता. आता लेखाची सुरुवातच या वाक्याने झाली म्हटल्यावर लेख स्मरणरंजनपर असणार, हे वेगळं सांगायला नको. पण हे स्मरणरंजन म्हणजे आठवणींचा फेर धरून त्यात गुंगून जाणं आहे. अगदी भोंडल्यासारखंच!

तर, तो काळ जरा वेगळाच होता. जागतिकीकरणाने मध्यमवर्गीयांचा घास घेण्याआधीचा काळ! टीव्हीवर इन-मिन दोन वाहिन्या होत्या. रेडिओचं प्रसारणदेखील रात्री 11 वाजता बंद व्हायचं. त्यामुळे उगाच उसासे सोडत कानात कुजबुजल्यासारखं बोलणार्‍या आणि प्रेमात विफल झालेल्यांना अत्यंत फुकाचे सल्ले देणार्‍या लव्हगुरूंची पैदास झाली नव्हती. सुपरमार्केट म्हणजे ‘अपना बाजार’ आणि सर्वोच्च चैन म्हणजे गावातल्या तळ्यावर जाऊन घोडागाडीत बसून भेळ खाऊन येणं…

- Advertisement -

त्या काळात श्रावण सुरू झाला की, आम्हा लहान मुलांना सणासुदीचे वेध लागायचे. श्रावणी शुक्रवारी शाळेत मिळणारे चणे-फुटाणे, जिवतीच्या कागदावरच्या नागाची नागपंचमीला केलेली पूजा, अंगणात वडिलांच्या डोक्यापेक्षा जरा जास्त उंचीवर बांधून मित्रमैत्रिणींनी एकत्र येत फोडलेली दहीहंडी, रक्षाबंधनाला बांधलेली राखी भाऊबिजेपर्यंत मनगटावर ठेवण्याचा भाबडेपणा, गणपतीमधील धमाल, दसर्‍याला पाटीवर काढलेल्या वळणदार सरस्वतीची पूजा, घरोघरी जाऊन सोनं वाटून थोरामोठ्यांना नमस्कार करणं, या सगळ्यामुळे आमचं भावविश्व समृद्ध होतं होतं.

यातच पितृपंधरवडा संपला की सुरू व्हायचं नवरात्र! घट बसले किंवा नाही, याच्याशी आम्हाला काहीच देणंघेणं नव्हतं. प्रत्येक दिवसाचा वेगळा रंग हे बाजारपेठीय चातुर्य अजून जन्माला आलं नव्हतं. पण या सगळ्यात ओढ लागायची ती भोंडल्याची!

- Advertisement -

आता तुम्ही म्हणाल, भोंडला हा खेळ मुलींचा, मग त्या खेळात हा ‘मुलीत मुलगा लांबोडा’ कशाला? पण सुदैवाने मुलं-मुली असा कोणताही भेदभाव न करता एकत्र खेळण्याची मुभा असलेल्या गल्लीत आम्ही लहानाचे मोठे झालो. परिणामी एकटा मीच लांबोडा नव्हतो, माझ्यासारखे माझ्याच आसपासच्या वयाचे अनेक लांबोडे होते. त्यामुळे मुली जशा बॅट-बॉल खेळायला किंवा किल्ल्यांसाठीचे दगड उचलायला आमच्या बरोबरीनं फिरायच्या, तसंच आम्हीही त्यांच्या भातुकलीच्या खेळापासून ते ‘आओ मीना, सुपर सीना, बिग बॉय, लेझी गर्ल… स्टॅच्यू’ या बावळटपणापर्यंत सगळ्यात सहभागी व्हायचो. त्यातलाच हा खेळ म्हणजे भोंडला!

महाराष्ट्रात सर्वत्र खेळल्या जाणार्‍या या खेळाची वेगवेगळी नावं परिचयाची आहेत. काही जण या खेळाला भुलाबाई म्हणतात, तर काही जण हादगा! नाव काहीही असलं, तरी येणारी मजा 100 टक्के खरी होती. नवरात्रीच्या आधीच प्रत्येकाकडच्या भोंडल्याचे वार ठरायचे. कधी कधी मुलं एवढी जास्त आणि दिवस एवढे कमी असायचे की, आमच्या आया आपसात ठरवून दोन-तीन मुलामुलींचा भोंडला एकत्र करायच्या. भोंडला रंगायचा संध्याकाळी, पण त्याची तयारी सुरू व्हायची ती मात्र दुपारपासूनच! शाळेतून घरी येऊन जेवण वगैरे आटोपलं की, देवासमोरची परडी घेऊन निसटायचं. भोंडल्यासाठी फुलं गोळा करायला हातात हात गुंफून फिरत राहायचं. गल्लीत एखादे खाष्ट आजोबा असायचेच.

ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसून स्तोत्रं वगैरे म्हणत आणि विडा-सुपारी कुटत डोळ्यात तेल ओतून आम्हा मुलांच्या खोड्यांकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं. नेमकी त्यांच्याच अंगणात भरपूर फुलझाडं असायची. मग ती फुलं खुडायला गेलं की ते अंगावर यायचे आणि आधीच्या स्तोत्रांशी फटकून असं, ‘तुझ्या बापाला सांगतो थांब रांडेच्या…’ असं ओरडायचे. चौथीच्या पुस्तकात शिकलेला शिवाजी महाराजांचा इतिहास मग अशा वेळी कामी यायचा आणि आम्ही त्या औरंगजेब आजोबांच्या हातावर तुरी देऊन सटकायचो. पण हेच आजोबा जेव्हा नारळाच्या वड्या खायला घालायचे, तेव्हा मेणाहुनही मऊ वाटायचे.

संध्याकाळी ज्या मुला-मुलीचा भोंडला तिच्या घराच्या, बिल्डिंगच्या अंगणात जमायचं. सारवण्यासारखं असेल, तर ते अंगण त्या दिवशी खास शेणाने सारवलं जायचं. मग अंगणाच्या मधोमध पाट ठेवायचा. त्यावर हस्त नक्षत्राचं प्रतीक असलेल्या हत्तीचं चित्रं किंवा रांगोळी काढून त्याची पूजा सुरू व्हायची. काही जण तर चक्क लाकडी हत्ती वगैरे ठेवूनही त्याची पूजा करायचे. एकदा का हत्तीची पूजा झाली की, मग त्या हत्तीभोवती गोल रिंगण करून सुरू व्हायची भोंडल्याची गाणी!

भोंडल्याची शेकडो गाणी असतील, पण सुरुवात मात्र ‘ऐलमा पैलमा गणेश देवा…’ याच गाण्याने व्हायची आणि शेवट ‘आड बाई आडोनी’ या गाण्याने! मध्ये असायची ती अनेक धमाल गाणी. त्या वयातही ती गाणी ऐकताना खूप मजा वाटायची. सुनेला त्रास देणारी सासू, माहेरच्या वाटेची आस लागलेली सासुरवाशीण, वेड्या नवर्‍यामुळे हताश झालेली बायको अशा अनेक गोष्टी त्या गाण्यांमध्ये यायच्या. मला आठवतं, त्या गाण्यांमध्ये ‘गोदावरी काठच्या उमाजी नायका’ अशीही ओळ होती. या ओळीचा संदर्भ उमाजी नाईक या क्रांतिकारकाशी आहे की नाही, कोणाला ठाऊक! पण म्हणजे भोंडला किंवा भुलाबाईचा हा खेळ तेव्हापासून खेळला जातो, असं मानायला हरकत नाही.

या भोंडल्याच्या गाण्यांमधील अनेक गाणी आजही लख्खं आठवतात. साधारण चौथी-पाचवीत असू आम्ही. त्यामुळे प्रकाश नारायण संत यांच्या भावविश्वातल्या लंपनच्या सुमीप्रमाणे एखादी सुमी आमच्याही भावविश्वात प्रवेश करून होती. मग भोंडल्याच्या रिंगणात तीच बाजूला आली की, भोंडला संपूच नये, असं वाटायचं. ‘एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबं झेलू…’ या गाण्यातलं आता ‘चिल्लारी बाळाला भूक लागली…’ या ओळीपुढचं काहीच कसं आठवत नाही, देव जाणे! तसं आणखी एक गाणं होतं,

‘अडकीत जाऊ खिडकीत जाऊ, खिडकीत होता बत्ता…
गुलाबरावांना मुलगा झाला, नाव ठेवा दत्ता…’

मग ‘बत्ता’च्या जागी वाटी, मेणबत्ती असे बदल करून स्वाती, पार्वती वगैरे नावं घ्यायची. तेव्हा मला प्रश्न पडायचा, या गुलाबरावांना नेमकी मुलं आहेत किती?

असंच एक गाणं म्हणजे,

‘अरडी गं बाई परडी, परडीमध्ये काय गं,
परडीमध्ये फुल गं, दारी मुल कोण गं,
दारी मुल सासरा, सासर्‍याने काय आणलंय गं?’

मग सासर्‍याने काय आणलंय, ते मी घेत नाही, सांगा मी येत नाही.. वगैरे चालायचं. या गाण्यात ‘झिपरं (उच्चारी झिप्रं) कुत्रं सोडा गं बाई’ असं एक कुत्रं पण यायचं. मजा वाटायची! त्या वेळच्या कोणत्याही पदार्थातून कोणताही पदार्थ बनवू शकणार्‍या बायकांचं प्रतिनिधित्व करणारं गाणं म्हणजे,

‘हरिच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली,
त्यातलं उरलं थोडंसं पीठ, त्याचं केलं थालिपीठ,
नेऊन वाढलं पानात, जिलबी बिघडली’

अशी कितीतरी गाणी रंगवत भोंडला चालायचा. कधीकधी फिरताना गरगरायचं. पण एक डोळा भोंडल्यानंतरच्या खिरापतीवरही असायचा.

भोंडल्यातल्या गाण्यांप्रमाणेच ही खिरापतही. भोंडल्याला जाताना आई किंवा आज्जी काहीबाही बनवून द्यायच्या. ते भांडं अगदी प्राणपणानं जपायचं आणि त्या भांड्यात कोणता पदार्थ आहे, हे ‘कोण्णाकोण्णाला’ सांगायचं नाही. मग खिरापत ओळखण्याच्या वेळी उखाणे घातले जायचे आणि त्यातून खिरापतीचा पदार्थ ओळखला जायचा. कधी दडपे पोहे असायचे, कधी पंचखाद्यं असायचं, कधी दही पोहे, तर काही काही जण त्या वेळी अगदी नुकतीच घराघरात शिरलेली पावभाजीही करायचे. आमची आजी अशा अवघड खिरापती करण्यात एक्सपर्ट होती. दुधीच्या वड्या, पानग्या, तांदळाच्या ओल्या फेण्या (स्स्स्स् हाहाहाहा….), कुरमुर्‍याचा लाडू… आजीच्या हातच्या अनेक पदार्थांच्या चवीची नुसती आठवणही आज मनाचा एक कोपरा उघडून जाते.

वेगवेगळ्या भांड्यांमधील वेगवेगळी खिरापत खाऊन पोटाची कुडी तृप्त झालेली असायची. तासभर त्या भोंडल्याची गाणी म्हणत फिरल्याने जीव दमलेला असायचा. पण तरीही जाम भारी वाटायचं. रात्री घरी अंथरूणावर अंग टाकलं की, डोक्यात भोंडल्याची गाणी घुमायची, खिरापतीची चव जिभेवर रेंगाळायची आणि ‘सुमी’च्या हाताचा मुलायम स्पर्शही जाणवायचा. मनात भोंडल्याने धरलेला फेर घुमतच राहायचा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -