घरफिचर्ससारांशराजीयांचा गड राजगड ते शिवतीर्थ रायगड!

राजीयांचा गड राजगड ते शिवतीर्थ रायगड!

Subscribe

आठवतंय मला माझ्या किल्ले पाहण्याच्या संख्या यादीत 100 वा किल्ला म्हणून रायगड ठरवला होता. त्या अगोदरच्या इतर 99 किल्ल्यांत किल्ल्यांचा अभ्यास आणि किल्ले पाहण्याचं तंत्र थोडंफार समजत उमजत गेलं होतं. शंभरावा किल्ला हा सर्वाधिक विषेश म्हणून मी रायगड पाहायचा आणि यासाठी शिवपुण्यतिथीस जावयाचे ठरवले. सोबत मित्र बाळा गावडे आणि महेश खेडेकर येतो म्हणालेत, म्हणून मी ऐनवेळी प्लान बदलला आणि केवळ रायगड न करता आपण राजगडापासून सुरुवात करून तोरणा-लिंगाणा करीत रायगडावर यायचे ठरवले. आणि त्यांनीही ते त्वरित स्वीकारले. त्याप्रमाणे अगदी रखरखत्या उन्हातही तो ट्रेक पूर्ण केला होता.

तुळशीमाळ परिधान केलेला प्रत्येक वारकरी जसा पांडुरंगाच्या भेटीसाठी कासावीस असतो, तसा शिव मंत्राने प्रेरित प्रत्येक धारकरी राजांचे गड आणि गडावरील राजांची चरणधुळ मस्तकी लावावयास उतावीळ झालेला असतो. जशी वारकर्‍याची विठुरायाप्रति सात्विक भक्ती तशी धारकर्‍याची शिवचरणी आसक्ती.

प्रत्येक वारकर्‍यास वारीचे वेड तसे धारकर्‍यास महाराजांच्या किल्ल्यांचे वेड. आणि त्यातही राजांचा गड जो राजगड ते गडांचा राजा-रायगड अशी पायी भ्रमंती आयुष्यात एकदातरी करावयाचीच हे प्रत्येक धारकरी स्वप्नं बाळगतो. शिवचरित्रं वाचायचं, मनांत साठवायचं आणि ‘राजगड-तोरणा-रायगड’ वारीत येऊन ते अनुभवायचं. अख्खा शिवकाळ या वाटेवर मंत्रमुग्ध करतो. इतकी वर्षे मध्ये लोटलीत पण महाराजांचा सर्वाधिक पदस्पर्श लाभलेले हे गड आणि त्यास भोवतालचे वातावरण तेच अन तसेच आहे. फक्त त्यात समरसून जायला हवं. त्या शिवस्मरण समाधीतून बाहेर येणं मला तर आजही जमत नाही.

- Advertisement -

आठवतंय मला माझ्या किल्ले पाहण्याच्या संख्या यादीत 100 वा किल्ला म्हणून रायगड ठरवला होता. त्या अगोदरच्या इतर 99 किल्ल्यांत किल्ल्यांचा अभ्यास आणि किल्ले पाहण्याचं तंत्र थोडंफार समजत उमजत गेलं होतं. शंभरावा किल्ला हा सर्वाधिक विषेश म्हणून मी रायगड पाहायचा आणि यासाठी शिवपुण्यतिथीस जावयाचे ठरवले. सोबत मित्र बाळा गावडे आणि महेश खेडेकर येतो म्हणालेत, म्हणून मी ऐनवेळी प्लान बदलला आणि केवळ रायगड न करता आपण राजगडापासून सुरुवात करून तोरणा-लिंगाणा करीत रायगडावर यायचे ठरवले. आणि त्यांनीही ते त्वरित स्वीकारले. त्याप्रमाणे अगदी रखरखत्या उन्हातही तो ट्रेक पूर्ण केला होता.

रायगडावर त्यावेळेस गोपीनाथ मुंडे, साबीर शेख आदींच्या राजकीय-उपस्थिती कार्यक्रमामुळे गडावर अलोट गर्दी होती. त्यामुळे शिवतीर्थ-रायगड मनाजोगा पाहता आला नव्हता. पुढे 2-3 महिने मनांत ती अस्वस्थता होती. अखेरीस पाऊस ओसरताच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा हा ट्रेक करावयास एकला निघालो. खरं सांगू,गड किल्ल्यांच्या भ्रमंतीत इतर सोबती असता मी इतका मोकळा नसतो जितका माझ्या सोलो ट्रेक्स किंवा प्रवासात असतो. कारण विषयाशी अभंग एकाग्रता असते,आणि ती अस्वस्थ-विचलित होऊ नये असे सारखे वाटत असते. त्यामुळे अधिक उत्साहात तरीही एकटेपणाच्या दडपणात, मी एकदाचा राजगड पायथ्याशी गुंजवणेत संध्याकाळी उशिराच मुक्कामी पोहोचलो. राजगडाच्या पूर्वेकडे पसरलेल्या सुवेळा आणि उत्तरेकडे पसरलेल्या पद्मावती सोंडेमधल्या खोर्‍यातील हे गुंजवणे गाव .

- Advertisement -

दुसर्‍या दिवशी पहाटेच आवरून साडेपाचच्या अंधुक प्रकाशात गुंजवणे सोडले. सुवेळा माचीच्या टोकापासून जी सोंड गुंजवणेत उतरते ती धरून दीडेक तासात गड गाठला. सुवेळा माचीच्या शेवटच्या बुरुजाला डाव्या हातास ठेवून कातळाच्या पोटातून आडवे जात तटावरील दिंडीतून गडावर दाखल झालो. तिथे पहिला साष्टांग दंडवत घातला. पवित्र माती भाळी लावली आणि पुढे झालो.

दुर्गराज राजगड!
वस्तुतः हा किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला. डोंगराला किल्ल्याचे स्वरुप गौतमीपुत्र सातकर्णी याने दिले. नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यां-खोर्‍यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा हा राजगड डोंगर. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या जागी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून तोरणा सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा, शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. या अधिकच्या नैसर्गिक सुरक्षिततेमुळे स्वराज्याचे मध्यवर्ती स्थळ म्हणून महाराजांनी राजगडाची निवड केली असावी.

सन 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व नाव ठेवले ‘राजगड’. मराठेशाहीची 25 वर्षे पहिली राजधानी याव्यतिरिक्त छत्रपती राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना राजगडाशी निगडित आहेत. कालांतराने राज्य कारभारासाठी राजगडही अपुरा पडू लागल्याने स्वराज्याची राजधानी पुढे अधिक दुर्गम रायगडावर नेली. राजगडाला संजीवनी-सुवेळा-पद्मावती अशा 3 माच्या आणि मध्यवर्ती डोंगर तासून तयार केलेला 1394 मीटर उंचीचा बालेकिल्ला आहे. जो महाराजांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो. जसा,शिवतीर्थ किल्ले रायगड हा महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो.

‘शेकडो यशस्वी मोहिमागनिक वाढणारे हिंदवी स्वराज्य’ उभ्या डोळ्यांनी पाहणारा बुलंद, बेलाग, बळकट असा राजगड समजून पाहण्यासाठी किमान 2-3दिवस हवेतच. गडावरील तिन्हीं माच्या, पद्मावती मंदिर, पद्मावती तलाव, राजवाडा, सदर, गुंजवणे दरवाजा, पाली महादरवाजा, काळेश्वरी बुरूज, बालेकिल्ला, बालेकिल्ल्यावर ब्रम्हर्षी तळे आणि देऊळ या पवित्र वास्तू आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. बालेकिल्ल्यावरून दक्षिणेस वेळवंड खोर्‍यातील येसाजी कंक तलाव, त्यामागे रोहीडेश्वर-रायरेश्वर-कांगोरी आणि प्रतापगड खुणावतो. पश्चिमेस तोरण्याच्या मागे रायगड लिंगाणा. आजूबाजूच्या गुंजण मावळावर मस्त धुक्याचे पुंजके पसरले होते. रात्रीच्या मुक्कामास काहीही करून तोरणा किल्ल्याच्या पलीकडे भट्टी गावातच पोहोचायचे हे ठरविल्यामुळे राजगडाचा साडेदहा सुमारास निरोप घेतला. आज पल्ला मोठा गाठायचा होता. बालेकिल्ला डावीकडे ठेवत संजीवनी माचीकडे निघालो. मध्ये पाल गावाकडे जाणारी वाट मिळते.

‘संजीवनी माची’ म्हणजे शिवकालीन स्थापत्य कलेचा एक अप्रतिम नमूना, पहाताच क्षणी नजरेत भरणारी आणि पुन्हा पुन्हा पहावी अशी दुहेरी तटबंदी असणारी चिलखती माची. आकाराने अरुंद, लांबीने पसरट आणि निमुळत्या स्वरूपात असणार्‍या या माचीवर आजही पाण्याची टाके आणि घरांचे अवषेश आढळून येतात. संजीवनी माचीच्या सोंडेवर शेवटच्या टोका अलीकडे ‘अळू दरवाजा’ आहे. हाच पूर्वीचा राजगड-तोरणा रहदारी मार्ग. इथून तोरणा गाठावयास मला अदमासे 12 किमी.चे अंतर पार करावयाचे होते.

संजीवनी माचीकडून कोल्हे खिंडीत उतरलो. वाटेतील पहिले तीन चार टप्पे कुठे सरळ तर कुठे नागमोडी तीव्र उतरणीचे त्यामुळे जरा अवघडच. घाई गडबडीत घसरण्याचे प्रकार होत होते. तोल सांभाळत-संभाळत कसा बसा तो टप्पा एकदाचा पार केला. त्यापुढील टेपाड पार केल्यावर बापूजीबुवा खिंडीत उतरलो. भुतोंडे ते पाल-वाजेघर हा गाडीमार्ग या खिंडीतून जातो. खिंडीच्या अलिकडे ( पाली ) वेल्हा तर पलिकडे ( भुतोंडे ) ही भोर तालुका हद्द आहे. खिंड ओलांडून सरळ सह्य धारेने तोरण्याच्या बुधला माचीच्या रोखाने वाट धरली. संपूर्ण वाट उघड्या माळरानावरून कारवीच्या सोबतीने रखरखत्या उन्हातून जाते. सपाटी आणि टेकड्यांचे चढउतार.

वाटमार्गावर पाण्याची सोय नाहीय, हे लक्षात ठेवून जवळ पुरेसे पाणी ठेवले होते. समोरचा नजरेत न मावणार्‍या ‘किल्ले तोरणा’चा तो अवाढव्य पसारा पाहता महाराजांनी तोरण्याचे नाव ‘प्रचंडगड’ का ठेवले असावे, याची प्रचीती येत होती. बुधला सुळक्याखाली दिसतो तो रडतोंडी बुरुज. इथला चढ घसारायुक्त आणि तीव्र आहे, सरळ उभ्या कपारीतील. त्यामुळे दमछाक झाली. कोणत्याही गडावरची चढण थोडी जरी अनुभवली तरी आत्मसाक्षात्कार घडतोच. ही चढण पार केल्यावर एकदाचा प्रवेश झाला, तो ‘स्वराज्याचे तोरण असलेल्या तोरणा किल्ल्यावर’.पुन्हा साष्टांग दंडवत घातला.

गडावरील विस्ताराने मोठी असलेली बुधला माची पश्चिमेस दूरवर पसरलीय. हिच्या दक्षिणेस एक फाटा फुटलाय. या पश्चिम आणि दक्षिण फाट्याच्या मधोमध टेकडीवर एक भलामोठा सुळका जो दूरवरून एखादा तेलाचा बुधला उपडा ठेवल्याप्रमाणे भासतो, म्हणून या माचीला ‘बुधला’ नाव देण्यात आले असावे. बुधला माचीकडून बालेकिल्ला दूरवर आहे. गडावर कोकण दरवाजा, भगत, महा, चित्ता आणि वळंजाई असे दरवाजे आहेत. माचीवर स्वतंत्र सदर, दारूगोळ्याची कोठारे, गंगजाई मंदिर, काही पाण्याच्या टाक्या आहेत. कापूर, खांब, महाळुंगे, शिवगंगा, पाताळगंगा ही यातील काही टाक्यांची नावं. इ.स.1880 मध्ये इथे आलेला जेम्स डग्लस हा इंग्रजी लेखक तोरण्याबद्दल कौतुकाने म्हणतोय, शिवाजीने जिंकलेला हा पहिला मोठा किल्ला. या किल्ल्याभोवती त्याने मराठी राज्याचा पसारा वाढवला.

ज्या मराठी राज्याने मुघल बादशाहचे आसन हलविले, त्याचे हे उगमस्थान. ‘Sinhagad is Lions den, then Torana is eagles nest’सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरण्यास गरुडाचे घरटेच म्हणावे लागेल! गडाचा बालेकिल्ला म्हणजे गडावरची सर्वात उंचावरची जागा. उत्तरेकडे कानंद आणि दक्षिणेकडची वेळवंड नदीची खोरी इथूनच न्याहाळावीत. पूर्वेला पसरलेली डोंगररांग कानंदी आणि गुंजवणी खोरी विभागते ते दृश्यही विलोभनीय. ईशान्येस सिंहगड, उजवीकडे राजगड, पश्चिमेस लिंगाणा, रायगड किल्ल्यांचा पहारा खुलून दिसतो. सारेच विलोभनीय दृश्य देहभान हरपून जाणारे सजीव सुख.

अशा काही जागा, असे क्षण असतात जिथे अवघ्या जीवनाचे प्रतिबिंब स्पष्ट होते. ‘पाहावे आपणाशी आपण,या नाव आत्मज्ञान’इथे हव्यास,अहंभावाचे विलोपन होते.निर्वेध-निर्लेप अस्तित्व उरते. समाधी लागते हो!

माझ्यापाशी वेळ आत्ता कमी होता. राजगडावरून तोरणा गाठावयास साडे पाच तास लागले होते. दूरवर भट्टी गावातील देवळाचा कळस दिसत होता. त्यादिशेने खूणगाठ मारून वेग पकडायचा होता. तोरण्यावर चिटपाखरूही नव्हते.

त्यात पुन्हा तोरण्याबाबत काही दुर्गप्रवाशांनी त्यांना झालेल्या चित्रविचित्र भासांबद्दल लिहून ठेवलेले वाचले होते. स्थानिक लोकही दिवेकर आडनावाच्या ब्राह्मणाच्या पिशाचाचा दाखला देतात.(वेल्ह्याच्या तहसील कार्यालयाकडूनही इथे नैवेद्यासाठी काही खर्च मंजुरी झाली होती असे ऐकले होते.) खरे खोटे काय ती मेंगाईच जाणे. भीतीची पर्वा नव्हती तरीही एकांतात ते दडपण अधिक गडद होते,याचा अनुभव होता. या सुनसान वातावरणात मी एकटा अजिबात राहू शकत नव्हतो. लगबगीने झुंजार माची ते बुधला माचीपर्यंत अवघा गड धुंडाळून बुधला माची पश्चिमेच्या वाळंजाई दाराने उतार पकडला. घड्याळात 5 वाजले होते. जेमतेम तासा-दीड तासात मला खाली भट्टीत पोहोचावेच लागणार होते.

पूर्वी वाळंजाई दरवाजाजवळ देवीचे स्थान असावे. आत्ता वाळंजाई देवी भट्टी गावात नेऊन तेथे नवीन मंदिर बांधण्यात आल्याचे ऐकिवात होते. दरवाजातून बाहेर पडल्यावरची वाट माती-रेताड मिश्रित अतिशय धोकादायक होती.त्यामुळे पाय टिकत नव्हता. तीव्र उतार, वाढलेली कारवी आणी डाव्या बाजूला खोलवर दरी अशी स्थिती. अखेरीस केव्हा धावडवत तर केव्हा धडपडत या दिव्यातून बाहेर पाडून भट्टी गावात वाळंजाई देवी पाशी पोहोचलो.

दिवसभरातल्या उन्हातल्या चालीमुळे पुढे चालायचे त्राण उरले नव्हते. ग्रामस्थांना माझ्या एकटेपणाचे साहस कुतूहल वाटले. त्यामुळे मंडळी जमा झाली. थोडा विसावा घेऊन कोकाटे या सद्गृहस्थांच्या घरी मुक्कामी थांबलो.

मागील खेपेच्या अनुभवावरून उद्याची मजल आजच्या मानाने अंतर आणि चढ-उताराच्या दृष्टीने तशी अवघड नव्हती.

उद्याचा कोणताही विचार आत्ता मनांत येऊ न देता थकलेलं शरीर, मन, आत्मा सहजपणे एकरूप होऊ झाल्याचे जाणवत होते. डोळे मिटताच शांत जलाशयात उठणार्‍या सौम्य लहरींप्रमाणे भाव मनात उमटू लागले मन निरभ्र-निर्विचार होत गेले. ‘स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे’, माझे मन मला समजावून देत निद्रिस्त झाले.

–(क्रमशः)

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -