ऐ जिंदगी गले लगा ले…

‘सदमा’ या चित्रपटात पाच गाणी असून सर्व गीतं गुलजार यांनी लिहिलेली आहेत. पैकी ऐ जिंदगी गले लगा ले... आणि सुरमयी आंखीयो में... ही अनुक्रमे सुरेश वाडकर व येसुदास यांनी गायलेली दोन गाणी अतिशय अर्थपूर्ण नि भावस्पर्शी झालेली आहेत. वाडकर आणि येसुदास यांच्या पार्श्वगायन कारकिर्दीतली ही दोन अविस्मरणीय म्हणता येतील अशी गाणी आहेत. शिवाय संगीतकार इलायराजा आणि गीतकार गुलजार यांच्याही कारकिर्दीत ही गाणी महत्वपूर्ण आहेत.

राज व रोमू सिप्पी निर्मित आणि बालू महेंद्र दिग्दर्शित ‘सदमा’ हा चित्रपट 1983 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात श्रीदेवी, कमल हसन, सिल्क स्मिता व गुलशन ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचं दिग्दर्शन-कथा-पटकथा-अभिनय-संगीताचं समीक्षकांनी तोंड भरून कौतुक केलं होतं. बालू महेंद्र यांना कथेसाठी तर श्रीदेवी आणि कमल हसन यांना अभिनयासाठी फिल्म फेअर पुरस्काराचे नामांकन प्राप्त झालं होतं. श्रीदेवीच्या अभिनय कारकिर्दीतला हा एक उल्लेखनीय चित्रपट समजला जातो.

या चित्रपटाच्या निमित्ताने भारतीय चित्रपट सृष्टीतले महान संगीतकार इलायराजा आणि गीतकार गुलजार पहिल्यांदा एकत्र आले. या चित्रपटात पाच गाणी असून सर्व गीतं गुलजार यांनी लिहिलेली आहेत. पैकी ऐ जिंदगी गले लगा ले… आणि सुरमयी आंखीयो में… ही अनुक्रमे सुरेश वाडकर व येसुदास यांनी गायलेली दोन गाणी अतिशय अर्थपूर्ण नि भावस्पर्शी झालेली आहेत. वाडकर आणि येसुदास यांच्या पार्श्वगायन कारकिर्दीतली ही दोन अविस्मरणीय म्हणता येतील अशी गाणी आहेत. शिवाय संगीतकार इलायराजा आणि गीतकार गुलजार यांच्याही कारकिर्दीत ही गाणी महत्वपूर्ण आहेत.

भारतीय लोकसंगीत व पारंपरिक वाद्यसंगीत यांच्या सोबतीने अभिजात पाश्चिमात्य संगीताचा सर्जकतेने वापर करणारे प्रतिभावंत संगीतकार इलायराजा यांची थोरवी काय वर्णावी ! भारतीय चित्रपट उद्योगाला शंभर वर्षे झाल्याच्या निमित्ताने सीएनएन-आयबीएन वृत्तवाहिनीने 2013 मध्ये लोकांचे मत जाणून घेतलं होतं. यानुसार इलायराजा यांची भारतीय चित्रपट संगीताचा ‘सार्वकालिक महान संगीतकार’ म्हणून निवड करण्यात आली. तसेच अमेरिकेचे जागतिक चित्रपट पोर्टल ‘टेस्ट ऑफ सिनेमा’ मार्फत जाहीर करण्यात आलेल्या जगातल्या 25 उत्कृष्ट चित्रपट संगीतकारांच्या क्रमवारीत इलायराजा यांनी नववे स्थान प्राप्त केलं. त्यांना 2010 मध्ये पद्मभूषण, 2012 साली संगीत नाटक अकादमी आणि 2018 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

शिवाय आतापर्यंत त्यांना उत्कृष्ट संगीतकाराचे पाच राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांनी लंडनच्या ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्युझिकचे अभिजात गिटार वादनाचे सुवर्णपदक पटकावले आहे. ते लंडनच्या रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राने सन्मानित केलेले आशिया खंडातले एकमेव आणि संपूर्ण सिम्फनी स्वरबद्ध करणारे पहिले दक्षिण आशियाई संगीतकार आहेत. त्यांच्या अनेक तमिळ-तेलुगु गाण्यांच्या चाली चोरून हिंदी चित्रपट संगीतकारांनी गाणी तयार केली आहेत ! मुळात त्यांनी फार कमी हिंदी चित्रपटांना संगीत दिलं आहे. त्यांच्या ‘सदमा’ या चर्चित चित्रपटातल्या ‘ऐ जिंदगी गले लगा ले…’ या गीतावर एक नजर…

ऐ जिंदगी गले लगा ले
हमने भी तेरे हर इक गम को
गले से लगाया है, है ना…

या गाण्यामध्ये जीवन आणि दु:ख यांचं एकमेकांशी असलेलं नातं गुलजार यांनी हळूवार शब्दांत उलगडून दाखवलं आहे. जीवना तू कधी तरी आनंदाने येऊन भेट ना.. आम्ही तर तुला आहे तसं स्वीकारलेलं आहे.. विनातक्रार ! तू ज्या काही खस्ता आम्हाला खायला लावल्या त्याही आम्ही सहन केल्या आहेत.. हे जीवना आता तरी आम्हाला आनंदाने भेट.. कवेत घे !

हमने बहाने से, छुपके जमाने से
पलकों के परदे में, घर भर लिया
तेरा सहारा मिल गया है जिंदगी…

आम्ही तुझ्या प्रत्येक बहाण्याला समजून घेतलं.. त्याचा स्वीकार केला.. त्याचा सन्मान केला .. आदरच दाखवला… रडलो जरूर पण डोळ्यांमधून टिपूस नाही येऊ दिला ! आम्ही दु:खाच्या भवसागरात असहायपणे भटकत आहोत.. तरीही हे जीवना तुझ्या भेटीची आस नष्ट झालेली नाहीये. तू एकदा आमची गळाभेट घ्यावीस म्हणून आम्ही विनवणी करतोय.. प्रार्थना करतोय…

छोटासा साया था, आंखो में आया था
हमने दो बूंदो से मन भर लिया
हमको किनारा मिल गया है जिंदगी…

एक छोटासा क्षण एकदा आम्हाला मोहरून गेला.. मनाला अनुरागाची अनुभूती देऊन गेला.. आम्ही इवल्याशा थेंबाला समुद्र समजून आमच्या मनाला चिंब भिजवून घेतलं ! आताशा यालाच किनारा समजून जीवनाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत… हे गाणं ऐकून आपण जीवनावर प्रेम करायला प्रवृत्त होतो, एवढे मात्र नक्की ! (अलीकडेच गायक अरिजितसिंहच्या आवाजात हे गाणं ‘डीअर जिंदगी’ या चित्रपटासाठी नव्याने ध्वनिमुद्रित करण्यात आलं आहे.) ‘सदमा’ चित्रपटातल्या दुसर्‍या गाण्यावर एक दृष्टीक्षेप…

सुरमई अंखियो में, नन्हा-मुन्ना सपना दे जा रे
निंदिया के उडते पाखी रे, अंखियो में आजा साथी रे

सच्चा कोई सपना दे जा, मुझको कोई अपना दे जा रे
अंजाना सा, मगर कुछ पहचाना सा, हल्का-फुल्का शबनमी, रेशम से भी रेशमी

रात के रथ पर जाने वाले, नींद का रस बरसाने वाले
इतना कर दे कि मेरी आंख भर दे, आंखो में बसता रहे, सपना ये हंसता रहे
सुरमई अंखियो में…
रा री रा रुम ओ रा री रुम
रा री रा रुम ओ रा री रुम…

येसुदास यांच्या आवाजातलं, इलायराजा यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गुलजार यांच्या लेखणीतून उतरलेलं हे हिंदी चित्रपट संगीतामधलं एक अजरामर अंगाईगीत होय. यात झोपेला एखाद्या पक्षाची उपमा दिली आहे. चित्रपटातला नायक हे अंगाईगीत गाऊन शरीराने वाढलेल्या पण मनाने निरागस लहान बालक असलेल्या निष्पाप नायिकेला आईच्या मायेने झोपवण्याचा प्रयत्न करतोय. संपूर्ण गाण्यात वात्सल्य भावना ओतप्रोत भरलेली आढळते. कोणीतरी वर आकाशातून निद्रारस खाली पाझरत आहे आणि त्यामुळे आपले डोळे या निद्रारसाने भरून जातील अशी नितांत सुंदर कल्पना म्हणजे गुलजार यांच्या लेखणीची किमया ! या गाण्यातला श्रीदेवी आणि कमला हसन यांचा अभिनय हे दोघे किती उच्च कोटीचे कलावंत आहेत याचा प्रत्यय आणून देतो.

दिवसभरातली धावपळ-दमछाक याने त्रस्त झालेल्या मनाला हे गाणं हळूवारपणे फुंकर घालते. गाणं संपल्यावरही यातलं शीतल, मधुर संगीत मंत्रमुग्ध करून मनात रेंगाळत राहतं…गायकी, शब्द आणि संगीताच्या आविष्काराने समृद्ध हे गाणं ऐकताना समुद्राच्या शांत लाटा स्वत:शीच गुणगुणत असल्याचा भास होतो. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी-अभिनेता कमल हसन-महान संगीतकार इलायराजा आणि शब्दप्रभू गुलजार या प्रतिभावंत कलाकारांची अभिजात निर्मिती असलेली ही दोन गाणी रसिकांच्या सदैव स्मरणात राहणार आहेत !

–प्रवीण घोडेस्वार