Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश कर्ज घ्या, पण या गोष्टी लक्षात ठेवा!

कर्ज घ्या, पण या गोष्टी लक्षात ठेवा!

Subscribe

आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे बँका किंवा फायनान्स कंपन्या कमी व्याजदराची आणि काही मिनिटांत लोनची रक्कम तुमच्या खात्यात जमा करण्याची ऑफर ठेवतात. फक्त आपण कर्ज हवंय एवढं म्हणायचं. इतकी तत्पर सेवा आपल्याला ह्या बँका आणि फायनान्स कंपन्या देतात. मग तुमचं आर्थिक ध्येय कितीही मोठे असू द्या. त्याची पूर्तता तुम्हाला सहज करता येईल. कर्ज घेणं इतकं सोपं झालंय. कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला काही नियम पाळावे लागतील. ते जर तुम्ही अगदी काटेकोरपणे पाळलेत तर तुम्हाला आयुष्यात कधीही आर्थिक अडचणी येणार नाहीत आणि तुम्ही तुमची मोठी स्वप्नसुद्धा सहज साकार करू शकाल.

सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या ह्या फास्ट युगात प्रत्येक माणसाकडे त्याची आर्थिक उद्दिष्ट, ध्येय पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा आहे असं आपल्याला वाटतं. अगदी लक्ष देऊन पैशांचा योग्य वापर केला ना तर आपल्या सगळ्या आर्थिक गरजा पूर्ण होऊ शकतील. फक्त थोडं आर्थिक बाबतीत सज्ञान होणं गरजेचं आहे. म्हणजेच हातात आलेला पैसा कसा आणि किती खर्च करायचा आणि आपल्या चांगल्या भविष्यासाठी शिल्लक राहिलेला पैसा कसा आणि कुठं गुंतवायचा एवढं समजून घेतलं तर फायनान्शिअल प्रॉब्लेम्स तुमच्यासमोर उभे राहणार नाहीत. काही माणसांची स्वप्नं मोठी असतात, तशीच खरी आर्थिक उद्दिष्टेसुद्धा मोठी असतात. त्यांच्यात धाडस असतं, काहीतरी मोठं करण्याची जिद्द असते आणि त्यांची इच्छाशक्तीसुद्धा जबरदस्त असते. मग ही मोठी स्वप्नं किंवा मोठी उद्दिष्टे गाठायला जास्त पैशांची गरज लागते. अशा मोठ्या गरजा भागवायला सध्या आपल्यासमोर बरेच पर्याय आहेत.

सगळ्याच बँका तुम्हाला मदत करायला तयार आहेत. असंख्य फायनान्स कंपन्या तुमच्यासमोर अनेक प्रकारचे नवीन नवीन पर्याय घेऊन येत आहेत. पूर्वी लोन मिळवायचं म्हणजे फारच कठीण काम होतं, पण आता सगळ्या बँका, फायनान्स कंपन्या तुम्हाला कर्ज द्यायला तयार आहेत. नुसत्या तयारच नाहीत तर तुम्ही फक्त ई-मेल करायचा की लगेच तुम्हाला बँकांचे फोन येतात आणि अगदी कमी वेळात तुमच्या कर्जाला होकार देण्याची त्यांची तयारी असते. टेक्नॉलॉजीमुळे ह्या बँका किंवा फायनान्स कंपन्या काही मिनिटांतच तुमच्या कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमासुद्धा करतात. तुमच्यापुढे कमी व्याजदराची आणि काही मिनिटांत लोनची रक्कम तुमच्या खात्यात जमा करण्याची ऑफरसुद्धा ठेवतात.

- Advertisement -

फक्त आपण कर्ज हवंय एवढं म्हणायचं. इतकी तत्पर सेवा आपल्याला ह्या बँका आणि फायनान्स कंपन्या देतात. मग तुमचं आर्थिक ध्येय कितीही मोठे असू द्या. त्याची पूर्तता तुम्हाला सहज करता येईल. कर्ज घेणं इतकं सोपं झालंय. कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला काही नियम पाळावे लागतील. ते जर तुम्ही अगदी काटेकोरपणे पाळलेत तर तुम्हाला आयुष्यात कधीही आर्थिक अडचणी येणार नाहीत आणि तुम्ही तुमची मोठी स्वप्नंसुद्धा सहज पूर्ण करू शकाल. त्यासाठीच आजचा हा लेख तुम्हाला विशेष उपयोगी ठरणार आहे. मग बघूयात कर्जासंबंधी काही नियम.

१. कर्ज इतकंच घ्या की त्याची तुम्हाला सहज परतफेड करता येईल : बँका किंवा फायनान्स कंपन्या तुम्हाला लोन द्यायलाच बसलेल्या आहेत. त्या कितीही लोन देऊ शकतात, पण मिळतंय म्हणून जास्त लोन घ्यायचं नाही, तर आपल्याला गरज आहे तेवढंच लोन घ्यायचं. कारण त्याची परतफेडसुद्धा आपल्याला करायची असते. मग हे लोन किती घेतलं पाहिजे? तर ते आपल्याला सहज परत करता येईल एवढं.

- Advertisement -

तुमचं एकूण उत्पन्न किती आहे, त्यातून तुमचे सगळे खर्च वजा करून जी शिल्लक रक्कम असेल त्यातून तुम्हाला ह्या लोनची परतफेड करायची असते. त्या रकमेचा अंदाज घेऊन तुम्ही तुम्हाला किती कर्ज घ्यायचं ते ठरवा. म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. समजा तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचंय, तर त्या लोनचा जो हप्ता असेल तो तुमच्या नेट इन्कमच्या १० टक्के इतकाच असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या बचतीचे पैसे सुरक्षित ठेवू शकाल. तुम्ही जर कार घेणार असाल तर त्या कारचा ईएमआय हा तुमच्या नेट इन्कमच्या १५ टक्क्यांपर्यंतच असायला पाहिजे.

तुम्ही अशी अनेक प्रकारची कर्जे घेतली असतील तर त्या सगळ्या कर्जांचा मिळून हप्ता तुमच्या नेट इन्कमच्या ५० टक्के किंवा त्याच्या आत असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणत्याही आर्थिक अडचणीत सापडणार नाहीत. काही लोक त्यांचे उत्पन्न पुरेशे नसतानासुद्धा आयकर विवरण पत्रात जास्त उत्पन्न दाखवून फक्त जास्त कर्ज मिळण्यासाठी जास्त आयकर भरतात, पण जेव्हा परतफेडीची वेळ येते तेव्हा दमछाक होते.

२. कमी मुदतीचं कर्ज घेणं योग्य : समजा तुम्हाला जर होम लोन घ्यायचं असेल तर बँका तुमच्याकडे धाव घेतात. घरासाठी कर्जाची रक्कम खूप मोठी असते. बँका तुम्हाला २५/३० वर्षांच्या मुदतीवर कर्ज ताबडतोब देतात, पण हे लोन परत करणे आपल्याला फार नुकसानीचं ठरतं. कारण बँका चक्रवाढ व्याजाने आपल्याला कर्ज देतात. हे व्याज कमी मुदतीत परतफेड केल्यास आपण हे नुकसान टाळू शकतो. कंपाऊंड इंटरेस्ट हे जर तुम्ही समजावून घेतलेत तर तुम्हाला ह्या लाँग टर्म लोनचा फायदा आणि तोटा कळेल. समजा तुम्ही बँकेकडून घरासाठी ५० लाखांचं कर्ज घेतलंत आणि १० वर्षांत परतफेड करायचं ठरवलं, तर तुम्हाला ५० लाख ह्या कर्जाच्या रकमेवर १० वर्षांत ९.७५ टक्के व्याजदराने एकूण ५७ टक्के व्याज द्यावे लागेल. हेच कर्ज जर तुम्ही २० वर्षांत परतफेड करायचं ठरवलं तर त्याच ५० लाखांवर २० वर्षांत कंपाऊंड इंटरेस्ट हे १२८ टक्के होईल. इतका मोठा फरक व्याजाच्या रकमेवर दिसेल. म्हणजे व्याजापोटी तुम्हाला जास्त रक्कम भरावी लागते. जेवढी कर्जाची मुदत जास्त तेवढं व्याज जास्त भरावं लागतं. जर तुम्ही २५ वर्षांची मुदत घेतली तर तेच व्याज १६७ टक्के होईल. त्यामुळे घर घ्यायचं असेल तर कमी मुदतीत कर्जफेड करणं योग्य ठरतं.

३. कर्जाची परतफेड करताना मासिक हप्ते वेळेवर भरले जातील ह्याची शिस्त लावून घ्या : कर्ज घेतल्यानंतर कामाच्या गडबडीतसुद्धा परतफेडीची म्हणजे हप्ता वेळेवर भरण्याची काळजी प्रत्येकानं घेतलीच पाहिजे. ही एक शिस्त आहे. हा हप्ता वेळेवर, न चुकता भरला गेलाच पाहिजे अशी व्यवस्था करून ठेवा. एकसुद्धा पेमेंट चुकणार नाही किंवा उशीर होणार नाही हे भविष्यात खूप महत्त्वाचं ठरतं. तुमचा एक जरी हप्ता चुकला, चुकून भरायचा राहिला किंवा हप्ता भरायला उशीर झाला तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर होतो. तुमचं नाव खराब होतं. तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येतो आणि भविष्यात पुन्हा तुम्हाला कर्ज मिळवायचं असेल तर तुम्हाला ते कर्ज मिळणं कठीण होऊन बसतं. पुढच्या कर्जाच्या वेळी तुमचा क्रेडिट स्कोअर बँकेकडून किंवा फायनान्स कंपनीकडून आवर्जून तपासला जातो आणि तुमचं नाव खराब असेल तर बँक तुम्हाला कर्ज देत नाही. ही गोष्ट बर्‍याच लोकांना माहीत नसते.

४. आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन किंवा शेअर मार्केटसारख्या गुंतवणुकीसाठी कधीही कर्ज काढू नका : काही लोकांना आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायची सवय असते. काही लोकांना आपल्याकडे नवीन खरेदी केलेली मौल्यवान वस्तू दाखवून सतत शेखी मिरवायला आवडतं. मग ती हौस पूर्ण करण्यासाठीसुद्धा काही लोक कर्ज काढून खरेदी करतात आणि लोकांना दाखवतात, पण असं करणं घातक ठरू शकतं. तुमच्या येण्यापेक्षा देणं वाढतं, म्हणजे आवक कमी आणि खर्च जास्त होऊन बसतो. त्या कर्जाचे हप्ते भरताना तारांबळ उडते. मग हप्ते चुकतात आणि नाव खराब होतं. गुंतवणूक करण्यासाठीसुद्धा कधीही कर्ज काढून गुंतवणूक करू नका. समजा तुम्ही शेअर मार्केटमध्ये कोणाच्या तरी सांगण्यावरून मोठी रक्कम कर्जाऊ घेऊन गुंतवणूक केली आणि त्या शेअर्सचे भाव एकदम खाली आले तर तुमचं देणं वाढतं आणि ही गुंतवणूक तोट्यात जाते.

५. मोठ्या कर्जाच्या रकमेला कव्हर करायला टर्म इन्शुरन्स घ्या : मोठं घर किंवा आलिशान कार घेताना कर्जाची रक्कम खूप मोठी असते आणि परतफेडीची मुदतसुद्धा जास्त असते. आयुष्यात काही बर्‍या वाईट घटना घडत असतात. तुमच्या आयुष्यात अशी वेळ येऊ नयेच, पण काही बरं वाईट घडलंच तर ह्या इन्शुरन्समुळे तुमच्या परिवाराला त्रास होत नाही.

६. तुमच्या लोनचे अ‍ॅग्रीमेंटचे पेपर्स सह्या करण्यापूर्वी नीट तपासून पाहा : तुम्ही ज्या बँकेकडून किंवा फायनान्स कंपनीकडून ज्यावेळी लोन घेता त्यावेळी बँक आणि तुमच्यामध्ये एक अ‍ॅग्रीमेंट होतं. त्यावर तुम्हाला सह्या करून द्यायच्या असतात. ह्या अ‍ॅग्रीमेंटमध्ये अनेक अटी-शर्ती असतात. ते नक्की काय आहेत हे एकदा नजरेखालून घातले की बरं असतं, नाहीतर सह्या केल्यावर आपण काहीच करू शकत नाही. कर्ज व्याजदर कसा आहे, इतर छुपे चार्जेस काय आहेत, तसेच मुदतपूर्व काटजू परतफेड करायची असेल तर अनेक बँका त्याला चार्जेस लावतात.

७. तुमच्या जास्त व्याजदराच्या एखाद्या लोनच्या जागी कुठून कमी व्याजदराचं लोन मिळाल्यास ते रिप्लेस करा : तुमच्याकडे चालू असलेल्या सगळ्या लोन्सची लिस्ट करा आणि त्यातलं जे जास्त व्याजाने घेतलेलं लोन आहे ते दुसर्‍या कोणत्या कमी व्याजाने देणार्‍या बँकेकडून घेऊन जास्त व्याजाचं लोन परत करा. म्हणजे तुमच्या पैशांची थोडीफार बचत होईल. तसेच आणखी एखादं पूर्ण लोन तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीवर लोन काढून मिटवू शकता. इन्शुरन्स पॉलिसीवरचं लोन कमी दराने मिळते. तसेच तुमच्याकडे सोनं असेल तर त्यावरही लोन घेऊन जास्त दराचं लोन बदलू शकता.

८. ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे त्यासाठीच त्याचा वापर करा : अनेक जण ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे त्यासाठी वापरत नाहीत. व्यवसायासाठी मिळालेले कॅश क्रेडिट लोन बरेच जण इतर कारणासाठी वापरतात. तसेच पर्सनल लोनसुद्धा बर्‍याच वेळेस ज्या कारणासाठी घेतले आहे त्यासाठी न वापरता इतरत्र वापरले जाते. असे केल्याने अनेक अडचणी येतात. व्यवसायाचे कॅश क्रेडिट कर्ज हे खेळत्या भांडवलासाठी दिलेले असते ते इतरत्र वापरले की व्यवसायाचे आर्थिक चक्र बंद पडेल.

९. तुम्ही जेव्हा लोन घ्यायचा विचार कराल त्यावेळी आपल्या घरातील मंडळींशी चर्चा करा. पत्नी-मुलांशी विचार विनिमय करा : आपण जेव्हा असं मोठं लोन घेणार असतो त्यापूर्वी घरातल्या लोकांशी जरूर चर्चा करावी. कदाचित त्या चर्चेतून तुमच्या लोन घेण्यावर दुसरा काहीतरी मार्ग निघू शकेल. पत्नीकडे काही जमापुंजी असेल तर त्याचा तुम्हाला हातभार लागू शकतो किंवा दुसरा काही पर्याय निघू शकतो. घरच्या व्यक्तींना अंधारात ठेवून आर्थिक उलाढाल केली तर ते तुमचा मानसिक ताण वाढवू शकतं. काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. याची जाणीव ठेवूनच लोनसंदर्भात कोणताही निर्णय घेतला जावा.

१०. कुणाला जामीनदार होताना पुरेसा विचार करा : जामीनदाराने त्याचे कर्ज वेळेत भरले नाही तर तुमचासुद्धा क्रेडिट स्कोअर कमी होतो हे लक्षात राहू द्या. तुमच्या सिबिलमध्ये तुम्ही कुणाला जामीनदार आहात व ते वेळेत कर्ज परतफेड करीत आहेत की नाहीत हे सर्व दिसते. त्यामुळे कुणाला जामीनदार होताना पुरेसा विचार करा.

असे आहेत हे कर्जासंबंधीचे काही नियम, जे तुम्हाला तुमच्या आर्थिक ध्येयाकडे जाण्यासाठी मोलाची मदत करतील आणि आर्थिक संकटांपासून सुरक्षित ठेवतील.

- Advertisment -