घरफिचर्ससारांशतिसर्‍या जगाची कल्पना!

तिसर्‍या जगाची कल्पना!

Subscribe

जगाची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे. विध्वंसाचा मार्ग ज्याच्या त्याच्या पद्धतीने स्वीकारला जातोय. प्याद्यांचा वापर बुद्धिबळाच्या पटावर होत नाही तेवढा प्रत्यक्षदर्शनी होत आहे. प्रेक्षक म्हणून पाहणार्‍यांची गर्दी वाढत आहे. ढोलताशे वाजवून आभासी जगात विजयाचा जल्लोष साजरा करताना एक पिढी जन्म घेत आहे. हातातले तंत्रज्ञान जरी ‘विश्वची माझे घर’ची संकल्पना साकारत असले तरी भेदाच्या भिंती आजही तोडता येत नाहीत ही शोकांतिका... कुणीतरी उठतो आणि तिसर्‍या जगाची कल्पना मांडतो. उद्या तिथे कंटाळा आला की चौथ्या जगाची कल्पनादेखील मांडणारे जन्म घेतील, परंतु प्रत्यक्षदर्शनी आजही आपण एका नव्या जगात वावरत आहोत.

आपण इथे कुणाचेच वारसदार होऊ शकलो नाही. ना विचारांनी, ना कृतीने, ना रक्ताने.. महापुरुषांनी दिलेला वारसा, त्यांचे कार्य व विचारहेदेखील आपण पुढे नेऊ शकलो नाही. (अपवाद वगळता) परंतु एक मान्य केले पाहिजे की महापुरुषांचे विचार हे इतके खोलवर रुजलेले आहेत की त्यांना आपण आपल्यापासून वेगळे करू शकत नाहीत. जे बोटावर मोजण्याइतके लोक समाज बदलाची अपेक्षा करतात, ते त्यांचे कार्य अविरतपणे सुरू ठेवत आहेत, परंतु त्यांनादेखील विचार करत असताना पुढे जाऊ दिले जात नाही. तरीदेखील ते पर्वा न करता आपले कार्य करत राहतात. काही लोकांना तर तिकडे जात असताना समांतर रस्त्याचीच वाटचाल करावी लागेल. दुसरीकडची एक समांतर व्यवस्था माथी मारून तोच योग्य मार्ग आहे हे दाखवण्याची वृत्ती आपल्याकडे आहे. तशी व्यवस्था जन्म घ्यायला लागली आणि त्याला आपण बळी पडलो की समजून जायचं अध:पतन ठरलेलं आहे.

यातून मार्ग काढण्यासाठी आपल्याकडे काही उपाय असतात. हेच आपण नंतर सपशेल विसरून जातो आणि मग आपले मार्गक्रमण होत राहते सर्वनाशाकडे. जिथून परत येण्याचा मार्ग बंद झालेला असतो. समोर त्याच मार्गावर चालत राहणे हा पर्याय आपल्यासमोर उभा राहतो. त्यावेळी आपल्याला पूरक असेल असे वातावरण तिथे नसते. मग विचारांची पायमल्ली होत आहे हे कळायला आपण तिथून कितीतरी मैल समोर चालत गेलेलो असतो. नंतर ते वर्तुळ भेदण्याची ताकद त्यावेळी नसते आणि आपण सर्व काही गमावून बसतो. इथे एक स्पष्ट दिसते की प्रवाहासोबत वाहण्याचा अलीकडे ट्रेंड झालेला आहे, पण तो प्रवाह किती इष्ट आहे हे तपासले जात नाही. म्हणजेच कार्यकारणभाव बाजूला ठेवून कार्य केले जाते. एक व्यवस्था दुसर्‍या व्यवस्थेला नाकारते त्यावेळी तिसरी व्यवस्था जन्म घेऊ पाहते. ती तिसरी व्यवस्था स्वतःची विचारसरणी व एक अजेंडा तयार करून स्वमार्गाचा अवलंब करून आपला स्वार्थ आणि हेतू साध्य करण्यात गुरफटून राहते.

- Advertisement -

जगण्या-मरण्याचा प्रश्न एखाद्यासमोर उभा राहतो, त्यावेळी दुसरीच गोष्ट विजय मिळवून जाते. अवतीभवतीच्या वातावरणाचा नियम मागणी आणि पुरवठ्याच्या अर्थशास्त्राशी जुळलेला आहे. सोबतच स्तुत्य मागणी आणि पुरवठा पुन्हा अर्थशास्त्राच्या नियमानुसार दुर्मीळदेखील झाला आहे. नॉलेज पॉवरचा वापर विधायकतेसाठी व्हावा यासाठी प्रयत्न करता करता नेमके विधायक काय याचेदेखील अनेक प्रश्न प्रत्येकाच्या समोर उभे राहायला लागतात. ज्यांना हे पटत नाही त्यांचा कोंडमारा होतो. ज्यांना पटत आहे त्यांच्यासाठी हे रान मोकळे आहे. आपला वावर सुरू असताना दुसर्‍याला त्रास होणार नाही याचा विचार कोण करतो? अलीकडे काही टीव्ही मालिकांमध्ये जसे रोज एक पात्र निर्माण केले जाते, त्याच्या तोंडी काही डायलॉग दिले जातात. अगदी त्याचप्रमाणे समाजात रोज एक नवीन पात्र असे निर्माण होत आहे की हीच आपली संस्कृती आणि हेच आपल्या वारशातून आले आहे असे बिंबवले जाते. हे अधोरेखित करणे, त्यातून सत्य लपवून ठेवणे समाजहितासाठी किती लाभदायक, हादेखील प्रश्न आहे.

सगळ्यांनाच वाटतं की आपण फिनिक्स पक्ष्यासारखं उडायला हवं, नवी भरारी घ्यायला हवी, पण त्या पंखांमध्ये जिवंतपणा राहिला आहे का? किंवा उंच उडण्याची जिद्द स्वतंत्रपणे तेवढीच तत्पर आहे का? जगाची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे. विध्वंसाचा मार्ग ज्याच्या त्याच्या पद्धतीने स्वीकारला जातोय. प्याद्यांचा वापर बुद्धिबळाच्या पटावर होत नाही तेवढा प्रत्यक्षदर्शनी होत आहे. प्रेक्षक म्हणून पाहणार्‍यांची गर्दी वाढत आहे. ढोलताशे वाजवून आभासी जगात विजयाचा जल्लोष साजरा करताना एक पिढी जन्म घेत आहे. हातातले तंत्रज्ञान जरी ‘विश्वची माझे घर’ची संकल्पना साकारत असले तरी भेदाच्या भिंती आजही तोडता येत नाहीत ही शोकांतिका. कुणीतरी उठतो आणि तिसर्‍या जगाची कल्पना मांडतो. उद्या तिथे कंटाळा आला की चौथ्या जगाची कल्पनादेखील मांडणारे जन्म घेतील, परंतु प्रत्यक्षदर्शनी आजही आपण एका नव्या जगात वावरत आहोत. त्यामुळे याच ठिकाणी संस्कार करणे ही काळाची गरज आम्ही विसरत चाललो आहोत.

- Advertisement -

हे सर्व असं अस्ताव्यस्त सुरू आहे. कुठेही जा आपापला स्वार्थ साधण्यात प्रत्येक जण मश्गूल आहे. येणार्‍या पिढीवर काय संस्कार होतील याचा आजही विचार करण्यासाठी एक वेगळा अजेंडा महत्त्वाचा आहे. या देशात प्रत्येक राज्यात वेगळी संस्कृती, धर्म, वेगवेगळ्या चालीरीती आहेत. स्वातंत्र्यानंतर हा देश काही काळ टिकेल असं भाकीत करणार्‍यांना ७५ वर्षांनंतर आपण उत्तर देऊ शकलो की आम्ही राष्ट्र म्हणून उभे आहोत. याचे श्रेय आपल्या भारतीय संविधानाला जाते. वर उल्लेख केला त्याप्रमाणे आपल्याजवळ संविधानाचा वारसा आहे. त्याच वारशाचे जतन केले तर आपल्या राष्ट्रीय एकात्मतेची नवी जडणघडण शाबूत राहील, परंतु हा आलेख अलीकडे गुंतागुंतीच्या पद्धतीने विस्तारत आहे.

विस्तारित जगात एक अस्वस्थता वाढत जाऊन आणि हे होणार होतं असं आपण मानतो. त्यावेळी गरज असते आपला इतिहास तपासून पाहण्याची. आपला इतिहास विजयाचा आहे की पराभवाचा याचे उत्तर इतिहास वाचल्यावर कळेल, परंतु इतिहासामध्ये जास्त रमून जाता येत नाही. वर्तमानात परिस्थिती वेगळी आहे. भविष्यात परिस्थिती वेगळी असू शकते. उद्याच्या भविष्यात आज जे काही असेल तो त्यासाठी इतिहास असेल. म्हणून वर्तमानात आपण सुज्ञ वागणं तितकंच महत्त्वाचं आहे. उद्या सत्ता येईल किंवा नाही माहीत नाही, परंतु तिकडे गांधींचा वारसा सांगू पाहणारा ‘भारत जोडो’ची यात्रा करतोय.

राजकीय हेतू साध्य करण्यासाठी हे सर्व सुरू आहे हे कोणीही सांगू शकेल, पण आजच्यापेक्षा उद्या जर चांगले होत असेल तर काहींच्या आशा पल्लवित होत जातात. काही गोष्टी प्रेरणादायी असतात खर्‍या, पण त्यातून आपण काय घ्यायचे हा प्रत्येकाचा स्वतंत्र विचार आहे. असेही आपण आपल्याच अनुभवातून शिकत असतो. कादंबरी वाचताना जसं एक एक पान वाचून संपत असतं तसंच आपलं आयुष्यदेखील त्या पानाप्रमाणे जगून संपत आहे. अर्थात मी एवढे दिवस जगलो? कसा जगलो? का जगलो? कशासाठी जगलो? याची उजळणी शेवटी करण्यापेक्षा आजच उत्तर मिळवत जगलो तर एका पिढीचा वारसा सांगण्यात आपण हक्काचा वाटा उचलू शकतो. नाहीतरी लिगसीला खुंटीवर ठेवून आपण धावपळ करतच असतो आपल्या उद्ध्वस्त आयुष्याची. हे होऊ नये यासाठी तर महत्त्वाचा असतो आपला वारसा, जो जगता यायला हवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -