घरफिचर्ससारांशआनंदाची पेरणी

आनंदाची पेरणी

Subscribe

राज्यात आनंददायी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुळातच शिक्षण आनंददायी असेल तरच भविष्य आनंददायी असण्याची शक्यता असते. शिक्षण हे दुःखदायी असेल तर शिक्षण घेतलेली माणसं आनंदी कशी असतील? आनंद पेरला तर आनंद उगवेल. उद्याच्या भविष्याच्या चेहर्‍यावर आपल्याला हास्य हवे आहे, त्यामुळे या निर्णयाचे मोल लक्षात घ्यायला हवे. त्यादृष्टीने दिल्ली, मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्र सरकारने त्या दृष्टीने काही उपक्रमाची घोषणा केली आहे. आनंददायी अभ्यासक्रमातील उपक्रमात दोन दिवस गोष्ट या उपक्रमासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

बालकांना गोष्ट सांगणे आणि त्यांनी ती ऐकणे हा एकूणच आनंददायी शिक्षणाचा भाग आहे. गोष्ट ही बालकाच्या भावनिक, भाषिक विकास प्रक्रियेतील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्या पलिकडे व्यक्तीमत्वाला आकार देण्यात गोष्ट महत्वाची भूमिका पार पाडते. खरंतर प्रत्येक बालक हे गोष्टीवेल्हाळ असतो. त्यामुळे घरातील आजीआजोबा यांच्याशी नातवाचे असणारे घट्ट नाते हे गोष्टींनीच अधिक घट्ट होत जाते. बालकांना कोण आवडते? असे विचारले तर, त्या प्रश्नाचे उत्तर असते गोष्ट सांगणारी माणसं. बालकांच्या जगण्यावर गोष्टींचा परिणाम असतो हे त्याच्याशी संवाद साधला की लक्षात येते.

आपण औपचारिक शिक्षणाच्या प्रक्रियेत अक्षर साक्षरतेला महत्व देत आलेलो आहोत. त्या प्रक्रियेत बौध्दिक विकासाला सर्वाधिक महत्व आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेत बालकांच्या भावनिक विकासाला अपेक्षित इतके प्राधान्य दिले जात नाही. पालकांची मार्काच्या पलिकडे फार काही मागणी नाही. शाळांना निकाल हवा आहे. बालक म्हणजे जणू स्वप्नपूर्तीचे माध्यम आहे. बालक म्हणजे स्पर्धेचा घोडा आहे. त्याला आपण शिक्षणात माणूस म्हणून समजून घेण्यात कमी पडत आहोत. आज बालकांच्या मनात जे ताणतणावाचे चित्र आहे त्याचे कारण भावनिक विकासातील अडथळे हे आहे. भावनिक समायोजन न घडल्याने समाजात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यातून विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, संघर्ष आणि संतापाच्या घटना आपल्या भोवतालमध्ये घडताना पाहावयास मिळतात. त्यावर मात करण्यासाठी आपल्याला आनंददायी शिक्षणाचा विचार करण्याची गरज होतीच. त्यामुळे या शासन निर्णयाकडे गंभीरपणे पाहावयाला हवे.

- Advertisement -

समाजात आपण जशी प्रगती साधत आहोत तसे ताणतणावाचे क्षण वाढत आहेत. भौतिक सुविधांमध्ये प्रगती साधली असली तरी त्यातून आनंद प्राप्त करण्यात यश मिळू शकलेले नाही. देकार्त नावाचे विचारवंत म्हणतात की, आपण प्रगती करतो म्हणजे निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र निसर्गावर मात करून आपण आनंद प्राप्त करू शकणार नाही. निसर्गासोबत जगणे हीच वाट आनंदाची आहे. आपण निसर्गाला मोठ्या प्रमाणावर ओरबडत आहोत. निसर्गाची हानी होते आहे. जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, खासगीकरणानंतर आपण प्रचंड स्पर्धेला तोंड देत आहोत. सर्वच क्षेत्रात स्पर्धा उंचावली आहे, मात्र त्यातून ताणतणावाची भर पडली आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. समाजात विविध कारणांनी ताणतणाव वाढत गेला की, त्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम बालकांवर होत असतो.

शिक्षणातही मोठी स्पर्धा आहे. तेथील शिकणे, मूल्यमापन, वाढती फी, पालकांच्या अपेक्षांचे ओझे, सामाजिक दबाव यामुळे विद्यार्थ्यांवर ताण आहेच. अशा परिस्थितीतून मुलांना तणावापासून मुक्ती द्यावी लागणार आहे. तणावातून मुक्ती मिळाली तर बालकांचे शिकणेदेखील अधिक परिणामकारक होईल. ताणतणावात राहिलेले बालक चांगले शिकू शकत नाही. तणावातून गुणवत्तेची वाट चालता येत नाही. त्यातून सृजनशीलता फुलण्याची शक्यतादेखील नाही. त्यामुळे ही वाट आज नाही तर उद्या चालावीच लागणार आहे. त्यादृष्टीने मानसिक स्वास्थ उत्तम राखणे, स्वची जाणीव विकसित करणे यादृष्टीने या अभ्यासक्रमाचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे ही वाट चालत गेलो तर आपल्याला भविष्यात त्याचे काही चांगले परिणाम मिळू शकतील.

- Advertisement -

शासनाने या करीता काही उपक्रम सूचविले आहेत. ज्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मस्तकी असलेला ताण हलका होईल. त्या दृष्टीने आठवड्याचे दोन दिवस बालकांना गोष्टी सांगायच्या आहेत. त्या गोष्टी गाभाघटक, जीवन कौशल्य, मूल्यांचा विचार करून सांगायच्या आहेत. खरेतर अभ्यासक्रमाच्या निर्मिती प्रक्रियेत यांचा विचार करण्यात आलेला आहे. खरंतर गोष्टी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील निव्वळ आनंदाचा भाग असतो. मात्र तरीसुध्दा त्यातून काहींना काही पेरले जात असते. गोष्टींनी अनेकाच्या आयुष्यात प्रकाश पेरला आहे. गोष्टींनी मुलांचे भावविश्व समृध्द होत असते. सांगितल्या जाणार्‍या गोष्टीतून बालकांच्या मनात जिज्ञासा, वैज्ञानिक दृष्टीकोन, जिद्द निर्माण होण्यास मदत होत असते. गोष्ट ही प्रत्येक बालकाच्या आयुष्यात महत्वाची आहे. गोष्ट आवडत नाही असे बालक सापडणे कठीण आहे. गोष्टीतील प्रसंग, घटना, पात्र ही मुलांच्या भावविश्वातील असेल तर त्याचे गोष्टीशी नाते पक्के होत जाते. प्रत्येक वयोगटाची असलेली अभिरूची भिन्न असते. अगदी बालवयात पक्षी, प्राणी तसेच पर्‍यांशी त्यांचे नाते जुळलेले असते. त्या नात्यातील बालक त्यांच्याशी अधिक गुंतलेले असते.

वय जसे वाढत जाते तसे अभिरूची बदलत जाते. मग पराक्रमाच्या,शौर्याच्या कथा मुलांचे मनात घर करत असतात. पुढच्या टप्प्यावर वैज्ञानिक, चरित्र कथा मुलांना आवडतात. अगदी महाविद्यालयात जाणार्‍या मुलांनाही गोष्टी भावत असतात. भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांना महाविद्यालयात असताना दर सोमवारी त्यांचे प्राचार्य ज्या गोष्टी सांगायचे त्या गोष्टींना त्यांना अधिक समृध्द करत गेल्या आहेत. त्याचा त्यांनी जाणीवपूर्वक उल्लेख केला आहे. त्यामुळे सोमवार हा त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस वाटत होता. त्यावेळी गोष्टींच्या माध्यमातून ज्या विचारांची पेरणी व्हायची ती त्यांच्या जीवनावर कायमची कोरली गेली आहे. गोष्टींनी त्यांना विचार करायला भाग पाडले आहे. प्रत्येक राष्ट्रपुरूष, त्यांची जडणघडण आणि त्यांचे विचार हे खूपच महत्वाचे होते. त्या गोष्टांच्या माध्यमातून त्यांना दृष्टी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अनेकांच्या आयुष्याला गोष्टींनी आकार दिला आहे. जन्माला आलेल्या मुलांच्या मनाचे पोषण चिऊताईच्या गोष्टींनी झाले. अगदी तहाणलेला कावळा. चिऊचे घर होते मेनाचे आणि काऊचे घर होते शेणाचे, या गोष्टी न ऐकलेला बालक सापडणार नाही.

बालकाच्या आयुष्यातील गोष्ट जात नाही. त्याप्रमाणे माणसं मोठी झाली तरी गोष्ट आयुष्यातून सुटत नाही. फार तर गोष्टीचे विषय बदलतात इतकेच. आपण कीर्तन ऐकत असतो. त्यातील दृष्टांत हीदेखील एक गोष्ट असते. माणसं लहान असू दे नाहीतर वृध्द. सर्वांच्या आयुष्याला गोष्ट हवी असते. गोष्टी माणसांचे जीवन परिवर्तन करण्यास मदत करत असतात. गांधीजींच्या जीवनातील सत्याची वाट ही हरिश्चंद्र तारामतीच्या गोष्टींनी सुरू झाली आणि जीवनभर टिकून राहिली. ऍरिस्टॉटल यांच्या गोष्टीदेखील जीवनावर परिणाम करत असतात. गोष्टी म्हणजे जीवन तत्वज्ञान प्रसुत करण्याचा मार्ग आहे. इसापच्या आयुष्यात गोष्टीने घडलेले नाट्य आपण पाहिले की, गोष्टीचे मोल लक्षात येते. लोक गोष्टीच्या माध्यमातून आपले विचार दर्शित करू शकतात. त्यामुळे गोष्टीचा विचार आनंददायी अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला आहे. गोष्ट ऐकल्याने बालकांच्या जीवनात शब्द संपत्तीत भर पडते. गोष्टीने मुलांचे भावविश्व समृध्द होते. श्रवण कौशल्याचे व भाषण कौशल्याचे विकसन होण्यास मदत होते. त्याच बरोबर मुलांच्या कल्पना शक्तीला अधिक भरारी मिळते. अनेक नव कल्पानांचा जन्म गोष्टीत दडलेला असतो हे लक्षात घ्यायला हवे. मुलांचे भविष्याचे पावले गोष्टीच्या माध्यमातून झालेल्या संस्काराने गतीमान होण्यास मदत होते.अनेकदा त्या गोष्टी मुलाना स्वप्न पाहण्यास प्रेरणा देत जातात.त्यामुळे गोष्टीन आयुष्य घडत जाते हे लक्षात घ्यायला हवे.

त्यामुळे बालकांच्या जीवानला आकार देण्याचा विचार जितका महत्वाचा आहे. त्यापेक्षा अधिक चांगला विचार पेरण्यासाठीच्या दिशेने जाण्यासाठीचा प्रवास म्हणून गोष्टीचे मोल लक्षात घ्यायला हवे. गोष्टीतून मुलांना जितका आनंद मिळतो त्यापेक्षा अधिक आनंदाचे ठिकाणे असण्याची शक्यता नाही. त्यामुळे रोज एक गोष्ट..मुलांच्या आयुष्यात पेरली गेली तरी आपल्याला अधिक चांगला समाज निर्मितीच्या दृष्टीने पावले टाकणे शक्य आहे. शिक्षकांना गोष्ट सांगण्यासाठीच्या कौशल्याचा विचार करावा लागेल. सांगितलेली गोष्ट आशयाच्या अंगाने जितकी महत्वाची आहे तितकीच ती कथन कौशल्याच्या अंगाने देखील महत्वाची आहे. बालपणात मुलांवर कथनाचा मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे ते कौशल्य प्राप्त करण्याबरोबर गोष्ट निवडण्याचेही आव्हान आहे. इयत्ता, वयोगट, मुलांचे भावविश्व, भाषिक परिसर, बौध्दिक क्षमता, भोवताल, पूर्वानुभव यासारख्या अनेक बाबींचा विचार करत आपल्याला गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. गोष्ट म्हणजे भविष्यासाठीची पेरणी आहे. त्यामुळे विचार करत पावले टाकावी लागणार आहे. मात्र गोष्ट म्हणजे आनंदाची पेरणी आहे हे लक्षात घ्यायला हवे. गोष्ट ही परीक्षेसाठी नाही तर निखळ आनंदाचा मार्ग ठरायला हवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -