तरीच म्हणवावे पुरुष…अखंडित !

आजही अवघ्या जगावर अधर्म युद्धाचे सावट आहेच. त्यात भारताला तर देशांतर्गतच्या सततच्या कुरबुरी आणि सीमेवरील आतंकवाद या दोन्ही शत्रूंना रोजचे सामोरे जावे लागतेय. भूतकाळात जिला धर्मग्लानी असे म्हटले गेले, तीच या वर्तमानकाळात विचारग्लानी म्हणून आलीय. धर्मग्लानी दूर करणारे अवतार होऊन गेलेत. विचारग्लानी दूर करणारे अवतार आता प्रकट व्हावे लागतील. त्यामुळे आज समर्थांसारख्या लोकशिक्षक आणि छत्रपती शिवरायांसारख्या पुरुषोत्तमाची प्रकर्षाने गरज भासतेय. देशावर ज्या परकीय राजवटी येऊन गेल्या, त्या पारतंत्र्यात रुजलेल्या महत्वाकांक्षेला दोन अंगे होती. एक परकीय राजवट संपली पाहिजे आणि दुसरे म्हणजे स्वदेशी राज्ययंत्रणा अस्तित्वात आली पाहिजे.

समर्थ रामदास स्वामी त्यांच्या बालपणी एकदा लपून बसले होते. काही केल्या सापडेनात.अखेर एका फडताळात सापडले. काय करीत होता रे, असे विचारल्यावर, ‘आई, चिंता करितो विश्वाची’, असे उत्तर त्यांनी दिले. बालवयातील नारायणाचे उत्तर साधे-सामान्य होते का? खरंतर हा प्रश्न सदासर्वकाळ लागू होतोय. पण, या प्रश्नामागील गूढार्थ जाणून घेण्याचे सायास कोण करतो म्हणा. त्या बालवयात समर्थांनी असे काय पाहिले असेल? कोणत्या उद्विग्न-परिस्थितीपुढे त्यांना समाजाची काळजी वाटली असेल? कोणत्या पीडा पाहून त्यांना लपून बसावेसे वाटले असेल?

बहमनी काळापासून महाराष्ट्र धर्मांध यवनांच्या जुलुमानी भरडून निघत होता. हिंदूंच्या कत्तली-जाळपोळ, देवतांच्या मूर्ती-मंदिरांचा विध्वंस, डोळ्यांदेखत आयाबहिणी मुलींचे अपहरण, बळजबरीने धर्मातरांचा जुलूम, अन्याय, विश्वासघात, रक्तपात, पाशवी अत्याचारात महाराष्ट्र भूमी होरपळत होती. समर्थांचे बालपण या घटनांनी दुःखी कष्टी झाले असेल. त्या अस्वस्थतेतून आईच्या कुशीत हमसून समर्थ म्हणतायत, ‘आई, काळजी वाटतेय या विश्वाची’.

राणूबाईंचा नारायण लग्नाच्या बोहल्यावरून जो पळाला तो अक्षरशः भारतभर हिंडला. कालांतराने नारायणाचा रामदास आणि रामदासाचे समर्थ झाले. काही कालखंड स्वतःचे शिक्षण, पठण, आत्मज्ञान प्राप्त करणे यात गेला. नाशिकसारख्या तीर्थक्षेत्री तपश्चर्या झाली. समाजसुधारणा, समाज बांधणी, तरुणांमध्ये बलोपासनेची आवड निर्माण करून एक समर्थ संप्रदाय तयार करणे आणि त्याचा ‘राष्ट्रउभारणीसाठी’ उपयोग करणे यासाठी समर्थ अहोरात्र झटले. यवणी अत्याचार पाहून त्याविरुद्ध स्व-राष्ट्रधर्माची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देईना. सह्याद्रीची अनावर ओढ आणि डोक्यात सदैव विचारचक्र सुरू होते. याच सह्याद्रीच्या आधाराने तरुणांची संघटना बांधून त्यांना बलोपासनेसाठी प्रोत्साहन द्यायचे. आपल्या हृदयातला मारुतीराया मूर्तिरूपाने त्यांच्यासमोर उभा करायचा. यासाठी समर्थ पाच नद्यांचा उगम जिथे होतो अशा महाबळेश्वरास आलेत गर्द राई, असंख्य वनस्पती, पुरातन देवालय आणि नीरव शांतता पाहून थांबलेत. इथून जर आपल्या कार्याला सुरुवात केली तर आपला संदेश या पाचही नद्या महाराष्ट्रभर पोचवतील.आपली धर्मध्वजा अशी उंचावरून फडकून दूरवरूनही निरखता येईल. सह्याद्रीने स्फूर्ती दिली, महाबळेश्वराने कौल दिला आणि त्यांच्या साक्षीने समर्थांनी गर्जना केली.

‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ – जय जय रघुवीर समर्थ!

या अभिनव गर्जनेने दर्‍याखोरी दुमदुमून गेली. निद्रिस्त महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कडेकपारीतून आलेल्या हाकेने अनेक तरुण आकर्षित झालेत.

शक्ती-बलोपासना संप्रदायाचे कार्य सुरु झाले.
दास डोंगरी राहतो । यात्रा देवाची पाहतो ॥
या त्यांच्याच उक्तीप्रमाणे दाट जंगलात,अवघड जागी असणार्‍या घळीमध्ये समर्थ थांबले.
‘कडे, कपाटे, दर्कुटे । पाहो जाता भयचि वाटे ॥

अशाच ठिकाणी ते रमले. माझा प्रभु राम हा कायम माझ्यासोबतच असतो, असे ते मानीत त्यामुळे त्यांनी वास्तव्य केलेल्या घळी या रामघळी म्हणून प्रसिद्ध पावल्या. सुप्रसिद्ध शिवथरघळी सोबतच हेळवाक, चंद्रगिरी, तोंडोशी, जरंडा, सज्जनगड, मोरघळ, चाफळची घळ अशा अनेक अनगड ठिकाणी वसलेल्या घळी आपल्याला पाहता येतात. समर्थवास्तव्याने पुनीत झालेल्या रामघळी-चहूकडे सृष्टीसौंदर्य उधळलेले आहे. याच घळी छत्रपती शिवाजी महाराज-समर्थ भेटीच्या स्मृती जपून आहेत. दोघा विभूतींनी इथूनच स्वराज्याचे स्वप्न पाहिले,जगले.

समर्थ जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांच्या मुखातून रामकृपेचे अनमोल साहित्य प्रसिद्ध झाले. लवथळेश्वर मंदिरातील ‘लवथवती विक्राळा’ ही शंकराची आरती असो, कृष्णाकाठावरची ‘सुखसरिते गुणभरीते दुरिते निवारी..’ ही कृष्णामाईची आरती असो. पंढरीच्या विठोबाला पाहून ‘इथे का रे उभा श्रीरामा ..’ हा सवाल असो वा प्रतापगडाच्या पायथ्याला पार गावात रामवरदायिनीला पाहून ‘देखिली तुळजा माता निवालो अंतर सुखे..’असो. दासबोधासारखा व्यवस्थापन शास्त्रावरचा उत्कृष्ट ग्रंथ शिवथर घळीत निर्माण केला. म्हणून या घळी महाराष्ट्र युवापिढीने पाहावयास हव्यात. जवळच्या महाबळेश्वरच्या पर्यटनात बुद्धी-वेळ-शक्ती-द्रव्याचा केवळ अपव्यय होईल. पण, या समर्थ स्थळी स्वतःसाठी, समाज राष्ट्रासाठी खूप काही सापडेल.

उपासनेचे सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना या दोन्हींचे महत्व आणि त्यातून राष्ट्रसेवा पटवून देणारे समर्थ रामदास महाराष्ट्रातील एकमेव संत होते. आणि म्हणूनच त्यांनी भक्तीसोबत शक्तीची उपासना करणारे शिष्य घडवले. रामदास स्वामी आणि संत तुकाराम समकालीन होते. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. ज्या काळात शिक्षण संस्था, विद्यापीठे, प्रसारमाध्यमे नव्हती त्या काळात समर्थांनी स्वतःला घडलेला बोध इतरांना घडविला.

‘मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे, हळूहळू’ ही त्यांची पध्दत होती. मुलांची वाणी कोमल असावी, करणी विमल असावी. त्यांनी विद्या वैभवाचा ध्यास घ्यावा, सज्जनांच्या संगतीत असावे, समाजावर प्रेम करावे, अंतर्यामी अभेदभावना बाळगावी, प्रसंग ओळखून वागावे, लोकांचे मनोगत विचारात घेऊन अंतरंग पारखावेत, आपले वागणे बोलणे लोकांना खुपू नये अशी साधी सोप्पी शिकवण होती. लोकजीवनाचे संस्करण करण्याचा प्रयत्न करणारे समर्थांसारखे निस्पृह, निर्भय, निर्भीड लोकशिक्षक ही आज अन उद्याची गरज होय. काळ बदललाय, परिस्थिती बदललीय, किती वेळ इतिहास स्मृतीत तरंगायचे, हा निर्जीव प्रश्न अद्यापही कुणाकुणास पडतो. इतिहासाचे विस्मरण झाले की असे पंगुत्व बुद्धीत शिरते. पण परब्रह्म तेच, मानवी मनोवृत्ती त्याच आणि माणसाचे मूलभूत प्रश्नही तेच आहेत.

आजही अवघ्या जगावर अधर्म युद्धाचे सावट आहेच. त्यात भारताला तर देशांतर्गतच्या सततच्या कुरबुरी आणि सीमेवरील आतंकवाद या दोन्ही शत्रूंना रोजचे सामोरे जावे लागतेय. भूतकाळात जिला धर्मग्लानी असे म्हटले गेले, तीच या वर्तमानकाळात विचारग्लानी म्हणून आलीय. धर्मग्लानी दूर करणारे अवतार होऊन गेलेत. विचारग्लानी दूर करणारे अवतार आता प्रकट व्हावे लागतील. त्यामुळे आज समर्थांसारख्या लोकशिक्षक आणि छत्रपती शिवरायांसारख्या पुरुषोत्तमाची प्रकर्षाने गरज भासतेय. देशावर ज्या परकीय राजवटी येऊन गेल्या, त्या पारतंत्र्यात रुजलेल्या महत्वाकांक्षेला दोन अंगे होती. एक परकीय राजवट संपली पाहिजे आणि दुसरे म्हणजे स्वदेशी राज्ययंत्रणा अस्तित्वात आली पाहिजे.

पुढे परराज्य गेले आणि स्वराज्य आले पण आजही लोकराज्य कुठेय? कुणी व्यक्ती वा पक्षाने मोगल-इंग्रजांची जागा घेणे म्हणजे स्वराज्य मानायचे का? ही तर राजसत्ता झाली. आपले सगळे बोलणे चालणे हे पक्ष आणि त्यांचे नेते याभोवती घुटमळत असते, ते देशाविषयी नसते. देशव्यापी इच्छाशक्ती नाहीच शिवाय सामाजिक समताही अस्तित्वात आलीय का? तत्वांचे अढळ अधिष्ठान नसणारे हेच का आपले स्वराज्य? सामाजिक जीवनात देखाव्यांना उत आल्याचे पाहावे लागतेय. सभा, समारंभ, नेत्यांचे दौरे, पैसे पेरून भरवलेले माणसांचे मेळावे, भोजनाच्या पंक्ती, डामडौल यातच लोकशाही अडकून पडलीय. पैशांची खैरात करून आपलीच शोभायात्रा काढून सुहासिनींकडून ओवाळून घेणं हीच लोकशाही का? लोकं विचारशून्य होऊन प्रवाहपतीत झाल्यामुळेच लोकशाही गटांगळ्या खातेय.

ज्या इस्लामी धर्मांध राजवटीने वैभवशाली भारतावर आक्रमण करून ते हस्तगत केले होते त्याच परकीय सत्तेच्या महासागरात शिवछत्रपती-समर्थांनी धर्मसंस्थापणा करून दाखवली होती. समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवरायांच्या लोकोत्तर कार्याने भारावून गेले होते. समर्थांच्या एकाही मंदिर वा मठास अगर शिष्यास कुणी हात लावण्याची बिशाद नव्हती. कित्येक मूर्तीभंजक मुसलमान सरदारांना समर्थांच्या सगुण भक्ती आणि योग सामर्थ्याचा तडाखा बसला होता. आत्मज्ञानी, पूर्ण वैरागी व निःस्वार्थी गुरूंनी साध्या कपारित बसून श्रद्धेने व मनोभावे केलेल्या साधनेचे हे केवढे मोठे फळ.

सध्या देशाच्या पुनरुत्थानाचे दिवस आहेत. इतिहासाची उजळणी करावीच लागेल. जुन्यातले चांगले ते उचलून, विवेकावर घासून, प्रयोग करून, कसावर उतरवून हृदयाशी धरावे लागेल. महाराजांच्या गडकोट किल्ल्यांप्रमाणे समर्थांच्या राम घळी आणि त्यांनी स्थापित केलेले मारुती युवापिढीने पाहून इथून प्रेरणा घ्यावी. इथून आत्मज्ञान मिळवून साहसी- निर्भय जीवन जगता येऊ शकेल. अन्यथा, पुन्हा आम्ही कोणाकडून तरी तुडवले जाण्याची वेळ येईल.

आज समर्थ असते तर, सांस्कृतिक शिक्षण या नावाखाली केवळ शब्दज्ञान देणार्‍या आत्मप्रचितिशून्य शिक्षकांना, सांप्रदायिक उपसनांना कंटाळलेल्या तरुणांना चाकोरीबद्ध शिक्षण पद्धतीतून बाहेर काढले असते. सह्याद्री वनविहार करता करता श्रेष्ठ तत्वे समजावून दिली असती. म्हणून युवापिढीने गडकोट किल्ले, समर्थांच्या रामघळी पाहण्याचा आता अट्टाहास धरावा. या वातावरणात अनेक रुपांतून प्रकट होणार्‍या शिव-समर्थांच्या जाणिवेने आपण समाधी स्वरूप एकरूप होऊन जातो. अंतःकरण अगदी मोकळे हलके झाल्याचे वाटते. इतके हलके की अस्तित्व सापेक्ष ‘मी’चासुद्धा स्पर्शभार उरत नाही.

समर्थ तपस्वी संत होतेच, पण राजनीतीचे जाणकार होते. शिवछत्रपतींच्या निधनानंतर स्वराज्य विवंचनांच्या आवर्तात सापडले. पराक्रमी संभाजी राजे अंतर्गत कलहाने अस्वस्थ झाले होते. वादळी प्रकृतीचा हा पुरुषोत्तम कदाचित वडवानलाचे रूप धारण करील, ज्यामुळे शत्रूला फावेल असे भय वाटत होते. अशावेळी संभाजी राजांना विवेकाच्या बळावर राज्यविस्तार व राज्यरक्षण करावे कसे, हे समर्थांनी समजावून दिले.

अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे। मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे॥
सकळ लोक एक करावे, गनीम निपटून काढावे।
ऐसे करिता कीर्ती धावे, दिगंतरी॥
आहे जितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे।
महाराष्ट्र राज्य करावे, जिकडेतिकडे ॥
शिवराजास आठवावे, जीवित तृणवत मानावे।
इहलोकी परलोकी उरावे, किर्तीरूपे॥
शिवछत्रपतींनी देवा धर्माचे कार्य सिद्धीस नेले. तेच कार्य संभाजी राजांनी पुढे नेऊन पराक्रमाने कृतकृत्य व्हावे म्हणून समर्थ पत्रातून तळमळीने सूचना करतायत,
‘‘त्याहुनी करावे विशेष,तरीच म्हणवावे पुरुष…अखंडित’’ !!

हाच समर्थ मंत्र राष्ट्रास आज अन उद्याही संजीवनी देईल.