घरफिचर्ससारांशदिवाळी कौटुंबिक नातेसंबंधाची!

दिवाळी कौटुंबिक नातेसंबंधाची!

Subscribe

या दिवाळीच्या निमित्ताने आपण सर्वजण हाच निग्रह करूयात की आपल्या नातेसंबंधांमध्ये रोजच दिवाळी असेल, रोजच आपण आपल्या जगणं साजर करूयात, रोजच आपण भूतकाळ विसरून नव्याने पाडवा पहाट जगूयात. वर्षभर रोजच आपण घरच्या लक्ष्मीची पूजा करूया. रोजच आपण बहीण भावातील नाते सुदृढ करून भाऊबीज साजरी करूया. दिवाळीत घरातील जाळीजळमटे काढताना आपल्या मनाला लागलेली जळमट, कलुषित झालेले नातेसंबंधदेखील स्वच्छ करूया. या दिवाळीत प्रत्येक नात्याला प्रेमाचे उटणे, सामंजस्याचे अत्तर आणि मन मोकळेपणाने बोलण्याची आतषबाजी हिच सर्वोत्तम दिवाळी भेट आपण एकमेकांना देऊया. नातेसंबंधांची दिवाळी साजरी करूया.

दिवाळी…लहान मोठ्यांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सगळ्यांना एकत्र आणणारा सण. आपण सर्वचजण दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतो.. लहान मुले नवीन कपडे, फटाके, फराळ, खाऊ, सुट्ट्या, फिरायला जाणे यासाठी आतुर असतात तर मोठी माणसे नवीन घर, गाडी, सोने, जमीन खरेदी यासाठी दिवाळीत नियोजन करीत असतात. घरोघरी महिला स्वतः साफसफाई, फराळ पदार्थ बनवण्याची तयारी, सामान खरेदी यादी यात व्यस्त असतात. सर्वांना उत्साह, ताजेपणा, उल्हास आनंद आणि प्रेरणा देणारी ही दिवाळी जशी जोमात येते तशीच सुमधुर आठवणी ठेऊन निघून पण जाते.

त्यामध्ये आपण सर्वजण प्रामुख्याने महिला किती दमतात, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेऊन किती बारकाईने नियोजन करतात वेळप्रसंगी आजारी देखील पडतात, पण कोणाच्याही उत्साहाला गालबोट न लागू देता सगळं निमूटपणे, निटनिटकेपणे पार पडतातच. घरातील सर्वचजण या सणात सक्रिय होतात आणि आपली परंपरा जपण्यासाठी अतोनात प्रयत्न करून, जास्तीतजास्त आनंदात हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतात.

- Advertisement -

सोशल मीडियावर शुभसंदेशांचा महापूर येतो तसेच हॅप्पी दिवाळी हा दोन शब्द संदेश देणारा फोन वेळात वेळ काढून कॉल सर्व मित्र मंडळी, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य एकमेकांना आवर्जून करतात. पण खरा प्रश्न हा आहे की दिवाळीच्या या चार पाच दिवसात एकमेकांना सोशल मीडियावर अथवा फोनवर गोड शब्दात शुभेच्छा देणारे कुटुंबातील सर्व सदस्य वर्षभर मात्र एकमेकांशी तितक्याच प्रेमाने, समजुतीने, आपुलकीने वागत असतात का? बहुतांश वेळा उत्तर नाही असेच येईल.

कोणत्याही सणावाराच्या, वाढदिवसाच्या निमित्ताने औपचारिकता दाखवून,गोड बोलून तेवढ्यापुरते एकमेकांना कुरवाळणे आणि वर्षभर परत त्याच व्यक्तीची निंदा-नालस्ती, लावालाव्या करणे यातच अनेक कुटुंबातील सदस्य धन्यता मानतात. नातं मग ते कोणतंही असो नवरा बायको, बहीण भाऊ, नणंद भावजय, सासूबाई सुनबाई अथवा आपले बालगोपाल भाचे, पुतणे, नातू सगळेच कुटुंबातील महत्वाचे घटक असतात. जेष्ठांचा आदर, मुलांना प्रेम, जिव्हाळा, माया, ममता, महिलांप्रती जाणीव, आदर आणि त्यांना समजून घेणं इतकं साधं सोपं पथ्य पाळलं तरी कुटुंब सुखात राहू शकतं. पण अनेक घरात नातेसंबंध या विषयावर काम केलेले दिसत नाही. नात्यातील प्रत्येक जण महत्वाचा आहे, प्रत्येकाच्या भावनांना घरात स्थान आहे, प्रत्येकाला स्वतःची मत आहेत आणि आपला स्वतंत्र दृष्टिकोन आहे याबाबत अनेक मंडळी अनभिज्ञ दिसतात. आम्हीच कसे खरे आम्हीच कसे योग्य आणि आम्हीच कसे सगळ्या कुटुंबाचे सूत्रधार हा हेकेखोरपणा अनेक नातेवाईक सातत्याने दाखवत असतात. घरातील एखाद्याची पाठ फिरली की त्याची निंदा करणे, घरातील ठराविक सदस्यांना डॉमिनेट करणे, सतत चित्रविचित्र टोमणे मारून घरातील ठराविक सदस्यांना त्रासून सोडणे, घरातल्या घरात राजकारण करणे, एकमेकांची बदनामी करणे, इतरांच्या चुका शोधून शोधून त्यावर जाहीर चर्चा करणारे, घरातल्या घरात ग्रुप पाडणारे, भेदभाव करणारे आणि तरीही कुटुंब प्रेमाचा खोटा दिखावा करणारे, आव आणणारे आपल्या सर्वांच्याच आजूबाजूला असतात.

- Advertisement -

आजकाल तर स्मार्ट फोनमुळे एकमेकांचे फोन स्पीकरवर ठेऊन सगळ्यांनी एखाद्याची खिल्ली उडवणे, कोणत्याही नातेवाईकचा फोन रेकॉर्डिंग करून आपापसात तो पाठवून त्यावर खुमासदार चर्चा करणे, कोणत्याही दोन व्यक्तीमधील संभाषण खुलेआम सगळ्यांनी ऐकून त्यावर टीका टिप्पणी करणे ही नवीन फॅशन आपण स्वीकारली आहे. अशा वागण्यातून नात्यातील विश्वास तुटतो, गोपनीयता न राहता सर्व काही सार्वजनिक होते याचे भानदेखील आपण बाळगत नसतो. अनेक घरांमध्ये आपल्या कुटुंबातील महिलांना, मुलांना चार लोकात अपमानित करणे, त्यांच्यावर ओरडणे, त्यांच्या व्यक्तिमत्वाची, वागणुकीची, सवयीची जाहीर चर्चा करणे असा ट्रेंड पाहायला मिळतो. वर्षभर जर घरातले वातावरण सर्वांसाठी नामुष्कीचे असणार असेल तर चार दिवसांच्या दिवाळीत उगाच एकमेकांना खोटं प्रेम दाखवण्याची तरी काय गरज आहे?

आपल्या कुटुंबातील, घरातील जेजे नातेसंबंध दुरावलेले आहेत, मनाने अथवा शरीराने लांब गेलेले आहेत, नोकरी अथवा व्यावसायिक कारणाने अन्य ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत किंवा कौटुंबिक कलह, भांडण यामुळे अबोला धरलेले आहेत त्या नात्यांना नवसंजीवनी देऊयात. सुरुवात करूयात पती पत्नीच्या नात्यापासून!!! संपूर्ण कुटुंबाला तोलून धरणे, सर्व नात्यांना जबाबदारीने सांभाळून सगळ्यांना आपलंस करणे ही ताकद या पती-पत्नीच्या नात्यात आहे. समाजातील अनेक जोडपी अशी असतील ज्यांच्यामध्ये कोणत्याना कोणत्या कारणास्तव दुरावा आलेला आहे, ते एकमेकांपासून लांब राहत आहेत, काही कारणास्तव त्यांच्यात गैरसमज झालेले आहेत, वादविवाद झालेले आहेत किंवा काही अपरिहार्य कारणामुळे वेगळे होण्याच्या देखील तयारीत आहेत.

दिवाळी सण आहे, हेच तुटत चाललेले, परंतु पूर्णपणे न तुटलेले नातेसंबंध वाचवण्याचा! नात्याची विझत चाललेली पणती पुन्हा प्रज्वलित करण्याचा…दिवाळी सण आहे आतापर्यंत एकमेकांमध्ये असलेले भांडण, क्लेश, गैरसमज संपवून, स्वतःचा इगो बाजूला ठेऊन आपल्याकडून पहिलं पाऊल टाकण्याचा! दिवाळी सण आहे थोडी माघार घेऊन इतरांना मोठेपणा देण्याचा !!! दिवाळी सण आहे हे ठरवण्याचा की इथून पुढे कुटुंबातील कोणालाही दुखावणार नाही, वाईट बोलणार नाही, कोणाची निंदा करणार नाही ! दिवाळी सण आहे तू तू आणि मी मी करण्यापेक्षा आपलं म्हणून सगळ्यांना स्वीकारण्याचा ! दिवाळी सण आहे आम्ही तुम्ही म्हणून घरात अधिक फूट पडण्यापेक्षा आपण म्हणून एकत्र येण्याचा…..

स्वतः पुढे व्हा… बायको रागावून माहेरी आहे तिला भेटायला जा, बहीण बोलत नाहीये स्वतः फोन करा, भाऊ माघार घेत नाहीये तुम्ही पुढे व्हा, आईवडील दुरावलेले आहेत त्यांना जवळ आणा, मित्र-मैत्रिणींना भेटायला जा, शेजार्‍यांना आपल्या घरी बोलवा.. घरातील बालगोपाल यांना नातं जोडणे शिकवा तोडणं नाही !

त्यानं असं वागावं, तिने तस करावं, याने असं बोलावं, त्यांनी इकडे यावं, यांनी तिकडे जावं, तो स्वतःला काय समजतो, ती स्वतःचा स्वाभिमान धरून ठेवते, हा बोलत नाही, तो फोन करत नाही, याला माझी किंमत नाही, ही स्वार्थी, तो मतलबी, याने धोका दिला, त्याने माझा गैरफायदा घेतला, यांनी मला फसवलं आणि त्यानं मला बरबाद केलं हेच आणि हेच विचार जर आपण दिवाळीत पण अंतर्मनात करत असू आणि स्वतः परिस्थिती सुधारण्यासाठी कोणतेही सकारात्मक पाऊल टाकत नसू तर कुटुंब व्यवस्था टिकणे, कुटुंबातील सदस्य जवळ येणे अशक्य आहे.

आपल्यातला मीपणा, खोटा अहंकार स्वतःबद्दलची खोटी भ्रामक कल्पना सोडून देण्यासाठी दिवाळीसारखा शुभमुहूर्त नाही. मोकळ्या मनाने स्वतःच्या चुका स्वीकारा, मान्य करा…. चुका कितीही झाकल्या तरी आणि कितीही पांघरून घातल्या तरी लपत नसतात. त्यामुळे आपल्याच माणसांजवळ चुकांचे खोटे समर्थन देण्यापेक्षा आणि स्वतःच्याच तोटक्या बुद्धी आणि हलक्या विचारसरणीच हसू करून घेण्यापेक्षा चुका मान्य करा चांगली वाईट परिस्थिती स्वीकारून त्यासाठी कोणालाही दोष न देता, कोणावरही खापर न फोडता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून हसत खेळत जवळ या. कुटुंबातील प्रत्येकाला त्याच्या गुण दोषांसहित स्वीकारणे म्हणजेच कुटुंबाचे नेत्तृत्व करणे होय. इतरांना बदलण्याचा भानगडीत न पडता स्वतःला बदला. स्वतःला सगळ्यांना सांभाळून, समजावून घेण्याइतपत सक्षम बनवा.

आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरविते…परंतु आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरविते…पण आयुष्यात कोण टिकून राहणार हे स्वभाव ठरवितो…मित्र मैत्रिणीच्या बाबतीत हे लागू होऊ शकते पण नातेसंबंधमधील लोकांकरिता आपल्याला पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळे जे नातेसंबंध आपल्याशी जन्माला आल्यापासून किंवा लग्नामुळे जोडले गेलेले आहेत ते चांगल्या पद्धतीने निभावणे क्रमप्राप्त असते. प्रत्येक नातेसंबंध प्रत्येक व्यक्ती त्याचा स्वभाव त्याची वागणूक, विचारधारा यात तफावत असणारच, पण तरी देखील एकमेकांना आपलं समजून एकमेकांना आधार देऊन कुटुंब रुपी वटवृक्षाचा पाया किती मजबूत करता येईल याचा आपण या दिवाळीत प्रयत्न करूयात. कुटुंबातील सदस्य शरीराने कितीही दूर असतील, लांब राहत असतील तरी मनाने त्यांना दूर जाऊ न देणे आपल्या हातात आहे. या दिवाळीत प्रत्येक नात्याला प्रेमाचे उटणे, सामंजस्याचे अत्तर आणि मन मोकळेपणाने बोलण्याची आतषबाजी हिच सर्वोत्तम दिवाळी भेट आपण देऊया.

कुटुंबातील प्रत्येक सदस्य महत्वाचा आहे. जेव्हा नियतीने त्याला तुमच्याशी कोणत्याना कोणत्या नात्यात गुंफले आहे तेव्हा तुम्ही त्या नात्याला न्याय देणे लागताच. ज्या व्यक्तींना परमेश्वरानेच तुमच्याशी बांधले आहे, एखादी व्यक्ती जर तुमच्याच कुटुंबाशी बांधली गेली आहे तर, ती व्यक्ती जर तुमच्या आयुष्याचाच एक भाग आहे तर त्या व्यक्तीला योग्य तो सन्मान, आदर, योग्य स्थान देण्यात आपल्याला कमीपणा का वाटावा? किंवा कोणतंही नातं टिकविण्यासाठी आपल्याच लोकांपुढे नमतं घेण्यासाठी आपला अहंकार आडवा का यावा यावर प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे.

या दिवाळीच्या निमित्ताने आपण सर्वजण हाच निग्रह करूयात की आपल्या नातेसंबंधांमध्ये रोजच दिवाळी असेल, रोजच आपण आपल्या जगणं साजर करूयात, रोजच आपण भूतकाळ विसरून नव्याने पाडवा पहाट जगूयात. वर्षभर रोजच आपण घरच्या लक्ष्मीची पूजा करूया. रोजच आपण बहीण भावातील नाते सुदृढ करून भाऊबीज साजरी करूया. दिवाळीत घरातील जाळीजळमटे काढताना आपल्या मनाला लागलेली जळमट, कलुषित झालेले नातेसंबंधदेखील स्वच्छ करूया.

मनामध्ये द्वेष, हेवादावा, अपमान सदोदित आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आपल्याला सुखाने जगू देत नाही. कोणासाठी काय केल, किती केल तरी ते कमीच पडलं का? म्हणून रडत कुढत बसून आपण आपलं आयुष्य आनंदाने जगण्याची संधी गमावून बसतो. आपला हेतू, आपला विचार चांगले ठेऊन कृती केलेली असेल तर कुठे नाही पण देवाच्या दारी त्याची नोंद नक्कीच होत असते. दुसर्‍याला नाव ठेवताना, दुसर्‍याच्या चुका काढताना आपण स्वतः जास्त चुकत असतो, इतरांची निंदा करताना आपण आपली मनस्थिती बिघडवून घेत असतो. अनेक घरांमध्ये लक्ष्मी पूजन धुमधडाक्यात साजरे केले जाते, परंतु त्या घरची सून, त्या घरातील माता, त्या कुटुंबातील स्त्रीचा मात्र वर्षभर अपमान केलेला असतो. या दिवाळीपासून आपण घरातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान वर्षभर कसा टिकून राहील यासाठी प्रयत्न करूया.

आपल्या नात्यातील सर्व सदस्य, कुटुंबातील महिला, ज्येष्ठ, बालक हसतमुख राहणे, आनंदी राहणे, त्यांचे चेहेरे सुखासमाधानाने उजळणे, त्याच्यातील कटुता संपून त्यांचे चेहेरे खुलवने हिच खरी रोषणाई आपण या दिवाळीत करूया. दिवाळीच्या सणाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. आध्यात्मिक ऐतिहासिक महत्वासोबतच दिवाळीचे सर्व दिवस जसे कायम एकमेकांना लागून, एकमेकांसोबत येतात तसेच आपण आपल्या घरातल्या सर्वाना एकमेकांशी बांधून ठेवायला शिकुया. हे सर्व दिवस एकत्र येतात म्हणूनच त्याला दिवाळी म्हणतात, म्हणूनच तो सर्वात मोठा सण समजतात आणि म्हणूनच या सणाचं महत्व कायम टिकून आहे. दिवाळीतील प्रत्येक दिवसाला जसं वेगवेगळं महत्व आहे त्यामागे वेगवेगळी परंपरा आहे तसेच आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला महत्व आहे, प्रत्येकाला दर्जा आहे त्याच स्थान आहे. तसेच जेव्हा सगळे कुटुंब एकत्र नांदताना दिसेल तेव्हा त्यालादेखील दिवाळीसारखं महत्व मिळेल.

दुर्दैवाने काही नातेसंबंध टिकविण्याच्या किंवा सुधारण्याच्या पलीकडे गेलेले असतील तरी त्यावर आयुष्यभर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आणि कुढत बसण्यापेक्षा ते नातं निभवायला आपण कुठे कमी पडलो, आपलं काय चुकलं याचं आत्मपरीक्षण करून त्यातून शिका. निदान आपल्याकडून त्यावेळेस झालेली चूक किंवा निष्काळजीपणा परत होणार नाही याची पूर्ण काळजी घ्या. या दिवाळीत सुदृढ आणि समृद्ध नाते संबंधांचे तोरण घरोघरी लागण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. आपल्या नात्यातला ओलावा आणि सुगंध आयुष्यभर टिकण्यासाठी आपण घरोघरी आत्मीयतेचे उटणे बनवायला सुरुवात करूया.

एकमेकांना शिव्या शाप, तळतळाट आणि दोष देण्यापेक्षा एकमेकांना येत्या दिवाळीपासून फक्त प्रेमाचे, आपुलकीने शब्द देऊया. कुटुंबाची ताकद, नात्यांचा महिमा असाच वर्षानुवर्षे परंपरा म्हणून जोपासला जाईल असा आदर्श आपण येणार्‍या पिढीसमोर ठेऊया. दिवाळीची परंपरा फक्त मौज, मजा, खरेदी, उधळपट्टी, हिंडणं फिरणं यासाठी न जपता आपल्या हक्काच्या माणसांची साथ, सदिच्छा, सोबत आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी जपूया. नैराश्य, एकटेपणा, एकाकीपणा, असुरक्षितता, अस्वस्थपणा या सर्व दुखण्यावर एकच रामबाण उपाय म्हणजे या दिवाळीपासून बोला, व्यक्त व्हा, एकमेकांच्या विचारांना किंमत द्या, प्रत्येकाचे अस्तित्व स्वीकारा, प्रत्येकाला आपली कमतरता जाणवेल, उणीव भासेल इतके मोठ्या मनाचे व्हा !!!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -