घरफिचर्ससारांशकंगनाचं करायचं काय?

कंगनाचं करायचं काय?

Subscribe

कंगना राणावतने गेल्या आठवड्यात केलेल्या दोन ट्वीट्सवरून ती सोशल मीडियामध्ये खूप ट्रोल झाली. पण विषय फक्त कंगनाचाच नाही. तो कंगना नावाच्या प्रवृत्तीचा आहे. त्याचं करायचं काय? स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या वर्गाची प्रवृत्ती! ती प्रस्थापितांना शिव्या घालते, त्यांच्याविरोधी भूमिका घेते म्हणून ती अनेकांना आवडते. पण असं करता करता ती स्वत: प्रस्थापित होऊ पाहाते, हे कोणीच लक्षात घेत नाही. म्हातारी मेल्याचं दु:खं नाही, पण काळ सोकावतो त्याचं काय?

असं म्हणतात की, सर्वज्ञ किंवा सर्वश्रेष्ठ असल्याची भावना मनात यायला लागली की, माणसाचा र्‍हास सुरू होतो. हे समजा खरं असेल, (ते असलंच पाहिजे. कारण आपल्या पूर्वजांनी असं म्हटलं आहे ना! आणि आजकालच्या वातावरणात आपल्या पूर्वजांनी केलेली प्रत्येक गोष्ट ग्रेट, बरोबर आणि खरीच आहे, असं म्हणण्याचा ट्रेंड आहे) तर आदरणीय कंगना राणावत यांची घसरण सुरू झाली, असं म्हणायला हरकत नाही. हे असं म्हणायला कारणीभूत ठरली, ती कंगनाने स्वत:च केलेली दोन ट्वीट्स!

ही ट्वीट्स खरंच मजेशीर आहेत. स्वप्रतिमेच्या प्रेमात मग्न झालेल्या किंवा ज्याला आपण शुद्ध मराठीत नार्सिसिस्ट म्हणतो, अशा लोकांना स्वत:शिवाय जगात काहीच दिसत नाही. आता कंगना नार्सिसिस्ट आहे किंवा नाही, हे माहीत नाही. पण तिला स्वत:एवढं चांगलं जगात काहीच दिसत नाही, हे मात्र त्या दोन ट्वीट्सवरून आपल्याला दिसतं. काय आहेत ती दोन ट्वीट्स!

- Advertisement -

तुमच्या माहितीसाठी त्या दोन्ही ट्वीट्सचा अनुवाद देतो. तर कंगना म्हणते, ‘माझ्यापेक्षा चांगली आणि बहुपेडी कला या भूतलावर इतर कोणत्याही अभिनेत्रीने दाखवली असेल, तर मी माझा उद्धटपणा सोडायला तयार आहे. पण तोपर्यंत उद्धट राहण्याचा माझा हक्का मी बाळगू शकते.’

त्यानंतर केलेल्या एका ट्वीटमध्ये तिने स्वत:ची तुलना हॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांच्याबरोबर केली आणि मी त्यांच्यापेक्षाही काकणभर सरसच आहे, असं जाहीर करून टाकलं. आता खरं तर कोणाला काय वाटावं, यावर कोणाचंच नियंत्रण नसतं. वाटायला काहीही वाटू शकतं. पण खरंच तसं आहे का?

- Advertisement -

आपण आदरणीय कंगना राणावत यांच्या कारकिर्दीकडे एक नजर टाकू या. 2006 पासून कंगनाने साधारण 33 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काही चित्रपटांमध्ये तिची भूमिका मध्यवर्ती होती, तर एक-दोन चित्रपटांमध्ये तिचा सहभाग पाहुणी कलाकार एवढाच मर्यादित होता. या 33 चित्रपटांमध्ये काम करता करता तिने आपली मोहोर उमटवली, हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही. फॅशन, लाईफ इन ए मेट्रो, क्वीन, तनु वेड्स मनू 1 आणि दोन, मणिकर्णिका अशा काही चित्रपटांमध्ये तिने केलेल्या अभिनयाची दखल टीकाकारांनी आणि प्रेक्षकांनीही घेतली. तिच्या नावे तीन राष्ट्रीय, चार फिल्मफेअर पुरस्कार आहेत आणि भारत सरकारने पद्मश्री देऊन तिचा गौरव केला आहे.

ही कामगिरी नक्कीच स्तुत्य आहे. पण जगातील कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा वरचढ ठरण्यासाठी पुरेशी नाही. आपण फार बाहेरच्या देशांमध्येही डोकावायला नको. आपण आपल्या देशातल्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीचाच विचार करू या. कंगनाच्या आधी किमान सहा तरी अशा अभिनेत्री सापडतील, ज्यांनी त्यांच्या अभिनयाची मोहर टीकाकारांच्या आणि प्रेक्षकांच्याही काळजावर कोरली आहे.

मुख्य म्हणजे एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी. हिंदी चित्रपटसृष्टी ही भारतीय समाजाप्रमाणेच पुरुषप्रधान आहे. त्यामुळे इथे हिरॉईनपेक्षाही हिरोची चलती असते. हिरॉईन ही लोणच्यासारखी असते. ती असली की, चित्रपटाला आणखी चव येते आणि चित्रपटाचं पान देखणं दिसतं. त्यामुळे नायकाला केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाच्या कथा, पटकथा लिहिल्या जातात. याला काही सणसणीत अपवाद आहेत, पण तरीही 100 पैकी 97 चित्रपट हे नायकाभोवती फिरणारेच असतात.

हा चक्रव्युह भेदून केवळ आपल्या नावाच्या बळावर चित्रपट मिळवायला सिंहिणीचं काळीजच हवं. नर्गिस यांना मदर इंडिया मिळाला आणि त्या लार्जर दॅन लाईफ झाल्या. त्यानंतर हेमा मालिनीसाठी म्हणून काही चित्रपट लिहिले गेले. जया बच्चन यांनी चित्रपट कारकीर्द सोडली म्हणून, नाहीतर त्यांच्यासारख्या प्रतिभावान अभिनेत्रीने काय बहार उडवून दिली असती, याची कल्पनाच केलेली बरी. अलीकडच्या काळात तब्बू हे नाव या यादीतून वगळणं अशक्यच आहे. विशाल भारद्वाजसारखा कसलेला दिग्दर्शक म्हणाला होता की, ‘हैदर’ चित्रपटात हैदरच्या भूमिकेसाठी कोणीही चाललं असतं एक वेळ, पण गज़ालाच्या भूमिकेसाठी तब्बूशिवाय इतर कोणाचा विचारही केला नव्हता.

आणि विद्या बालन! तिला कोण कसं काय विसरू शकेल! अभिनेत्रींसाठी म्हणून वेगळी पटकथा लिहिली जाऊ शकते आणि ती पडद्यावर यशस्वी होऊ शकते, हा आत्मविश्वास विद्या बालनने दिला. परिणिता, भूलभुलैय्या, पा, इश्किया, डर्टी पिक्चर, कहानी, बॉबी जासूस, शादी के साईड इफेक्ट्स, तुम्हारी सुलू, शकुंतला देवी अशा किती चित्रपटांची उदाहरणं द्यावी! कहानी, बॉबी जासूस, डर्टी पिक्चर, शकुंतला देवी, हे चित्रपट तर विद्या बालनला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिले आहेत. त्या चित्रपटांमधला तिचा अभिनयही बावनकशी आहे.

त्यानंतर याच यादीत तापसी पन्नूचंही नाव लिहावं लागेल. तापसीने बॉलिवूडमध्ये पाय ठेवल्यापासून वेगवेगळ्या भूमिका करत बहार उडवून दिली आहे. तिने केलेल्या देमार हाणामारीच्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या आहेत. त्याच बरोबर तिचा पिंक हा चित्रपट तर तिच्या आणि अमिताभच्या जुगलबंदीसाठी नक्कीच बघावा असा आहे.

तर मुद्दा ही यादी देण्याचा नाही. स्वत:च्या कामाबद्दल अभिमान वाटणं, हे केव्हाही चांगलंच, पण त्याबद्दल दुराभिमान बागळून गर्वाची बाधा करून घेणं हे अधोगतीचं लक्षण असतं. कंगना नेमकी त्याच वाटेने चालली आहे का, हा मुद्दा आहे.

कंगनाच्या अभिनयाला मर्यादा आहेत. तिच्या बोलण्यात असलेला हेल तिच्या जवळपास प्रत्येक भूमिकेत डोकावतो. आता, आपण ज्या प्रदेशातून येतो, त्या प्रदेशातील हेल आपल्या भाषेवर असणं हे अगदीच स्वाभाविक आहे. पण हिंदी चित्रपटसृष्टीसारख्या सर्वदूर पसरलेल्या व्यवसायात काम करताना तुम्हाला या गोष्टींचं भान बाळगावंच लागतं. तिच्या चेहर्‍यावरचे भावही अनेकदा सारखेच असतात. सणसणीत अपवाद क्वीन या चित्रपटाचा! त्यात तिने खरंच कमाल केली आहे. पण पोट फुगवून बेडकीला बैल झाल्याचा भास होत असेल, तर मग त्या बेडकीचं पुढे काय होतं, हे लक्षात ठेवायला हवं.

कंगनाकडे, तिच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या देशातील सर्वात शक्तिमान पक्षाचा तिला असलेला पाठिंबा! तो तसा जाहीरपणे व्यक्त झाला नसला, तरी लपलेलाही नाही. तिची वक्तव्यं उचलून धरणारी आणि त्यांचा उदो उदो करणारी मंडळी समाजमाध्यमांवर खोर्‍यानं आहेत. पुढे-मागे कंगना राजकारणात उतरली, निवडून आली आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित एखाद्या खात्याची मंत्री वगैरे झाली, तर काय अवस्था होईल, याचा विचार करा! किंवा न केलेलाच बरा.

कंगना ही एक प्रवृत्ती आहे. स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या वर्गाची प्रवृत्ती! ती प्रस्थापितांना शिव्या घालते, त्यांच्याविरोधी भूमिका घेते म्हणून ती अनेकांना आवडते. पण असं करता करता ती स्वत: प्रस्थापित होऊ पाहाते, हे कोणीच लक्षात घेत नाही. म्हातारी मेल्याचं दु:खं नाही, पण काळ सोकावतो त्याचं काय?

-रोहन टिल्लू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -