घरफिचर्सस्किझोफ्रेनियाग्रस्तांसाठी...

स्किझोफ्रेनियाग्रस्तांसाठी…

Subscribe

शारीरिक दुखणे, जखमा, आजारांवर तातडीने उपचार करून माणूस तातडीने आजारातून सुटका करून घेतो. मात्र, मानसिक आजाराच्या बाबतीत माणूस म्हणावा तितका सजग दिसत नाही. परिणामी माणसाला मानसिक त्रासाच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. आधुनिक जीवनशैलीमुळे ताणतणावाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे स्किझोफ्रेनियाग्रस्त रुग्णांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. मुळातच मानसिक आजारांबाबत म्हणावी तितकी जागरुकता आज समाजामध्ये होताना दिसत नाही.

जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा मानसिक आजारांबाबत जागरुकतेसाठी वेळोवेळी पावले उचलली आहेत. स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराबद्दलही जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर मत मांडले आहे. मानवाला होऊ शकणारा सगळ्यात वाईट आजार अशा स्वरूपात स्किझोफ्रेनियाची थोडक्यात व्याख्याच जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. विशेष म्हणजे स्त्री-पुरुष, तरुण-प्रौढ, गरीब-श्रीमंत असा कोणताच भेदभाव न होता स्किझोफ्रेनिया हा आजार कोणालाही होऊ शकतो. त्यातही पौगंडावस्थेतील मुलांना या आजाराचा अधिक धोका असल्याचेही अनेक उदाहरणातून समोर आले आहे.

- Advertisement -

वर्ष १९८६ पासून दरवर्षी २४ मे हा दिवस जागतिक स्किझोफ्रेनिया दिन म्हणून साजरा केला जातो. स्किझोफ्रेनिया आजारात व्यक्तीच्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेत परिणाम होतो. आजही जगातील एकूण लोकसंख्येच्या १ टक्के व्यक्ती स्किझोफ्रेनियाग्रस्त आहेत. या आजाराने ग्रस्त व्यक्ती दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाच्या असतात. मात्र, समाजात मानसिक आरोग्याबाबत आजही म्हणावी तेवढी जनजागृती होत नसल्याने स्किझोफ्रेनियाग्रस्त समाजापासून दूर राहतात. मेंदूतल्या जीवरासायनिक बदलामुळे स्किझोफ्रेनिया हा आजार जडतो. त्यामुळे ही व्याधी जडलेली व्यक्ती आभासी जगात जगत असते. खरे-खोट्यातील फरक करणे, प्रेम, राग, लोभ, माया यासारख्या भावनांना प्रतिसाद न देणे स्किझोफ्रेनियाग्रस्तांना कठीण जाते. परिणामी समाजात वावरताना वागण्यातील सहजता नाहीशी होऊन अशा व्यक्ती समाजापासून दूर राहू लागतात. एकटेपणातच त्यांना सुरक्षितता वाटू लागते.

हा आजार रुग्णाच्या मनाचा ताबा घेऊ लागतो. त्यामुळे स्किझोफ्रेनियाग्रस्त स्वतःच्याच आभासी जगात रममाण होतो. प्रत्यक्षात नसलेली वस्तू दिसण्याचा भ्रम होणे, काल्पनिक आवाज ऐकू येणे, स्वतःचे विचार व्यक्त करता न येणे, दुसर्‍याच्या बोलण्याकडे लक्ष न देणे, समोरची व्यक्ती आपल्याला किंवा आपल्या कुटुंबियांना इजा पोहोचवेल याची सतत भीती वाटणे, याबरोबरच निद्रानाश, निष्क्रियता, नैराश्य यामुळे एकटक सतत कुठेतरी नजर लावून बसणे यासारखी गंभीर लक्षणे स्किझोफ्रेनियाग्रस्तांमध्ये आढळतात. स्किझोफ्रेनियाग्रस्तांवर वेळीच उपचार केल्यास या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य होते. मात्र, अशावेळी अनेकदा स्किझोफ्रेनियाग्रस्तांचे नातेवाईकच त्यांच्या उपचाराला आडकाठी करतात. त्यामुळे आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजाराबाबतीत रुग्णाला नातेवाईक, मित्र-मैत्रिणींच्या प्रेमळ वागणुकीची नितांत गरज असते.

- Advertisement -

असे असताना प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. अनेकदा मानसिक आजाराबाबत तातडीचा उपाय म्हणून कुटुंबियांसह नातेवाईकही मनोरुग्ण हॉस्पिटलचा मार्ग निवडतात. त्यामुळे तातडीने कोणताही निर्णय न घेता स्किझोफ्रेनियाग्रस्तांशी प्रेमाने वागावे. त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा. ‘स्किझोफ्रेनियाग्रस्तांचा समाजाने तिरस्कार न करता त्यांना आधार द्यावा. असे केल्याने रुग्णाला या आजाराशी लढा देण्याचे बळ मिळेल. २४ मे जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त जगभर जागरुकता कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये या विषयावर ठिकठिकाणी व्याख्याने, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येते. मात्र, केवळ हा दिवस साजरा करून समाजातील घटक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण होत नाही. स्किझोफ्रेनियाग्रस्तांना आजारावर मात करण्यासाठी मदत करूया. त्यांचा तिरस्कार न करता त्यांच्याशी प्रेमपूर्वक वागूया.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -