घरफिचर्सशरद पवारांचा ‘राजकीय खेळ चाले’!

शरद पवारांचा ‘राजकीय खेळ चाले’!

Subscribe

शरद पवारांवर विश्वास कोणी आणि कधी ठेवायचा. मोदी त्यांचे काही महिन्यांपूर्वी मित्र असतात. त्यांचा सल्ला घेऊन चालतात आणि आता अचानक त्यांचे राजकारण हुकूमशाही असल्याचे दिसते. मैत्रीच्या नावाखाली भूमिकेशी तडजोड करता येत नाही; पण, सत्तेसाठी तडजोड हेच पवारांच्या राजकारणाचे सूत्र आहे आणि देशात आगामी लोकसभा निवडणुकीत त्रिशंकू अवस्था असेल तर आपल्याला पंतप्रधानपद मिळवणे सोपे जाईल असा पवारांचा अंदाज आहे. आणि सध्या तरी सत्तेचा सर्वात प्रथम वास येणारा या देशात कुणी राजकारणी असेल तर ते शरद पवारच!

‘आपलं महानगर’च्या याच रविवार ‘सारांश’ पुरवणीतून 26 फेब्रुवारीला आम्ही ‘शरद पवारांच्या स्वप्नात पंतप्रधानपदाची खुर्ची’ असा लेख लिहिला होता आणि आज बरोबर लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडल्यानंतर पवारांचा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर डोळा असल्याचे स्पष्ट दिसून आले. लोकशाहीत प्रत्येक राजकीय नेत्याला पंतप्रधानपदाचे स्वप्न पडले तर त्यात वावगे काय… घटनेने तसा तो अधिकार दिला आहे. पण, आपण त्या गावचे नसल्याचे भासवून आणि दुसर्‍याच्या नथीमधून तीर मारून आपल्याला पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसायला आवडेल, असा पवारांचा खेळ सुरू झाला आहे.

- Advertisement -

टीव्हीवर सध्या ‘रात्रीस खेळ चाले’, ही मालिका जोरात सुरू आहे. तळ कोकणातील अण्णा, शेवंता, अण्णांचे कुटुंब (घरचे आणि दारचे), वाडा, विहीर, लिंबू-मिरची, बाहुली, भगत आणि गंडे-दोरे असा सगळा भानामतीचा खेळ रात्री दहा वाजता सुरू होतो… आणि हे सारे थोतांड आहे, हे माहीत असूनही लहान मुलांच्या डोळ्यावर हात ठेवून मालिका डोळे फाडून बघितली जात आहे. निसर्गरम्य कोकणावर जादूटोण्याचा हा अत्याचार करत या देवदत्त भागाकडे इतर भागातील पर्यटकांचा चुकीचा समज करून देणार्‍या या मालिकेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. विशेष म्हणजे कोकणात ज्या महिलांनी पुरुष माणसे पोटापाण्यासाठी परगावी असताना मोठ्या हिकमतीने आपले घरदार सांभाळले त्या महिला निर्बुद्ध असल्याचे दाखवून या मालिकेने मोठा सामाजिक गुन्हा केला आहे, तो वेगळाच… असो, थोडे विषयांतर झाले. तर असाच पवारांचा नजरबंदीचा खेळ आता भारतीय राजकारणात सुरू झाला आहे. 23 मे रोजी लोकसभेचे निकाल त्रिशंकू लागल्यास ‘जाणता राजा’चा हा खेळ जोरात रंगेल. अजून लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे बाकी असताना पंतप्रधानपदाच्या या खेळाचा पवारांनी नमन नटवरा… करत पडदा उघडला आहे.

महाराष्ट्रातील चौथा आणि अंतिम टप्पा होण्याआधी बरोबर आदल्या दिवशी भारताच्या कानाकोपर्‍यात जाणार्‍या एका प्रमुख इंग्रजी दैनिकाला मुलाखत देताना पवारांनी मायावती, ममता आणि चंद्राबाबू नायडू हे पंतप्रधान होऊ शकतात, असे विधान करून एकाच दगडात अनेक पक्षी मारले. मुख्य म्हणजे नरेंद्र मोदी विरोधकांचा मुख्य चेहरा असलेले आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना अनुल्लेखाने मारत काँग्रेसच्या पोटात गोळा आणला… यात गंमत म्हणजे स्वतःचे कुठेही नाव येऊ दिले नाही. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांच्या नथीमधून तीर मारत त्रिशंकू परिस्थितीत पंतप्रधानपदी शरद पवार हेच योग्य उमेदवार कसे आहेत, हे वदवून घेतले… पवारांचा खेळ सुरू झाला आहे तो असा! पवारांच्या या खेळाला खरी रंगत येईल ती निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर. ममता बॅनर्जी, मायावती, चंद्राबाबू नायडू यांच्यासह सीताराम येच्युरी, फारुख अब्दुल्ला, नवीन पटनायक, लालूप्रसाद यादव, देवेगौडा अशी विरोधकांची गाठ मारून (आणि त्यांचे पाय एकमेकांच्या पायात अडकवून) पवार या सर्वांना आधी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत धावायला लावतील आणि मग आधी जाहीर पवारवाणी केल्याप्रमाणे ज्याचे खासदार जास्त अशा प्रमुख नावांना पुढे आणतील.

- Advertisement -

हे झाल्यानंतर याच प्रमुख नावांना एकमेकांविरोधात बोलायला लावतील. पंतप्रधानपदासाठी कुठलेही एक नाव नक्की होणार नाही, याची काळजी घेतील. त्याचवेळी राहुल गांधींसह सोनिया गांधी यांना विश्वासात घेऊन या क्षणी मोदीनामक हुकूमशाही कशी दूर झाली पाहिजे आणि नेहरू-गांधी घराणे कसे वाचले पाहिजे, याचे नजरबंद गारुड तयार करतील… काँग्रेसला एकदा वेशीवर उभे केले की बाकी विरोधी नेत्यांना कसे खेळवायचे हा पवारांचा आवडता खेळ बनेल. कुठल्याच नावावर कोणाचेही एकमत न करता शेवटी आपल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही, अशा अराजकतेवर हा खेळ आणून ठेवतील. कर्नाटक लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवताना जो विरोधकांनी खेळ केला होता, तसाच हा खेळ होईल; पण घोडेबाजाराला उत येऊन खिचडी होऊन जाईल आणि हेच पवारांना हवे आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षी यांनीही त्रिशंकू लोकसभेचे भाकीत वर्तवले आहे. त्यांच्या मते भाजपला 200 जागांच्या आत धाप लागेल. बहुमताच्या जवळ जाणार नसल्याने आपणच सर्वात मोठा पक्ष म्हणून ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि राष्ट्रपती भाजपचेच असल्याने (मोदींच्या शब्दाबाहेर नसल्याने) ते भाजपला बहुमताचा आकडा गोळा करण्यासाठी महिन्याभराची मुदत देतील आणि मग घोडेबाजार सुसाट वेगाने होऊन पैशांचा महापूर येईल. आता या घडीला अमाप पैसा फक्त भाजपकडे असल्याने ते या बाजारात प्रमुख सौदेबाज असतील… याचवेळी पवारांचा समांतर खेळ सुरू राहील. यदाकदाचित आपल्या खेळाला यश येत नाही, असे दिसताच आपले दहा एक खासदार बरोबर घेऊन ते शेवटच्या क्षणी एनडीएतसुद्धा येऊ शकतात. पंतप्रधान झालो नाही तर किमान संरक्षणमंत्री किंवा कृषीमंत्रीपद पदरात पाडून घेण्याचा खेळही पवार खेळतील…

पवारांचा हात धरून आपण राजकारणात आलो, असे सांगणार्‍या मोदींना शरदबाबूंचे हे रंग नीट माहीत असल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पहिले लक्ष्य केले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या या अध्यक्षांना. पवार घराण्यापासून ते राज्यातील आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराला नवीन फोडणी देत पवारच्या प्रतिमा डॅमेजवर भर दिला. मोदींच्या महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत पवार मोदींच्या रडारवर राहिले. मोदींना पक्के ठाऊक आहे की त्रिशंकू लोकसभा झाल्यास आपल्या पंतप्रधानपदाच्या वाटेत कोणाचा अडसर असेल तर तो पवारांचा!

कुठलाच विधिनिषेध न बाळगता वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोद सरकार स्थापन करत स्वतः मुख्यमंत्री झालेल्या पवारांचे राजकारण देशातील जनता आज ओळखत नाही. सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्या परदेशी असल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसपासून वेगळी चूल मांडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणार्‍या पवारांचे सत्तेचे राजकारण काँग्रेस ओळखून आहे. आतापर्यंत राहुल गांधी हे परिपक्व राजकारणी नाहीत, असा सूर पवारांनी लावला. त्यांची पप्पू म्हणून होत असलेल्या हेटाळणीत अदृश्य हातभार लावणार्‍या पवार यांना गेल्या काही महिन्यांत अचानक राहुल हे जाणते राजकारणी कसे काय वाटू लागले? ही सगळी सत्तेच्या जवळ जाण्याची गणिते आहेत.

एक त्यातल्या त्यात बरे आहे की गांधी परिवार पवारांच्या राजकारणाची पक्की नस ओळखून आहे. 2012 साली महाराष्ट्रात सत्तेतील संस्थानिकांसाठी सत्ता राबविणार्‍या राष्ट्रवादीला वेसण घालण्यासाठी शेवटी सोनिया यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात आणले आणि पवारांच्या पक्षाची कोंडी केली. भले काँग्रेसला सत्ता गमावण्याची शिक्षा भोगावी लागली; पण त्यांनी राष्ट्रवादीला धडा शिकवला. यासाठी सोनिया आणि पृथ्वीराज यांची महाराष्ट्रातील जनता आभारी राहील.
शरद पवारांवर विश्वास कोणी आणि कधी ठेवायचा. मोदी त्यांचे काही महिन्यांपूर्वी मित्र असतात. त्यांचा सल्ला घेऊन चालतात आणि आता अचानक त्यांचे राजकारण हुकूमशाही असल्याचे दिसते. याआधी पवारांना ते दिसले नव्हते. गुजरातमध्ये 1992 नंतर मोदी यांनी जे काही केले होते ते पवार मैत्रीच्या नावाखाली विसरले होते की काय? भूमिका स्पष्ट असावी. उजवी किंवा डावी. मैत्रीच्या नावाखाली भूमिकेशी तडजोड करता येत नाही. पण, सत्तेसाठी तडजोड हेच पवारांच्या राजकारणाचे सूत्र आहे आणि देशात आगामी लोकसभा निवडणुकीत त्रिशंकू अवस्था असेल तर आपल्याला पंतप्रधानपद मिळवणे सोपे जाईल असा पवारांचा अंदाज आहे. आणि सध्या तरी सत्तेचा सर्वात प्रथम वास येणारा या देशात कुणी राजकारणी असेल तर ते शरद पवारच!

काँग्रेसचे नेतृत्व मान्य करण्यास प्रादेशिक पक्ष तयार नाहीत आणि ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू या प्रादेक्षिक पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाकांक्षा वाढली असली तरी काँग्रेस त्यांना महत्त्व देण्यास तयार नाही, हा आणखी एक गुंता आहे. दुसरी गुंतागुंत आहे ती मायावती आणि अखिलेश यादव यांची. या दोघांना उत्तर प्रदेशमध्ये दबल्या गेलेल्या काँग्रेसला पुन्हा जिवंत करायचे नाही. हे दोघे काँग्रेसला वार्‍यावर सोडून आघाडी करून मोकळे झालेत. या दोघांना पवारांच्या कानाला लागून बोलायला आवडते; पण, राहुल यांच्याबरोबर मोकळेपणाने चर्चा करता येत नाही. डाव्या पक्षांच्या नेत्यांबरोबर पवारांचे मधूर संबंध. पण, हेच डावे ममता यांना डाव्या डोळ्यानेही बघून घेत नाहीत, अशी गोची झालीय… चंद्राबाबू नायडू हे सध्या पवारांच्या उजव्या कानात बोलतात, तर देवेगौडा डाव्या कानाला लागून आहेत. पवारांना त्यांचा सर्वात आवडता राजकारण हा खेळ खेळण्याची संधी बर्‍याच वर्षांनी चालून आली आहे आणि तीसुद्धा दिल्लीत.

निकालानंतर कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसेल तर १९९६ साली निर्माण झाली तशी परिस्थिती होऊ शकते. विशेष म्हणजे आघाड्यांच्या राजकारणात कुणी विचार करू शकत नाही, अशा व्यक्ती पंतप्रधान झालेल्या आपण पहिल्या आहेत. १९९६ साली जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. देवेगौडा आणि १९९७ मध्ये इंदरकुमार गुजराल पंतप्रधान झाले होते. पंतप्रधानपदासाठी पुरेसे संख्याबळ नसताना हे दोघे पंतप्रधान झाले. आताची परिस्थिती 22 वर्षांपूर्वीसारखी असल्याचे पवारांना दिसत आहे आणि हे अस्थिरतेचे पोषक वातावरण आपल्याला पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत घेऊन जाऊ शकते, यासाठी केरळपासून ते काश्मीरपर्यंच्या प्रत्येक नेत्याला पवार भेटत आहेत. आता आपलेच राज्य येणार आहे, असे सांगत आहे. तुम्ही कामाला लागा, मी मागे उभा आहे… असा सूर लावत आहेत. कारण आता या घडीला निवडणूकपूर्व आघाडी आणि त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी तडजोडी करण्याकरिता जी काही बार्गेनिंग पॉवर लागते ती पवारांकडे पुरेपूर आहे… पंतप्रधानपदाची खुर्ची स्वप्नात यायला लागल्यापासून पवारांची ही पॉवर वाढत चालली आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -