Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स नव्याने जुळलेले ‘नेट’चे नाते 

नव्याने जुळलेले ‘नेट’चे नाते 

आपला ‘डेटा पॅक’ संपला आहे, मग? अरे देवा मग तर एकच गोंधळ. इतकं तर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीसाठीही कासावीस होत नाही. जितकं संपलेल्या ‘नेट पॅक’साठी जीव कासावीस होतो. इतकं घनिष्ठ नातं सध्या नेटबरोबर झालं आहे की, त्याशिवाय काहीही सुचत नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे.

Related Story

- Advertisement -

थोडं पेचात टाकणारं वाटतं आहे ना? अहो पण नाही…खरं आहे हे. आपलं आता प्रत्येकाचं नवं नातं जुळलं गेलं आहे ते म्हणजे ‘नेट’शी. अर्थात आपलं सोशल नेटवर्क. एकवेळ आजूबाजूला माणूस नसलेलं चालेल. पण मोबाईलमध्ये नेट नसेल तर हल्ली प्रत्येकाला अगदी वेडपिसं व्हायला होतं. ‘नेट’ हा शब्द अर्थात आता हा शब्द न राहता, आपल्याशी जोडलं गेलेलं एक महत्त्वपूर्ण नातं झालं आहे. ज्याला अजून नक्कीच कोणतं नाव देण्यात आलं नसलं तरीही, त्याच्याशिवाय आयुष्य म्हणजे एक निरर्थक भावना असंच जणू वाटायला लागणारी माणसंही आहेत. म्हणूनच आता हे नव्यानं जुळलेलं नातं आहे असं म्हणावंसं वाटत आहे. अगदी त्याच पद्धतीने आपण त्याला आंजारतो, गोंजारतो. खरं तर माणसाच्या नात्यापेक्षाही सध्या या नात्याला जास्त जपलं जातंय असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती होणार नाही. पटतंय ना तुम्हाला पण?

अहो नक्कीच. का नाही पटणार? म्हणजे बघा ना. सकाळी अगदी डोळे उघडल्यानंतर सर्वात पहिले लहानपणी देवाचं नाहीतर आईचं नाव तोंडी असायचं अथवा कोणतेही वेगळे विचार तरी असायचे. पण आता उठल्यानंतर सर्वात पहिले डोळे उघडायच्या आधीही हात आजूबाजूला चाचपडायला लागतात ते म्हणजे मोबाईल शोधायला. इतकंच नाही तर डोळे चोळत मोबाईलवर नक्की कोणाकोणाचे आणि किती मेसेज आले आहेत, हे बघणं जास्त गरजेचं वाटतं. पण त्याहीपेक्षा जर डोळे उघडल्यानंतर कळलं की, आपला ‘डेटा पॅक’ संपला आहे, मग? अरे देवा मग तर एकच गोंधळ. इतकं तर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीसाठीही कासावीस होत नाही. जितकं संपलेल्या ‘नेट पॅक’साठी जीव कासावीस होतो. इतकं घनिष्ठ नातं सध्या नेटबरोबर झालं आहे की, त्याशिवाय काहीही सुचत नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे. अर्थात याचे फायदे आणि तोटेही प्रचंड आहेत. मात्र हे नातं कुठपर्यंत निभवायचं आणि कुठे थांबवायचं हे आपल्याच हातात आहे. मात्र बर्‍याचदा या नात्याच्या आहारी जाऊन आपणच आपल्या आजूबाजूची परिस्थिती खराब करून घेतो. वास्तविक आपल्याला नक्की या नात्याची अर्थात नेटची किती आणि कधी गरज आहे हे प्रत्येकाने स्वतःने ठरवायला हवं.

- Advertisement -

अर्थात प्रत्येकाचं या ‘नेट’शी वेगळं नातं जोडलं गेलं आहे असं म्हणावं लागेल. विद्यार्थ्यांसाठी हे एक माहिती सांगणार्‍या मित्राचंही नातं आहे आणि खेळासाठी लागणार्‍या डिजीटलचंही एक वेगळं नातं आहे. तर गृहिणींसाठी दूरच्या मित्र – मैत्रिणींना जोडणारं नातं आहे. नोकरी करणार्‍यांसाठी तर हे एक वरदानच आहे असं त्यांच्या बोलण्याचालण्यातून जाणवतं. तर आता मात्र इतक्या सहजरीत्या ही सुविधा उपलब्ध असल्याने ती लोकांसाठी रोजची गरज बनली आहे. इतकंच नाही तर आता संकेतस्थळावर काम करत असलेल्या लोकांसाठी तर नेटवरच त्यांचं पोट भरलं जातं अशी स्थिती आहे. अर्थात त्यासाठीदेखील एक ठराविक मर्यादा आणि वेळ आखून घ्यायला हवी. पण प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार हे नातं बदलत जातं हे नक्की.

दरम्यान, नेटमुळे दूरचं जग जवळ आलं असलं तरीही जवळचं जग दूर गेलं आहे असं नाही का वाटत? यावर अनेक वादविवाद होऊ शकतात. हे जरी खरं असलं तरी या नव्याने जोडलेल्या नात्यामुळे जुनी नाती रुसली आहेत हे मात्र नक्की. आता तुम्हाला वाटेल ही नक्की जुनी नाती कोणती? तर स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं, आपलं झोपेशी असलेलं नातं, जुन्या मित्रमैत्रिणींशी समोरासमोर बसून गप्पा मारायचं एक नातं, अशी एक नाही तर बरीच नाती या एका नात्यामुळे दुरावली जातात की काय? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पण ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी आपण वेळीच सावरून हे नवं नातं नक्की किती आणि कसं जपायचं हे आपल्यालाच ठरवता आलं पाहिजे. नाही का? तर यावर आता विचार करायला हवा आणि सर्वच नात्यातील समतोल राखायला हवा. समतोल राखला तरच जुनी आणि नवी सगळीच नाती जपून ठेवता येतील, मग ती कोणतीही नाती असोत. नेट हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग जरी बनला असला तरीही हे नातं जपत असताना इतरही नाती कुठे तुटत नाहीत ना? याचं भान आता आपणच ठेवायला हवं.

- Advertisement -