घरफिचर्सझगमगाटातलं रितेपण

झगमगाटातलं रितेपण

Subscribe

आत्महत्या करणार्‍यांमध्ये नामचीन यशस्वी लोकांची लिस्ट मोठीच आहे. पण फार वैयक्तिक न जाता जर आपण आत्महत्या करणार्‍या व्यक्तींच्या मानसिकतेचा व ते ज्या परिस्थितीचा सामना करत होते त्याचा विचार केला तर कदाचित त्यांची त्यावेळची मनोवस्था आपण समजून घ्यायला हवी. यामुळे गेलेल्या माणसांबद्दल उगाच निष्कर्ष न काढता त्यांना व्यक्त होण्यासाठी जवळच कोणी भेटलं नाही याचा विचार करायला हवा.

बॉलिवूड स्टार सुशांतसिंग राजपूत याने नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली आणि त्याच्या लाखो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. केव्हा, कुठे, कसं आणि शेवटी का? या प्रश्नांच काहुर जसं त्याच्या नातेवाईक व मित्रांच्या मनात उठलं तसंच ते तुमच्या आमच्यासारख्या त्याच्या चाहत्यांच्या मनातही उमटलं. कारण आपण सुशांतला नेहमी हसताना बघितलं आहे. खेळकर बरोबरच प्रगल्भ भूमिका करणारा त्याच्यासारखा उमदा तरुण कधी असा टोकाचा निर्णय घेईल याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. ऐन लोकप्रियतेच्या शिखरावर असताना सगळं आलबेल असताना खिशात पैसा खुळखुळत असताना बॉलिवूड सारखा मोठा मित्रपरिवार असतानाही त्याला एवढं नैराश्य का यावं की त्याला जगण्यापेक्षा मरण जास्त जवळंच वाटावं. हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच आहे. पण तरीही त्याच्या आत्महत्येने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना अंतर्मुख केलं आहे. प्रत्येक आनंदी हसरा चेहरा हे समाधानाच नव्हे तर कधी कधी मनात घोंघावणार्‍या एकटेपणाचं चिन्ह असू शकतं, हे सुशांतने टोकाच पाऊल उचलत दाखवून दिलं आहे. जे आजच्या घडीला प्रत्येक व्यक्तीशी कुठेतरी मिळतजुळत उदाहरण आहे.

सुशांत नैराश्यात गेला होता. त्यावर तो उपचारही घेत होता. पण नैराश्य यावं अस त्याच्या आयुष्यात काय घडलं होतं. याबद्दल बरंच काही बोललं जात आहे. पण सुशांतची एकंदर सध्याची सिनेकारकिर्द पाहता तो यशाच्या शिखरावर होता. पैसा, प्रसिद्धी यानंतर आपसुकच येणारं ग्लॅमर्स लाईफ तो एन्जॉय करत होता. सुंदर तरुणींच्या गराड्यात तो कमीच रमायचा. अभ्यासू, शांत व लाजाळू स्वभावाच्या सुशांतला वाचनाची आवड होती. भविष्यात खूप काही त्याला करायचं होतं. त्याची लिस्टही अनेकवेळा त्याने मित्रांना वाचून दाखवली होती. पण त्याच्या अशा जाण्याने त्याची बकेट लिस्ट अपूर्णच राहिली. सुशांतच्या जाण्याचे कनेक्शन अनेकांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीबरोबर लावले आहेत. रियाबरोबर सुशांतचा ब्रेक अप झाला आणि तो निराशेच्या गर्तेत ढकलला गेला. दोघांमध्ये ब्रेकअप का झाला, सुशांतसारख्या संवेदनशील व्यक्तीला सोडून जाण्याचा निर्णय रियाने का घेतला, हे त्या दोघांनाच माहित. तसेच काही दिवसांपूर्वी त्याची मॅनेजर सलियन हीनेही १४व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याचेही कारण अद्याप समजलेले नाही.

- Advertisement -

पण या घटनांदरम्यान झालेली घुसमट सुशांतने जर वेळीच कोणासमोर व्यक्त केली असती तर कदाचित तो आज आपल्यात असता. पण सुशांतने तसे केले नाही. तो स्वत:च विचारांच्या गुंत्यात अडकत गेला व त्यात त्याने शेवट केला. त्याच्या अशा जाण्यामुळे त्याचे चाहतेही मोठ्या प्रमाणावर दुखावले आहेत. यातूनच काहीजणांनी उद्वेगाने त्याला ‘लूजर’ संबोधले आहे. तर काही जणांनी ‘तू आम्हाला निराश केलंस यार’..असं म्हणत भावना व्यक्त केल्या आहेत. चाहत्यांच्या भावनांचा आदर राखून जरी विचार केला तरी खरंच सुशांत लूजर होता का किंवा गेल्या काही वर्षात सुशांत सारखाच निर्णय घेऊन आयुष्य संपवणार्‍या यशस्वी व्यक्तीही मनाने कमकुवत होत्या का, याचा विचार करणेही गरजेचे आहे. तर तसे नाहीये. या सर्व व्यक्ती आपआपल्या क्षेत्रात कष्टाने पुढे आलेल्या व कमालीच्या आत्मविश्वाशी होत्या. यात प्रामुख्याने नाव येत ते अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांचे. शांत स्वभावाचे मनमिळावू भैय्यू महाराज अध्यात्माच्या मार्गाने दुसर्‍यांना आयुष्यातील कठिण परिस्थिती कशी हाताळायची याचे मार्गदर्शन करायचे. पण स्वत:च मन मोकळं करण्यासाठी त्यांना तितकं विश्वासार्ह कोणी वाटल नाही. यातून मग कुटुंबातील वादाला कंटाळून त्यांनी आत्महत्या करत त्या वादातून स्वत:ला कायमच मुक्त केलं.

अभिनेता कुशल पंजाबी यानेही २७ डिसेंबर २०१९ रोजी गळफास लावून आयुष्य संपवल. छोट्या व मोठ्या पडद्यावर लोकप्रिय झालेल्या कुशलची आत्महत्येने सगळ्यांनाच धक्का बसला. तोही कुटुंबापासून विभक्त राहत होता. एकटेपणातून येणारे रितेपण हेच त्याच्या मृत्यूचे कारण ठरले. तर सुशांतप्रमाणेच ऐन यशाच्या शिखरावर असताना टिव्ही मालिका फेम अभिनेत्री प्रत्युक्षा बॅनर्जी हीनेही गळफास लावून आत्महत्या केली. प्रेमभंगाच्या दु:खापुढे तिला पैसा, ग्लॅरमर्सही फिके वाटले. पैशांशिवाय राहता येईल, प्रेमाशिवाय नाही असाच संदेश तिने कृतीतून दिला. प्रेम करणारी व्यक्ती सोडून निघून गेल्याने आयुष्यात आलेली पोकळी तिला भरता आली नाही. कारण कदाचित त्याची कमतरता भरून काढणार विश्वासार्ह तिला कोणी भेटला नसावं. पण याचा अर्थ ती कमकुवत होती असा नाही. तर ती प्रेम हेच तिचं आयुष्य होतं. असंच काहीसे झालं होतं ते बॉलीवूड स्टार जिया खानच्या बाबतीत. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर नि:शब्द या सिनेमात अफलातून अभिनय केलेल्या जियाचे अभिनेता सूरज पांचोलीबरोबर प्रेमसंबंध होते. त्याच्याशिवाय ती जगूच शकत नव्हती, एवढी ती त्याच्यात गुंतली. पण सूरजला या जाळ्यात अडकून राहायचं नव्हत. तो मुक्त पक्षी होता. इतर सेलिब्रिटीज पुत्रासारख लाईफ एन्जॉय करणे त्याला माहित होतं. यामुळे त्याने जियाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती तर त्याच्याबरोबर लग्नाचे स्वप्न बघत होती. शेवटी त्याने तिच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. ते सहन न झाल्याने जियाने आयुष्य संपवल. ती असं काही करेल हे सूरजला अपेक्षित नव्हतं. पण त्याला पश्चाताप होण्याची वेळ निघून गेली होती. कारण तोपर्यंत जियाने जगाचा निरोप घेतला होता. तिच्या मनातील ही तगमग तिने कधीही कोणापुढे व्यक्त केली नाही. कारम सूरज शिवाय तिला कधी कोणीच जवळच वाटलं नाही. यातूनच तिला नैराश्याने गाठले आणि सुशांतने जे केलं तेच जियाने केलं. पण तीही लूजर नव्हती. संवेदनशील होती. मनाने कणखर होती. पण प्रेमात तिचा तो कणखरपणा कमी पडला.

- Advertisement -

याच यादीत हल्लीच नाव घ्यायच म्हणजे सीसीडीचे मालक व्ही सिद्धार्थ वार्षिक ४,२६० कोटींची उलाढाल करणारा हा बिझनेसमन पण आर्थिक गणित चुकलं . कोणाला सांगाव असं जवळच कोणी वाटल नाही. कारण बिझनेस म्हणजे स्पर्धकांची स्पर्धा त्यामुळे मूक राहण गरजेचे यातून ताण सहन न झाल्याने नेत्रावती नदीत उडी मारून त्यांनी जीवन संपवले. कोट्यावधींची उलाढाल करणारा हा बिझनेसमन मनाने कधीच कमकुवत नवहता. पण आर्थिक चक्रव्यूहात अडकला. त्याला त्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी मदत मागावी असं कोणीच जवळच वाटलं नाही. यामुळे त्याने मृत्यूला जवळ करत सगळे प्रश्न खोडून टाकले.

नामचीन यशस्वी लोकांच्या आत्महत्येची तशी ही लिस्ट मोठीच आहे. पण फार वैयक्तिक न जाता जर आपण आत्महत्या करणार्‍या व्यक्तींच्या मानसिकतेचा व ते ज्या परिस्थितीचा सामना करत होते त्याचा विचार केला तर कदाचित त्यांची त्यावेळची मनोवस्था आपण समजून घ्यायला हवी. यामुळे गेलेल्या माणसांबद्दल उगाच निष्कर्ष न काढता त्यांना व्यक्त होण्यासाठी जवळच कोणी भेटलं नाही याचा विचार करायला हवा. व्यक्ती जेवढी मोठी तेवढी ती एकटी असते. ती तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांसारखी उठसूठ कोणासमोर आपले रडगाणे गाऊ शकत नाही. स्वत:चे प्रश्न मांडू शकत नाही. कारण लोक त्या प्रश्नाकडे फक्त मनोरंजन म्हणून बघत असतात. एवढा मोठा माणूस हेच समोरच्याच्या डोक्यात असते. सेलिब्रिटी असलेल्या मित्रमैत्रिणीच्या आपण किती क्लोज आहोत हे जगाला कळावं या नादात ती व्यक्ती समोरच्याच सिक्रेट सागंत सुटते. गॉसिपिंग सुरू होतं. याचा थेट परिणाम सेलिब्रिटी असलेल्या त्या व्यक्तीच्या स्टारडमवर होतो. यामुळे मोठ्या लोकांच्या घरातील दु:खही अनेकवेळा त्यांच्या बरोबरच जातात. यामुळे बर्‍याचवेळा उंच भिंतीपलिकडचे हुंदके आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. सरळ त्यांच्या जाण्याची बातमी ब्रेकींग बनून येते. या तारकांचे आयुष्यही ताप्तुरता लखलखाट असते. त्यांचे ते यश, पैसा, लोकप्रियता आपले डोळे दिपवून टाकतात. पण त्यामागचे त्यांच्या मनातली तगमग त्यांच्या सेलिब्रिटी वलयामागे मात्र कायम दडलेली असती. यामुळे या मोठ्या व्यक्तींना मन मोकळ कराव असं दुर्मिळतेनेच कोणीतरी भेटतं आणि कधी जर तेही दूर गेलं तर घुसमटीचा स्फोट होऊन आयुष्य संपवलं जातं. त्यावेळी कमावलेल्या पैशाचा नाही तर गमावलेल्या व्यक्तीचा विचार करत गळ्याभोवती दोर आवळला जातो. जो आपल्यासाठी मात्र ब्रेकींग देऊन जातो.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -