Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स बदलत्या काळानुसार बदलते गीतकार- मजरूह

बदलत्या काळानुसार बदलते गीतकार- मजरूह

मजरूहजी कायम तरुणाईला (अर्थात, बदलत्या काळातल्या) भावतील आकर्षित करतील असे शब्द आपल्या गाण्यात लिहित राहिले. पण ते काम करताना आपण लिहिलेलं गाणं कुठेही थिल्लर होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. अर्थात, मजरूहजींनी अशी गाणी लिहिली तरी त्यांच्याबद्दलची लोकांच्या मनातली प्रतिमा मात्र नजाकतीत शब्द लिहिणार्‍या कवीची होती.

Related Story

- Advertisement -

कविता-गीत कविता लिहिणारे लोक शक्यतो दिलेल्या आणि लिहिलेल्या शब्दाला पक्के असतात. पण गीतकार मजरूह सुलतानपुरी त्याला अपवाद होते. शेवटी शेवटी ते वयाने, शरीराने थकले, पण त्यांचं लिहितं मन आणि लिहिता हात मात्र कधीच थकला नाही. सैगलपासून आमीर खानपर्यंत ते लिहीत राहिले. त्या त्या काळात त्यांनी त्या त्या काळातली भाषा, परिभाषा जाणून घेतली आणि त्या काळाबरहुकूम गाणी लिहिली. मी सैगलच्या काळात लिहायला सुरवात केली म्हणून या काळातल्या भाषेत का आणि कसं लिहू, हा प्रश्न त्यांना अजिबात पडला नाही. ते शेवटपर्यंत लिहित राहिले. सिनेमातले लोकही त्यांना आपली गाणी लिहिण्यासाठी बोलवत राहिले. त्यांनीही नवा-जुना असा फरक मानला नाही. जो भी प्यार से मिला, हम उसी के हो लिए… हे त्यांनीच लिहून ठेवलेले शब्द खरोखरच पाळले. फुटपाथमधलं शामे राम की कसम, आज मश है हम अशी कातरवेळची हुरहूर लिहिणार्‍या मजरूजींनी हम तुमपे इतना डाईंग, जितना सी मे पानी लाइंग, आकाश में पंछी फ्लाइंग, भंवरा बगियन मे गायिंग असं त्या त्या वेळच्या तरुणांचे अंतरंगी मनही लिहिलं.

मजरूहजी कायम तरुणाईला (अर्थात, बदलत्या काळातल्या) भावतील आकर्षित करतील असे शब्द आपल्या गाण्यात लिहित राहिले. पण ते काम करताना आपण लिहिलेलं गाणं कुठेही थिल्लर होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. अर्थात, मजरूहजींनी अशी गाणी लिहिली तरी त्यांच्याबद्दलची लोकांच्या मनातली प्रतिमा मात्र नजाकतीत शब्द लिहिणार्‍या कवीची होती. त्यामुळे कयामत से कयामत तक या सिनेमाची गाणी लिहिल्यानंतर त्यांच्या बाबतीत एक निराळाच किस्सा घडला. झालं असं की त्या सिनेमातलं पापा कहते है बडा नाम करेगा हे गाणं ऐकून एका अतिउत्साही समीक्षकाने आपल्या परीक्षणात लिहिलं- मजरूह संपलेले आहेत. आता त्यांनी घरी आराम केलेला बरा. मजरुहजींना ते वृत्तपत्र कुणीतरी आणून दिलं तेव्हा त्यांच्या जिव्हारी ते खूप लागलं. त्या शब्दांनी त्यांना खूप वेदना झाल्या. कारण पापा कहते हे बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा असे शब्द लिहिणार्‍या या गीतकाराचा ऐन पस्तिशीतला, हातातोंडाशी आलेला मुलगा हे जग सोडून निघून गेला होता. दुसरा फिल्म इडस्ट्रीत दिग्दर्शक होण्यासाठी धडपड करत होता. तो आर्थिक संकटातून जात होता. त्यामुळे या विशिष्ट गाण्याबद्दल त्या समीक्षकाने आपल्या समीक्षणातून मारलेला शेरा मजरुहजींच्या जिव्हारी लागला होता. हे सारं त्यांच्या वयाच्या पंच्याहत्तरीत घडत होतं. साहजिकच, जो कोणी देईल ती ऑफर या वृद्ध गीतकाराला स्वीकारावी लागत होती. अशाच एका काळात जानम समझा करो हा त्यांनी लिहिलेला अल्बम एम-टीव्हीवर अवतरला आणि तो पब्लिकने खरोखरच डोक्यावर घेतला.

- Advertisement -

वास्तविक मजरूहजींचा पिंड हा गझल लिहिण्याचा. दस्तकमधली लता मंगेशकरांनी आपल्या दर्दील्या स्वरात आळवलेलं हम है पता ए कूचा बाजार की तरह… ही अप्रतिम गझल मजरूहजींनी त्यांच्या गीत लेखनाच्या सुरवातीलाच लिहून ठेवली होती. दस्तक या सिनेमात ती नंतर घेतली गेली. त्यांचा हा संग्रह गझलप्रेमींना अतिशय आवडला. तो इतका आवडला होता, की त्याच्या आठ आवृत्त्या निघाल्या. गझलमध्ये शेवटचा शेर मक्ता असतो. त्यात शायर स्वतःच्या नावाचा उल्लेख करत असतो. मजरुजींनीही या गझलमध्ये शेवटी मजरूह लिख रहे है अहले वफा का नाह… अशी ओळ त्या कथेला अनुसरूनच लिहिली आहे. पण मजरूहजींनी शेरे फिल्मी शेरोशायरी लिहिताना ही प्रथा बर्‍याच वेळा अनुसरली आहे. उदाहरणच द्यायचं तर तुझे न मो कोई, तुझे इससे क्या मजरूह, चल अपनी राह, भटकने दे नुक्तीचीनों को…. किंवा जबाँ हमारी न समझा कोई मजरूह, हर अजनबी की तरह हम अपने ही वतन में रहे…

हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात मजरुहजींचे नाव कवी-गीतकार म्हणून पुढे आलेलं असलं तरी मजरूहजींच्या नावाला आधीपासूनच एका साहित्यिकाची किनार होती. उर्दू साहित्यात त्यांनी आपल्या लेखनाचा एक ठसा उमटवला होता. किंबहुना उर्दू साहित्यात अनमोल योगदान दिल्याबद्दल मजरूहजींना इक्बाल सलमा हा प्रसिद्ध पुरस्कार देण्यात आला होता. त्याशिवाय मीर तकी मीर आणि गालिब या दोन मानाच्या पुरस्कारांनीही मजरूहजींना सन्मानित करण्यात आलं होतं. असे कित्येक पुरस्कार मजरूहजींनी आपल्या कारकिर्दीत मिळविले असले तरी सिनेमातल्या एका गीतकाराला दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार मानाचा पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचा जो गौरव केला होता, पण दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची निवड झाली तेव्हा खुद्द मजरूहजींना मात्र त्याचं आश्चर्य वाटलं होतं…

- Advertisement -

मजरूहजींचं लहानपणही तसं गमतीदार घटनांनी भरलेलं होतं. मजरूह उत्तर प्रदेशातल्या सुलतानपूर जिल्ह्यातल्या अवध या गावचे. त्यांचं खरं नाव असरार हसन खान. त्या काळात शिक्षण घेण्याला तशी फारशी किंमत नव्हती. लिहिण्या-वाचण्याइतकं शिक्षण झालं की, त्यांच्या गावातल्या लोकांचे भागायचं. त्यांच्या मते शिक्षण घेणं म्हणजे सुखाचं आयुष्य फुकट घालवणं.

जगण्यासाठी कसून मेहनत घेणं इतकं त्यांना माहीत असायचं. अशा ठिकाणी आणि अशा काळात मजरूहजींनी आल्या गावातल्या मदरशात अरबी, उर्दू, पर्शियन वगैरे भाषांतून शिक्षण घेतलं. ते प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर घरच्यांना ते पुरेसं वाटलं. पण खुद्द मजरूहजींना मात्र पुढे शिकायचं होतं. याच सुमारास त्यांना शेरोशायरीबद्दल सुप्त आकर्षण निर्माण झालं. आपली ही आवड त्यांनी चोरून चोरून पुरवली. कारण काव्य, साहित्य, संगीत याला त्यांच्या घरच्यांचा प्रखर विरोध होता. मजरूहजींची ही आवड तिथल्या तिथे संपावी म्हणून त्यांच्या अब्बाजाननी एक युक्ती केली. मजरूहना औषधविषयक विद्या दिली जात होती. पण शायरीचं वेड लागलेल्या मजरूहजींनी त्यांच्या या शिक्षणाला फारसं महत्त्व कधीच दिलं नाही. तिथे औषधाच्या जडीबुटी, चूर्ण, मात्रा यांचं ज्ञान त्यांनी मिळवलंच नाही. तिथल्या औषधविषयक व्याख्यानांना हजर राहण्याऐवजी शायरीवेडे मजरूहजी तिथल्या मुशायर्‍यांनाच आपली हजेरी नोंदवू लागले.

त्यांचे हे पराक्रम वडिलांपर्यंत पोहोचले तेव्हा वडिलांनी त्यांना सज्जड दम दिला आणि खड्या आवाजात त्यांना सांगितलं, म्हटलं, तुझं हे शिक्षण, लेखन, शायरी हे सगळं आता तू बाजूला ठेव, त्यापेक्षा तू आता हकिम हो. आपल्या अखंड गावाला आता एका चांगल्या हकिमची गरज आहे! वडील मजरूहजींना हे नुसतं सांगूनच थांबले नाहीत तर त्यांनी मजरूहजींना चक्क एक हकिमखाना म्हणजे दवाखाना थाटून दिला. पण मजरूहजींनी आपल्या वडिलांची आपल्याबद्दलची ही योजनाही पार धुडकावून लावली.

जे कुणी रुग्ण मजरूहजींच्या या हकिमखान्यात आपल्या व्याधी वेदनांवर औषधोपचार करायला यायचे त्यांना औषध देण्याऐवजी मजरूहजी आपल्या नव्या नव्या गझल, नवेनवे शेर नजाकतीत ऐकवायचे आणि आपल्या हकिमखान्याचं रूपांतर शेरोशायरीच्या मैफिलीत करून टाकायचे. रुग्ण मजरूहजींकडे जालिम दवा मागायला आलेले असायचे आणि मजरूहजी त्यांना मेरी गझल जालिम दवा से बढकर है असं म्हणत त्यांना आपली आणखी शायरी ऐकवायचे. मजरूहजींच्या गाण्यात सर्रास येणार्‍या जालिम या शब्दाची उत्पत्ती ही त्या हकिमखान्यातून अशी झाली होती. बर्‍याचदा त्यांच्या सुलतानपूर या गावात मुशायरा असायचा. अशा वेळी तर मजरूहजींची स्वारी आपल्या हकिमखान्याला टाळा ठोकूनन मुशायर्‍याकडे धूम ठोकायची. साहजिकच गावातले लोक गंमतीने म्हणायचे, या हकिमाकडून दवा हवा असेल तर त्याच्या हकिमखान्यात न जाता मुशायर्‍याला जाणं हे उत्तम!

अशाच एका मुशायर्‍याला मजरूह मुंबईत आले. त्या मुशायर्‍याला त्या काळचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक अब्दुल रशीद कारदार आले होते. त्यांना मजरूहजींची ती शेरोशायरी खूप भावली. त्यांनी तिथल्या तिथे मजरूहजींना गाठलं आणि आपल्या कारदार स्टुडिओत येण्याचं निमंत्रण दिलं. तेव्हा ते शाहजहाँ नावाचा सिनेमा करत होते. त्यात सुप्रसिद्ध गायक कुंदनलाल सैगल एका शायराची भूमिका करत होते आणि मजरूहजींना त्यांच्यासाठी गाणं लिहायचं होत. संगीत होतं नौशादजींचं. नौशादजींनी त्यांना एक चाल ऐकवली आणि त्या चालीवर शब्द लिहायला सांगितले. मुक्त शायरी करणार्‍या मजरूहजींपुढे ते एक आव्हान होतं. सुरवातीला ते गोंधळून जाणं तसं साहजिक होतं. पण पुढच्याच क्षणी प्रयत्न करताच मजरुहजींना चालीवर गाणं लिहिण्याचा तो मामला जमला आणि त्यांनी शब्द लिहिले. कर लिजिए चल कर, मेरी जन्नत के नजारे…. मजरुहजींच्या गीतकार म्हणून कारकिर्दीतलं हे पहिलं गाणं…

चालीवर गाणी लिहू शकणार्‍या मजरुहजींची नोंद हळूहळू सिनेमासृष्टीने घेतली नसती तरच नवल! पुढच्या काळात त्यांना ‘अंदाज’ मिळाला. तिथेही त्यांचे संगीतकार होते नौशाद. त्या ‘अंदाज’च्या सुमारास त्यांचा ‘दूष्टा’ या लेखक संघटनेशी संबंध आला. तिथे त्यांची अली सरदार जाफरी, कैफी आझमी, शैकेंद्र, इस्मत चुगताई वगैरे मंडळींशी थेट झाली. या प्रगतीशील, परिवर्तनवादी विचारांच्या मंडळींचा विचार त्यांच्या लेखनात, आचारात, विचारात डोकावू लागला. त्यामुळेच पुढे ‘असम का झंडा इस धरती पर किसने कहाँ लहराने न पाएँ, ये भी कोई, हिटलर का है चेला, मार ले साथी जाने न पाएं…’ असे तडफदार शब्द त्यांच्या लेखनात उमटले. त्याच विचारांच्या प्रभावामुळे मजरुहजी ‘आ मुहब्बत की बस्ती बसाऐंगे हम…’ आणि ‘बने हो एक खास से तो दूर क्या करीब क्या, लहू का रंग एक है अमीर क्या गरीब क्या…’ अशी सामाजिक भान ठेवणारी गाणी लिहू शकले.

एकीकडे हे सामाजिक भान सांभाळतानाच मजरुहजींना सिनेमातला नायक-नायिकेचा नवथर प्रणयही कळला होता. म्हणूनच तर मजरुहजी ‘नयनों ने सपनों की महकिल सजाई है, तुम थी जरुर जाना’ अशी अतिशय भावूक आणि तरल ओळ लिहू शकले, त्याच वेळी त्या त्या पिढीतली प्रेमाची जगण्याची पद्धत त्यांनी समजून घेतली. म्हणूनच एका ठिकाणी लिहिलं- अंग्रेजी मुल्क में कितना रोमान्स है, बाहर की छोकरी कितना अ‍ॅडव्हान्स है, तर दुसर्‍या ठिकाणी लिहिलं-होठों में गुलाब है, आँखों में शराब है, लेकिन वो बात कहाँ…

मजरुहजींचा आणखी एक विशेष सुचवला जातो तो म्हणजे कित्येकदा त्यांनी निर्माता-दिग्दर्शकांना संगीतकारांची नावं सुचवलेली आहेत आणि ते सिनेमे संगीताच्या दृष्टीने शेर झालेले आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर राजश्री प्रॉडक्शनचा ‘दोस्ती’ हा सिनेमा शेर ठरला खरा, पण राजश्री प्रॉडक्शनच्या ताराचंद बडजात्यांना संगीतकार रोशननी त्याला संगीत देण्यासाठी साफ नकरा दिला होता. त्यांच्या आधीचा ‘नाझ’ हा सिनेमा हीट ठरल्यामुळे बडजात्यांचा रोशनच्या संगीतावर जास्त विश्वास होता. पण रोशननी ‘दोस्ती’मधल्या आंधळ्या-बहिर्‍यांच्या गाण्यांना काय संगीत द्यायचं. म्हणून तो सिनेमा धुडकावून लावला होता. अशा वेळी मजरुहजींनी बडजात्यांना नवतरुण लक्ष्मीकांत-प्यारेलालवर तितका विश्वास नव्हता. पण त्यांनी मजहरुजींची सूचना मानली आणि लक्ष्मीकांत-प्यारेलालना संगीत दिले. पुढे ‘दोस्ती’ने आणि ‘दोस्ती’च्या संगीताने इतिहास घडवला हे सांगायला नकोच!

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मजहरुजी हे काळाप्रमाणे बदलत गेले आणि ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या गीतलेखनाचा ऐवज बदलत ठेवला म्हणून अगदी जतिन-ललितपर्यंत ते गाणी लिहीत राहिले. त्यांचं पहिलं गाण सैगलवर चित्रित झालं. आज ते असते तर त्यांचं गाणं रणवीरवर चित्रीत होताना दिसलं असतं!

- Advertisement -