घरफिचर्सगणेशोत्सव नाटकवाल्यांसाठी थंड !

गणेशोत्सव नाटकवाल्यांसाठी थंड !

Subscribe

यंदा नैसिर्गक आपत्ती, उद्योग व्यवसायातली मंदी यामुळे जवळ-जवळ अनेकांनी नाटकं न लावण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव नाटकवाल्यांसाठी तसा थंडाच आहे. चेतन दळवी या कलाकाराचं ‘पती सगळे उचापती’ या नाटकाचे शेकडो प्रयोग आजवर झाले आहेत, मात्र यावेळेस अजून तरी एकही प्रयोग नक्की झालेला नाही. अर्थात याबाबतीत चेतन म्हणतो, एवढी भयानक, बिकट परिस्थिती असल्यानं हे होणारच. लोक यातून बाहेर पडल्यावर आम्ही नव्यानं त्यांच्या भेटीला जावूच.

अवघ्या काही तासांवर श्रीगणरायाचं आगमन आले आहे. पण यंदाचा गणेशोत्सव काहीसा थंड आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकण येथील पुराच्या थैमानामुळे सर्वांच्या मनात एक प्रकारचं नैराश्य, दुःख, उदासी दाटलेली आहे. मात्र परंपरेत खंड पडू नये म्हणून साधेपणाने व उत्साहात, रोषणाईला, खर्चाला लगाम घालून यंदा गपणती साजरा करण्यात येत आहे.

मराठी व्यावसायिक नाटकांनाही याच्या परिणामाची झळ सोसावी लागत आहे…. अर्थात मराठी रंगभूमीवरील रंगमंच कामगारांपासून कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ त्यांनी ज्या तत्परतेनं माटुंगा, बोरिवली, पुणे, नाशिक व अन्य नाट्य परिषदेच्या माध्ममातून व स्वतंत्रपणे मदतीचा हात पुढे केला आहे, त्याबद्दल सर्वांना सलाम… खरोखरच सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. (मात्र अक्षय कुमार, सलमान, बीगबी, नाना पाटेकर वगळता उभ्या बॉलिवूडकरांनी या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये काहीही पाऊल उचलले नाही याला काय म्हणावं कृतघ्नता की बेपर्वाई?) या अशा परिस्थितीमध्ये मनोरंजन क्षेत्राला झळ सोसावी लागणार याबद्दल जराही तक्रार नाहीए कोणाचीही. उलट अनेक नाटकवाल्यांनी स्वतःहून ‘प्रमोज’ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

त्यांचेही मनःपूर्वक कौतुक….. मात्र अशा परिस्थितीतही राज्य पुरस्कार सोहळा साजरा करण्यात आला. तो पुढे घेता आला असता तर बरं झालं असतं.

खरंतर गणपती, नाटक व गणेशोत्सव याचे एक वेगळे ऋणानुबंध, नातं आहे. तेही गेली अनेक दशकाचं… पावसाची चाहूल जशी खड्डे, पाणी तुंबणार काय? याविषयावर चर्चा सुरू होते. त्यानंतर चाहूल लागते गणपतीसाठी नाटकांची.

- Advertisement -

जेव्हा साखर कारखाने, कंपन्या, मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं फुल्ल फॉर्ममध्ये होती. असायची तेव्हा साधारण जून-जुलैमध्ये नाटकावरली मंडळी गणेशोत्सवाच्या नाटकांचा दौरा व त्यानंतरचं नाट्यप्रयोग हे गणित ठेवून नव्या, ताज्या, धंदेबाज नाटकांची गणितं जुळवायला लागायची…. कौटुंबिक, विनोदी, हल्कीफुल्की आणि वेगळी नाटकं, जो तो आपल्या नाटक धंद्याची परंपरा…. चांगल्या संस्था, नावाजलेले निर्माते त्यांच्यासोबत टिपीकल गणेशोत्सवाला नजरेसमोर ठेवून विनोदी नाटक, लोकनाट्य, रणनाट्य, एकांकिका, महिला कलाकार प्रधान नाटक करणारी मंडळी, ज्यांचा निर्मिती खर्च, मानधन मोठ्यांच्या तुलनेत त्या मानाने कमी असायचा, असतो, तेही कामाला लागायचे.

गणेशोत्सवातील दहापैकी दहा दिवस फुल्ल होणं ही गोष्ट निर्मात्यांपासून सर्वांच्याच दृष्टीनं सर्वात आनंदाची, खुशीची गोष्ट असायची. उभ्या आडव्या महाराष्ट्रात दहा दिवस प्रयोग लागणं म्हणजे पुढल्या वाटचालीला शुभशकून मानला जायचा… त्यानंतर चालणार, धावणार असं मानलं जायचं.

मुंबईतल्या हिंदू कॉलनीसारख्या अनेक गणेशोत्सवांमध्ये दर्जेदार नाटकं बघायला मिळायची, आजही मिळतात.. फक्त विनोदी नाही तर सस्पेन्स वेगळ्या विषयांवरची, हटके नाटकं रसिकांपर्यंत पोहचवली जायची, जातात. मोठेमोठे निर्माते, कलाकार आवर्जून अशा रसिकांसाठी नाटक करायला तयार. तेही आनंदानं… मात्र यावर्षी… अनेक नवी नाटकं आली, जुनी नाटकंही गणेशोत्सवाकरिता तयारीत होती. मात्र यंदा नैसर्गिक आपत्ती, उद्योग व्यवसायातली मंदी यामुळे जवळ-जवळ अनेकांनी नाटकं न लावण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव नाटकवाल्यांसाठी तसा थंडाच आहे. चेतन दळवी या कलाकाराचं ‘पती सगळे उचापती’ या नाटकाचे शेकडो प्रयोग आजवर झाले आहेत, मात्र यावेळेस अजून तरी एकही प्रयोग नक्की झालेला नाही. अर्थात याबाबतीत चेतन म्हणतो, एवढी भयानक, बिकट परिस्थिती असल्यानं हे होणारच. लोक यातून बाहेर पडल्यावर आम्ही नव्यानं त्यांच्या भेटीला जावूच.

सुबोध भावे, भरत जाधव, प्रशांत दामले अशा दिग्गजांनीही या पूर परिस्थितीत आपले प्रयोग रद्द केलेच आहेत.  महाराष्ट्राबाहेर गोवा, दिल्ली, इंदौर, रतलाम अशा ठिकाणी मात्र काही नाटकांचे, मराठी वाद्यवृंदाचे, गाण्यांचे प्रयोग होताहेत. परदेशातही गणेशोत्सवात कार्यक्रम होताहेत… अर्थात ते करत असताना सर्वांच्याच मनात महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची जाणीव आहेच. गणरायाच्या कृपेनं, महाराष्ट्रावर आलेले हे अस्मानी संकट दूर होईलच आणि त्याचबरोबर नाट्य क्षेत्रातील अवकाळी आलेली ही मंदी लौकरच दूर होऊन पुन्हा नव्यानं, नाटकांचे प्रयोग उभ्या-आडव्या महाराष्ट्रात धुमधडाक्यात होतीलच. आणि अर्थातच शाखेतून फिनिक्स पक्षासारखी झेप घेऊन, ‘शो मस्ट गो ऑन’ चा मंत्र जपत ‘नाटकवाले’ उभे राहतीलच.

पुढल्या वर्षी नव्या उमेदीनं, नव्या उत्साहानं नाटकवाले नव्या व जुन्या नाटकांचे गणेशोत्सवात प्रयोग करतील. उद्योग व्यवसायातील मंदी संपून सर्वच जण नव्याने उभे राहतील हीच गणराया चरणी प्रार्थना….

-अजितेम जोशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -