घरफिचर्स...ती अनोखी माणसं, ...त्यांच्या अनोळखी किमया!

…ती अनोखी माणसं, …त्यांच्या अनोळखी किमया!

Subscribe

मजरूह सुलतानपुरींचं गाणं लिहून झालं होतं. शब्द होते ‘आँखों में क्या जी, सुनहरा बादल, बादल में क्या जी, किसी का आँचल.’ सिनेमा होता ‘नौ दो ग्यारह.’ तो जमाना रिहर्सल्सचा होता. गाण्याच्या रिहर्सल्सही सुरू झाल्या होत्या. एस.डी. बर्मननी गाण्याची चालही छान अवखळ खोडकर लावली होती. आता काही दिवसांतच गाण्याचं रेकॉर्डिंगही होणार होतं. इतक्यात सिनेमाचे दिग्दर्शक विजय आनंदनी गाण्याची पहिली ओळ सहज कुतुहल म्हणून विचारली. त्यात त्यांना ‘सुनहरा’ हा शब्द खटकला, ते म्हणाले, ‘बादल’साठी ‘सुनहरा’ हे विशेषण मला बरोबर वाटत नाही. एस.डी. बर्मननी तिथल्या तिथे हा सूर्य, हा जयद्रथ करून टाकलं. त्यांनी सरळ विजय आनंदना विचारलं, ‘मग तुझ्या मते तिथे कोणता शब्द असावा? मला आताच सांगून टाक.‘विजय आनंदही थांबले नाहीत. त्यांनी एका क्षणात सांगितलं, ‘बादल सुनहरा का म्हणून? आपण बादल रूपहला म्हणूया!‘…झालं, गाणं आँखों में क्या जी, रूपहला बादल, असं रेकॉर्ड झालं.

ह्या ठिकाणी दाद द्यायला हवी ती दिग्दर्शक विजय आनंदच्या शब्दांच्या जाणीवेला. त्यांनी मजरूह सुलतानपुरींसारख्या प्रतिभावान गीतकाराचा शब्द बदलण्याचं धाडस दाखवलंं आणि तितकाच योग्य आणि काव्यात्म शब्द सुचवला. कारण बादल म्हणजे ढग हे सुर्याच्या सोनेरी किरणांत एकवेळ सोनेरी होतील; पण त्यांची मुळची रूपेरी छटा कशी कुणाला नाकारता येईल! त्यांचा तो रूपहला हा शब्द मजरूह सुलतानपुरींनीही मान्य केला ह्यातच सगळं काही आलं.

- Advertisement -

गीतकार-संगीतकाराच्या कामात आपली कलात्मक कारागिरी राज कपूरसारखा चतुरस्त्र निर्माताही आवर्जून दाखवायचा. राज कपूरना तर संगीताची उत्कृष्ट जाण होती. पार्श्वगायक सुरेश वाडकर जेव्हा संगीतकार श्रीनिवास खळेंना राज कपूरकडे घेऊन गेले होते तेव्हाची एक गोष्ट सांगायला हवी. राज कपूरनी श्रीनिवास खळेंना त्यांची काही गाजलेली गाणी सांगितली. लक्षात घ्या की श्रीनिवास खळे हे मराठीतले संगीतकार होते आणि त्यांची जास्तीत जास्त कामगिरी ही मराठी भावगीत-भक्तीगीताच्या प्रांतातली होती; पण तरीही राज कपूरनी त्यांची गाणी ऐकली होती आणि त्यांचं नाव राज कपूरना एक नामवंत संगीतदिग्दर्शक म्हणून माहीत होतं.

खळेंना राज कपूरनी त्या भेटीत ‘भेटिलागी जीवा लागलीसी आस’ ह्या अभंगाबद्दल विचारलं. संत तुकारामांचा हा अभंग खळेंनीच संंगीतबध्द केला होता. राज कपूर खळेंना त्याच अभंगाच्या बाबतीत म्हणाले, ‘खलेसाब, ये जोगिया है ना? पर आपने इस गाने के बीच ललत क्यूं लगाया है?‘…राज कपूरचं हे म्हणणं सांगायचा उद्देश हा की राज कपूरना संगीतातल्या रागदारीची ओळख होती. त्यांचा सिनेमा म्हणूनच संंगीताने नटलेला असायचा. राज कपूरना संगीताची अतिशयं जाण असल्यामुळे त्यांच्या सिनेमाचं संगीत करताना ते स्वत: संगीतकाराबरोबर बसायचे. ‘राम तेरी गंगा मैली’मधलं ‘सुन साहिबा सुन’ हे गाणं करताना गाणं सुरू होण्याआधीचं जे चुटक्या वाजवून केलेलं कोरसमधलं संंगीत आजही लक्ष वेधून घेतं ते संगीत राज कपूरच्या कल्पनेतून साकारलेलं आहे हे कळल्यावर आजही कुणाकुणाच्या भुवया उंचावतात.

- Advertisement -

राज कपूरना कवितेची, भाषेची, शब्दांचीही खास जाण होती. त्यांच्या सिनेमासाठी गाणी लिहिणार्‍या गीतकारांच्या गाण्याबाबत ते गीतकाराशी वेळप्रसंगी चर्चा करायचे. ‘धरम करम’मधलं ‘एक दिन बिक जायेगा माटी के मोल’ हे शब्द लिहिल्यानंतर ‘जग में रह जायेंगे प्यारे तेरे बोल’ ह्या ओळीची संकल्पना राज कपूरची. राज कपूर हा माणूस शब्द, सुरात मुशाफिरी करणारा असल्यामुळे त्यांना शब्द, सुरात छान गती होती. शब्द, सूर त्यांना त्यांचे सिनेमे करताना सहज सुचायचे ते असे.

मराठीतले आपले ज्युबिली स्टार दादा कोंडकेनाही संगीताची आणि विशेषत: लोकसंगीताची प्रचंड आवड होती. सिनेमात येण्याआधी लोकनाट्यात नाव कमावलेल्या ह्या लोककलाकाराकडे हजरजबाबीपणाचा एक खास गुण होता. त्यांचा हा हजरजबाब सिनेमातली गाणी करताना त्यातूनही दिसून यायचा. ताडदेवमधल्या एका कबड्डी स्पर्धेला ते एकदा प्रमुख पाहुणे म्हणून गेले. त्यांनी तिथले कबड्डी सामने पाहिले आणि तिथून येताना त्यांच्याच सिनेमातल्या गाण्याचा मुखडा त्यांच्या मनात तरळला तो असा – ‘चल खेळ खेळू दोघं हुतूतूूतू, तुझी तंगडी कधी माझ्या हातात, माझी तंगडी कधी तुझ्या हातात!’ पुढे त्याचं लोकगीताच्या ढंगाने गाणं झालं आणि त्या एका काळात गाजलंही.

‘माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी’ ह्या आजही तितक्याच लोकप्रिय असलेल्या गाण्यात एक ओळ आहे…‘आंघोळीला बसले, माझं मलाच येई हसू गं!’…नवथर तारुण्याची नुकतीच जाणीव झालेली गावाकडली एक तरुण पोर आंघोळीला बसल्यावर आपल्या सर्वांगावर नजर टाकते, तिला आपण तारुण्यात आल्याची सुखद अनुभूती येते आणि ती तिला स्वत:ला झालेली तारुण्याची ओळख बोलून दाखवते. त्या धमाल गाण्यातली ही खरंतर इतकी गहनगहिरी तरल ओळ दादा कोंडकेंनी सुचवलेली आहे हे विशेष. त्या गाण्यात जेव्हा जेव्हा ही ओळ येते तेव्हा तेव्हा ती ओळ त्या गाण्यातून आपल्याला कोणत्याही वयात एक वेगळा अलगद स्पर्श करून जाते.

राज कपूर, दादा कोंडकेंसारखी कलावंत माणसं ही चतुरस्त्र होती, अष्टपैलू होती. एखादी कलाकृती करताना ती माणसं गीत, संगीत अशा प्रांतात आपली छाप सोडून जायची. ती निव्वळ निर्माता-दिग्दर्शक नसायची. ती आपण करत असलेल्या कलाकृतीच्या प्रत्येक सुरात, शब्दात डोकावून पहायची, त्यांचा धांडोळा घ्यायची आणि तो घेताना एखादा सूर किंवा एखादा शब्द सुचवून जायची. तो सूर किंवा तो शब्द त्या त्या ठिकाणी चपखल बसायचा. त्या कलाकृतीला साजेसा दिसायचा. त्या कलाकृतीची शोभा वाढवायचा. त्यांच्या गीतकार, संगीतकारांनाही त्यांचं ते डोकावणं ही लुडबुड वाटायची नाही. त्या किंवा आजच्या काळातल्या इतर निर्मात्या-दिग्दर्शकांकडे असा पैलू नसायचा…आणि इतर निर्माते-दिग्दर्शक आणि राज कपूर-दादा कोंडकेंमध्ये नेमका हाच फरक असायचा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -