घरफिचर्ससारं काही धगधगतं...

सारं काही धगधगतं…

Subscribe

आग...अंगार...राख...उध्वस्त... दु:ख व्यक्त करण्यासाठी जितके म्हणून शब्द आहेत त्याचे बाळकडूच जणू जपानमध्ये प्रत्येकाला दिले जाते... टोकीयो ऑलिम्पिकसाठी हनेडा एअरपोर्टवर उतरल्या उतरल्या आमचे स्वागत झाले ते भूकंपाने... दीड तासात 2.6 रिश्टर स्केलचे दोन भूकंप टोक्योपासून 60 किलोमीटर अंतरावरील चीबाच्या जवळ झाले होते... गेल्या 30 दिवसात जपानमध्ये 3 रिश्टर स्केलचे तब्बल 25 भूकंप झालेत. हे कमी की काय म्हणून अवघ्या जपानमध्ये तब्बल 110 ज्वलंत ज्वालामुखी आहेत. त्यातील अतिधोकादायक 47 ज्वालामुखींवर जागता पहारा आहे... अवघ्या जगातील एकूण ज्वालामुखीच्या दहा टक्के एकट्या या छोट्याशा जपानमध्ये आहेत. जीवावर उदार होणे काय असते हे जपान्यांकडून शिकावे.

ऑगस्ट महिना हा तसा जपानी नागरिकांसाठी निसर्ग आणि मानवी अत्याचाराची आठवण देणारा…आज हा लेख लिहीत असताना आजच्याच दिवशी 76 वर्षांपूर्वी 6 ऑगस्टला हिरोशिमा आणि नंतर 9 ऑगस्टला नागासकीवर अमेरिकेने अणूबॉम्बचा हल्ला केला होता. या हल्यात एकूण अडीच लाखांवर जपानी नागरिक मृत्युमुखी पडले होते. आणि लाखो माणसे किरणोत्सर्गामुळे नरकयातना भोगत होते. याच 4 ते 8 ऑगस्टमध्ये बरोबर 238 वर्षांपूर्वी जपानमधील माऊंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन 35 हजाराहून अधिक माणसे मृत्युमुखी पडली होती.

याच ऑगस्टच्या 15 तारखेला 1945 ला जपानने दोस्त राष्ट्रांच्या फौजांपुढे शरणागती पत्करली होती…याच जुलै-ऑगस्टच्या 1948 सालच्या लंडन ऑलिम्पिकमधून जपान आणि जर्मनीला अपमानास्पदरित्या बहिष्कृत करण्यात आले होते….. युध्द… ज्वालामुखी…रोजचे भूकंप.. आणि अगणित अपमान यातून तावून सुलाखून जपान आज ताठ मानेनं उभा आहे… नुसता उभा नाही तर तब्बल 205 देशांचं यजमानपद भुषवून टोकीयो ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करतोय. आणि तेही अवघे जग कोरोना सारख्या महामारीशी झगडत असताना. कोरोनातील फिझिकल डिस्टन्सच्या या जमान्यात जपान अवघ्या जगाची मने जुळवण्यात यशस्वी झालाय. एवढे मात्र नक्की.

- Advertisement -

जपान हा तसा महागडा देश. पण आम्ही जपानमध्ये पाय ठेवताच जपान सरकाराने आम्हाला लखपती केले… तब्बल एक लाख चाळीस हजार येन. आमच्या हातात ठेवले. भारतीय रुपयात मोजायचे झाले तर चौर्‍यान्नव हजार चारशे त्रेचाळीस रुपये फक्त…माझ्या पाच ऑलिम्पिकमधील हा सगळ्यात सुखद धक्का होता. हे पैसे टॅक्सी खर्चासाठी आम्हा प्रत्येक पत्रकाराला देण्यात आले होते.  निर्धारीत 4600 पत्रकारांपैकी जपानमध्ये कोविडशी पंगा घेऊन दाखल झालेल्या आम्हा जवळपास 2000 पत्रकारांना हे एक लाख चाळीस हजार येनची कुपन देण्यात आली होती. ती खर्च  करण्यासाठी अट एकच. अलिशान एसी टॅक्सीतून भटकायचे. हॉटेल ते स्टेडियम व्हाया टॅक्सी असा प्रवास असल्याने कोरानो आटोक्यात राहील हा त्यामागचा उद्देश. या टॅक्सीचा प्रत्येक ड्रायव्हर हा तापमानाच्या स्कॅनरखाली असतो हे वेगळे सांगायला नको.

कोरोनामुळे  हे ऑलिम्पिक एक वर्ष पुढे  ढकलले गेले. पण त्यामुळे संयोजनावर खूप बंधनं आली. त्याचा फटका आम्हा पत्रकार आणि सहभागी खेळाडूंनाही बसला. कोरोनाचा उद्रेक झालेल्या भारतातील आम्ही पत्रकार म्हणून आम्हाला जपानला येण्यापूर्वी सात दिवस सलग आरटी पीसीआर टेस्ट करणे बंधनकारक होते. जपानच्या विमानतळावर उतरल्यावर पुन्हा आमची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यानंतर टॅक्सीतून आमची थेट रवानगी संयोजकांनी ठरवलेल्या हॉटेलमध्ये.  तेथे तीन दिवसाचे क्वारंटाईन.

- Advertisement -

या तीन दिवसात रोज आरटीपीसीआर टेस्ट. अशी सलग 11 दिवस टेस्ट निगेटिव्ह असेल तर पुढील 14 दिवस फक्त हॉटेल ते स्टेडियम असाच प्रवास करता येणार. आणि त्यानंतर पुन्हा एकदा टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला की मग तुम्हाला नियमांच्या चौकटीत राहून टोकीयो भटकता येणार. एवढे सगळे अग्निदिव्य पार केल्यानंतर मग तुम्ही ऑलिम्पिक कव्हर करू शकता. बरं ज्या विमानातून तुम्ही आलात त्यातील एक जरी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला तरी तुम्ही निगेटिव्ह असलात तरी तुम्ही 14 दिवस क्वारंटाईन. थोडक्यात जपानमध्ये आम्ही दाखल झाल्यापासून 14 दिवस आमचा जीव टांगणीला लागलेला होता.

ऑलिम्पिकसाठी अवघं जग यजमान देशात धडकलेले असते. सगळ्या रंगाची, भाषा, पंथ, जातीची माणसे ऑलिम्पिकच्या या महाउत्सवासाठी एकत्र येतात. त्यांचा धर्म एकच असतो आणि तो म्हणजे खेळ. प्रत्येक यजमान देश यासाठी कंबर कसतो. पण यंदा जपानला कोरोनाचा दुहेरी फटका बसला. एक वर्षाच्या दिरंगाईमुळे विविध करारांचे नूतनीकरन आणि कोविडवरील उपाययोजनांसाठी ऑलिम्पिक संयोजन खर्चात तब्बल 22 टक्यांनी वाढ झाली. 12.6 बिलियनवरून खर्च पोहोचलाय 15.4 बिलियन अमेरिकन डॉलरवर. येथील स्थानिक वित्त तज्ज्ञांच्या मते ऑलिम्पिक संपेपर्यंत ही रक्कम 20 बिलियन्सच्या घरात जाऊ शकते.

या सगळ्याचा परिणाम असा झालाय की ऑलिम्पिकचा बाज रस्तोरस्ती दिसत नाही. मोठ्या मुश्कीलीने ऑलिम्पिकच्या खुणा टोकीयोत शोधाव्या लागतात. एकतर टोकियोतील सामान्य नागरिकांसाठी येथे कर्फ्यु लावण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाही. अत्यावश्यक गरज असेल तरच माणसे घराबाहेर पडतायत. त्यामुळे एरव्ही जो ऑलिम्पिकचा उत्साह असतो तो येथे पहायला मिळत नाही. माझे हे पाचवे ऑलिम्पिक आहे. अथेन्स (2004), बीजींग (2008), लंडन (2012), रिओ (2016) आणि आता टोकीयो. पण आधीच्या चार ऑलिम्पिकचा उत्साह येथे दिसत नाहीय. राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून प्रत्येक जपानी नागरिक अगदी कमरेत लवून आमचे स्वागत करतोय. पण त्याच्या हसर्‍या चेहर्‍यामागील वेदना चटकन नजरेत भरतेय.

ऑलिम्पिक म्हटले की देशोदेशींच्या बच्चे कंपनीच्या चिवचिवाटाने ऑलिम्पिक गजबजून जायचे. उद्याचे भविष्य असणारी ही बच्चेकंपनी यंदा ऑलिम्पिकपासून कोसो दूर आहे. ज्या विमानतळावर मी उतरलो तेथे तर मिलिटरी छावणीचेच रुप होते. मी एकही लहानमूल न पाहिलेले हे पहिले विमानतळ आहे. या ऑलिम्पिकसाठी खेळाडू, पदाधिकारी, स्वयंसेवक आणि पत्रकार यांच्याशिवाय कुणालाही जपानमध्ये प्रवेश दिलेला नाही.

ऑलिम्पिक आयोजनाची जपानची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 1964 साली याच टोकीयोमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. पण यंदाचे वैशिष्ठ्य म्हणजे जपानने टाकावूतून टिकावू असे ब्रीदवाक्य ठेवून हे ऑलिम्पिक भरवले आहे. साधे उदाहरण घ्या. खेळाडूंना जी गोल्ड, सिल्व्हर आणि ब्राँझ मेडल दिली जातात ती जपानने जुन्या आणि नादुरुस्त मोबाईलपासून बनवली आहेत. अशी तब्बल पाच हजार मेडल यंदा वितरीत करण्यात आली आहेत. त्यासाठी 78995 टन इलेक्ट्रॉनिक कचरा जमा करण्यात आला.

त्यात या मोबाईलची संख्या होती 6 लाख 21 हजार. जपानी नागरिकांनी या मेडलसाठी आपले मोबाईल दान केले. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सोने, चांदी आणि ब्राँझ असते. प्रक्रीया करून ते वेगळे केले गेले आणि त्यातून मेडल साकारले गेले. थोडक्यात खेळाडूच्या छातीवर अभिमानाने विराजमान झालेले मेडल हे सामान्य माणसाच्या घामाच्या कमाईतून बनवले गेले आहे. थोडक्यात, सामान्यातील सामान्य माणसालाही जपान सरकारने या ऑलिम्पिक संयोजनात सामावून घेतलेय. विद्युत निर्मीतीपासून ते सांडपाण्याच्या निचर्‍यापर्यंत निर्सगाचा कमीतकमी र्‍हास होईल याची दक्षता जपानने घेतलीय.

ऑलिम्पिकच्या निमित्तानं पर्यटनाला चालना मिळते. पण यावेळी पर्यटन व्यवसायाचा बाजार उठलाय. मी जे हॉटेल प्रतिदिवस 14 हजार जपानी येनला बुक केले होते त्याच दर्जाचं हॉटेल आता येथे आल्यावर अवघ्या साडेचार हजार जपानी येनमध्ये मिळतंय. आणि हो 70 टक्के हॉटेल रिकामी आहे. आणि तरीही आपले झालेल्या नुकसानीचा चेहर्‍यावर लवलेश न दाखवता हे जपानी आम्हाची सरबराई करण्यात मग्न आहेत. आणि तेही चेहर्‍यावर हसू कायम ठेवत. आरीगातो हा आमचा परवलीचा शब्द झालाय. आरीगातो म्हणजे धन्यवाद.

ऑलिम्पिकचं वैशिष्ट्य म्हणजे यजमान शहरात खास वाहतुकीसाठी एक ऑलिम्पिक लेन समर्पित असते. रस्त्यावर कितीही ट्रॅफिक असले तरी ही लेन फक्त ऑलिम्पिकसाठी प्रवास करणार्‍यांसाठी राखीव असते. अशा राखीव लेनमधून मिरवताना अंगावर जरा मूठभर मांस चढायचे. पण यावेळी टोकियोत उलट परिस्थिती आहे. ऑलिम्पिक दरम्यान येथे कर्फ्यु असल्यानं फक्त अत्यावश्यक वाहतूकच सुरू आहे. आधीच येथे शहरभर सहापदरी रोडचे जाळे आहे, त्यामुळे टोकियोतील अवघे रस्ते तसे ओस पडलेत.

कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर अवघ्या जगाचे लक्ष चीनकडे होते. गंमत पहा ज्या कोरोनाचा उगम चीनमध्ये झाले असे म्हणतात त्या चीनचा समावेश जपानमध्ये प्रवेश करणार्‍या धोकादायक देशांत नव्हता. सर्वाधिक धोकादायक देशांच्या यादीत भारतासहीत अनेक आशियाई देश होते. त्यांना किमान तीन दिवसांचे क्वारंटाईन होते. पण चीन आणि युरोपियन देशांना एकाही दिवसाचे क्वारंटाईन नव्हते. स्पर्धेला दोन दिवस शिल्लक असताना मेडल टॅलीतही चीन 34 गोल्डसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ अमेरिका आणि मग जपानचा नंबर लागतोय. थोडक्यात, चीननं कोरोनाचे भूत मानगुटीवर बसू दिलेले नाही.

मेडल टॅलीत सध्यातरी तिसर्‍या स्थानावर असणार्‍या जपानला एवढ्या विपरीत परिस्थितीत ऑलिम्पिकचे संयोजन केल्याबद्दल गोल्ड मेडल द्यायला हरकत नाही. ताठरपण दाखवणार्‍या ओक वृक्षापेक्षा लवचिक बांबू जास्त ताकदवान असतो, अशी एक जपानी म्हण आहे. येणार्‍या प्रत्येकाचे कमरेत झुकुन स्वागत करणे ही येथील प्रथा आहे. पण जेव्हा युध्दाचा प्रसंग येतो तेव्हा अवघा जपान बांबूसारखा ताकदवान होतो… कोरोनाच्या या समरप्रसंगात जपानची हीच जिद्द प्रकर्षाने जाणवली. पण प्रसिध्द शायर बशीर बद्रच्याच शब्दात सांगायचे झाले तर कोरोनामुळे एक सल आम्हा प्रत्येकाच्या मनात जपान सोडताना कायम राहील…

कोई हाथ भी न मिलाएगा,

जो गले मिलोगे तपाक से,

ये नए मिजाज का शहर है,

जरा फासले से मिला करो….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -