घरफिचर्सघटनेनंतरची स्फुंदनं

घटनेनंतरची स्फुंदनं

Subscribe

माणूस गेल्यानंतरचं हे चर्चेतलं स्फुंदन क्षणिक ठरू नये तर यातून पुढे अशा घटना घडू नयेत याबद्दल स्वतंत्र चळवळ सुरू होणार असेल तर या स्फुंदनाला अर्थ आहे. नाहीतर इतर घटनांप्रमाणेच सुशांतचं जाणंही बातम्यांपुरतंच राहायला नको. बॉलिवूड काय आणि इतर क्षेत्र काय स्पर्धा या सगळीकडेच आहेत. त्यातही मागून येऊन पुढे जाणार्‍याला मागे खेचणारा वर्गही सगळीकडे वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या नावाने आहेच. यामुळे अशा वर्गासाठी स्वत:चे आयुष्य न संपवता त्या स्पर्धेत टिकून राहण्याचे कौशल्य प्राप्त करणे त्यासाठी वेळोवेळी अनुभवी जाणकारांची मदत घेणे त्यांच्याशी चर्चा करणे हेच या स्पर्धेत टिकून राहण्याचे औषध आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या वृत्ताने देशातीलच नाही तर जगभरातील त्याच्या असंख्य चाहत्यांना जबर धक्का बसला. सुशांतनं नैराश्याच्या गर्तेत उचललेल्या या टोकाच्या भूमिकेने बॉलिवूडच्या झगमगाटामागची गटबाजी चव्हाट्यावर आणली खरी. पण, त्याचबरोबर कित्येक दिवस, महिने आणि वर्षांपासून बॉलिवूडकरांच्या मनात ठसठसणार्‍या गटबाजीच्या जखमाही जगाला दिसल्या. याआधी त्या कधी दिसल्या नाहीत असे नाही. पण, सुशांतच्या आत्महत्येच्या निमित्ताने वरवर खपली धरलेल्या या जखमा पुन्हा एकदा भळभळू लागल्या आहेत. जर वेळीच या सगळ्यांनी इतरांना या गटबाजीबद्दल अवगत केलं असतं किंवा अशा स्पर्धात्मक क्षेत्रात त्यांच्याप्रमाणे तग धरून कसं राहायचं यावर आताप्रमाणे भाष्य केले असते तर कदाचित सुशांत व त्याच्यासारखेच अनेकजण आज आपल्यात असते. वेळीच बोलणं आणि एखाद्याला बोलतं करून त्यातून मार्ग काढणं गरजेचे असताना घटनेनंतर त्यावर स्फुंदत बसणं यातून काय साध्य होतं, हा प्रश्नच आहे. समाजात अशी अनेक उदाहरणे व घटना घडल्या आहेत जिथे घटना घडून गेल्यानंतर त्यावर उहापोह केला गेला. पण, जर तो वेळीच केला गेला असता तर वेळ हाताबाहेर गेलीच नसती असं म्हणणारे मात्र जवळजवळ नाहीच आहेत.

- Advertisement -

असं म्हणतात सहनशrलतेचा अंत झाला की विस्फोट होतो. मग तो कधी शब्दातून व्यक्त केला जातो तर कधी तो आक्रमकपणे तरी कधी मूकपणे केला जातो. सुशांतच्या मृत्यूमागची पुढे आलेली कारणं पाहता त्याच्याही सहनशीलतेचा अंत झाल्यानेच त्याने हे टोकाचं पाऊल उचलत सगळं संपवलं असं म्हणणं गैर ठरणार नाही. त्याचा विस्फोट शांततेतून झाला. पण, त्यानंतर ज्या पद्धतीने बॉलिवूडमधली काही मंडळी समोर आली ते पाहता बॉलिवूडमध्ये घुसमट होणार्‍यांची कमतरता नाही हे समोर आलं. त्यांच्यात आणि सुशांतमध्ये फरक एवढाच की त्यांनी वेळेप्रमाणे पाऊल उचलत स्वत:ला सांभाळलं तर सुशांत त्यात गुरफटून राहिला. सुशांत गेल्यानंतर अभिनेत्री कंगणा राणावत, मीरा चोप्रा , गायक सोनू निगम, निर्माता अनुभव सिन्हा, अभिनेता प्रकाश राज यांच्याबरोबरच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीही व्हिडिओ आणि ट्विटमधून बॉलिवूडवर सूचक विधान करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर बॉलिवूडच्या झगमगाटातले अनेक चेहरे समोर आले. प्रत्येकजण बॉलिवूडमध्ये त्यांना आलेल्या अपमानास्पद वर्तवणुकीवर, गटबाजीवर बोलू लागले आहेत. सुशांतच्या मृत्यूचेही हेच कारण असल्याचे सध्या तरी मानले जात आहे.

पोलीसही त्यादृष्टीने तपास करत आहेत. ज्या वेगाने हा तपास सुरू आहे त्याच वेगाने बॉलिवूडमधले अनेक चेहरे सुशांतचं समर्थन करण्यासाठी पुढे येत आहेत. आपल्यावरही कसा अन्याय झाला हे सांगत आहेत. सुशांतने कसलंच कारण न देता मूकपणे जाणं पसंत केलं असलं तरी जाता जाता त्याच्यावरील आपबीती सांगण्यासाठी दुसर्‍यांना मात्र बोलतं केलं हेच यातील प्रत्येक व्यक्ती सांगत आहे. पण, यात एकच गोष्ट खटकते ज्यावेळी या सर्व जणांना या सावत्रपणाचा जाच सुरू होता तेव्हा हे गप्प का बसले? का नाही त्याचवेळी आवाज उठवला? कदाचित त्यांच्या त्यावेळच्या हिमतीने अनेक सुशांत आज वाचले असते. घटना घडल्यानंतर ढोल बडवून आता काय होणार, असाच सूर सध्या बॉलिवूडमधल्या एका वर्गात आळवला जात आहे. यामुळे या मुद्यावरून बॉलिवूडमध्ये दोन गट तर पडलेच आहेत. आता जर तरच्या गोष्टी या फक्त प्रसार माध्यमांना खाद्य पुरवण्याचे काम करत आहेत, तर विस्मृतीत गेलेल्यांना लाईमलाईटमध्ये आणत आहेत. घटना ताजी असेपर्यंत ती चर्चेत असते नंतर काळाप्रमाणे ती जुनी तर होतेच. पण, त्याची प्रखरताही कमी होते. त्यावर धुरळा चढतो. मग पुन्हा महिने वर्षानंतर त्या घटनेशी साम्य असणारी घटना घडते. कधी कधी साम्य नसलं तरी ती त्या एकाच क्षेत्राशी संबंधित असली तरी पुन्हा त्यावर चर्चेचं गुर्‍हाळ सुरू होतं. नंतर पुन्हा कॅलेंडरचं पान बदलतं. घटना जुनी होते. दिवस जात असतात. त्या गेलेल्या माणसांचा मग लोकं गुगुलवर, शोध सुरू करतात. न्याय, अन्यायाच्या मशाली मात्र त्या घटनेनंतर थंड पडतात त्या थेट दुसरी घटना घडेपर्यंत. कारण त्यात लढा देणार्‍या कमी आणि परिस्थिती पुढे सपशेल शरणागती पत्करणार्‍यांचीच चर्चा असते.

- Advertisement -

अशीच घटना २०१७ साली घडली. #MeToo’ या चळवळी अंतर्गत अमेरिकेतल्या ‘एलिसा मिलानो’ या अभिनेत्रीने तिच्यावरील लैंगिक अन्यायाची व्यथा सोशल मीडियावर मांडली. तसेच तिने पीडित महिलांना व्यक्त होण्याचे आवाहनही केले. त्यानंतर ‘मी टू’ चळवळ सुरू केली. त्यानंतर २००६ साली सुरू करण्यात आलेली व विस्मृतीत गेलेल्या या चळवळीत अनेक महिलांनी गौप्यस्फोट करत आपल्यावरील अन्यायाच्या कहाण्या मांडल्या. यात अनेक बड्या व्यक्ती अडकल्या. यात दहा आणि त्याही पेक्षा जास्त वर्षाआधी अन्याय झालेल्या महिलाही बोलत्या झाल्या. त्यांनी अनेकांची नावं समोर आणली. भारतातही खळबळ उडाली. इतकी वर्ष मनात दडवून ठेवलेली गुपितं एका क्षणात चव्हाट्यावर आली. पुरुष वर्ग धास्तावला तर महिला वर्ग आक्रमक झाला. यातही एकच गोष्ट होती. न्याय मागण्यासाठी इतका उशीर का केलात. का नाही वेळीच व्यक्त झालात. पण, कायद्याने त्याही प्रकरणांची दखल घेत आरोपींवर गुन्हे दाखल केले. ज्याचे खटले आजही सुरू आहेत. पण, आता त्यावर कोणी चर्चा करत नाही. कारण ते आता जुनं झालं आहे. एका घटनेनंतर दुसरी घटना त्याची जागा घेतेच हा तर भविष्याचा नियमच आहे. त्यातही कितीजण या घटनांचा पाठपुरावा करतात हे त्यांचं त्यांनाच माहीत. सध्या या चळवळीची चर्चा कुठे होताना दिसत नाहीये.

दरम्यान, वेळीच आवाज उठवणे व त्याला साद देणं किती महत्त्वाचं आहे हे सुशांतच्या आत्महत्येने व इतर काही घटनांनी पुन्हा एकदा अधोरेखीत केलं आहे. माणूस गेल्यानंतरचं हे चर्चेतलं स्फुंदन क्षणिक ठरू नये तर यातून पुढे अशा घटना घडू नयेत याबदद्ल स्वतंत्र चळवळ सुरू होणार असेल तर या स्फुंदनाला अर्थ आहे. नाहीतर इतर घटनांप्रमाणेच सुशांतचं जाणंही बातम्यांपुरतंच राहायला नको. बॉलिवूड काय आणि इतर क्षेत्र काय स्पर्धा या सगळीकडेच आहेत. त्यातही मागून येऊन पुढे जाणार्‍याला मागे खेचणारा वर्गही सगळीकडे वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या नावाने आहेच. यामुळे अशा वर्गासाठी स्वत:चे आयुष्य न संपवता त्या स्पर्धेत टिकून राहण्याचे कौशल्य प्राप्त करणे त्यासाठी वेळोवेळी अनुभवी जाणकारांची मदत घेणे त्यांच्याशी चर्चा करणे हेच या स्पर्धेत टिकून राहण्याचे औषध आहे. हीच खरी सुशांतला व त्याच्यासाऱख्या संवेदनशील व्यक्तीला वाहिलेली श्रद्धांजली आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -