करोनाशी लढायचंय, मनोबल वाढवा!

-डॉ. केशव काळे

करोनासारख्या जागतिक महामारीशी मागील तीन महिने आपला देश लढत आहे. करोनावर उपाय करणारी लस सापडली नसली तरी करोनाशी लढण्यासाठी आपण सज्ज व्हायला पाहिजे, मनोबल, आपली प्रतिकारशक्तीच करोनाला हरवू शकते, असे मत ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ तथा खुशी हार्टकेअरचे वैद्यकीय संचालक डॉ. केशव काळे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केले.

वाढते प्रदूषण आपल्या हृदयावर आघात करत असते. दूषित हवेमुळे श्वसनाचे रोग तयार होतात. करोनासारख्या संकटाला रोखायला आपल्या शरीरात प्रचंड प्रतिकारशक्ती पाहिजे, मात्र मानवी सवयी, व्यायामाचा अभाव, धावपळ यामुळे माणूस कमजोर झाला आहे. म्हणून आरोग्याचं हे संकट जीवावर बेतले आहे, असे डॉ. काळे म्हणाले. ते म्हणाले, आपल्याला चांगले आरोग्य राखण्यासाठी आपण आपल्या हृदयाची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्या हृदयाविषयी ज्ञान आवश्यक आहे. डॉ. काळे म्हणाले, मानवाचे हृदय हा एक पोकळ, मांसपेशीयुक्त अवयव असून त्याचा आकार बंद मुठीइतका असतो. आपलं हृदय हे छातीच्या पिंजर्‍याच्या मध्यभागी किंचित डाव्या बाजूला असते. हृदयाचे कार्य कसे चालते? हे रोज जवळजवळ 1 लाख वेळा आणि मिनटाला 60-90 वेळा धडकते. प्रत्येक ठोक्याबरोबर शरीरात रक्त ‘पंप’ करण्याचं काम हृदय करते.

हृदयाला शुध्द रक्तपुरवठा करणार्‍या हृदयधमन्या ह्याच हृदयाला प्राणवायू आणि अन्न पुरवतात. हृदय हे डावा व उजवा अशा दोन भागात विभागलेले असते. हृदयाला दोन कप्पे असतात (ज्याला एट्रीयम आणि वेंट्रीकल म्हणतात) जे हृदयाच्या उजव्या व डाव्या बाजूस असतात. हृदयाला एकूण 4 कप्पे असतात. हृदयाच्या उजव्या कप्प्यात अशुद्ध रक्त आत येते आणि ते फुफ्फुसात पंप केले जाते. फुफ्फुसात रक्त शुद्ध होते आणि परत हृदयाच्या डाव्या कप्प्यात सोडले जाते. जेथून रक्त शरीराला पोहोचवले जाते. हृदयाला चार झडपा (वॉल्व्ह) असतात : 2 डाव्या बाजूला (मिट्रल आणि एऑर्टिक) आणि 2 उजव्या बाजूला (पल्मनरी आणि ट्रायकस्पीड).

हृदयविकार म्हणजे काय?
हृदय शरीराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयुक्त रक्तपुरवठा करणार्‍या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या (कोरोनरी आर्टरी)असे म्हणतात. जर अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही व ते मरते. यालाच हृदयविकार म्हणतात. हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायुंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायुंमूळे हृदयाला होणार्‍या रक्त पुरवठ्याचा वेग कमी होतो (कंजेस्टिव हार्ट फेल्यूअर) व त्यामुळे पाऊलांना घाम फुटून श्वसनास त्रास होतो.

हृदयविकार का होतो ?
आपण जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून कोलेस्ट्रॉलचे थर साठू लागतात, ज्यात कोरोनरी आर्टरीचा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. सामान्यत: महिला सेक्स हार्मोन इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमुळे सुरक्षित आहेत. ह्याचा प्रभाव कमीतकमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो. भारतीयांसहित अनेक आशियाई देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो.

ज्यात खालील कारणांचा समावेश आहे :
धूम्रपान करणे मधूमेह उच्च रक्तदाब लठ्ठपणा उच्च कोलेस्ट्रॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्ट्रॉल शारीरिक श्रमाची कमतरता अनुवंशिकता तणाव, रागीटपणा आणि चिंता वंशानुगत मुद्दे काय लक्षणे असतात? काहीवेळा लक्षणे ओळखणे फार अवघड असते आणि अन्य लक्षणे दिसू शकतात. सामान्यतः छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो. घाम येणे, मळमळणे चक्कर येणे ही देखील लक्षणे आहेत. साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात. तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात. इतर लक्षणे जसे मळमळ, उलट्या, अस्वस्थता, कफ, कंप अशी आहेत व ह्या वेदना सुमारे 20 मि. पेक्षा जास्त काळ टिकतात. काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो, रक्तदाब एकदम कमी होऊन मृत्यू येतो.

हृदयविकार कसा ओळखला जातो?
डॉक्टर रुग्णाची सूक्ष्म तपासणी करतात, हृदयाची स्पंदने मोजतात आणि रक्तदाब पाहतात. ईसीजीमुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर हृदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते. हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते रक्ताच्या परीक्षणात दिसून येते. छातीचा एक्सरेदेखील घेतला जातो. हृदयाच्या माहितीसाठी इकोकार्डिओग्राम करता येतो. ज्यात हृदयाच्या समुचित कार्याची माहिती मिळते. कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी एंजियोग्राम करणे महत्वाचे आहे.

हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे?
हृदयविकारावर झटकन उपचार मिळाल्यास जीवन वाचवता येते. जोपर्यंत वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे.जर ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरीत ऑक्सिजन द्यावे. जर नायट्रोग्लिसरीन किंवा सॉरबिटरेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरीत त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी. पाण्यात ढवळून अ‍ॅस्प्रीन द्यावे. हृदयविकारावर काय उपचार असतात? हृदयविकारावर झटकन वैद्यकीय उपचार व इस्पितळात भरती करणे गरजेचे असते. पहिले काही मिनिटे आणि तास जरा संकटपूर्ण असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधे दिली जातात. हृदयाच्या स्पंदनांवर लक्ष ठेवले जाते व जर काही अनपेक्षित स्पंदने आढळली तर त्यावर उपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधे दिली जातात व रुग्णास आराम करण्यास व झोपण्यास सांगितले जाते.जर रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. प्रत्येक रुग्णाची व त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचे नुकसान आणि अडथळ्यांचे प्रमाण व रुग्णाचे वय लक्षात घेऊन उपचार पद्धती ठरवली जाते. कित्येक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. ह्यात कोरोनरी एंजियोप्लास्टी, फुग्याने वाहिकांचा अडथळा दूर करणे किंवा कोरोनरी बाईपास सर्जरीचा उपयोग केला जातो.

हृदयविकारापासून बचाव कसा करता येतो?
हृदयविकारापासून ज्यांना धोका आहे किंवा वाचायचे आहे त्यांनी खालील नियम पाळावेत. आहार स्वस्थ ठेवा ज्यात चरबी आणि मीठ कमी असावे, फायबर आणि जटिल कार्बोहाइड्रेट उच्च मात्रेत असावे. वजन जास्त असणार्‍यांनी वजन कमी करावे. शारीरिक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे. धूम्रपान करू नये व करत असल्यास त्वरित बंद करावे. मधूमेह, रक्तदाब किंवा जास्त कोलेस्ट्रॉल असणार्‍यांनी त्यांची रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगास आटोक्यात ठेवावे, असा सल्ला डॉ. केशव काळे यांनी दिला.

-डॉ. केशव काळे