घरफिचर्सकरोनाला रोखणार्‍या महिला ब्रिगेड!

करोनाला रोखणार्‍या महिला ब्रिगेड!

Subscribe

तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साय इंग वेन, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल, न्यूझीलँडच्या पंतप्रधान जेसिंदा अर्डर्न, आईसलँडच्या पंतप्रधान कॅटरीन जॅकोबसदोतीर, नॉर्डीक द्विपसमूहातील फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन, कॅरिबियन बेटावरील सिंट मार्टेन गव्हर्नच्या पंतप्रधान सिल्वेरिया जेकब यांची नावे आज जगभरात घेतली जात आहेत. करोना महामारीवर या महिलांनी ज्या पद्धतीने मात केली आहे त्याचे दाखले जागतिक आरोग्य संघटनेनेही इतर देशांना दिले असून या महिलांनी लॉकडाऊन व इतर उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करत करोनाला देशातून कसे हद्दपार केले हे शिका असेही सांगितले आहे, पण केवळ त्या महिला असल्याने अनेक देशप्रतिनिधींनी त्यांच्या उपाययोजनांवर टीका करत आपणच कसे करोनाचा संसर्ग रोखू शकतो हे दाखवण्याचे केविलवाणे प्रयत्नही सुरू केले आहेत. जे कोणाच्या खिजगणीतही नाही, हे विशेष.

जगभरातील दोनशेहून अधिक देशांना आपल्या विळख्यात जखडून ठेवणार्‍या करोना व्हायरसने जगण्यापेक्षा मरणं स्वस्त करून टाकलयं. चीनमधून जगभरात पसरलेल्या या व्हायरसच्या प्रादुर्भावाने अमेरिकेसह अनेक देशांची आर्थिक व्यवस्थाही खिळखिळी करून टाकली आहे. यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह विविध देशातील नेतेमंडळी चीनवर रोज न चुकता आग ओकत आहेत, तर दुसरीकडे प्रत्येक देश आज करोनापासून जनतेचे संरक्षण करण्यासाठी जीवाचे रान करताना आदळआपट करत आहे, पण एवढे करूनही करोनाचा संसर्ग रोखण्यात व मृत्यूदर कमी करण्यात त्यांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. यामुळे ट्रम्प यांच्यासह अनेक बडे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत, पण याउलट ज्या देशाचे प्रतिनिधित्व महिलांच्या हातात आहे तेथे मात्र दिलासादायक चित्र बघायला मिळत आहे. या महिला नेतृत्वाने आपल्या खास कडक शिस्तीच्या जोरावर बेशिस्त नागरिकांना शिस्तीवर आणत करोनालाच या देशातून काढता पाय घेण्यास भाग पाडले आहे. यामुळे सुरुवातीला देशवासीयांना डोईजड वाटणार्‍या या महिला आता मात्र जनतेच्या गळ्यातल्या ताईत बनल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर देशाचं प्रतिनिधित्व महिलाच उत्तम करू शकतात, असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे.

यात प्रामुख्याने ज्या महिला नेतृत्वाचे नाव घेतले जात आहे त्यात आहेत तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साय इंग वेन, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल, न्यूझीलँडच्या पंतप्रधान जेसिंदा अर्डर्न, आईसलँडच्या पंतप्रधान कॅटरीन जॅकोबसदोतीर, नॉर्डीक द्विपसमूहातील फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन, कॅरिबियन बेटावरील सिंट मार्टेन गव्हर्नच्या पंतप्रधान सिल्वेरिया जेकब यांची नावे आज जगभरात घेतली जात आहेत. करोना महामारीवर या महिलांनी ज्या पद्धतीने मात केली आहे त्याचे दाखले जागतिक आरोग्य संघटनेनेही इतर देशांना दिले असून या महिलांनी लॉकडाऊन व इतर उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करत करोनाला देशातून कसे हद्दपार केले हे शिका असेही सांगितले आहे, पण केवळ त्या महिला असल्याने अनेक देशप्रतिनिधींनी त्यांच्या उपाययोजनांवर टीका करत आपणच कसे करोनाचा संसर्ग रोखू शकतो हे दाखवण्याचे केविलवाणे प्रयत्नही सुरू केले आहेत. जे कोणाच्या खिजगणीतही नाही, हे विशेष. यामुळे करोनाच्या या महासंकटात जर केवळ आपला पुरुषी अहंकार जपण्यासाठी महिलांच्या कार्याकडे मत्सराने बघत देशवासीयांचे प्राण धोक्यात घालणारे देशाचे नेतृत्व करत असेल, तर त्यांची सुरक्षा रामभरोसे असेल हे मान्य करण्याशिवाय पर्याय नाही.

- Advertisement -

दरम्यान, यातील प्रत्येक महिला ही कडक शिस्तीची असून तिची स्वतंत्र अशी मते आहेत. स्त्री सुलभ स्वभावानुसार देशातील प्रत्येक व्यक्ती ही तिच्या घरची असल्याच्या भावनेतून तिने देश चालवायला घेतला आहे. यामुळे करोनासारखे अरिष्ट कोसळल्यावर देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी ती स्वत:ही कामाला लागली आहे. यात विशेष उल्लेख केला जातो तो तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साय इंग वेन यांचा. तैवानची लोकसंख्या 24 लाख आहे. यामुळे डिसेंबर महिन्यात ज्यावेळी चीनमधील वुहान शहरात करोना व्हायरसने हाहाकार उडवल्याचे समोर आले, त्यावेळी राष्ट्राध्यक्षा साय इंग वेन यांनी सर्वप्रथम वुहान येथून विमानाने येणार्‍या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तैवानमध्ये रॅपिड टेस्टिंगचे आदेश देऊन रस्त्यारस्त्यावर तपासणी सेंटर उभारण्यात आले. तसेच सामान्य नागरिक, डॉक्टर व इतर कर्मचार्‍यांसाठी तातडीने मोठ्या संख्येने पीपीई सूट व मास्कची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर चीन, हाँगकाँग आणि मकाव येथून येणार्‍या विमानांना तैवानमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली. यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने तैवानमध्ये करोनाग्रस्ताची संख्या 393 वर थांबली आणि 3 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर करोना रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात आले. लॉकडाऊन करण्यात आले. कोणीही घराबाहेर पडल्यास त्याची रवानगी थेट तुरुंगात करण्यात येत असल्याने लोकही घाबरून घरातच बसले.

अत्यावश्यक सेवा लोकांना देण्यात आल्या, पण त्यासाठीही काटेकोर नियम लावण्यात आले. यामुळे तैवान लवकर करोनामुक्त झाला. आज तैवानमध्ये सामान्य जीवन सुरू झाले असून करोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेले मास्क व पीपीई किट तैवान जगाला पुरवत आहे, पण आजही तेथे सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे लागत आहे. साय इंग वेन या आजही कुठला धोका पत्करण्यास तयार नाहीत. यामुळे त्यांच्यावर विरोधक टीकाही करत आहेत, पण वेन आज करोना आणि देश यात अभेद्य भिंत म्हणून उभ्या आहेत. सुरुवातीला लोकांच्या रोषाला सामोरे जाणार्‍या वेन आज लोकांच्या आवडत्या राष्ट्राध्यक्षा बनल्या आहेत.

- Advertisement -

जर्मनीतही करोनाने थैमान घातले आहे, पण चेन्सलर अँजेला मर्केल यांनी जास्तीत जास्त तपासण्यांचे आदेश दिल्याने करोना रुग्णांना योग्यवेळी उपचार, विलगीकरण करण्यात आले. यामुळे 83 लाख लोकसंख्या असलेल्या जर्मनीत 1 लाख 32 हजार करोनाग्रस्त असल्याचे समोर आले, पण त्या तुलनेत तेथील मृत्यदर मात्र कमी आहे. मर्केल या स्वत: रसायनशास्त्राच्या पदवीधर असल्याने त्यांनी करोनाची गंभीरता ओळखून त्याला रोखण्यात काही अंशी यश मिळवले आहे. लॉकडाऊनही कडकपणे पाळण्यात आला. याचा फायदा आज अनेक युरोपीय देशांच्या तुलनेत जर्मनीला अधिक झाला आहे. जर्मनीत आठवड्याला 3 लाख 50 हजार लोकांची करोना तपासणी करण्यात येत आहे. यामुळे संसर्ग रोखण्यात यशही मिळत आहे.

न्यूझीलँडमध्ये ५० लाख लोकसंख्या आहे. बेट असल्याने मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटक येत असतात. पण करोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका ओळखत पंतप्रधान जेसिंदा अर्डन यांनी 19 मार्च रोजी चार दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला, पण यात अत्यावश्यक सेवा मात्र गाळण्यात आल्या. त्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्टिंग करण्यात आल्या. यावेळी 1३ हजार जणांना करोनाची लागण झाल्याचे व नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यामुळे नागरिक अस्वस्थ झाले. पर्यटनस्थळ असल्याने अनेकांवर बेकारीची कुर्‍हाडही कोसळली आहे, पण अर्डन कायम जनतेच्या संपर्कात असून त्यांच्या सर्व शंकांंचे निरसन करत आहेत. तसेच कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेत गरजूंना अन्न पुरवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मात्र, कोणीही घराबाहेर पडू नका हे अर्डन लोकांना रोज विनवण्या करून सांगत आहेत. ज्याचा मान राखत लोकही घरात बसून आहेत.

दुसरीकडे नॉर्डिक द्विपसमूहातील पाच देशांपैकी चार देशांचे प्रतिनिधित्व महिला करत आहेत. तेथेही करोना संसर्ग कमी होत आहे. फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन या जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान आहेत. ५५ लाख लोकसंख्या असलेल्या फिनलँडमध्ये करोनाने मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 59 एवढा आहे. योग्य वेळी कडक उपाययोजना लॉकडाऊन बरोबरच लोकांना कायद्याचा बडगा दाखवत या तरुण पंतप्रधानाने करोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळाले आहे.

याच द्विपसमूहातील आईसलँडच्या पंतप्रधान कॅटरिन जॅकोबसदोतीर यांनीही करोनाचा धोका ओळखून जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या करण्यावर भर दिला. 3 लाख 60 हजार लोकसंख्या असलेल्या या बेटावरील अर्ध्या लोकांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले, पण त्यांच्यात कुठलीही लक्षणे आढळली नाहीत, पण तरीही कॅटरिन यांनी सगळ्यांनाच क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले. लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे येथे संसर्ग वाढला नाही. कॅरेबियन द्विपसमूहावरील सिंट मार्टेन गव्हर्नच्या पंतप्रधान सिल्वेरिया जेकॉबस यांनी दोन आठवडे घरात बसा, कुठेही जाऊ नका. आवडता ब्रेड मिळत नसेल तर डाळी खा, ओट्स खा असे विचित्र विधान केले. त्याचा व्हिडिओ जगभरात गाजला, पण जेकॉबस यांच्या या विधानामुळे लोक घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे संसर्ग वाढला नाही, पण स्टीफन लोफन यांनी मात्र या महिलांनी राबवलेल्या लॉकडाऊनची थट्टा उडवली व शाळा, कॉलेजेस ऑफिसेस सुरूच ठेवली. परिणामी त्यांच्या देशात करोनाने सर्वाधिक थैमान घातले. अनेकजणांचा मृत्यूही झाला. याची नोंद जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. जे या महिलांनी करून दाखवले ते पुरुष लोकप्रतिनिधी असलेल्या देशातही करावयास हवे असे सूचविले, पण त्याकडे अमेरिकेसह इतर देशांनी कानाडोळा केला. ज्याची किंमत आता हे देश मोजत आहेत.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -