घरफिचर्सबुढ्ढा होगा तेरा बाप !

बुढ्ढा होगा तेरा बाप !

Subscribe

स्वतःविषयीचं आणि वर्तमानाविषयीचं कमालीचं असमाधान आपल्या मनात असतं. त्यातच आजूबाजूला काही घडत नाही म्हणजे तसं ग्रेट काही हॅपनिंगही नाही, मग दिल बहलाने के लिए नया अ‍ॅप का खयालही अच्छा. प्रत्यक्ष म्हातारं होण्यापूर्वी म्हातारं होऊन अनुभवणं याची एक गंमत आहे खरी. सगळं काही अनुभवायची इच्छाही अमर्याद.

एका डॉक्टर मैत्रिणीने तिचा फोटो पाठवला. मी बघतच राहिलो. तिच्या सुंदर चेहर्‍यावर सुरकुत्या आणि केस पांढरे. आपल्या लाडक्या मैत्रिणीचा असा कसा पेशंट झाला, म्हणून हळहळलो. मग लक्षात आलं तिनं FaceApp वापरुन म्हातारपणीचं रुपडं मला पाठवलं होतं.

मला म्हणाली, ‘कशी दिसत्येय?’
फ्लर्ट करण्याचं आद्य कर्तव्य पूर्ण करत मी म्हणालो, ‘म्हातारपणीही सेक्सीच दिसशील यार’

- Advertisement -

पुढं काय संवाद झाला तो मुद्दा इथे महत्त्वाचा नाही, तर त्या दिवशी फेसबुकवर एका पाठोपाठ एक असे माझ्या मित्र-मैत्रिणींचे एकदम आजी-आजोबा झालेले फोटो दिसू लागले. ते पाहून मला हसू आवरेना. अचानक आठवली वि.स.खांडेकरांची कादंबरी- ययाती. आरशात आपले पिकलेले केस पाहून ययातीला रडू कोसळतं आणि स्वतःच्या पोराकडं तो तारुण्य मागू लागतो, असा प्रसंग आहे. तरुण असण्याची किती ती हौस ! संतुर मॉम होण्याची आस असो नायतर ‘वाटत नाही ओ तुमचं वय एवढं असेल’ असं ऐकण्यासाठी उत्सुक असलेले कान. तरुण होण्यासाठी आपण नेहमीच तयार असतो. ययाती असं तारुण्य मागतो आहे आणि आम्ही मात्र बिनधास्त म्हातारपणी आपण कसे दिसू हे पाहतो आहोत, शेअर करतो आहोत. उद्या काय घडेल, हे सांगता येत नाही तिथे सुमारे चाळीस, पन्नास वर्षांनंतर आपण जिवंत तरी असू का, माहीत नाही. पण आजच हे अ‍ॅप आलं आहे आणि ट्रेंड सुरू आहे म्हातारं होण्याचा तर चलो म्हातारं व्हावं अ‍ॅप वापरुन, अशी आपली अवस्था.

अर्थात वय हासुध्दा एक आभासच आहे की. इट्स जस्ट नंबर आय नो.
बा. भ. बोरकरांनी म्हटलं आहे-
‘तुला कसे कळत नाही, फुलत्या वेलीस वय नाही
क्षितिज ज्याचे थांबले नाही, त्याला कसलेच भय नाही

- Advertisement -

क्षितिज थांबत नाही तोवर तारुण्य आहे, थांबायचा मुद्दाच नाही. पण मनाने अजूनही मी तरुण आहे असं कितीही गहिवरून म्हटलं तरी शरीर जाणीव करून देत राहतं आणि मग खरंखुरं म्हातारपण वाट्याला आल्यावर काय असेल ते जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. मुळात आपण जे आहोत त्याहून वेगळं करून आपल्याला नक्की काय मिळत असेल? टाइम मशीनमध्ये बसून काळ ओलांडता येईल का? हे सारं शक्य नाही. स्वतःविषयीचं आणि वर्तमानाविषयीचं कमालीचं असमाधान आपल्या मनात असतं. त्यातच आजूबाजूला काही घडत नाही म्हणजे तसं ग्रेट काही हॅपनिंगही नाही, मग दिल बहलाने के लिए नया अ‍ॅप का खयालही अच्छा. प्रत्यक्ष म्हातारं होण्यापूर्वी म्हातारं होऊन अनुभवणं याची एक गंमत आहे खरी. सगळं काही अनुभवायची इच्छाही अमर्याद. लहानपणी माझी धाकटी बहीण म्हणायची, मला अ‍ॅक्टर व्हायचंय. का असं विचारलं की सांगायची- अ‍ॅक्टर झालं की आपल्याला सगळंच होता येतं. कंडक्टर, डॉक्टर, इंजिनिअर, टीचर..सगळंच.

आज हे आठवताना हसू येतं; पण असंच काहीसं झालंय ना. एका आयुष्यात आपल्याला सगळ्याच भूमिका कशा पार पाडता येतील? कोणता तरी रोल वाट्याला येईल तो पार पाडावा लागेल; पण तोवर वेगवेगळे रोल्स तपासून घ्यायला काय हरकत आहे, असंही कुणी म्हणेल. नामदेवांनी म्हटलं, एक तरी ओवी अनुभवावी तसं आता एक तरी अ‍ॅप अनुभवावे. इकडचं तिकडचं गाणं घेऊन थोडं एडिट क्रॉप करून टिक टॉकवर व्हिडिओ झाला तरी दिल खुश. हे दोन क्षण आनंदाचे जावेत मग त्या आनंदाची गुणवत्ता काय, हा प्रश्न अलाहिदा. मुळात नाचता आलं पाहिजे. चिल करता आलं पाहिजे बॉस. फार पुढचा विचार करायला वेळ आहे कुणाकडे. उसकी हमको क्युं हो फिकर, जीना हो तो मस्त कलंदर. आता कशाला उद्याची बात, बघ उडून चालली रात. जो चाहिए अभी चाहिए. फटाकदिशी. इन्स्टंट. टेन्शन नही मंगताय. डोक्याला शॉट नको, चला हवा येऊ द्या, अशी सारी नवी बाराखडी आहे.

सोशल मीडिया, डिजिटल फोरम्स आणि अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप्सनी सर्व काही अनुभवण्याचं एक नवं पॅकेजच दिलं आहे. ही व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी असं कितीही म्हटलं तरी आता सार्‍या बाऊंड्रीजच संपल्यात. व्हर्च्युअल आणि खरीखुरी रिअ‍ॅलिटी यातली सीमारेषा एकदम धूसर होत चालली आहे आणि मग सारं अनुभवणं, वाटणं किंवा फील करणं हे मोबाइल लॅपटॉपवरच. भावना टिपणारा इंटरनेटने तयार केलेला हा मोठा कॅनव्हास आहे. आणि भावनांचं मिश्रण इतकं गुंतागुंतीचं आहे की चुकून एखाद्या पोस्टला लव्ह करायचं की अ‍ॅन्ग्री व्हायचं की आणखी काही, हे कळेस्तोवर आपण कमेंटही करून बसलेलो असतो. आपल्याला कळण्याच्या आतच कुणीतरी आपल्याला पुढे ढकलत नेतं.

ते काय आहे नक्की हे शोधणं हा इंटरेस्टिंग प्रवास आहे. पर सोचने को ऑप्शन नही है भाय. सोचना तो पडेगाच. तर मैत्रिणी कितीही गोड सुंदर असल्या तरी काही मित्र हे खडूस किंवा कमीने असतातच ना. मी FaceApp वापरुन फोटो पोस्ट केला नाही म्हणून मित्र म्हणाला, ‘तुला FaceApp वापरुन म्हातारं व्हायची गरजच नाही, तू आहे असाच म्हातारा दिसतोस.’ यावर अर्थातच ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ असं मी म्हणालो तरी काळ वेगात धावत राहतोच आणि काळाचं बोट हातून निसटत राहतंच. आपण तरी किती धावणार, कुठं धावणार? दोन मिनिटांचा ब्रेक घेऊन स्वतःला कधी विचारणार? काही प्रश्नोत्तरांची सत्रं स्वतःसोबत व्हायला हवीत नाहीतर ये जीना भी कोई जीना है लल्लू !

-श्रीरंजन आवटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -