घरफिचर्सआपल्या झोपेचा सौदा...

आपल्या झोपेचा सौदा…

Subscribe

घुबडासारखी रात्र रात्र जागून सिरिअल्सचे सीझन्स संपवणारी माणसं हे काही दुर्मिळ दृश्य राहिलेलं नाही. एक संपली कि दुसरी अशीच सलग बघणारेही अनेक आहेत. एका तरुण मुलाला आपण व्यसनी बनत चाललो आहोत याची जाणीव होऊन त्याने त्यातून मुक्तता मिळावी आणि आयुष्याची गाडी रुळावर यावी यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात धाव घेतली पण उरलेल्याचं काय?

याच वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातली घटना. बंगलोरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स म्हणजेच निमहान्स या संस्थेत एका 26 वर्षाच्या बेरोजगार तरुणाने स्वतःला व्यसनमुक्तीसाठी दाखल करून घेतलं. या तरुणाला कशाचं व्यसन होतं? तर नेटफ्लिक्सवरच्या निरनिराळ्या सीरिअल्स आणि सिनेमे बघण्याचं.

हा तरुण दिवसाचे जवळपास आठ तास आणि 29 मिनिटं सलग नेटफ्लिक्स बघण्यात घालवत होता. निमहान्स संस्थेने या तरुणाला व्यसनमुक्तीसाठी दाखल करून घेतलं आहेच. शिवाय महत्वाचं म्हणजे नेटफ्लिक्सच्या व्यसनाची नोंद झालेली जगातली ही पहिली केस मानली जाते. जगभर नेटफ्लिक्सच्या व्यसनाबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली असली तरी सलग नेटफ्लिक्स बघण्याचा ज्याला ऑनलाईन भाषेत लळपसश-ुरींलहळपस म्हणतात, त्याचा जागतिक कालावधी सहा तास पंचेचाळीस मिनिटांचा आहे. या तरुणाचं नेटफ्लिक्स बघण्याचं आठ तास आणि 29 मिनिटं हे प्रमाण गेले सहा महिने असल्यामुळे अर्थातच त्याची रवानगी व्यसनमुक्तीसाठी करण्यात आली आहे.

- Advertisement -

ही बातमी वाचत असताना आजूबाजूचे नियमित नेटफ्लिक्स बघणारे अनेक चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले. विचार करत होते इतकं सतत बघण्याचा कंटाळा येत नाही का? तितक्यात काही दिवसांपूर्वी वाचलेली अजून एक बातमी आठवली. नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हेस्टिंग्स यांना नेटफ्लिक्सचा सगळ्यात मोठा स्पर्धक कोण आहे? असं विचारलं गेलं तेव्हा त्यांनी अगदीच अनपेक्षित उत्तरं दिलं. सर्वसाधारणपणे नेटफ्लिक्स आणि अमेझॉनमध्ये बाजार काबीज करण्यासाठी चढाओढ चालू असते. असा आपला अंदाज असतो त्यामुळे नेटफ्लिक्सचा सगळ्यात मोठा स्पर्धक अमेझॉन असं आपण गृहीत धरतो, पण रीड हेस्टिंग्सने मात्र वेगळाच विचार मांडला. ते म्हणाले, ‘झोप हा आमचा सगळ्यात मोठा स्पर्धक आहे.’ सहज हसण्यावारी नेण्यासारखा हा मुद्दा नाहीये. स्वतःच्या घरात आणि आजूबाजूला बघितलं कि नेटफ्लिक्स कुणाशी स्पर्धा करतंय हे सहज दिसतं. घुबडासारखी रात्र रात्र जागून सिरिअल्सचे सीझन्स संपवणारी माणसं हे काही दुर्मिळ दृश्य राहिलेलं नाही. एक संपली कि दुसरी अशीच सलग बघणारेही अनेक आहेत. एका तरुण मुलाला आपण व्यसनी बनत चाललो आहोत याची जाणीव होऊन त्याने त्यातून मुक्तता मिळावी आणि आयुष्याची गाडी रुळावर यावी यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात धाव घेतली पण उरलेल्याचं काय?

नेटफ्लिक्स, त्याचं व्यसन या सगळ्याची गुंतागुंत समजून घ्यायची असेल तर सगळ्यात आधी आपल्या मनोरंजनाच्या पद्धती बदलल्या आहेत. हेही समजून घेतलं पाहिजे. एखादी सीरिअल एकत्र बसून बघणं हा प्रकार जवळपास कालबाह्य व्हायला आला आहे. कालपर्यंत मनोरंजन हा कुटुंबाचा एकत्रित वेळ होता. लोक टीव्हीवरच्या सीरिअल्स आवडो न आवडो एकत्र बसून बघत होते. त्यामुळे त्याला काही एक मर्यादा होती. आता हातातल्या स्मार्ट फोनवर सगळंच उपलब्ध झाल्यावर मनोरंजनही ज्याच्या त्याच्या मोबाईलच्या स्क्रीन पुरतं मर्यादित झालं आहे. ‘मी काय बघते हे तू बघू नको आणि तू काय बघतोयस हे बघायला मी डोकावणार नाही.’ असा सगळं मामला. शिवाय या सगळ्याला स्थळ, काळाचं बंधन उरलेलं नाही. अमुक एक वाजताच सीरिअल बघावी लागेल, रिपीट एपिसोड बघायचा असला तरीही अमुक एक वाजताच हि भानगडच नाही. ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा बघता येण्याची सोय क्रांतिकारी असली तरी माणसांचं मनोरंजन चौकटीत कोंबून टाकणारी आहे. त्यामुळे मनोरंजनाचा आस्वाद घेण्याची पद्धतच मुळापासून बदलली आहे. त्यातलं सार्वजनिक असणं लोप पावत चाललं आहे. आणि व्यक्तिकेंद्रित मनोरंजनाकडे आपण झपाट्याने चाललो आहोत.

- Advertisement -

शिवाय नेटफ्लिक्स काय किंवा अमेझॉन काय ही माध्यमे मुक्त आहेत. अजून तरी सेंसॉरशिप लागू झालेली नाही. त्यामुळे निरनिराळ्या सीरिअल्समधले मुक्त लैंगिक व्यवहार जे सॉफ्ट पॉर्न प्रकारातले असतात सहज बघण्याची सोय आहे. ते चांगलं कि वाईट हा निराळा चर्चेचा मुद्दा. मुळात उपलब्ध आहे हे महत्वाचं. एरवी हिंदी सिनेमातला एखादा जेमतेम लव्ह सिन म्हणता येईल असा सीनही घरात सगळ्यांच्या सोबत बघायला अवघडलेल्या समाजाला अचानक माणसांचे नग्न देह आणि त्यांचे आकर्षक व्यवहार सहज बघायला मिळतायेत. मनोरंजन स्वतःपुरतं मर्यादित राखण्यामध्ये हाही महत्वाचा मुद्दा असतोच, नाकारून चालणार नाही.

या सगळ्याचा आपल्या झोपेवर परिणाम होतोय. नेटफ्लिक्स आज उघडपणे म्हणतंय कि त्यांची स्पर्धा माणसाच्या झोपेशी आहे. तो जितका कमी झोपेल आणि नेटफ्लिक्स बघण्यात वेळ घालवेल तितकं बरं ! खरंतर नेटफ्लिक्सने हे उघडपणे सांगितलं इतकंच बाकी अमेझॉन, हॉटस्टार यांचीही स्पर्धा झोपेशीच आहे. इतकंच कशाला या सगळ्या आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म आधी आलेल्या युट्युबनेही न बोलता कायम आपल्या झोपेशी स्पर्धा केली आहे. फेसबुकही तेच करतंय. झोपेतून उठत नाही तोच फेसबुक आणि व्हाट्स अँप उघडणारे अनेक असतात. मध्यरात्री अचानक उठून फेसबुक बघणार्‍यांची आणि मग त्याच तंद्रीत परत झोपणार्‍यांची संख्या वाढतेय. रात्री झोपताना तरी किमान फोनचा डाटा बंद केला पाहिजे हा विचार डाऊनमार्केट आणि कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

रोजचा दीड जीबी डाटा ही स्वस्ताई नाहीये, त्या दीड जीबीसाठी आपण झोपेच्या निमित्ताने प्रचंड मोठी किंमत चुकती करतो आहोत. ज्याचा संबंध थेट आपल्या शारीरिक-मानसिक-सामाजिक आणि आर्थिक आरोग्याशी आहे. आपल्याला आभासी जगात एखादी गोष्ट स्वस्तात किंवा फुकट मिळते म्हणजे ती खरोखर फुकट नसते. फेसबुक वापरण्याचे खिश्यातून पैसे आपण देत नाही. नेटफ्लिक्स वापरण्याचे जे पैसे देतो त्याच्या कितीतरी पट अधिक मनोरंजन आपल्या हातात असतं, ज्यामुळे ते जवळपास फुकट आहे असं आपल्याला वाटत असतं. पण आधुनिक काळात, आभासी जगाच्या दुनियेत बाजार निराळ्या पद्धतीने पैशांची वसुली करत असतो. इथे कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. स्वस्तातही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत असते. मनोरंजन अधिकाधिक व्यक्तिकेंद्रित बनत चाललंय कारण सध्या सौदा आपल्या झोपेचा आहे.

आपण जितके कमी झोपणार, डिजिटल माध्यमातून मनोरंजन देणार्‍या कंपन्या तितक्याच मोठ्या होत जाणार.हे भयंकर आहे. अस्वस्थ करणार आहे. प्रत्येकजण बोली लावतोय, माणसांची झोप कमी व्हावी यासाठी तेव्हा, आपल्या झोपेचा सौदा किती होऊ द्यायचा याचाही ज्याने त्याने विचार करण्याची वेळ आली आहे

-मुक्ता चैतन्य

(लेखिका समाज माध्यमांच्या अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -