घरमहाराष्ट्रभिवंडी पिंपळास फाट्यावर नोटांचा सडा

भिवंडी पिंपळास फाट्यावर नोटांचा सडा

Subscribe

शिवशाही बस कंडक्टरच्या हातातून निसटली 12 हजारांची रोकड, चोरी, हव्यास, लोभ दूर ठेवून माणसातल्या माणुसकीचा प्रत्यय

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे-जव्हार शिवशाही बस कंडक्टरच्या हातातून प्रवाशांच्या तिकिटांची रोकड निसटल्याने महामार्गावर अक्षरशः नोटांचा पाऊस पडला. या घटनेमुळे हायवेवरील वाहने काही काळ रोखून धरण्यात आली. त्यावेळी संबंधित कंडक्टर, प्रवासी आणि वाहनचालकांनी वेळीच धाव घेऊन हायवेवर पसरलेल्या नोटा गोळा केल्या आणि कंडक्टरच्या ताब्यात दिल्या. यात तब्बल 12 हजारांची रोकड पुन्हा मिळाली. तिकिटांच्या हिशेबातील फरकात दोनशे रुपये कमी असल्याने हे उरलेले 200 रुपये कंडक्टरने स्वतःच्या खिशातून भरले. मात्र, रस्त्यावर नोटा पसरल्याने कंडक्टरवर आलेले आरिष्ठ्य प्रवासी, इतर वाहनचालक माणसातील माणुसकीने परतवून लावले. लोभ, हव्यासावर माणसातील माणुसकी, सहकार्य आणि मदतीच्या भावनेने विजय मिळवला.

रात्रीची वेळ, त्यातच नोटा रस्त्यावर पडल्यावर हायवे रोखून धरल्याने वाहनांच्या हॉर्नचा कर्णकर्कश्य गोंगाट सुरू झाला. या प्रकारामुळे बसमधील कंडक्टर पुरता भांबावून घाबरून गेला होता. मात्र, जवळपास संपूर्ण रक्कम परत आल्याने या कर्मचार्‍याचा जीव भांड्यात पडला.

- Advertisement -

रविवारी सायंकाळी सहा वाजता जव्हारहून येणारी ठाणे आगाराची शिवशाही बस भिवंडी बस स्थानकातून निघाली. एमएच13 सीयू 7494 क्रमांकाचे बसचालक ठिपके हे मुंबई-नाशिक महामार्गावर आले. दोनही बाजूने वाहने वेगाने धावत होती. गडद अंधारात बसचालक ठिपके भिवंडी- पिंपळास फाट्यावर येताच मागून येणार्‍या वाहनांना बस कंडक्टर गणेश डी. भावसार यांनी मंदगतीने वाहने चालवण्याची सूचना करण्यासाठी बसच्या खिडकीतून हात बाहेर काढला आणि काही कळायच्या आत हातात असलेल्या प्रवाशांच्या तिकिटांची रोकड हात दाखवताना अचानक क्षणार्धात खाली निसटली.

कंडक्टरनी जिवाच्या आकांताने, ठिपके दादा गाडी थांबवा..अशी हाक दिली, त्यावर चालक ठिपसेंनी करकचून ब्रेक मारल्यावर प्रवाशांना सुरुवातीला अपघात झाल्यासारखे वाटले. मात्र, दुसर्‍या क्षणी रोकड पडल्याचा प्रकार समजताच प्रवाशांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणार्धात हालचाल केली. वाहक गणेश भावसार यांनी बसचा दरवाजा क्षणार्धात उघडला, रस्त्यावर उडी मारून हातवारे, जोरदार आरडाओरडा करत मागील वाहने रोडवर अडवली. यावेळी 500, 100, 200 तसेच इतर किरकोळ नोटांचा सडा रस्त्यावर पसरला होता. हेडलाईट्सच्या उजेडात कंडक्टर भावसार पडलेल्या नोटा गोळा करत होते.

- Advertisement -

काही मोटारसायकलचालकांनी गणेश भावसार यांना नोटा गोळा करायला मदत केली. पण भावसारांच्या मनात भीतीही होती. मदतीच्या नावाखाली कुणी नोटा गहाळ केल्या तर… मात्र तसे झाले नाही. लोभ आणि हव्यासावर माणुसकीच्या मदतीने मात केली होती. एकामागोमाग एक प्रवाशांच्या मोबाईल्सचे टॉर्च लागले, रस्त्यावरील नोटांचा सडा एकेक करून उचलला जाऊ लागला. एक एक नोट गोळा करून कंडक्टरांकडे दिली जात होती. त्याच वेळी, सापडतील हो सगळ्या नोटा, चिंता करू नका, आपण शोधू…असा धीरही दिला जात होता. साधारण 15 मिनिटे रस्त्यावर नोटांचा शोध सुरू होता. या ठिकाणी जास्त माणसं गोळा होणंही नोटांची चोरी होण्याच्या शक्यतेने धोक्याचं होतं. थांबलेल्या वाहनांचे हॉर्न वाजत होते आणि दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

अखेर मिळालेल्या नोटा उचलून घामाघूम झालेले गणेश भावसार यांनी गोळा केलेल्या नोटांचा सडा ओंजळीत भरून बसमध्ये आणला. त्यांचा चेहरा धास्तावलेला रडकुंडीला आला होता. प्रवाशांच्या तिकिटाची रक्कम असल्याने प्रवाशांनी कंडक्टर भावसार यांना धीर दिला. पुढे बस तातडीने आगाराकडे नेण्यात आली आणि पुढे नोटा मोजण्याचे काम सुरू झाले. हा हिशेब जुळणे महत्वाचे होते. सगळे पैसे परत आलेत का….या प्रश्नाने कंडक्टर भावसार यांच्या चेहर्‍यावर तणाव स्पष्ट होता. परिवहन बस कर्मचार्‍यांचा पगार तो कितीसा त्यात हा फटका आणि सेवेतील रेकॉर्ड खराब होण्याची भीती भावसार यांच्या चेहर्‍यावर होतीच. भावसार यांनी धडधडत्या काळजाने रोकड मोजायला घेतली. ती संपूर्ण 12 हजार भरणे गरजेचे होते. रोख पूर्ण मोजल्यावर त्यात 200 रुपयांचा फरक स्पष्ट झाला. 12 हजार 200 रुपयांपैकी 12 हजारांची रक्कम हाती आली होती, मोठे आर्थिक संकट केवळ 200 रुपयांवर निभावल्याने हा वरचा 200 रुपयांचा फटका गणेश भावसार यांनी स्वतःच्या खिशातून भरला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -