घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राला स्वाईन फ्लूचा विळखा, नवीन वर्षात १३ मृत्यू

महाराष्ट्राला स्वाईन फ्लूचा विळखा, नवीन वर्षात १३ मृत्यू

Subscribe

महाराष्ट्रात सध्या स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. २०१९ या नवीन वर्षाच्या १ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत १४९ रुग्नांना स्वाईन फ्लू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात सध्या थंडीची लहर कायम आहे. गेल्या काही महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस देखील पडला. त्यातून, सध्या साथीच्या आजारांसह स्वाईन फ्लूचा वाढता धोका राज्यात दिसून येत आहे. २०१९ या नवीन वर्षात १ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात एकूण १३ रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. तर, १४९ नवीन स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्याच्या वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे तसंच तापमानाच्या चढ-उतारामुळे राज्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. थंडी आणि ऊन हे वातावरण स्वाईन फ्लूच्या विषाणूंसाठी पूरक असते. त्यामुळे, राज्यातील नागपूर, नाशिक, पुणे, सातारा, अमरावती, अहमदनगर आणि भंडारा या भागांतील ग्रामीण आणि शहरी परिसरात मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. स्वाईन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या लक्षात घेता अतिदक्षता विभागात रुग्णांवर उपचार कसे करावेत, यावर भर देत मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या गेल्या आहेत. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे आणि अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, अशा रुग्णांवर या मार्गदर्शनानुसार उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील वातावरणाच्या बदलामुळे आणि पडत असलेल्या थंडीमुळे सध्या स्वाईन फ्लूचं प्रमाण वाढत आहे. १ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीदरम्यान राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून १४९ स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, आतापर्यंत एकूण १३ मृत्यू झाले आहेत. गेल्यावर्षी ४६२ रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला होता. हे वातावरण स्वाईन फ्लूच्या विषाणूसाठी पुरक आहे. त्यामुळे, या वातावरणात स्वाईन फ्लूचे विषाणू मोठ्या संख्येने आढळून येतात. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातील काही शहरांमध्ये ही स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. स्वाईन फ्लूमुळे राजस्थानमध्ये ७२, पंजाबमध्ये २६ आणि काश्मीरमध्ये १२ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. 
– डॉ. प्रदीप आवटे, राज्याचे सर्वेक्षण अधिकारी

५० टक्के मृत्यू विदर्भातून 

उत्तरेहून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रात सध्या थंडीचं वातावरण आपल्याला अनुभवायला मिळत आहे. याच कालावधीदरम्यान नागपूरच्या काही ग्रामीण भागांमध्ये पाऊस पडला. त्यातून स्वाईन फ्लूचं प्रमाण हे वाढलं. १३ पैकी ४ मृत्यूंची नोंद ही नागपूरमधून, अमरावतीमधून २ आणि भंडाऱ्यातून १ अशा विदर्भातून ७ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे, ५० टक्के मृत्यू हे फक्त विदर्भातून आहेत. तसंच, अहमदनगरहून एका मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्र एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

नाशिकमध्येही वाढता प्रादूर्भाव 

नाशिकमध्येही स्वाईन फ्लूचा वाढता प्रभाव पाहायला मिळत आहे. नाशिकच्या ग्रामीण भागातून १३ स्वाईन फ्लू सदृश रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कडाक्याची थंडी असल्याकारणाने ग्रामीण भागातून स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढती आहे. पण, शहरात तेवढा प्रादूर्भाव नसल्याचं नाशिक महापालिका रुग्णालयाचे डॉ. राहुल गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

असा आहे स्वाईन फ्लू उपचाराचा प्रोटोकॉल

स्वाईन फ्ल्यू रुग्णांना त्यांच्या लक्षणानुसार अ ब आणि क म्हणजेच सौम्य, मध्यम आणि गंभीर अशा वर्गीकरणानुसार उपचार देण्यात येतात. हे उपचार रुग्णास लक्षणे सुरू झाल्यापासून ४८ तासात सुरु होतील, याची दक्षता घेण्यात येते. ज्या रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग किंवा मूत्रपिंड/ यकृत यांचे जुनाट आजार असतात तसेच गरोदर माता यांच्या मध्ये हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो, यासाठी या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यायला हवी. कोणताही सर्दी, खोकला अंगावर न काढता तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे, हिताचे आहे, असंही डॉ. आवटे यांनी सांगितले.

- Advertisement -

‘ही’ आहेत लक्षणे 

सर्दी, खोकला, वारंवार शिंका, घशात खवखव, थंडी वाजून ताप, अंगदुखी ही ‘स्वाइन फ्लू’ची लक्षणे आहेत. या रुग्णाने त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होतो. याची बाधा इतरांना होऊ नये म्हणून रुग्णाने एका खोलीतच आराम करणे, गर्दीत जाणे टाळणे, इतरांच्या संपर्कात न येणे, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. हा रुग्ण केवळ स्वाइन फ्लूने दगावत नसून, फुप्फुसावर होणारा घात व न्यूमोनियामुळे त्याचा मृत्यू होतो.

मुंबईत स्वाईन फ्लूच्या रुग्णांत ९७ टक्क्यांनी घट

महाराष्ट्रात गेल्या वर्षी स्वाईन फ्लूचे अडीच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले होते. पण, मुंबईत स्वाईन फ्लूचं प्रमाण कमी झाल्याचं आढळून आलं आहे. मुंबईकरांसाठी ही खूषखबर आहे की, यंदा एच१एन१ चा प्रभाव राज्याच्या तुलनेत जवळपास नसल्यासारखाच आहे. मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी स्वाईन फ्लूच्या केसेसमध्ये जवळपास ९७ टक्क्यांनी घट झाली आहे. महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०१७ या साली स्वाईन फ्लूचे ९९५ केसेस समोर आले होते. पण, गेल्या वर्षी फक्त २५ केसेस समोर आले आहेत.

पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणात होणारा बदल स्वाईन फ्लूच्या विषाणूंसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. हे वातावरण त्यांच्यासाठी अनुकूल असतं. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या वर्षी वातावरणात झालेल्या चढ-उतारामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण अधिक होते. शहरातील दिवस आणि रात्रीच्या तापमानात जास्त अंतर नव्हतं. त्यामुळे शहरात स्वाईन फ्लूचे रुग्ण कमी आढळले.

वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढले आहेत. नागपूरमध्ये अनअपेक्षित पाऊस पडला. त्यातून स्वाईन फ्लूचे रुग्ण समोर आले. नागपूरमध्ये ४ रुग्णांना स्वाईन फ्लू मुळे जीव गमवावा लागला आहे. तसंच, राज्यात ही सध्या हीच परिस्थिती पाहायला मिळते.
– डॉ. अनुपकुमार यादव, आय़ुक्त, राष्ट्रीय आरोग्य अभियान
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -