घरमहाराष्ट्रपोलिसांनंतर आता सनदी अधिकारी; राज्यात २६ बाबूंच्या झाल्या बदल्या!

पोलिसांनंतर आता सनदी अधिकारी; राज्यात २६ बाबूंच्या झाल्या बदल्या!

Subscribe

राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आता सनदी अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.

गेल्या आठवड्याभरात १९० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आता सरकारने सनदी अधिकाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. आज एकात झटक्यात सरकारने भारतीय प्रशासकीय सेवा अर्थात आयएएसमधल्या तब्बल २६ वरीष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर राज्य सरकारने या अधिकार्‍यांच्या तडका फडकी बदल्या केल्या असल्याचं बोललं जात आहे. या बदल्यांमध्ये मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी सचिन कर्वे यांची नियुक्ती थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सचिव पदावर करण्यात आली आहे. तर नाशिकच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदी एम. जे. प्रदीप यांची नियुक्ती करण्यात आली असून यवतमाळ येथील सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेल्या एस. भुवनेश्वरी यांची नियुक्ती नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली आहे. सचिन कर्वे यांच्या जागेवर पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरिकर यांची निवड करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी बदल्या?

या बदल्यांत २००३ ते २०१५ च्या बॅचमधील अधिकार्‍यांचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांना अधिक महत्व प्राप्त झाले आहेत. या २६ बदल्यांमध्ये सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र भारुड यांची बदली नंदुरबारच्या जिल्हाधिकारी पदी करण्यात आली आहे. तर धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांची बदली धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. तर के. बी. शिंदे यांची बदली पालघरच्या जिल्हाधिकारी पदी करण्यात आली आहे. शिंदे हे गेल्या अनेक दिवसांपासून सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कार्यरत होते.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईसह राज्यभरातील ८९ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या!

म्हाडाच्या सीईओपदी बी. राधाकृष्णन

नवी मुंबईचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची बदली कामगार आयुक्त पदी करण्यात आली आहे. तर म्हाडा बोर्डाचे मुख्य अधिकारी डी. एस. कुशवाह यांची बदली महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डावर करण्यात आली आहे. तर कुशवाह यांच्या जागेवर राधाकृष्णन बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कार्यरत होते. तर अजित पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान कार्पोरेशनच्या कार्यकारी संचालक पदी करण्यात आली आहे. या बदलांसह एकूण २६ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -