एसटीचे संपकरी ३१०० कर्मचारी सेवेतून बडतर्फ

six thousand st buses will be out service 15 million passengers will be hit hard

गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. वारंवार आवाहन करूनही एसटी कर्मचारी कामावर हजर न राहिल्याने महामंडळाने एसटी कर्मचार्‍यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संप सुरू झाला होता त्यावेळी 92 हजार कर्मचारी पटलावर होते, दोन हजार कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती झाली होती. तसेच कालपर्यंत 3 हजार 100 कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले आहेत, अशी माहिती एसटीच्या व्यवस्थापकीय महासंचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. तसेच संप केल्यामुळे या काळात तब्बल 5 हजार कर्मचार्‍यांच्या सेवा समाप्त केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

साधारण 87 ते 88 हजार कर्मचारी सध्या पटावर आहेत, त्यातील 26 हजार 500 कर्मचारी कामावर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शक्यतो बडतर्फ झालेल्या कर्मचार्‍यांना सेवेत घेणार नाही, ती तेवढी सहज प्रक्रिया नाही, ती क्लिष्ट प्रक्रिया असल्याचे सांगण्यात आले आहे. एसटीचे 37 आगार पूर्ण बंद आहेत, तर उर्वरित आगार कमी क्षमतेने सुरू आहेत, असे चन्ने म्हणाले.

आम्ही कर्मचार्‍यांना तीन वेळा बजावूनही कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत, त्यामुळे ही कारवाई सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या कर्मचार्‍यांवर आतापर्यंत कारवाई झाली नाही, असे कर्मचारी कामावर हजर राहिल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तशी पत्रके प्रत्येक डेपोत लावली गेली आहेत. एसटीचा संप सुरूच राहिल्याने प्रवाशांना त्रास होत आहे, प्रवाशी खासगी वाहतुकीकडे वळत आहेत, त्यामुळे कर्मचार्‍यांनी कामावर हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी कंत्राटी कर्मचारी भरती करत असल्याची माहिती शेखर चन्ने यांनी दिली आहे.