घरताज्या घडामोडीकोल्हापूर राड्याप्रकरणी 36 जण अटकेत

कोल्हापूर राड्याप्रकरणी 36 जण अटकेत

Subscribe

400 जणांविरोधात गुन्हे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची माहिती

कोल्हापूर शहरातील स्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत असून शहरात शांतता आहे. अनेक भागातील दुकाने सुरू झाली आहेत. शहरात बुधवारी झालेल्या राड्याप्रकरणी 36 जणांना पोलिसांनी अटक केली आहे, तर 400 जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी तिघे अल्पवयीन आहेत. त्यांना बाल न्यायालयात हजर करून पुढील कारवाई केली जाईल. तसेच शहरातील 3 पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापुरात काही तरुणांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर औरंगजेब आणि टिपू सुलतानचे फोटो ठेवल्यावरून स्थानिक हिंदू संघटनांनी आंदोलन पुकारले होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चा काढण्यास पोलिसांनी मनाई केल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले. त्यातच गंजी गल्ली परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अखेर पोलिसांना लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढले आहेत.

- Advertisement -

जागोजागी पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले की, ज्या संघटनांनी जमाव जमवण्याचे आवाहन केले होते किंवा कोणीही प्रक्षोभक वक्तव्य केले होते असे सर्व फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये या व्हिडीओच्या माध्यमातून कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेदेखील यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या घटनेनंतर कोल्हापुरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. या राड्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळाचे पंचनामे करण्यात आले असून याबाबतची माहिती लवकरच देण्यात येणार असल्याचेही पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले.

- Advertisement -

डेटा मिळवण्याचे काम सुरू

कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्‍या 5 मुलांनी औरंगजेब आणि टिपू सुलतानचे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे या सर्व प्रकरणाला सुरुवात झाली. सदर मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. या मुलांनी त्यांचे सर्व सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केल्याने ते पुन्हा मिळविण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.

-महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -