विधान परिषदेत आमदारकी मिळाली, पण 75 हजार गमावले, नेमकं काय घडलं?

विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल हाती आल्यानंतर भाजपला चांगलाच धक्का बसलेला दिसून आला आहे. या निवडणुकीत विजयी उमेदवारांकडून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जंगी रॅली सुद्धा काढण्यात आली. परंतु कोकण शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेल्या भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजयोत्सवाचा चांगलाच फटका बसला आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयानंतर काढण्यात आलेल्या रॅलीत चोरट्यांनी थेट म्हात्रे यांच्या खिशावर डल्ला मारला. त्यांच्या खिशातील ७५ हजार लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार घडल्यानंतर म्हात्रे यांनी मतमोजणी केंद्रावरील पोलीस कर्मचाऱ्यांना याविषयी माहिती दिली. तसेच १२ हजाराचे घड्याळ चोरीला गेल्याचे म्हात्रे यांनी पोलिसांना कळविले आहे.

नेमकं काय घडलं?

निवडणुकीची मतमोजणी ज्याठिकाणी होती, त्याठिकाणी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जात होता. मलाही त्यांनी उचलून घेतले होते. त्यावेळी माझ्याकडे खर्चासाठी काही पैसे होते. मागील खिशात २५ हजार तर पुढील खिशात ५० हजार रुपये ठेवले होते. मात्र, हे पैसे कुणीतरी लंपास केले, असं आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले.

माझ्या दोन्ही खिशातून पैसे गेल्यामुळे मी कार्यकर्त्यांना अलर्ट केले. पण मला वाटलं नव्हतं असं काहीतरी होईल. कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी आणि इतर खर्चासाठी ही रक्कम माझ्या खिशात ठेवली होती, असं म्हात्रे म्हणाले. इलेक्शनच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांचे पैसे लंपास केले. याबाबत पोलिसांनी तक्रार नोंदवली असून त्याचा तपास सुरू आहे.

ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या विजयानंतर भाजपने दणक्यात सेलिब्रेशन केलं. म्हात्रेंचा विजय घोषित झाल्यानंतर सर्व भाजप पदाधिकाऱ्यांनी एकत्र जमून हा जल्लोष साजरा केला. भाजपने ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळत आणि फटाके फोडून कोकणातील विजयाचा आनंद साजरा केला. विजेते ज्ञानेश्वर म्हात्रे यांना खांद्यावर उचलून घेवून विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पनवलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजेते ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली.


हेही वाचा : कोकणातील ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष, म्हणाले, “हा तर एक प्रकारचा बदला…”