Coronavirus: बजाज कंपनीतील ७९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!

दिवसेंदिवस वाढत जाण्याऱ्या कोरोना रूग्णांमुळे औरंगाबादकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

bajaj company

औरंगाबाद येथील वाळूंज एमआयडीसीत बजाज कंपनीतील ७९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी दोन दिवस कंपनी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद येथील कंपनी अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार, रविवारी कंपनी बंद ठेवण्यास सांगितले आहे.

दिवसेंदिवस वाढत जाण्याऱ्या कोरोना रूग्णांमुळे औरंगाबादकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. औरंगाबादमध्ये २५ जूनला एका दिवसात २३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील १२४ आणि ग्रामीण भागातील १०६ जणांचा समावेश आहे. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४२६६ कोरोनाबाधित रुग्ण असून २२१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १६०१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत २१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये ७७ महिला आणि १५३ पुरूषांचा समावेश आहे.

तर राज्यात मागील २४ तासात ३ हजार ६६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्व रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत ७७ हजार ४५३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. दोन दिवसापासून राज्यातून दिलासादायक माहिती समोर येत असून कालदेखील ४ हजार १६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा बरे होण्याचा आकडा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ८४४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


हे ही वाचा – पडळकरांचं विधान भाजपची ‘मन की बात’ तर नाही ना?; ‘सामना’तून सवाल