घरमहाराष्ट्रअभिभाषणातून जनतेची दिशाभूल; आदित्य ठाकरेंची राज्यपालांवर टीका

अभिभाषणातून जनतेची दिशाभूल; आदित्य ठाकरेंची राज्यपालांवर टीका

Subscribe

मुंबईः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी हिंदीतून अभिभाषण केल्याने विरोधकांनी नाराजीचा सूर लावला आहे. सोबतच राज्यपालांनी अभिभाषणादरम्यान मांडलेले मुद्दे हे दिशाभूल करणारे होते, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. अधिवेशन संपल्यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणातील अनेक मुद्दे हे महाविकास आघाडीने सुरू केलेल्या कामांबाबत होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा उत्साह कमी जाणवत होता. अभिभाषणातून राज्यपालांनी जनतेची दिशाभूल केली का, असा प्रश्न उपस्थित होतो. दावोसबाबत त्यांनी चुकीची माहिती दिली. त्यामुळे सभागृहातील पटलावर सत्य बाजू आणण्याचा आम्ही अधिवेशनातून प्रयत्न करणार आहोत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न सुरू होता, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गद्दारी करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी गेल्या 6 महिन्यांत १२ कारणे दिली आहेत. त्यामुळे आता काय बोलणार? एक लक्षात घ्या जे गद्दार आहेत ते गद्दारच राहणार. त्यांच्यावरचा तो शिक्का पुसला जाणार नाही. गद्दारांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये विविध घोषणा झाल्या आहेत. विविध वचने देण्यात आली, मात्र गद्दारांनी काहीही वचने पूर्ण केली नाहीत, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -