गणपतीनंतर आता नवरात्रोत्सवातही आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिंदे गटाचे बॅनर

warli

मुंबई – खरी शिवसेना कोणाची हा वाद असतानाच आता शिंदे गटाची नजर शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवातही वरळी मतदारंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकत आहेत. त्यामुळे  मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात विशेष रस दाखवत असल्याचे चित्र दिसत आहे.

त्या बॅनरवर काय? –

वरळीतील अनेक देवींच्या मंडळांसमोर गेट उभारण्यात आले आहे. या गेटवर आणि आजूबाजूला लावलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचे फोटो दिसत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असंल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे वरळीत शिवसेनेच्या बॅनरपेक्षा शिंदे यांचेच बॅनर अधिक असल्याचे दिसत आहे.

गणेशोत्सवातही शिंदेंचे बॅनर –

याआधी गणेशोत्सवात एकनाथ शिंदे यांचे बॅनर वरळी मतदारसंघात लागले होते. वरळीचा लाडका मार्केटचा राजा इथे श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वागत कमानीवर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे पोस्टर लावण्यात आले होते. कमानीवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो होते. त्यामुळे वरळीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा शिंदे गटाचा इरादा असल्याची चर्चा होती.