घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकृषीउत्पन्न बाजार समिती निवडणूक : उमेदवारास ८ लाखाची उत्पन्न मर्यादा; 'या' आहेत...

कृषीउत्पन्न बाजार समिती निवडणूक : उमेदवारास ८ लाखाची उत्पन्न मर्यादा; ‘या’ आहेत इतर अटीशर्ती

Subscribe

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवाराची कुटुंबाची एकत्रित वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असून कुटुंबाची जमीन धारणा मर्यादा किमान १० आर व कमाल ५ एकर असावी असे निर्देश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांनी दिले आहेत. यासंबंधी आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील व्यक्तीबाबत उपरोक्त दोन्ही बाबींचे निकष विचारात घेऊन तहसिलदार यांनी दिलेला दाखला अर्जासोबत जोडावा लागणार आहे.

आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील व्यक्तीच्या उत्पन्न आणि जमीन धारणा यांच्या मर्यादेबाबत महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणूक) नियम २०१७ मध्ये स्पष्टता नसल्याने याप्रकरणी क्षेत्रीय स्तरावर संभ्रम निर्माण झाल्याने तो दूर करण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंगळवारी (दि.28 मार्च) शासन आदेश काढून संभ्रम दूर केला. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम १३ (१) (अ) (दोन) मधील तरतुदीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीद्वारे ग्रामपंचायतींच्या सदस्यांकडून ४ सदस्य निवडले जाणार असून त्यापैकी १ सदस्य आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील व्यक्ती असणार आहे.

- Advertisement -

शासन आदेशाप्रमाणे, महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणूक) नियम २०१७ चे नियम २१ मधील तरतुदीनुसार आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील उमेदवाराने मागील वर्षाचे त्याचे उत्पन्न व भू धारणा याचा तपशिल नामनिर्देशन पत्रामध्ये नमूद करणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणूक) नियम २०१७ चे नियम ९(१) नुसार कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीकरीता संबंधित उमेदवाराकडे किमान १० आर जमीन असणे अनिवार्य आहे. यासंबंधीचे आवश्यक असलेले सर्व निर्देश डॉ.पी.एल. खंडगळे सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे. यांनी आदेश निर्गमित केले आहे.

यासंबंधीचे सर्व निर्देश जिल्हा पातळीवर जिल्हाधिकार्‍यांनी सर्व तहसिलदार तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहेत, तहसिलदारांनी आदेशांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजारसमितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (दि २७) पासून प्रारंभ झाला. ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात असून अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एक अर्ज जमा करण्यात आला आहे. ग्रामपंचायत-सर्वसाधारण मतदारसंघातून गिरणारे येथील तानाजी निवृत्ती गायकर यांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला.

- Advertisement -
अर्ज दाखल करण्यासाठी अटीशर्ती

किमान दहा गुंठे जमीन असेल आणि शेतकरी असल्याचा पुरावा असेल तरच शेतकरी उमेदवारांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. निडणुकीसाठी सहकारी संस्था प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी, आडते व मापाडी मतदारसंघ तसेच हमाल व मापाडी मतदारसंघ यातून उमेदवारी अर्ज दाखल केले जातात. शेतकरी म्हणून उमेदवारी करणार्‍यांकडे किमान दहा आर. जमीन असली पाहिजे, शेतकरी व बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी व शेतकरी असल्याबाबतचा संबंधित गावच्या तलाठ्यांचा दाखला देखील बंधनकारक करण्यात आला आहे. व्यापारी, हमाल व तोलारी मतदारसंघासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना,अनुज्ञपती, लायसेन्स यापैकी एकाची स्वसाक्षांकित प्रत सादर करावी लागेल. दरम्यान, उमेदवारांना येत्या ३ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे कामकाज पाहत आहेत. उमेदवारांनी अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा एक फोटो (सर्वांसाठी); आधार कार्डची स्वसाक्षांकित प्रत (सर्वांसाठी); प्रतिज्ञापत्र; तलाठी यांचा रहिवाशी दाखला (सर्वांसाठी); जात प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत (राखीव प्रवर्गासाठी); जात वैधता प्रमाणपत्राची स्वसाक्षांकीत प्रत (राखीव प्रवर्गासाठी); कोणतीही थकबाकी नसल्याबाबत बाजार समिती सचिवांचा दाखला (सर्वांसाठी); तहसिलदार यांनी दिलेले आर्थिक दुर्बल घटक असल्याचे प्रमाणपत्र व घोषणापत्र (आर्थिक दुर्बल घटकासाठी); किमान 10 आर जमीन धारण असलेला अद्ययावत 7/12 उतारा (फक्त शेतकरी उमेदवारासाठी); शेतकरी व बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील रहिवाशी व शेतकरी असल्याबाबत संबंधित गांवच्या तलाठी यांचा दाखला; व्यापारी, हमाल व तोलारी मतदार संघासाठी कृषि उत्पन्न बाजार समितीचा परवाना / अनुज्ञप्ती / लायसेन्सची स्वसाक्षांकित प्रत; अनामत रक्कमेची मुळ पावती हे जोडण्यात यावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -