घरट्रेंडिंगNCP Vs NCP : अजित पवारांना संवैधानिक इशारा! शरद पवार गटाने सांगितल्या...

NCP Vs NCP : अजित पवारांना संवैधानिक इशारा! शरद पवार गटाने सांगितल्या घड्याळ चिन्ह वापराच्या अटी-शर्ती

Subscribe

NCP Name and Symbol Issue मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाला, यावरुन सोशल मीडियावर झुंजत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह कोणाचे या याचिकेवर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालाने अजित पवार गटाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. मात्र अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह वापरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्याचे ट्वीट अजित पवार गटाने केले. त्यावर शरद पवार गटाने सविस्तर पोस्ट लिहित “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची मोडतोड करून जनतेला चुकीची माहिती देणं हे आपल्यासारखा स्वयंघोषित स्पष्टवक्तेपणावाल्यांना शोभत नाही…! असा टोला अजित पवारांना लगावला आहे. त्यासोबतच त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि सूचना काय आहेत, याची माहिती करुन देत चुकीच्या माहितीचे ट्वीट डिलिट करु नका. चूक मान्य करुन न्यायालयाची आणि जनतेची माफी मागा असे सुनावले.

काय आहे प्रकरण

केंद्रीय निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर सर्वोच्च न्यायालयात जस्टिस सूर्यकांत आणि के.व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे.

- Advertisement -

19 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने घड्याळ चिन्ह वापरण्यासंबंधी अजित पवार गटाला महत्त्वाचे निर्देश आणि सूचना दिल्या. मात्र त्याकडे कानाडोळा करत अजितदादा गटाने घड्याळ चिन्ह वापरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्याचे ट्वीट केले. वास्तविक अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापराबाबत अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. तर शरद पवार गटाला तुतारी वाजवणार मणूस हे चिन्ह लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
तर, अजित पवारांकडील घड्याळ हे चिन्ह या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कायम राहणार आहे. मात्र त्यासाठी न्यायालयाने अजित पवार गटाला काही अटी शर्ती लागू केल्या आहेत. त्यानुसार, जिथे जिथे अजित पवार गट घड्याळ चिन्हाचा वापर करणार तिथे त्यांना “घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे!” असे नमूद करावे लागणार आहे. याचा उल्लेख अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना टॅग करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरील ट्विटमध्ये नाही. यावरुन शरद पवार गटाने जोरदार टोला लगावला आहे.

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना हा संवैधानिक इशारा असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

न्यायालयाच्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन होऊ नये यासाठी न्यायालयाने सांगितले आहे की, बॅनर्स, पोस्टर्स, व्हिडीओ किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी जिथे जिथे घड्याळ चिन्हाचा वापर करण्यात येईल त्या त्या ठिकाणी “घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे!” असे नमूद करावे. असे खणखणीत निर्देशच सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला देण्यात आले आहे, असे शरद पवार गटाने म्हटले आहे.

अजित पवार गटाने न्यायालयाने घातलेल्या अटी, शर्ती लपवण्याचा केलेला प्रयत्न शरद पवार गटाने उघड करत त्यांनी न्यायालयाच्या निर्देशांच्या अवमानाबद्दल होणाऱ्या कारवाईला तुम्हाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे. सोबतच हे ट्वीट डिलीट करु नका. चूक मान्य करून न्यायालयाच्या अवमानाबद्दल आणि जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मागा, असा टोला शरद पवार गटाने लगावला आहे. आता अजित पवार गट ट्वीट डिलीट न करता माफी मागणार का, हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -