Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र तुळजाभवानी मंदिर समितीच्या 'त्या' आदेशावर अजित पवारांची सडकून टीका

तुळजाभवानी मंदिर समितीच्या ‘त्या’ आदेशावर अजित पवारांची सडकून टीका

Subscribe

तुळजाभवानी मंदिर समितीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. कोणत्या देवाने सांगितलं हाफ पँट घालून दर्शन घेऊ नका, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित करत मंदिर समितीवर संताप व्यक्त केला.

महाराष्ट्रातील तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराकडून काल गुरुवारी (ता. 18 मे) कपड्यांच्या संदर्भातील एक नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार महिलांना आणि पुरुषांना वेस्टर्न कपडे घालून मंदिर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. पण या निर्णयाला विरोध झाल्यानंतर काही तासांतच मंदिर समितीकडून यु-टर्न घेत हा निर्णय मागे घेतला. पण या मुद्द्यावरून तुळजाभवानी मंदिर समितीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. कोणत्या देवाने सांगितलं हाफ पँट घालून दर्शन घेऊ नका, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित करत मंदिर समितीवर टीका केली आहे.

हेही वाचा – समीर वानखेडेंना २२ मेपर्यंत अटकेपासून संरक्षण; CBI, NCB ला हायकोर्टाची नोटीस

- Advertisement -

यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्ही शाळेत असताना आम्हाला दहावीपर्यंत हाफ पॅंट घालून यावं लागत होतं. तेव्हा घरचे सांगायचे की तुम्ही अकरावीत गेल्यावर तुम्हाला फुल पॅंट दिली जाईल. ही अशी पद्धत ग्रामीण भागात होती. मुलं हाफ पॅंट घालून आली म्हणून दर्शन घेऊन द्यायचं नाही हे असं कुणी सांगितलं? कोणत्या देवानं सांगितलं हाफ पॅंट घालून दर्शन घेऊ नका? काही जण याचा विपर्यास करत आहेत, असेही यावेळी अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले.

भारतीय संस्कृतीप्रमाणे अनेक वेगवेगळ्या धर्मात, पंथात वेगवेगळा पेहराव आहे, काही ठिकाणी लुंगी पायजमा घालण्याची पद्धत आहे, तर अलीकडे जिन्स पॅंट मोठ्या प्रमाणात घातली जाते. पेहराव योग्य असावा याबद्दल दुमत असायचे कारण नाही. पण वळून बघतील असे काही परिधान केल्यास आपण समजू शकतो. ते देखील नियमात नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांना हाफ पॅंटमुळे तुळजापूर मंदिरात प्रवेश नाकारणे हे आक्षेपार्ह आहे. याशिवाय काही जण आव्हान करतायत की, या देशाला पुन्हा एकदा शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गरज आहे. हे महापुरूष पुन्हा एकदा जन्माला आले पाहिजेत. आज एकविसाव्या शतकात अशा घटना घडतात हे पाहून एक लोकप्रतिनिधी म्हणून कमीपणा वाटतो, असे म्हणत त्यांनी मंदिर समितीच्या निर्णयाबाबत संताप व्यक्त केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -