घरमहाराष्ट्रअजित पवार पुन्हा बंडाच्या तयारीत! ठाकरे सरकार २ महिन्यांत कोसळण्याचे विरोधकांचे भाकित!

अजित पवार पुन्हा बंडाच्या तयारीत! ठाकरे सरकार २ महिन्यांत कोसळण्याचे विरोधकांचे भाकित!

Subscribe

‘ठाकरे सरकार दोन महिन्यांत कोसळणार’, हे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांचे उद्गार खरे ठरतात की काय? अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा बंडाच्या तयारीत असून आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांचा मोठा गट ते भाजपमध्ये घेऊन जाणार असून दादांच्या समर्थकांना मंत्रिमंडळात महत्वाची खाती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्यापूर्वी अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता या अधिकाराने भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेळीच या बंडातील हवा काढून घेतल्याने दादांमागून भाजपच्या तंबूत जाण्याच्या विचारात असलेले आमदार शांत झाले आणि स्वतः दादाही गेल्या पावलाने परत येऊन मोठ्या पवारांचे नेतृत्व त्यांनी मान्य केले. मात्र, आपल्या काकांनी उभे केलेले ठाकरेंचे ढकलगाडी सरकार त्यांना मान्य नाही. या अतीसंयमी सरकारमध्ये राहून दादांच्या वेगवान कारभाराला ब्रेक लागला असून स्वतः मंत्रालयात दहा बारा तास काम करून हे सरकार पळत नसेल तर आपल्या एकट्याच्या मेहनतीला काही अर्थ नाही, अशी दादांची भावना प्रबळ झाली आहे. विशेष म्हणजे ही भावना आणि दादांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांचे भाजपला ‘जय श्रीराम’ म्हणणे हा ठरवून साधलेला योगायोग असल्याचे बोलले जाते.

थोरल्या पवारांनी अजितदादांनाच अप्रत्यक्षपणे सुनावले!

शरद पवारांची धर्मनिरपेक्ष भूमिका आणि राम मंदिराच्या पायाभरणीच्या तोंडावर त्यांनी मंदिरापेक्षा या घडीला कोरोनाशी लढायला हवे, असे मोदी सरकारला उघड सुनावले होते. पण, आजोबा एक बोलत असताना नातू पार्थने राम मंदिर पायाभरणीला पाठिंबा देत तसे थेट मोदींना पत्र पाठवत आपल्या भावना कळवल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेला पार्थ छेद देत असतानाही मोठे पवार शांत बसले. पण, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात पुढे होऊन विरोधी पक्षाप्रमाणे सीबीआय चौकशीची मागणी उचलून धरत पार्थ यांनी सर्व नियम धाब्यावर बसवल्याने पवार प्रचंड नाराज झाले आहेत. यामुळेच त्यांनी पार्थ हे अपरिपक्व असल्याची उघड भाष्य केले आहे. पवार सहजासहजी सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होताना संयमी भूमिका घेतात. मात्र यावेळी त्यांनी पार्थला फैलावर घेताना अजितदादांनाही खरंतर पार्थला दोन बोल सुनावण्याची जबाबदारी तुमची होती, पण मला हे करावे लागले, असे न बोलता सुनावले आहे.

- Advertisement -

हा सारा प्रकार पाहता पवार घराण्यात सर्व काही आलबेल सुरू असल्याचे दिसत नाही. पार्थ राम मंदिरवरून वाद होऊन गप्प बसणार नसेल आणि सुशांत सिंहसारख्या अतिशय संवेदनशील प्रकरणात आघाडी सरकारच्या विरोधात भूमिका घेणार असेल तर याचा अर्थ अजितदादांची याला मूक संमती असल्याचे सांगितले जाते. ही संमती म्हणजे दोन महिन्यानंतर कोसळणाऱ्या ठाकरे सरकारची नांदी आहे. मुख्य म्हणजे याची तयारी दिल्लीत झाली असून अमित शहा यांच्याकडून हिरवा कंदील मिळताच ठाकरे सरकार कोसळेल, अशी सूत्रांची माहिती आहे. मागच्या वेळेला रात्रीच्या अंधारात निर्णय होऊन पहाटे शपथविधी करण्याचा धावता खेळ यावेळी न करता अगदी ठरल्या संहितेप्रमाणे अजितदादांच्या मदतीवर फडणवीस सरकार सत्तेवर येईल.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड या ज्येष्ठ नेत्यांचा अपवाद वगळता अजित पवार यांच्या मागे राष्ट्रवादी आमदारांचा मोठा गट उभा आहे. विशेष म्हणजे आज धनंजय मुंडे, राजेश टोपे, अनिल देशमुख हे निष्ठावंत समजले जात असले तरी ते सत्तेसाठी अजितदादांबरोबर भाजपच्या वळचणीला कधीही जाऊ शकतात. राष्ट्रवादीतील तरुण आमदारांचा मोठा गट या क्षणाला अजितदादांच्या मागे आहे. ५४ पैकी निम्म्यापेक्षा जास्त आमदार त्यांच्या सोबत असल्याचे दिसते. सध्या भाजपचे १०५ आमदार असून अपक्षांच्या पाठिंब्याचा विचार करता हा आकडा १२० च्या आसपास जाऊ शकतो. बहुमतासाठी १४५ चा आकडा गाठण्यासाठी २५ आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादीमधून ही संख्या मिळेल, असे जरी बोलले जात असले तरी प्रसंगी शिवसेना आणि कॉंग्रेसच्या आमदारांना गळाला लावण्याची भाजपची तयारी आहे. यासाठी चाचपणी सुरू असल्याचे सांगितले जाते. काँग्रेस आणि शिवसेनेकडून हा आकडा दहाच्या आसपास आल्यास मग फडणवीस सरकारला काही अडचण येणार नाही, असे बोलले जाते.

- Advertisement -

आव्हाड पुढे, दादा नाराज!

ठाकरे सरकारमध्ये सध्या राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची चलती असून ते म्हणतील ती पूर्व दिशा असल्याचे चित्र आहे. त्यांच्या महत्वाच्या फायली उद्धव ठाकरे यांच्याकडून तातडीने मंजूर होताना दिसत आहेत. याशिवाय राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांच्या मतदार संघात काय चालले आहे? याची माहिती आव्हाड यांना द्यावी लागत आहे. ही माहिती दिल्यानंतर काय करायला हवे? याच्या सूचना आव्हाड देताना दिसत असून शरद पवार यांच्या सुचनेनुसार पक्ष मजबूत करण्याचे हे काम सुरू असल्याचे चित्र दाखवले जात आहे. आव्हाड यांच्या बंगल्यावर जाऊन ही माहिती देणारेच आमदार मग अजितदादांना हे काय चालले आहे, अशी व्यथा मांडताना दिसत आहेत. या नाराज आमदारांना सध्या शांत राहण्याचा सल्ला अजित पवार देत असून जेव्हा गरज असेल तेव्हा काय करायचे ते सांगितले जाईल, असे सांगितले जात आहे.

असे झाले तर… नियमांचा अभ्यास सुरू

अजित पवार यांच्या सोबत येणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदारांचा मोठा गट तसेच शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये घेऊन त्यांना पुन्हा निवडून आणायचे असल्यास किंवा दोन तृतीयांशपेक्षा अधिक राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट भाजपमध्ये विलीन होणार असेल तर काय करावे लागेल, याचा जोरात अभ्यास सध्या भाजपमध्ये सुरू आहे. यासाठी कर्नाटक तसेच मध्य प्रदेश मध्ये काँग्रेसचे सरकार पाडताना केलेल्या घोडेबाजार तसेच नंतरच्या कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. दोन महिन्यानंतर कुठल्याही परिस्थितीत भाजप सरकार आणायचे असा निर्धार शहा यांचा पक्का झाला आहे.

राऊतांचा दावा मात्र कायम

दरम्यान, हे सगळं एका बाजूला असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणण्यात ज्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली, ते शिवसेनेचे खासदार संजय राऊत मात्र वारंवार आपल्या मुलाखती आणि पत्रकार परिषदांमधून ठाकरे सरकार शाबूत असल्याचा दावा करत असतात. ‘फक्त भाजपचे आमदार टिकवून ठेवण्यासाठी भाजपकडून सरकार पडण्याचे मुहूर्त जाहीर केले जात आहेत. ठाकरे सरकार स्थिर असून सरकारमध्ये कुणाच्याही काही तक्रारी असल्या, तर त्या त्या वेळी तक्रारी दूर केल्या जातात’, असं संजय राऊत छातीठोकपणे सांगत असतात. त्यामुळे नक्की सत्ताधारी आणि विरोधक यांच्या पडद्यामागे काय हालचाली सुरू आहेत, याचा अंदाज लागणं कठीण झालं आहे.

भाजपला सरकार पाडण्यात रस नाही – आशिष शेलार

सरकार पाडण्याच्या सर्व चर्चा भाजपकडेच अंगुलीनिर्देश करत असताना भाजपकडून मात्र या मुद्द्यावर हात वर करण्याचीच भूमिका घेतली जात आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसला स्वत:च्या घरातला विसंवाद लपवण्यासाठी भाजपमधून काही आमदार येतील अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्याला यश येण्याची शक्यता नाही. जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्वत:च्या पक्षात जरी संवाद साधला, तरी खूप होईल. अन्य पक्षातल्या आमदारांची चिंता करू नका. भाजपला कुणाचेही आमदार आणण्यात रस नाही किंवा सरकार पाडण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही’, अशी स्पष्ट भूमिका भाजप आमदार आशिष शेलार यांनी मांडली आहे.


हेही वाचा – पार्थच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही – शरद पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -